गुढी पाडवा - विशेष लेख
मराठी वर्षात एकूण साडेतीन शुभ अशा मुहूर्तांची माहिती मिळते. त्यापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस होय. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात चांगल्या दिवशी व चांगल्या मुहूर्तावर करावी अशी आपल्या पूर्वजांची आज्ञा आहे. अशा शुभकामाच्या संकल्पाचा एक मंगल मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा होय.
शिशिर ऋतुबरोबर कडाक्याची थंडी संपते. ऋतूंचा राजा वसंत पुढे सरसावतो. सृष्टीला नवे चैतन्य प्राप्त होते. उन्हाच्या झळा वाढत असतानाच सृष्टी बहरत असते. झाडेझुडपे आपला पर्णसंभार सोडून फुलांनी बहरून जातात. पांगारा, बहावा, गुलमोहर, पळस वेड्यासारखे वाढतात. झाडांवर आलेली पालवीसुद्धा कितीतरी प्रकारची असते. फिक्कट तांबडी, गर्द हिरवी, चक्क लालसर. कांही झाडांना पालवी येण्यापूर्वीच बहरण्याची हुक्की आलेली असते. यावेळी परागकण गोळा करणारे पक्षी, गुंजाररव करणारे भुंगे आणि मधमाशा यांची लगबग पहाण्यासारखी असते. वसंताच्या या आगमनाबरोबरच नवा उत्साह, नव्या आशा आकांक्षा मनामनात निर्माण होतात. चैत्र महिन्यात नव्या मराठी वर्षाची सुरुवात होते. वर्षाच्या सुरुवातीचा हा महत्त्वाचा दिवस लोक आनंदाने साजरा करतात. नव्या वर्षाची सुरुवात सुखासमाधानात साजरी केली की, सारं वर्ष सुखात जाते अशी भावना आहे. हा पहिला दिवस म्हणजे, चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढी पाडव्याचा मंगल दिवस.
सणाबद्दलच्या पौराणिक कथा:
रामायण आपण सर्वजण जाणतो. त्यामध्ये एक कथा आहे. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी चौदा वर्षे वनवासात काढली. वडील बंधूची प्रेमळ आज्ञा म्हणून भरत आयोध्येचे राज्य चालवित होता. तो श्रीरामचंद्राच्या येण्याचीच वाट पहात होता. चौदा वर्षे पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचं असं भरतानं ठरविलं. तशी त्यांनी तयारी पण केली. दुसऱ्या दिवशी भरत पहाटेच उठला. श्रीरामांच्या पादुकांची पूजा केली. मनोमन सीतामाई व श्रीलक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चित्तेकडे निघाला. एवढ्यात एक नवल घडले. महाबली वीर हनुमान पुढे आला. भरतास वंदन करून त्यांनी प्रभू रामचंद्र येत असल्याची वर्दी दिली. भरताला खूप आनंद झाला. त्यानं शत्रुघ्नला सांगितलं, आयोध्या नगरी सजवा. श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा. सर्वत्र आनंदी आनंद झाला. नंदीग्राम पासून आयोध्या नगरीपर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या झंकाराने सारे आकाश भरून गेले. श्रीरामाचे पुष्पक विमान खाली आले. सर्वांचा आवडता राजा श्रीराम यांच्या दर्शनासाठी अनेकांचे प्राण डोळ्यात साठले होते. श्रीरामांच्या जयनादांनी आयोध्या दणाणून गेली. डोक्यावर श्रीरामांच्या पादुका घेऊन भरत पुढे गेला. भावाभावांची भेट झाली. तो देखावा पाहून आयोध्यावासियांच्या डोळ्यात आनंदाश्रूंचे पूर लोटले.
ते म्हणू लागले...
राघवे उचलोनी ते समयी।
भरत दृढ धरिला हृदयी ।।
श्रीराम भरत भेटीचा देखावा काय वर्णावा? लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणे बांधली, गुढ्या उभारल्या. त्यातून आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस. तेंव्हापासून ही परंपरा सुरू झाली असे मानतात.
दुसरी एक कथा सांगितली जाते. फार वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळी पैठण ही महाराष्ट्राची राजधानी होती. प्रतिष्ठानपूर असेही त्या नगरीचे नांव होते. तिथे शालीवाहन नावाचा एक राजा होऊन गेला. राजा अतिशय पराक्रमी, न्यायी आणि शूर होता. याच काळात राजा शक आणि त्याचे सैन्य वेळोवेळी राज्यावर स्वारी करीत होते. जनतेची लूट, अत्याचार हे प्रकार अनेकदा झाले. शक राजावर शालीवाहनाने स्वारी केली व त्याचा पराभव केला. त्यामुळे लोकांचे हाल कमी झाले. लोकांना आनंद झाला. शालीवाहनाच्या पराक्रमाचा हाच विजयदिन होय. हाच तो चैत्र पाडव्याचा दिवस. या दिवसापासूनच इ. स.सुरू झाल्यावर ७८ वर्षानंतर शालीवाहन शक वर्षाची सुरूवात झाली. दक्षिण भारतात हाच वर्षारंभ मानतात.
सण कसा साजरा करतात:
भारतातील बहुसंख्य लोक हा सण मोठ्या आनंदाने, हौसेने साजरा करतात. एखादा भव्य राजवाडा असो किंवा एखादी सामान्य फाटकी झोपडी असो या दिवशी त्यावर गुढी दिसतेच. एक सरळ उंच साधी किंवा वेताची काठी घेतात. काठीच्या वरच्या टोकाला चांदीचे, तांब्याचे किंवा पितळी भांडे पालथे घालून बांधतात. एक सुंदरसं रेशमी वस्त्र किंवा चोळखण त्याच्या सोबत कडूलिंबाचे डहाळे आणि साखरेच्या गाठीची किंवा खोबऱ्याच्या वाटीची माळ त्याला घालतात. हीच गुढी होय. गुढीला गंध, फुले वाहून पूजा करतात. गूळ खोबऱ्याचा नैवद्य दाखवितात.
गुढीपाडव्याच्या या शुभ दिवशी सर्वजण सुगंधी द्रव्य लावून मंगलस्नान करतात. गुढी उभारून पूजा करतात. त्यानंतर कडूलिंबाची पाने, मिरे, हिंग, साखर, जिरे, ओवा, चिंच यासह बारीक ठेचून खातात. या पदार्थामुळे आपल्याला उत्तम आरोग्य लाभते, बुद्धी तेजस्वी होते. या दिवशी घरोघरी पुरणपोळ्या व अन्य गोडधोड पदार्थ केले जातात. एकत्र बसून मधुर जेवणाचा आस्वाद घेतला जातो.
नव्या वर्षातील पहिला दिवस म्हणून लोक या नव्या दिवशी नव्या कामाची सुरुवात करतात. गुढीबरोबरच लोक आपल्या घरी नवे पंचांग आणून त्याची पूजा करतात. दुपारी जाणकार लोक पंचांगातील वर्षफल भविष्य वाचतात. हे वर्ष कसे जाईल? यावर विचार मांडतात. अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात त्याचे श्रवण करतात. याच दिवशी ब्रम्हदेवाची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते.
अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...।
शेवटी एवढंच म्हणेन....
वर्षाला येतो गुढी पाडवा।
सर्वांच्या जीवनात येऊ दे गोडवा।