कुटुंबजीवन काल, आज आणि उद्या
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
फोटो साभार: गुगल |
प्रस्तावना:
कुटुंब म्हणजे
अशा व्यक्तींचा समूह की त्यांचे एकमेकाशी एक उत्कट नातं असतं. कुटुंबातील व्यक्ती
एकमेकांच्या आधाराने वात्सल्याची कस्तुरी जणू एकमेकांच्या ह्रदयामध्ये भरतात आणि
त्यामुळेच त्यांच्या ह्रदयाच्या तारा जुळून गेलेल्या असतात. कुटुंबामध्ये
एकमेकांशी मोकळेपणी विचारांची, सुखदुःखाची देवाण घेवाण होत असते. एकमेकांतील
संवादाने आयुष्यातील चढ उतार सहज पार होतात. थोडक्यात कुटुंब म्हणजे जीवनातील
उन्नतीचे उगमस्थान होय.
कुटुंबजीवन काल:
पूर्वी एकत्रित
कुटुंबात खळाळणारा आनंद होता. व्यक्ती व्यक्तीच्या प्रेमाचं जाळं विणलं जात होतं.
एकमेकात जिव्हाळा, प्रेम, माया होती. कुटुंबातील सर्वच घटक एकमेकांच्या
वात्सल्याने, आपुलकीने बांधलेली असत. एकमेकांच्या साथीने सुख-दुःखात अश्रूनी
न्हाऊन निघत. वडीलकीच्या मायेच्या सावलीत सर्व निर्भयपणे वावरत. एकोणविसाव्या
शतकाच्या सुरूवातीपर्यंत एकत्र कुटुंबजीवन अस्तित्वात होते आणि ते आदर्शवत होते.
एका कुटुंब प्रमुखाच्या छत्राखाली घरातील सर्व लहान थोर मंडळी गुण्यागोविंदाने
नांदत होती. पूर्वीचे कुटुंबजीवन साधे नि सोपे होते. अन्न, वस्त्र, निवारा
एवढ्याच मूलभूत गरजा होत्या. कुणाच्याच अपेक्षा, महत्वाकांक्षा उच्च कोटीच्या
नव्हत्या. त्यामुळे कर्तासवरता कुटुंबप्रमुख जे सांगेल ते ऐकून संसाराचा रथ
व्यवस्थितपणे चालविण्यातच धन्यता मानली जात होती. कुटुंबातील जेष्ठ मंडळी
सन्मानाने जगत होती. पूर्वीच्या कुटुंबजीवनात एकाला काटा लागला तर दुसर्याच्या
डोळ्यात अश्रू दाटून यायचे. सख्खा, चुलत हा भेदभाव नव्हता कुटुंबजीवन फुललेलं
होतं
कुटुंबजीवन आज:
काळ बदलला.
यंत्रयुगामुळे परंपरागत व्यवसाय बंद पडले. जीवनकलह तीव्र झाला. तरूण शिक्षण घेऊन
तयार झाले. व्यक्तीविकासाला, महत्वाकांक्षेला पंख फुटले. शहरीकरण वाढून चौकोनी
त्रिकोणी कुटुंबे निर्माण झाली. हम दो, हमारे दो चा जमाना जावून हम दो हमारा एक
चा जमाना आला. व्यक्ती च्या गरजा वाढल्या आणि त्या भागविण्यासाठी अर्थार्जन
व्हावे म्हणून स्त्रिया घराबाहेर पडल्या. काही ठिकाणी केवळ मुलांना
सांभाळण्यासाठीच आजी आजोबांचा उपयोग होऊ लागला.
नंतर त्यांचीही
अडचण, अडगळ होऊ लागली. मुलं पाळणाघरात वाढू लागली आहेत. अतिश्रीमंत बनण्याच्या
नादात सहा महिन्याची मूलं बारा बारा तास पाळणाघरात वाढत आहेत. मुलांना आई
वडिलांचे प्रेम मिळेनासे झाल्यामुळे भावी पिढी चिडचिडी, हेकेखोर, हट्टी बनत आहे.
आर्थिक संपन्नतेतून चंगळवाद वाढत आहे. दोन पिढ्यात वैचारिक दरी निर्माण होत आहे.
सून-मुलगा त्यांच्या नोकरीत बारा-चौदा तास मग्न असतात. नातवंडे त्यांच्या
शाळा-क्लास, कॉम्पुटर, टेनिस, डान्स यात बिझी आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी
स्वतंत्र खोली आहे. लँपटाँप, मोबाईल आहेत. संध्याकाळी एकत्र जेवायला बसायची शिस्त
दिसते. काही ठिकाणी पण जेवतांनाही प्रत्येकजण व्हाटस्अपवर असतो. आईला भाजी वाढू
का हा मेसेज समोरच बसलेल्या मुलाला करावा लागत आहे. ह्रदयात वेदनांचा पूर आलेला
असतानाही एकमेकांजवळ व्यक्त करायला आज वेळ नाही. आजच्या कुटुंबजीवनात माझा फ्लॅट,
माझी पत्नी, माझी मुलं एवढ्यांनाच स्थान आहे. बाकीची नाती अडगळीच्या खोलीत जाऊन
पडली आहेत. थोडक्यात आजचे कुटुंबजीवन
पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरू
बालबच्चे साधुसंत, अब किसकी सेवा करू
कुटुंबजीवन उद्या:
उद्याच्या
तरूणांच्या आशा आकांक्षा दाही दिशांना झेप घेतील. कुटुंबाच्या पंखाखाली राहून
जीवन संकुचित करणे, त्यांना वेडेपणाचे वाटेल. त्यांना या विशाल जगात आकांक्षाचे
पंख लावून उतुंग भरारी घेणे योग्य वाटेल. हम दो हमारा एक ही कुटुंबजीवन पद्धती
संपुष्टात येईल. पती पत्नी ही नातीही हंगामी असतील. लिव्ह इन् रिलेशनशिप ही
विचारधारा प्रबळ होईल. दोघेही करिअर पैसा यांच्या मागे लागतील. त्यामुळे नवीन
'डिंक (DINK) संस्कृती ' निर्माण होईल
"डबल इन्कम विथ नो किड" चा उदय होईल. मागच्या पिढीच्या एकुलत्या एक
जन्मलेल्या तरूणांना बहीण-भाऊ, काका-काकू, आत्या-मामा, मावशी, आजी-आजोबा, चुलत,
मावस, मामे या नात्यांची ओळखही नसेल. त्यामुळे आधारासाठी मित्र मैत्रिणींचा
स्वछंद, मुक्त आधार घ्यावा लागेल. आजी-आजोबांचे वाडे रिकामे राहतील. आजी आजोबा,
आई वडील म्हणतील
घर नाही घरासारखे, आहेत नुसत्या भिंती
प्रेम, जिव्हाळा लावू कुणाला दूर गेली नाती।
उद्याचे
कुटुंबजीवन सैरभैर असेल बोंडातून निघालेल्या कापसासारखे. वाट्टेल तिकडे पळेल.
प्रसंगी मातीत मिसळून जाईल. उद्याच्या पिढीला सांगावे लागेल फार फार वर्षापूर्वी
एकाच घरामध्ये आजी आजोबा, आई वडील व त्यांची मुले रहात होती.
सुंदर लेख
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट लेखन 👌👌👍👍
उत्तर द्याहटवाखरंच अतिशय सुंदर लेख, समाजात आजच्या घडीला सर्वांच्या डोळयांत अंजन घालण्याचे काम केले आहे, पुढील लेखनास माझ्या खूप शुभेच्छा....
उत्तर द्याहटवा