मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

ज्येष्ठांच्या सुखी जीवनाची गुरुकिल्ली - विशेष मराठी लेख


१ ऑक्टोबर हा 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने हा विशेष लेख.

 

ज्येष्ठांच्या सुखी जीवनाची गुरुकिल्ली

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       एखाद्या लहानशा बीजाला वृक्ष होण्यासाठी, वृक्ष बनून सर्वार्थानं फुलण्यासाठी खूप लांबवर प्रवास करावा लागतो; तरच त्या वृक्षाच्या फळांचा आस्वाद सर्वांना घेता येतो, वृक्षाच्या परिपक्वतेचा सुगंध सर्व सृष्टीला लाभू शकतो. खऱ्या अर्थाने निवृत्त व्यक्तीचे जीवन असंख्य फांद्यानी बहरलेल्या वृक्षाप्रमाणे असते. ऊन, वारा, पाऊस, वादळ या सर्वांशी टक्कर देत त्यानं मोठ व्हायचं, अगणित मुळांच्या सहाय्याने खडकांशी टक्कर देऊन पाण्याचा शोध घेत मातीशी घट्ट नातं जोडायचं, गोड फळांना, सुगंधित फुलांना जन्म द्यायचा, पण आपली फळे-फुले कुठे पडावीत, ती कोणी घ्यावीत व खावीत, कुणाला द्यावीत हे वृक्षानं नाही ठरवायचं। या वृक्षाप्रमाणे जी व्यक्ती वागते त्या व्यक्तीलाचं निवृत्तीच्या सुखाची गुरुकिल्ली सापडले. निवृत्त व्यक्तीने पुढे दिलेल्या बाबींचे पालन केल्यास सुखासमाधानात उर्वरित आयुष्य घालवता येईल.


१) जेष्ठ व्यक्तीने गत आयुष्याकडे वारंवार मागे वळून पाहू नये. त्यामुळे गतायुष्यात अडकून पडण्याची भीती असते म्हणून आपल्या गतायुष्याकडे तटस्थपणे पहायला शिकावे.


२) ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या कर्तृत्वाचा, घटना, प्रसंगांंचा उच्चार वारंवार करू नये, कारण तो विषय एकदा ऐकल्यावर इतरांच्या दृष्टीने जुना झालेला असतो.


३) जेष्ठ व्यक्तीने आपल्या भविष्याकडे संन्यस्त वृत्तीने पहावे. भविष्याच्या चिंतेने वर्तमानातील सुख दवडू नये.


४) जेष्ठ व्यक्तीने आपले रोजचे जगणे आवड-निवड विरहित ठेवावे जे समोर आले आहे ते आनंदाने खावे. जे दिसेल त्याकडे रसिकतेने पहावे जे ऐकायला मिळेल ते तृप्तपणे ऐकावे.


५) जेष्ठ व्यक्तीने आसक्तीला आपल्या जीवनात थारा देवू नये. आसक्तीला व अभिलाषेला चौफेर दृष्टीने, मायेने, वात्सल्याने समजून घ्यावे, त्यात गुरफटू नये.


६) जेष्ठ व्यक्तीने संघर्षापासून सदैव दूर रहावे. संघर्षाविना कृतीशील जीवन जगण्याचे शहाणपण दाखवावे.


७) ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या जीवनातील वर्तमानातील प्रत्येक क्षण संपूर्णतेने व दिलखुलासपणे व्यतित करावा. वर्तमानातील प्रत्येक क्षणांचा आस्वाद घेवून त्यातील अर्थ वेचून समृद्ध व्हावे.


८) जे आहे, जसे आहे ते स्विकारावे. वास्तवाचा सन्मान करावा. त्यामुळेच त्यात मानसिक शांतीचा धनी होणे सहज शक्य होते.


९) ज्येष्ठ व्यक्तीने रोज किमान अर्धा तास ध्यानासाठी द्यावा, कारण ध्यान हे आंतरिक शांततेसाठी व स्वतःला जास्तीत जास्त जाणून घेणेस उपयुक्त ठरते.


१०) ज्येष्ठ व्यक्तीने एखाद्या न आवडणाऱ्या गोष्टीला किंवा विधानाला अतिशय शांतपणे, सभ्यपणे व संयमाने सामोरे जावे. ती गोष्ट किंवा ते विधान का आवडले नाही ते खिलाडू वृत्तीने समजावून सांगावे. माझे तेच खरे न मानता, खरे तेच माझे ही वृत्ती ठेवावी.


११) ज्येष्ठ व्यक्तिने अधिकारशाही पासून नेहमी दूर रहावे. अधिकार न गाजवता प्रेमाने समजावून सांगावे. प्रेमाने जग जिंकता येते हे वचन लक्षात ठेवून वागावे.


१२) आपल्याला पेलणारी जबाबदारी स्विकारावी. स्विकारलेले काम हसतमुखाने पार पाडावे. जबाबदारीला ओझे समजू नये.


१३) आपले छंद, आपले व्यासंग अखंडपणे सुरु ठेवावेत. छंदात, व्यासंगात सातत्य व एकजिनसीपणा ठेवावा. समछंदिष्टांशी व समव्यासंगी मित्रांच्या सानिध्यात रहावे.


१४) ज्येष्ठ व्यक्तीने नेहमीच हेतुविरहीत कार्य करावे. मी जे काम करत आहे ते माझ्या समाधानासाठी करत आहे. त्याचे इतरांनी कौतुक करावे, भरपूर मोबदला मिळावा ही अपेक्षा ठेवू नये.


१५) निवृत्तीचे  जीवन जगताना कोणत्याही व्यक्तीचे किंवा त्यांच्या कृतीचे मापन करण्याचा प्रयत्न करू नये. चांगला शेरा नोंदविता आला, प्रशंसा करता आली तर जरूर करावी पण वाईट शिक्का मारुन त्याला नाराज करू नये, तटस्थ रहावे.


१६) ज्येष्ठ व्यक्तीने दुसऱ्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्या वाटेवरून न जाता स्वत:ची पायवाट तयार करावी.


१७) ज्येष्ठ व्यक्तीने स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. कारण परावलंबन निवृत्तीचा शत्रू आहे.


१८) ज्येष्ठ व्यक्तीने कधीही दुःखी होऊ नये. स्वतः नेहमी आनंदात रहायचे असेल तर दुसऱ्याला दुखवू नये.


१९) ज्येष्ठ व्यक्तीने सदैव गंभीरतेत जगावे कारण गांभिर्यातच प्रसन्नता व आनंद टिकून रहातो


२०) ज्येष्ठ व्यक्तीचे प्रत्येक पाऊल परिपक्वतेकडे जाणारे असावे कारण परिपक्वता ही एक अपूर्व आध्यात्मिक घटना आहे.


२१) जेष्ठ व्यक्तीने स्वत:च्या अंत:करणात खोलवर उतरावे. स्वत:ला कमालीच्या आत्मशोधकतेने व अंतर्मुखतेने जाणून घ्यावे त्यामुळेच तुम्ही परिपक्व होत जालं. परिपक्व व्यक्तीमध्येच समजूतदारपणा, नि:शब्द शांतता आणि निरागसता येते. परिपक्व व्यक्तीलाच सुखाची गुरुकिल्ली सापडते.


    वरील सर्व गोष्टींचा मनस्वी अवलंब केला तर निवृत्तीचे जीवन सुखासमाधानाने घालविता येईल. कमी आहार, विपुल विहार, विशुद्ध विचार आणि विमल आचार ठेवून निवृत्तीचे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळेच निवृत्तीचे जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेले विश्रांतीस्थान होईल यात शंका कसली?