रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

मराठी लघुकथा संच - ५

 

मराठी लघुकथा संच - ५


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

लघुकथा क्रमांक - २१

      एका काकांनी पुतणीला शिकण्यासाठी खूप मदत केली. काका केवळ शिक्षण देऊन थांबले नाहीत तर तिला नोकरी लावण्यासाठीही खूप प्रयत्न केले. पुतणीला नोकरी लागली. तिला लग्नासाठी स्थळं येऊ लागली. एक स्थळ जुन्या पाहुण्यातलं होतं. मुलगा आय. टी. आय. होऊन एक कारखान्यात नोकरी करत होता. ते लोक काकांच्या मागे लागले होते. त्याकाळी फोनची व्यवस्था नसल्याने काकांनी पुतणीला पत्र पाठवून याबाबतीत काय करायचं ते विचारलं. पुतणीने काकांना पत्रात लिहलं, "काका तुम्हाला याबाबतीत जे योग्य वाटेल ते करा, कारण मला खात्री आहे की माझं वाईट करायला प्रत्यक्ष परमेश्वर जरी आले तरी तुम्ही परमेश्वराला तसं करण्यापासून विनवणी करुन रोखाल." काकांनी पाहुण्यांना नकार कळवला व म्हणाले, "त्याला माझ्या मुलीची भाषाही कळणार नाही."


लघुकथा क्रमांक - २२

      एका मामाकडे दहा-बारा वर्षांची भाची शिकवण्यासाठी राहिली होती. भाचीची आजी स्वभावाने फारच कडक होती. मामीला वरचेवर माहेरी जाऊच द्यायची नाही, म्हणून मामा-मामी दुसऱ्या कुठल्या तरी कामाला गेले, की माहेरी जाऊन यायचे. सोबत भाची असायचीच. तिला आजीला सांगू नकोस असे सांगितले जायचे. ती मामाला ब्लॅकमेल करायची, मला हे घेऊन द्या नाहीतर आजीला सांगते. मामा बिचारे तिला काय हवं ते घेऊन द्यायचे. पुढे भाचीचे लग्न झाले. ती सासरी गेली पण ब्लॅकमेल करायची सवय मात्र गेली नाही. तिच्या सासरी एकत्र कुटुंब पद्धत होती. भाची नवऱ्याच्या संमतीने काही रक्कम आईकडे आणून ठेवायची. मामीच्या भावावर एक संकट आले. तो बहिणीच्या मळातल्या घरात राहून कामधंदा करुन उदरनिर्वाह करु लागला. ही गोष्ट आजीला माहीत नव्हती. एके दिवशी भाचीने मामीला फोन केला व म्हणाली, "मला सोन्याच्या रिंगा करून द्या नाहीतर आजीला सांगते." मामी वैतागून म्हणाली, "सांग, माझ्याकडे तुझ्या सासूचा फोन नंबर आहे, तिला तू पैसे साठवल्याचं सांगते." भाची सुतासारखी सरळ झाली.


लघुकथा क्रमांक - २३

     खाडे सर एकदम हुशार होते. अध्यापन उत्कृष्ट होतं. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा याबाबतीत विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करून घ्यायचे. त्यामुळे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक त्यांच्यावर खूष होते. खाडे सरांना एकच वाईट सवय होती. प्रत्येक दोन-तीन वाक्ये बोलले की त्यानंतर 'च्याआयला' म्हणायचे. त्यांच्या या बोलण्याची सवय झाली होती. त्यांच्या शाळेत एक नवीन विद्यार्थी आला. त्याला ही गोष्ट खटकली. त्याने ही गोष्ट पालकांना सांगितली. पालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की, सर आईवरून शिव्या देतात. अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी त्यांना बोलावले व याबद्दल विचारले. खाडे सर म्हणाले, "साहेब, सवय आहे च्याआयला!" यावर साहेब काय बोलणार?


लघुकथा क्रमांक - २४

     पाटील काकूंचं घर रिकामे झाले होते. त्यांच्याकडे राहणाऱ्या कुळाची बदली अन्यत्र झाली होती. भाड्यानं घर हवंय म्हणून घर बघण्यासाठी एक नवीन कूळ आलं. ते डी. फार्मसी. कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. किती लोक राहणार? भाडं किती? वगैरे बोलणं झाल्यानंतर त्यांनी घर पसंत असल्याचं सांगितलं. पाटील काकू निवृत्त शिक्षिका होत्या. त्यांनी शिक्षणशास्त्र विषयात पी. एच्. डी. पदवी प्राप्त केली होती. त्यांचं राहणीमान अगदी साधं होतं. साधी राहणी व उच्च विचारसरणी असं वागणं होतं. प्राध्यापक म्हणाले, "मी बी. फार्म. झालोय, बी. फार्म. म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला?" काकी म्हणाल्या, "बॅचलर इन फार्मसी, मी पी. एच्. डी. झाले आहे. पी. एच्. डी. म्हणजे काय माहीत आहे ना तुम्हाला?". प्राध्यापक महाशय मागे न बघता निघून गेले.


लघुकथा क्रमांक - २५

      एक कुटुंबात तीन आपत्ये असतात. मोठा मुलगा असतो व त्याहून लहान दोन बहिणी असतात. तिघांत काही कारणाने कुरबुर झाली की, आईबाबा म्हणायचे, "अरे तू मोठा आहेस, त्या काय मागतात ते दे, रडवू नकोस त्यांना." हे शब्द ऐकून ऐकून मुलगा कंटाळला होता. प्रत्येक वेळी मीच का समजून घ्यायचे असं त्याला वाटत होतं. तो आता बारा वर्षांचा झाला होता व बहिणी दहा व आठ वर्षांच्या होत्या. एके दिवशी मुलींना रडताना पाहून आईबाबांनी पुन्हा तीच कॅसेट लावली. मुलगा म्हणाला, "हे बघा, मी मोठा आहे हे मला मान्य आहे. पण पुढे आयुष्यभर मी मोठाच राहणार आहे. या दोघी म्हाताऱ्या झाल्या तरी माझ्यापेक्षा लहानच असणार म्हणून काय प्रत्येक वेळी यांना मीच समजूनच घ्यायचं का?" आईबाबा अवाक् होऊन मुलाकडे पाहू लागले.

1 टिप्पणी:

  1. सर्वच कथा मार्मिक आहेत.अशाच आणखी काही कथा मिळून एक सुंदर पुस्तक तयार होईल...

    उत्तर द्याहटवा