शुक्रवार, ११ जून, २०२१

साने गुरुजीः एक दीपस्तंभ - विशेष लेख


साने गुरुजीः एक दीपस्तंभ - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

११ जून हा पूज्य सानेगुरुजी यांचा स्मृतीदिन त्यानिमित्त त्यांच्या उज्ज्वल कार्याचा परिचय.....

       हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे अनेक गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नांवे जगाला माहित नाहीत, समुद्राच्या पोटात असे असंख्य गोलबंद व पाणीदार मोती असतील, की ज्यांची जगास वार्ता नाही. भारतमातेला स्वतंत्र  करण्यासाठी कित्येकांनी आपले आयुष्य वेचले आहे की ज्यांची आपणास फारशी ओळख नाही अशा थोर महामानवापैकी एक म्हणजे पूजनीय साने गुरुजी.


अल्पपरिचय:

       सानेगुरुजींचा जन्म कोकणातील पालगड या गांवी २४ डिसेंबर १८९९ मध्ये झाला. विद्यार्थ्यांशी अतूट नाते जोडणाऱ्या या महामानवाच्या वडिलांचे नांव सदाशिवराव व आईचे नांव यशोदा होते. खडतर हाल अपेष्टा सोसून, माधुकरी मागून, शिळेपाके तुकडे खाऊन, प्रसंगी उपाशी राहून त्यांनी आपले एम्. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.


सानेगुरुजींचे शैक्षणिक कार्य:

       अमळनेरच्या शाळेत शिक्षक म्हणून तसेच वसतिगृहाचे प्रमुख म्हणून काम केले. तेथे ते  विद्यार्थ्यांच्या जीवनाशी एकरूप झाले. खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाबड्या मुलांचे ते माता पिता झाले. विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि सेवावृत्ती आपल्या कृतीद्वारा शिकविली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी आपले सारे श्रम व सारी बुद्धी त्यांनी वेचली. त्याना निसर्गप्रेम शिकविले. १९२९ च्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी 'विद्यार्थी' नावाचे मासिक सुरु केले.


स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग:

       १९२९ मध्ये ३१ डिसेंबरला काँग्रेसच्या लाहोर येथील अधिवेशनात पंडीत नेहरूंनी अध्यक्ष म्हणून संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला आणि तो एकमताने पास झाला. त्यावेळी सानेगुरुजींनी पंडीतजींचे भाषण ऐकले आणि त्यांच्या मनात देशभक्तीची प्रचंड लाट उठली. त्यांनी आदेशाप्रमाणे २६ जानेवारीला स्वातंत्र्याची शपथ घेतली व शिक्षकांसमोर भाषण केले. ते भाषण म्हणजे स्वातंत्रदेवतेची जणू भूपाळीच होती.


       त्यानंतर साने गुरुजी सत्याग्रहात गेले. त्यांना १९३० मध्ये धुळे येथील जेलमध्ये ठेवले होते. जेलमध्ये असतांना विनोबा भावे यांची प्रवचने त्यांनी ऐकली व लिहून काढली. तीच 'गीता प्रवचने' म्हणून प्रसिद्ध झाली. त्यांनी खानदेशात गावोगावी फिरून स्वातंत्र्याचा संदेश दिला. १९२१ साली त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली.


       १९३६ साली काँग्रेसने फैजपूर येथे अखिल भारतीय अधिवेशन भरवले होते. तेथे साने गुरुजींच्या भाषणामुळे हजारो तरूण स्वयंसेवक म्हणून समाविष्ट झाले. गुरुजींनी स्वागत कक्ष घेण्याचे नाकारले व स्वच्छतागृहाच्या सफाईचे प्रमुख म्हणून उत्तम प्रकारे काम केले. ते म्हणत, लेखणीच्या लालित्यापेक्षा मला झाडूचे लालित्य अधिक आवडते.


