रविवार, २६ जुलै, २०२०

मराठी लघुकथा संच - १

मराठी लघुकथा संच - १


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

लघुकथा क्रमांक - १

तिन्हीसांजेची वेळ होती. गावच्या वेशीजवळच समीर व रेश्मा यांची दुचाकी बंद पडली. जवळच्याच गॅरेजमध्ये समीर गाडी दुरूस्त करून घेत होता. बाजूला रेश्मा ऊभी  होती. गावातील लोक शेतातून घरी परत येत होते. डोक्यावर जळणाचा भारा घेतलेली एक स्त्री रेश्माजवळ येऊन थांबली. गाडी नादुरुस्त झालीय का म्हणत रेश्माला न्याहाळू लागली . रेश्माला तिची नजर चांगली वाटली नाही, म्हणून तिने पदराने गळ्यातील दागिने झाकून घेतले. हातावरही पदर ओढून घेतला. ती स्त्री म्हणाली बाई, किती वेळ उभी आहेस?  हे समोरच माझं घर आहे. तिथं बस चल. चहा करून देते तुला. पण रेश्मा नको नको म्हणाली, थोड्याच वेळात ती स्त्री हातात चहाचे कप घेऊन गॅरेजकडे आली व म्हणाली, "चाललं नव्हं गरिबाचा चहा?"


लघुकथा क्रमांक - २

एका कार्यक्रमासाठी बहिणी चे कुटूंबिय व भावाचे कुटूंबिय गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर दोघांच्याही चारचाकी एकदम बाहेर पडल्या. वाटेत सर्वानी मिळून चहा घेतला कारण दोन्ही कुटुंबे वेगवेगळ्या गावी जाणार होते. एक फकीर मोरपिसांची जुडी घेऊन त्यांच्यासमोर आला. बहिणी च्या मिस्टरांनी त्याच्या ताटात दहाची नोट ठेवली. तो भावाकडेही मागू लागला. भाऊ म्हणाला, "आम्ही दोघे एकाच घरातील आहोत". तो बाजूला गेला. बहीण दुसऱ्या गावाला गेली, भाऊही आपल्या गावाला निघाला. थोड्याच अंतरावर मागून येणाऱ्या ट्रकने भावाच्या कारला जोराची धडक दिली. सुदैवाने कुणाला इजा झाली नाही. पण कारचे दार चेपून गेले, लोक गोळा झाले. जमलेल्या लोकात मगाचचा तो फकीर पण होता. दार बदलण्यास पाच हजार खर्च झाले.


लघुकथा क्रमांक - ३

दहा बारा वर्षाचा एक मुलगा पळत पळत मेडिकलमध्ये आला. त्याच्या हातात एक पुस्तक, एक डॉक्टरांची चिठ्ठी व दहा रुपयांची नोट होती. त्याने चिठ्ठी मेडिकलवाल्याला दिली. मेडिकलवाला म्हणाला, या गोळ्यांंना शंभर रूपये लागतील. मुलगा म्हणाला, "काका माझी आई फार आजारी आहे, हे दहा रुपये घ्या आणि एका दिवसाच्या तरी गोळ्या द्या." तो म्हणाला, असं कसं देता येईल? मुलगा म्हणाला, हे पुस्तक घ्या ठेवून तुमच्याकडे. मला निबंध स्पर्धेत बक्षिस मिळालय.पन्नास रूपये किंमत आहे याची. मी पैसे दिले की मला परत द्या. दुकानदार म्हणाला, हे दहा रूपये कुठून आणलेस? मुलगा म्हणाला, त्या समोरच्या बंगल्यातील बागेत काम करून आणले. उद्या आणखी काम करून पैसे देईन तुमचे. दुकानदाराने पुस्तक ठेवून न घेता त्याला पूर्ण औषधे दिली व सांगितले, तुझी आई बरी झाली की मला भेटायला ये.


लघुकथा क्रमांक - ४

एक समाजसेवक वृद्धाश्रमात देणगी देण्यासाठी गेले होते. आश्रम चालकांनी त्यांना कांही वृध्दांशी संवाद साधण्याची संधी दिली. समाजसेवक प्रत्येकाला पूर्वायुष्याबद्दल प्रश्न विचारत होते. वृद्ध मंडळीही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली, कारण बऱ्याच दिवसांनी कोणीतरी त्यांची आपुलकीने चौकशी करत होते. त्यांनी एका वृद्धेला प्रश्न विचारला आजीबाई तुम्हांला मुलंबाळं आहेत का? ती म्हणाली, "हो आहेत ना मुलंबाळं, म्हणूनच मी इथे दाखल झाले आहे".


लघुकथा क्रमांक - ५

एक तरुण कार्यकर्ता आपल्या निवडक मित्रांसह कोल्हापूरला ला एका महत्वाच्या कामासाठी निघाला होता. रिमझिम पाऊस पडत होता. हातकणंगले बसस्टँडजवळ एक वयस्क शेतकरी पावसात भिजत भाजीविक्री करत बसला होता. त्या कार्यकर्त्याने ते दृश्य पाहिले. गाडीत असलेली छत्री उचलली, गाडीतून उतरला व छत्री उघडून त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर धरली. त्याला नमस्कार करून गाडीत बसला. त्या दिवशी त्यांच्या सेवा संघाच्या रजिस्ट्रेशनचे रखडलेले काम चुटकीसरशी फत्ते झाले, शासनाचे अनुदानही मिळाले.