२२ जुलै दिवशी बेंदूर म्हणजेच बैलपोळा हा सण साजरा केला जातोय त्यानिमित्त या सणाविषयी थोडेसे....
बेंदूर बैलपोळा: श्रमाची पूजा - विशेष लेख
✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषिसंस्कृती हा देशाचा प्राण आहे. कृषीसंस् कृती म्हटले की शेती, शेतकरी, शेतीची अवजारेही आपसूकच येतात. आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. वर्षभर कष्ट उपसणाऱ्या बळीराजाच्या आणि बैलांच्या प्रेमाचे प्रतिक असलेला बैलपोळा मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. वर्षभर कामाचे जोखड म्हणजेच जू ओढणाऱ्या बैलांचा सण म्हणून ओळखला जाणारा बेंदूर दक्षिण भारतात 'पोंगल', दक्षिण महाराष्ट्रात 'बैलपोळा', कर्नाटकात 'कार हुजरी' या भिन्न नावांनी ओळखला जातो. ज्येष्ठ पौर्णिमेला जून महिन्यात कर्नाटकी बेंदूर तर जुलै महिन्यात देशी बेंदूर म्हणजेच महाराष्ट्रीयन बेंदूर या नावाने स्थानपरत्वे दोन वेळा साजरा केला जातो.
बेंदूर सणांविषयीची एक आख्यायिका:
बेंदूर हा सण कसा सुरू झाला याविषयीची एक आख्यायिका आहे. कैलास पर्वतावर एकदा शंकर व पार्वती सारीपाटाचा डाव खेळत होते. पार्वतीने सारीपाटाचा डाव जिंकला. मात्र शंकराने मीच डाव जिंकला असा दुराग्रह धरला. हा वाद कांहीं मिटेना. तेंव्हा पार्वतीने साक्षीदार असलेल्या नंदीला डाव कोणी जिंकला? असे विचारले. मात्र नंदीने शंकराच्या बाजूने मान हलवताच रागावलेल्या पार्वतीने 'मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जू बसेल आणि तू जन्मभर कष्टच उपसशील' अशी शापवाणी उच्चारली. या शापवाणीने भयभीत झालेल्या नंदीने पार्वती कडे उःशाप मागितला. तेंव्हा पार्वतीने वर्षातील एक दिवस शेतकरी तुझ्या मानेवर जू न ठेवता तुझी पूजा करतील असा उःशाप दिला. तेंव्हापासून बेंदूर हा सण साजरा केला जातो. ही आख्यायिका एका कवीने काव्यबद्ध केली आहे. ही कविता आम्ही पांचवी-सहावीला असताना पाठ्यपुस्तकात होती. ती कविता अशी....
सहज एकदा कैलासावर
बसुनी पार्वती आणिक शंकर
मजेत सारीपाट खेळती
गंमत नंदी हसत बघे ती ।
बेंदूर सण कसा साजरा केला जातो..
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पहाटे गरम पाण्याने आंघोळ घातली जाते. नंतर त्याला शेंगतेल, कोंबडीच्या अंड्यातील बलक बैलाना पाजतात. डोक्याला बाशिंग बांधून पाठीवर झुली टाकतात. बैलांच्या शिंगाना छान रंग लावतात. त्यावर सोनेरी, चंदेरी कागद चिकटवून रिबीनी बांधतात. गळ्यात घुंगराची माळ घालतात. या दिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलाना घालतात. बैलांच्या अंगावर विविध रंगाचे ठसे उमटवले जातात. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. या सणाचे वर्णन यथार्थपणे एका कवीने या कवितेत केले आहे. ती कविता अशी...
शिंगे रंगविली, बाशिगे बांधली
चढविल्या झूली, ऐनेदार ।
राजा, प्रधान, रतन दिवाण
वजीर पठाण सुस्त मस्त ।
खांदेमळणी:
बैलांच्या वशिंडापासून पुढील भाग आणि मानेचा वरचा भाग म्हणजे खांदा. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. या दिवशी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात म्हणजेच शेकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्याना हळद लावली जाते.
मिरवणूक व कर तोडणे:
या दिवशी संध्याकाळी बैलांना सजवून मिरवणूक काढली जाते. बैलांच्या शिंगाना फुगे, पायात तोडे, गळ्यात घुंगराच्या माळा, अंगावर झूल टाकून गावच्या वेशीत कर तोडण्यास जातात. गावच्या वेशीत सर्व बलुतेदार लोक गवत व पिंजर एकत्र करून त्यामध्ये पिंपळाची पाने टोचून लावतात त्याला कर म्हणतात. ही कर दोन्ही बाजूला ओढून आडवी धरली जाते. बैलाला वाजत गाजत पळवत आणून त्यावर उडी मारण्यास भाग पाडतात. बैलाने उडी मारताच कर तुटते. कर तोडणे म्हणजे सर्व बंधने तोडून नव्याने सुरुवात करणे होय.
बैलाने वर्षभर केलेल्या काबाडकष्टाच्या जोरावर अन्नधान्य पिकवून शेतकरी सधन व संपन्न होतो त्यामुळे बैल हेच त्यांचे दैवत असते. या सणाच्या वेळी शेतकरी पेरण्या करून रिकामा झालेला असतो. पिकांचे हिरवेगार अंकुर पाहून आनंदी झालेला शेतकरी आनंदाने हा सण साजरा करतो.
शेतकरी व बैल यांचे नाते कसे जिवाभावाचे असते हे दाखविणारा एक ह्रदयद्रावक प्रसंग:
ता. आष्टी, जि. बीड उस्मानाबाद येथील दादासाहेब झानजे या शेतकऱ्याकडे एक बैलजोडी असते. बैलपोळा या सणाच्या दिवशी त्याने बैलाला सजविले. पत्नीने बैलांचे पूजन केले, औक्षण केले. बैलांना नैवेद्याचा घास भरवला. गडबडीत पूजेसाठी आणलेले मंगळसूत्र तिथेच विसरले. कांहीं वेळानंतर मंगळसुत्राची शोधाशोध सुरु झाली. एका बैलाने नकळत वैरणीबरोबर ते गिळले असावे अशी शंका आल्यावर शेतकऱ्यांने व्हेटर्नरी डॉक्टराकडून एक्सरे काढून घेतला. बैलाच्या पोटात मंगळसूत्र दिसले. ऑपरेशन करून मंगळसूत्र काढता येईल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यावर डोळ्यात पाणी आणून शेतकरी म्हणाला, "डॉक्टरसाहेब, मंगळसूत्र पन्नास-साठ हजाराचे असेल ते राहू द्या बैलाच्या पोटात पण आमच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या माझ्या या सख्याला त्रास होता कामा नये. माझा मित्र ऑपरेशनमुळे अधू होता कामा नये. बैलावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याचे हे बाणेदार उत्तर ऐकून डॉक्टर थक्क झाले. आणि विशेष म्हणजे, तिसऱ्या दिवशी रवंथमधून मंगळसूत्र बाहेर पडले. याला म्हणतात बैलावरील प्रेम. धन्य तो शेतकरी व धन्य तो त्याचा बैल.