खुषीची शिक्षा
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
मी एक पती बोलतोय
एरवी माझी बायको भलतीच काटकसरी आहे. नखातील मातीसुद्धा विनाकारण वाया घालवत नाही. पण तिचा एक विक पॉईंट आहे, तो म्हणजे 'साडी'. साडी घेताना ती काटकसर सोडून देते. तिला नेहमीच दुसरीची साडी छान वाटते. साडीच्या खरेदीसाठी तिच्याबरोबर जाणे म्हणजे मला सश्रम कारावासाची शिक्षा विनाकारण भोगत आहे असे वाटते.
साड्यांचा ढीग समोर पडलेला असतो, पण तिची नजर कपाटातील अजून दाखवायच्या राहिलेल्या साड्यांकडेच असते. समोर असलेल्या साडीचा कधी रंग छान वाटतो पण त्या साडीचे काठ तिला निबर वाटतात, तर कधी काठ आवडतात पण रंग उठावदार नसतो. काठ व रंग दोन्ही आवडलेल्या साडीचा पदर तिला विजोड वाटतो. तिच्या मते पदर कधी अगदी लहान असतो किंवा फारच मोठा असतो. काठ, पदर, रंग चांगला असलेली साडी तिच्याकडे यापूर्वीच घेतलेली असते. आता काय करायचे हा प्रश्न माझ्यासमोर असतानाच दुकानदाराच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे लक्ष न देता ती उठते व मला म्हणते, "चला दुसऱ्या दुकानात बघू." बिच्चारा मी नाईलाजाने तिच्यामागून चालू लागतो.
अशा प्रकारे पाच सहा दुकानांची वारी होते. भुकेने, तहानेने व्याकुळ झालेली ती माझ्याकडे न पाहताच सातव्या दुकानात प्रवेश करते, तिथे एकदाची साडी पसंत पडते. त्याचवेळी तिची भिरभिरती नजर किंमतीच्या लेबलकडे जाते आणि क्षणभर तिच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद कुठल्या कुठे निघून जातो. ती सूचक नजरेने माझ्याकडे पहाते. खिशाला हात लावत मी म्हणतो, "घे घे तुला आवडलेली साडी, किमतीचा कसला विचार करतेस." माझे बोलणे ऐकून साडी खरेदी एकदाची आनंदाने पार पडते.
साडी घेऊन घरी आल्यावर स्वस्थ बसेल ती बायको कसली? शेजारणींना आपली नवी साडी दाखविण्याची तिला अगदीच घाई झालेली असते. शेजारणींनी साडीची तारीफ केली तर ठीक, नाही तर पुन्हा माझी पंचाईत येते. साडी बदलून आणण्याची टूम निघते आणि पहिल्या दुकानात पहिल्यांदा दाखविलेली साडी घेऊन यावी लागते. त्यानंतरच स्वयंपाकाला सुरूवात होते. मग तिच्या मूडप्रमाणे मेनू ठरविला जातो.
साडी खरेदीनंतर बहुतेक वेळा भात पिठलं हाच मेनू नशिबी येतो. असो....पण काही असो मित्रांनो! साडी खरेदीनंतर बायको माझ्यावर जाम खूष असते. ती खूष राहण्यासाठी साडी खरेदीची शिक्षा मी जन्मभर आनंदाने स्विकारली आहे, एवढे मात्र अगदी खरे आहे.
काय मित्रांनो तुमचाही अनुभव असाच आहे ना?
,👌👌👌👍
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा