रमजान : आत्मिक शांती देणार महिना
✍️: डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो:साभार गुगल
इस्लाम धर्मियात पवित्र, शांती व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या रमजान महिन्याची सुरूवात आजपासून होत आहे. इस्लामी हिजरी दिनदर्शिकमध्ये १) मोहरम २) सफर ३) रबिलावल ४) रबिलाखर ५) जमादिलावल ६) जमादिलाखर ७) रज्जब ८)शाबान ९) रमजान १०) शव्वाल ११) जिल्काद १२)जिल्हेद महिना आहे. इस्लामी पंचागांत दिवसांची गणना आणि वेळेचे मोजमाप सूर्याच्या हालचालीचा हिशोब लावून केले जाते तर महिना चंद्रदर्शनावर आधारित म्हणजेच चांद्रमासावर अवलंबून आहे.
इस्लामी परंपरेप्रमाणे सर्व दिवस आणि सर्व महिने शुभ आणि कल्याणकारी आहेत. परंतू काही दिवस व काही महिने अतिशुभ मानले गेले आहेत. त्यापैकीच एक रमजान महिना होय. रमजानला इस्लाममध्ये वेगळे स्थान आहे.
रमजान महिना केवळ (उपवास) रोजे राखण्याचाच नसून त्यात अनेक उपासना रोजेधारकाकडून कळत नकळत प्रामाणिकपणे करवून घेतल्या जातात. रोजे करणे याचा अर्थ केवळ उपाशी - तपाशी राहणे नाही. मानवाच्या मनामध्ये चांगल्या भावना जगविण्याची प्रेरणा देणारी ही प्रक्रिया आहे. रमजान हा आत्मशुध्दी करणारा महिना आहे. रमजान पवित्र प्रार्थना (नमाज) पठण करण्याचा, मनापासून अल्लाहची उपासना करण्याचा महिना आहे. रोजे म्हणजे इंद्रियांना वश करण्याचा तप आहे.या काळामध्ये वाईट गोष्टीकडे जाणे, वाईट गोष्टी करणे तर दूरच त्यांच्याबाबत विचार करणे हासुध्दा गुन्हा आहे. दुसऱ्याबाबत वाईट असे बोलणे, निषिध्द मानले जाते. थोडक्यात रोजे करताना वाईट पाहू नये, वाईट ऐकू नये व वाईट बोलू नये. रोजे राहणाऱ्याने मन, वचन आणि कर्माने स्वतःला शिस्तबध्द आणि संयमित ठेवावे लागते. पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत फक्त आपल्या दीन अर्थात अल्लाहच्या स्मरणात मग्न राहून आत्मिक शांती आणि समाधान मिळविण्यासाठी रमजान ही नामी संधी आहे. अल्लाह सर्वांना रोजे करण्याची, उपासना करण्याची सद्बुध्दी देवो हिच प्रार्थना.
ऐ चाँद सब को हमारा पैगाम देना । खुशी का दिन और हंसी की शाम देना । जब सब देखे बाहर आकर तो, हमारी तरफसे रमजान मुबारक कहना ।