शनिवार, ९ जानेवारी, २०२१

राजमाता जिजाऊ: विशेष मराठी लेख

 

राजमाता जिजाऊ: विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


तेजाची मशाल होत्या जिजामाता ।

अंधाराची सत्ता नष्ट केली ।।१।।

स्वातंत्र्याचा ध्यास जन्मभरी त्यांनी

तोडिती बंधना गुलामीच्या ।।२।।

स्वातंत्र्याचे प्रेम शिवबाच्या मनी।

 वाढे तरारून मातेमुळे ।।३।।

युगस्त्री जिजाऊ महापराक्रमी। 

तुलनेला कमी दुर्गा चंडी ।।४।।

पंचकन्याहून चरित्रे सरस।

निर्मी इतिहास स्वराज्याचा ।।५।।

प्रातःस्मरणीय थोर जिजामाता।

पावित्र्याची गाथा जिणे त्यांचे ।।६।।

जिजामाता आद्य स्वातंत्र्यदेवता।

त्यांच्या पायी माथा नम्र माझा ।।७।।

त्यांच्या चरित्राचे करू पारायण।

राष्ट्राचे जीवन उंच होण्या ।।८।।

  

       राजमाता जिजाऊ मातेचे स्मरण केल्याशिवाय स्वातंत्र्यसूर्य, छत्रपती शिवरायांचे चरित्र सांगणे कठीणच नव्हे, तर अप्रस्तुतही ठरेल. थोर विचारवंत न्यायमूर्ती रानडे म्हणतात, "थोरपुरूषांचा थोरपणा जर आईच्या शिकवणीमधील स्फूर्तीवर अवलंबून असेल, तर शिवाजींच्या कामगिरीत जिजाबाईंचा वाटा अव्वल दर्जाचा मानावा लागेल. त्यांच्या बळाचे जिजाबाई हेच प्रमुख कारण होते." शिवचरित्र घडविण्यात जिजाऊ मातेचे योगदान फार महत्त्वाचे आहे. अशा या थोर जिजाऊंचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गांवी १२ जानेवारी १५९८ रोजी एका प्रतिष्ठित व मातब्बर अशा लखुजीराव जाधव यांच्या घराण्यात झाला. जिजाऊंना चार मोठी भावंडे होती. लखोजीराजे हे त्यावेळचे निजामशाहीतील सर्वात मातब्बर सरदार होते. अशा मातब्बर घरात जन्मलेल्या मुलीचे नांव जाणिवपूर्वक जिजा असे ठेवले. जिजा शब्दातच जय आणि विजय आहेत. 

       जिजाऊंनी केवळ स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवबांची आई म्हणूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची एक कर्तबगार माता होऊन अन्याय, अत्याचार व गुलामगिरीत खितपत पडलेल्या आपल्या रयतेला स्वतःचे अस्तित्व दाखविले. आपले पुरोगामी विचार अस्तित्वात आणण्यासाठी शिवबांना सातत्याने मार्गदर्शन केले. जो राजा रयतेची काळजी घेतो, रयतेच्या सुखदुःखात सहभागी होतो, त्यालाच रयत आपला राजा मानते अशी शिकवण दिली आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांना रयतेचा राजा होता आले. 

       जेंव्हा लखुजीराजे आणि त्यांच्या तीन मुलांचा खून निजामशहाच्या भर दरबारात करण्यात आला तेंव्हा जिजाऊ दौलताबादच्या जवळच होत्या. अशा कठीण प्रसंगात त्या आपली आई म्हाळसाराणी व एका भावास घेऊन पुण्यात आल्या. सतीची चाल बंद करण्याचा बहुमान जर खऱ्या अर्थाने कोणाला जात असेल तर तो म्हाळसाराणीनाच कारण पतीच्या निधनानंतर त्या सती गेल्या नाहीत. सतीच्या नावावर महिलांना जिवंत जाळण्याच्या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला व अखेरपर्यंत जिजाऊ राबवित असलेल्या सामाजिक सुधारणेच्या विचारांना चालना देत राहिल्या. त्यामुळेच पुढे शहाजी राजांच्या निधनानंतर जिजाऊंनी सतीची प्रथा बंद पाडली.

        शिवाजीराजे पाच वर्षांचे असताना आदिलशाही सरदार जगदेव मुरारी पंडीत याने पुणे परिसरावर गाढवाचा नांगर फिरवून परिसर उद्ध्वस्त केला. या जमिनीवर कोणीही वास्तव्य करू नये म्हणून एक हजार पहारी रोवून त्यावर चपलांचे जोड बांधले आणि दवंडी पिटवली की जो कोणी या परिसरात राहील किंवा जमीन नांगरेल त्याचे घराणे निर्वंश होईल. खरेतर हा सगळा प्रकार म्हणजे एक प्रकारे धार्मिक दहशत आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा होता. अशावेळी जिजाऊनी पाच वर्षाच्या बाल शिवरायांच्या हातात सोन्याचा फाळ लावलेला नांगर दिला आणि नांगरणी करण्यासाठी पाच बालकांचा हात त्या नांगराला लावला. ते चार बालक म्हणजे महार, मांग, चांभार व रामोशी म्हणजेच वेगवेगळ्या जातीचे होते. तसेच सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराची पूजाही विधवा असणाऱ्या म्हाळसाराणी व त्यांच्या विधवा सुनेच्या हाताने करावयास लावली. अशा प्रकारे जिजाऊनी शुभकार्यात विधवांचा सन्मान केला. ही गोष्ट सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली.