       गोरगरीबांच्या हाल अपेष्टा त्यांना दुःखी करू लागल्या म्हणून १९३८ मध्ये त्यांनी सारामाफीसाठी शेतकऱ्यांची परिषद भरविली. १९३९ साली किसान मोर्चात खेड्यापाड्यातून घुमलेले

आता उठवू सारे रान

आता पेटवू सारे रान

शेतकऱ्यांच्या राज्यासाठी

लावू पणाला प्राण ।

हे गीत आजही तेवढ्याच ताकदीने म्हटले जाते.

त्यांची स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणास्थाने होती.

बलसागर भारत होवो

विश्वात शोभुनी राहो ।

हे गीत आजही राष्ट्र शभक्तीची ज्योत पेटवते. तर

खरा तो एकची धर्म

जगाला प्रेम अर्पावे।

ही सानेगुरुजींची प्रार्थना मानवतेचा महामंत्र देते.

वारा वदे कानामध्ये

गीत गाईन तुला।

  हे गीत बालकांमध्ये आजही लोकप्रिय आहे.


सानेगुरुजींचे लेखन: श्यामची आई

       सन १९३२ मध्ये स्वातंत्र्य आंदोलनात शिक्षा झाल्यानंतर गुरूजींना नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेंव्हा रोज रात्री कारागृहातील बराकीचे दरवाजे बंद झाल्यावर गुरूजी तेथील लोकांना आपल्या गतजीवनातील आठवणी सांगत . त्यातून 'श्यामची आई' हे अविस्मरणीय आणि अद्वितीय असे पुस्तक मराठी साहित्याला लाभले. श्यामची आई वाचून अश्रूनी तुडूंब भरलेल्या लाखो मुलांच्या हृदयात मातृभक्तीची कमळे फुलली आहेत, फुलत आहेत व फुलत राहतील.


       गुरुजीनी  रामाचा शेला, ते आपले घर, ही खरी संस्कृती व सावित्री ही नाटके लिहिली. गोड गोष्टी, आस्तिक ही सुंदर अशी पुस्तके लिहिली. गुरूजींनी आपले साहित्य आसवांनी लिहिले आहे. त्यातील अक्षर न् अक्षर त्यांनी गहिवरलेल्या अंतःकरणाने आणि डबडबलेल्या डोळ्यांनी लिहिले आहे.


आंतरभारती: एक अपुरे स्वप्न

       गुरूजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारती. प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र बंधुप्रेमाचे वारे वहावेत यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरिती समजून घ्याव्यात यासाठी त्यांनी आंतरभारतीचा प्रयोग करण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांनी पैसाही गोळा केला होता. पण त्यांचे हे कार्य अपुरेच राहिले.


अस्पृश्यता निवारण:

       पंढरपूरचे देऊळ हरिजनांना खुले करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रचार केला. शेवटी १ मे १९४७ ते १० मे १९४७ या कालावधीत आमरण उपोषण केले. पुढे पांडुरंगाचे दर्शन सर्वांना घेता येऊ लागले.


       ३० जानेवारी १९४८ ला गांधीजींच्यावर एका माथेफिरूने गोळ्या झाडल्या. गुरूजींचा ध्येयसूर्य अस्तंगत झाला. गांधीजींचा खून एका महाराष्ट्रीयनाने केला या पापक्षालनार्थ गुरुजींनी एकवीस दिवसांचे उपोषण केले. स्वातंत्र्याचे नगारे देशात सर्वत्र गर्जू  लागले. स्वातंत्र्याचा उषःकाल झाला, तरीही भेदाभेद दूर झाले नाहीत याबद्दल गुरुजींना फार वाईट वाटे. 

       

       १९४८ साली त्यांनी "साधना" हे साप्ताहिक सुरु केले व त्यातून समाजवादी विचार मांडले. ११ जून १९५० साली मुंबई येथे गुरूजींनी जगाचा निरोप घेतला.

त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम...।