मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

आरोग्यमंत्र कुटूंबाचा - विशेष लेख.

 

७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे त्यानिमित्ताने,


आरोग्यमंत्र कुटूंबाचा - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान आपण सर्वजण अनुभवत आहोत. कोरोनाने कित्येकांचे प्राण घेतले. मरण पावलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय अश्रूत भिजवून हुंदका आवरत घास गिळत आहेत. प्राप्त परिस्थितीशी सामना करता न आल्यामुळे कित्येकांनी आपली जीवनयात्रा आपल्याच हाताने संपवली आहे. कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे.


       कोरोनामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाली हे खरे आहे, पण कोरोनानं एक चांगले काम केले आहे.... दचकलात काय?


       कोरोनानं माणसाला आपल्या जीवनाचं मोल काय आहे हे दाखवून दिलं. सर्व प्रकारच्या धनसंपत्तीपेक्षा आपलं आरोग्य उत्तम राखणं महत्वाचं आहे हे पटवून दिले, समजावून सांगितलं. करोडोची संपत्ती, शेकडो नातेवाईक असूनही कोविड सेंटरमध्ये बेडवर एकट्यानेच जीवन मरणाची लढाई लढणे अटळ झाले. जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपले आरोग्य व आपले कुटूंबीय हे कळून चुकले.


आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त हा आरोग्यमंत्र कुटूंबाचा.....

आरोग्य नियमांचे पालन करत असताना कुटूंबाचे सहकार्य खूप आवश्यक असते, शिवाय त्यामुळे सर्व कुटूंबाचे आरोग्य व्यवस्थित रहायला मदत मिळते. कुटूंबाच्या आरोग्याचा विचार करतांना सर्वप्रथम लक्षात घ्याव्या लागतील कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृती व सवयी. कुटुंब म्हटले की परस्परासाठी थांबणे, परस्परांच्या आवडीनिवडीचा विचार करणे आले. कौटुंबिक प्रेमाखातर, कुटूंबाच्या मानसिक आरोग्याखातर हे करणे आवश्यक असले तरी त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत नाही ना याकडे लक्ष द्यायला हवे. उदाहरणार्थ एखाद्या दिवशी यजमानांना रात्री घरी यायला उशीर होणार असला आणि पत्नी जेवायची थांबली तर दोघांना बरे वाटेल, पण पत्नीने दररोज असे करणे बरोबर नाही. अन्यथा रोजच्या जागरणाने व भुकेले राहिल्याने दोघांचे पचन बिघडून बाकीच्या त्रासांना आमंत्रण मिळेल.


       कुटूंबाच्या आहाराची योजना करतांनाही सर्वांच्या तब्येतीचा विचार करायला हवा. बहुतेक वेळेला आपण फक्त आवडीनिवडी सांभाळत राहतो. पण आरोग्य सांभाळण्यासाठी तब्येतीनुरुप आहारयोजना करणे अधिक गरजेचे आहे, हे समजून घ्यायला हवे. जसे इडली, डोसा, ढोकळा वगैरे आंबवून तयार केलेले पदार्थ कफप्रकृतीच्या व्यक्तीला सहज मानवतात पण पित्तप्रकृतीच्या व्यक्तीचे पित्त वाढवू शकतात किंवा वातप्रकृतीला पचायला जड ठरू शकतात. अशावेळी वात, पित्त प्रकृतीसाठी इडली सांबाराबरोबर भात सांबार किंवा वरण भातही बनवावा. दूध लोण्यासारखे कफ वाढविणारे पदार्थ वात पित्त प्रकृतीला थोडे अधिक दिले तरी चालते पण कफ प्रकृतीला मात्र मर्यादित प्रमाणात देणे चांगले. कुटुंबातील सर्वांचे आरोग्य नीट रहावे यासाठी तांदूळ भाजून घेणे, कणीक भाजून घेणे यासारख्या साध्या उपायांचाही अधिक उपयोग होतो.


       कुटुंबाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन खेळ खेळण्याचा, सर्वांनी मिळून सहलीला जाण्याचा, कांहीतरी वेगळे उपक्रम करण्याचा उपयोग होत असतो. यातही कुटुंबातील सर्व सदस्यांचा विचार करायला हवा. उदा. वातपित्तात्मक प्रकृतीला अधिक धावपळ, दगदग सहन होत नाही, तर कफ प्रकृतीला शारीरिक हालचाली न करता एका ठिकाणी फार वेळ बसणे हितावह नसते. व्यायामाच्या बाबतीतही ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम वगैरे गोष्टी संतुलन साधणाऱ्या असल्याने घरातील सर्वांसाठी अनुकूल असतात, मात्र त्यांचे प्रमाण तब्बेतीला सोसवेल असे असावे. दमछाक करणारे, घामाघूम करणारे व्यायाम करू नयेत. सहलीला जातानाही असे ठिकाण निवडावे की जेथे कुटुंबातील सर्वांनाच आनंद घेता येईल. कुटुंबात आजी आजोबांनी अशा ठिकाणी जावे, जिथे चढ उतार करायची आवश्यकता भासणार नाही, दगदग होणार नाही.