       आदिलशहाच्या भितीला न जुमानता पुणे परिसरात शेतीत नांगर फिरवून ती जमीन वैचारिक दृष्ट्याही सुपीक बनविली आणि पुणे शहराला पुन्हा वसविले. पुण्याची लोकसंख्या हळूहळू वाढत गेली. लोकांची वाढती गरज लक्षात घेऊन बाजारपेठ बनवावी याकरिता आग्रह करण्यास काही लोक जिजाऊंच्याकडे आले. तेंव्हा ही बाजारपेठ आपण सरकारी खर्चाने बांधून देऊ आणि बाजारपेठेच्या सुरक्षिततेची जबाबदारीही घेऊ असे आश्वासन दिले आणि पाषाण परिसरात अद्ययावत अशी बाजारपेठ बनवली यामुळेच पुण्याचा चेहरामोहरा बदलला आणि बारा मावळातील त्या शहराला जिजापूर असे नांव दिले.

         आदिलशहाने शहाजीराजांना फसवून कैद केले. शिवाजी व संभाजी या त्यांच्या दोन पुत्रानांंही मारण्यासाठी पाठविलेल्या फरीदखान व फतेहखान या दोन्ही सरदारांचा जिजाऊंनी पुरता बंदोबस्त केला. शहाजीराजांच्या मुक्ततेसाठी शहाजहानचा दक्षिणेतील सुभेदार मुरादबक्ष याच्याशी संधान साधून आदिलशाहीला शह दिला त्यामुळे आदिलशहाने बिनशर्त शहाजीराजांना मुक्त केले आणि सन्मानपूर्वक दरबारात पुन्हा फर्जत म्हणून नियुक्त केले. या ठिकाणी जिजाऊनी मुत्सद्देगिरी दाखविली नसती तर स्वराज्याचे रोपटे मूळ धरण्या अगोदरच नष्ट झाले असते.

        स्वराज्याची निर्मिती जरी शिवाजी महाराजांच्या नावाने झाली असली तरी यामागची प्रेरणा आणि मुत्सद्देगिरी मात्र निर्विवादपणे जिजाऊंचीच होती. शिवाजी महाराजांना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढणारा आणखी एक मुत्सद्देगिरीचा प्रसंग म्हणजे अफजलखानचा वध. चाळीस हजार फौज घेऊन आलेल्या अफजलखानच्या फौजेचे तीन विभाग करणे, जावळीच्या प्रतिकूल परिसरात त्याची भेट घडविणे, अफजलखानच्या विश्वासघातकी स्वभावाची राजांना जाणीव करून देणे अशी सर्व व्यवस्था जिजाऊंनीच केली आणि त्यामुळेच प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचे पानिपत करणे महाराजांना शक्य झाले.

         अफजलखानाचे कापलेले मुंडके संभाजी कावजी या शूराने रायगडावर नेऊन जिजाऊंना प्रत्यक्ष दाखविले आणि या शिराचे काय करायचे असे त्याने विचारले तेंव्हा त्या म्हणाल्या, "मेला तो गनिम, संपली ती गनिमी। मरणानंतर वैर शिल्लक रहात नसते." सन्मानपूर्वक अफजलखानाचे शिर राजगडाच्या बुरूजापाशी दफन करून त्या बुरूजाला अफजल बुरूज असे नांव देण्यात आले आणि जेथे अफजलखानला मारण्यात आले तेथे त्याची कबर बांधण्यात आली. याच लढाईत तावडीत सापडलेल्या अफजलखानाच्या दोन मुलांना मुक्त करून जिजाऊ नी माणुसकीचा अतुल्य परिचय करून दिला. स्वराज्याची संकल्पना अस्तित्वात आणून सर्वसामान्य रयतेला सन्मान पूर्वक जीवन जगण्याची हमी दिली.

       अशाप्रकारे महाराष्ट्राच्या क्रांतिकारी मातीत स्वातंत्र्याचे बीजारोपण करत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्या अनेक प्रसंगाना मुत्सद्देगिरीने सामोऱ्या गेल्या, म्हणूनच शिवरायांना स्वराज्याची स्थापना करता आली व ते रयतेचे राजे झाले. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. हा राज्याभिषेक ही जिजाऊंची अदम्य महत्वाकांक्षा होती. आपला पुत्र महापराक्रमी आहे पण तो समाजमान्य झाला पाहिजे हे जिजाऊंचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले. अशा या महान जिजाऊंचा स्वर्गवास शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर केवळ बाराव्या दिवशी म्हणजे १७ जून १६७४ रोजी पाचाड येथील वाड्यात रात्री बारा वाजता झाला.

        महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता ठरलेल्या शिवरायांची ही कूस खऱ्या अर्थाने सार्थक ठरली.

या महान जिजाऊमातेला जयंत्तीनिमित्त कोटी कोटी प्रणाम, अभिवादन।