       कौटुंबिक आरोग्याचा विचार करतांना शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. घरातील सगळ्यांनी रोज किमान एकदा तरी एकत्र बसून जेवण करावे. याचा कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो. कुटूंबातील सर्वांना एकमेकांविषयी आदर व प्रेम असणे आवश्यक आहे.


       सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंब ही संकल्पना मर्यादित ठेवू नये. घरातील लोक हे जसे कुटुंबातील असतात तसेच इमारतीतील किंवा कॉलोनीतील, आजूबाजूला राहणारे लोक मिळूनही एक मोठे कुटूंबच असते. आपल्या घरात काही समारंभ असला, लग्नकार्य असले तर  मोठ्या आवाजात गाणी लावण्याचा किंवा वेळीअवेळी फटाके वाजविण्याचा आसपासच्या लोकांना त्रास होणार नाही व त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही याचे भान ठेवावे.


कुटूंबाच्या आरोग्याविषयी मौलिक टिप्स:

  • सर्वांनी रोज सकाळी भिजवलेले बदाम किंवा सुक्या मेव्यातील इतर पदार्थ खावेत.
  • रोजच्या आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश करावा.
  • लहान मुलांना शारीरिक खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे. सातत्याने टीव्ही किंवा कॉम्प्युटर समोर बसून राहण्याची सवय लागणार नाही याकडे लक्ष द्यावे.
  • कुटुंबातील सर्वांनीच रात्री जड पदार्थ खाणे टाळावे. विशेषतः मांसाहार, तळलेले पदार्थ टाळावेत.
  • कुटुंबातील व्यक्तींच्या साध्यासुध्या तक्रारीवर उदा. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे, अपचन, हातपाय मुरगाळणे वगैरे साठी घरगुती उपाय करावेत. त्यासाठीचा किट तयार ठेवावा.
  • ऋतुनुसार हवामानात होणाऱ्या बदलांप्रमाणे संपूर्ण कुटुंबाच्या आहार आचरणात योग्य ते बदल करावेत. उदा. पावसाळ्यात पाणी उकळून पिणे, उन्हाळ्यात पित्त वाढविणाऱ्या गोष्टी टाळाव्यात, हिवाळ्यात धातपोषक गोष्टींचे आवर्जून सेवन करावे.
  • अंगाला तेल लावणे, पाठीला तेल लावणे, यासारख्या गोष्टी कुटुंबातील सर्वांनाच हितकर असतात. रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटे वेळ काढला तर आरोग्य टिकेलच पण स्नेहबंध टिकायलाही हातभार लागेल.
  • स्वयंपाक करताना नुसत्या चवीचा विचार न करता आयुर्वेदिक संस्काराना महत्त्व द्यावे. केशर, डिंक, सुकामेवा, पालेभाज्या, फळभाज्या यांचा वापर योग्य प्रकारे करावा त्यामुळे स्वयंपाक चवदार बनेलच पण कुटूंबाचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत मिळेल.


कोरोनासारख्या आजारांपासून वाचण्यासाठी महत्वाच्या टिप्स...

  • आपले लक्ष आपण आरोग्यदायी होण्याकडे द्या. विनाकारण भिती बाळगू नका, काळजी करू नका, काळजी घ्या.
  • सतत कार्यमग्न रहा.
  • सकस आहार घ्या, अति खाणे पिणे टाळा.
  • व्यायाम किंवा शरीराच्या सर्व अवयवांची हालचाल होईल असा व्यायाम करा.
  • सतत नवा विचार करा.
  • मनात निर्माण झालेले प्रश्न दाबून टाकू नका, त्यांची उत्तरे शोधा.
  • एखादा छंद जोपासा. एखादी कला आत्मसात करा, त्यात रममाण व्हा.
  • जे कच्चे खाता येते ते भाजून खाऊ नका, जे भाजून खाता येते ते शिजवून खाऊ नका, जे शिजवून खाता येते ते तळून खाऊ नका.
  • सकाळी नाष्टा राजासारखा घ्या. दुपारी प्रधानासारखा मध्यम आहार घ्या. रात्री मात्र भिकाऱ्याप्रमाणे अगदी थोडासाच हातावर मावेल एवढाच आहार घ्या.


अशा प्रकारे स्वतःची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या. सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।