पवित्र कुरआनचे अवतरण
हजरत मुहम्मद पैगंबर सलेल्लाहु अलैवस्सलम यांचे अनेक सोबती होते. ज्यांना काही लिहिता वाचता येत नव्हते. स्वतः पैगंबर साहेबांनाही लिहिता वाचता येत नव्हते; परंतू अल्लाहने त्यांच्या हृदयाला संपूर्ण जगाच्या ज्ञानाने संपन्न केले होते. अरब बांधवांचे दुसरे वैशिष्ट्ये असे की, त्यांची स्मरणशक्ती जबरदस्त होती. पैगंबर साहेबांचे अनेक सोबती असे होते जे एकदा ऐकलेले वाक्य अथवा संवाद त्यांच्या जुजबी बाबींसह स्मरणात रहायचे. अनेकांना संपूर्ण कुरआन मुखोद्गत होते. पैगंबर साहेबांवर तेवीस वर्षाच्या कालखंडात संपूर्ण कुरआन अवतरित झाले. ईशदूत हजरत जिब्रईल जेव्हा कुरआनचे श्लोक पैगंबर साहेबांना सांगायचे, त्याचक्षणी पैगंबरसाहेब ते श्लोक पाठ करायचे आणि लगेचच आपल्या लेखनिकाला बोलावून ते लिहून काढायचे. सुरूवातीच्या काळात आयत म्हणजे श्लोक स्मरणात ठेवण्याकरिता खूप प्रयत्नशिल असायचे आणि या प्रक्रियेचा त्यांच्यावर खूप ताण पडायचा नंतर अल्लाहनी त्यांना आदेश दिले की या आयतीना लक्षात ठेवण्याकरिता आपण फार तसदी घेऊ नका, त्या विस्मरणात जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ आणि पुढे तसेच घडले.
रमजानच्या पवित्र महिन्यात हजरत जिब्रईल पैगंबर साहेबांच्यासमोर उपस्थित व्हायचे आणि त्यांच्याकडून संपूर्ण कुरआन ऐकून घ्यायचे. एके वर्षी ते पैगंबर साहेबांना म्हणाले, "यावर्षी मी तुमच्याकडून दोनदा कुरआन ऐकून घेणार आहे." पैगंबर साहेबांना हे समजायला उशीर लागला नाही की कदाचित् हा माझा अंतिम रमजान असावा. हजरत जिब्रईलकडून निवेदन मिळताच त्यांनी मोठ्या स्वरूपात आपल्या साथीदारांना उपस्थित राहून ऐकविण्याचे आदेश दिले. सोबत्यांच्या या समोरासमोर पठणाला 'अर्जा:' सादर करणे असे म्हणतात. पैगंबर साहेबांच्या जीवनकाळापर्यंत कुरआनचे संपादन झालेले असले तरी त्याचे संकलन झालेले नव्हते. म्हणजे एका ग्रंथाच्या रूपात त्याचे अस्तित्व नसून लोकांच्या स्मरणात किंवा लहान-मोठ्या प्रमाणात चर्मपत्रे, कातडे, लाकूड, वस्त्र, धातू, शिला, मातीच्या विटा अथवा झाडांच्या सालीवर कुरआन लिहिलेले होते. परंतू, कुरआनच्या संरक्षणाचा आणि जतन करण्याचा अधिक भार संपूर्ण कुरआन तोंडपाठ असलेल्या हाफिज मंडळीवरच होता. हजरत मुहम्मद पैगंबर सलेल्लाहु अलैवस्सलम यांच्या निधनानंतर 'मुसैलमा कज्जाब' नावाच्या एका तोतया प्रेषिताने संपूर्ण अरबस्तानात हाहाकार माजवला. त्याने मदिनेच्या उत्तरेस यमामा येथे प्रचंड शक्ती गोळा केली आणि इस्लाम व इस्लामी राष्ट्राच्या विरोधात बंड पुकारले. त्याचा नायनाट करणे जरूरीचे होते. पहिले खलिफा हजरत अबुबक्र यांनी एक सशक्त सेना त्याच्या दिशेने पाठवली. घणाघाती युध्द झाले. तोतया प्रेषित मारला गेला. त्यात कुरआन तोंडपाठ केलेल्या 'हाफिज' लोकांची संख्या खूपच कमी झाली. या युध्दानंतर पवित्र कुरआनच्या संरक्षणाचा, त्याला अखंड राखण्याचा प्रश्न उपस्थित झाला.
हजरत उमर एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले पैगंबर सोबती होते. त्यांच्यासंदर्भात एकदा स्वतः पैगंबर साहेब म्हणाले होते, "माझ्यानंतर कोणी प्रेषित झाले असते तर ते उमर झाले असते !" यावरून आपण कल्पना करू शकतो की उमर रजिअल्लाह किती विद्वान व दूरदर्शी होते. या युध्दतील नरसंहारामुळे त्यांची झालेली व्याकुळता अवाजवी नव्हती. कारण त्यामागे प्रश्न होता. पवित्र कुरआनच्या संरक्षणाचा उमर रजिअल्ला हजरत अबूबक्रना भेटले आणि त्यांना म्हणाले, "कुरआनचे संकलन करून त्याला एका ग्रंथाचे रूप द्यायला हवे. "अबूबक्र रजिल्लाह यांचे पैगंबर साहेबांवर अफाट प्रेम होते. ते भावनात्मक होऊन म्हणाले, "जे काम पैगंबर साहेबांनी केले नाही ते काम मी कसे करणार? पैगंबर साहेबांनी आपल्या आयुष्यात संपूर्ण कुरआन लिहून घेण्याचे आदेश कधीच दिले नाहीत." परंतू हजरत उमरनी आग्रह सोडला नाही.
शेवटी अबूबक्र रजिल्लाह म्हणाले, "ठीक आहे. यावर आपण एक पंच नेमू. तो देईल तो निर्णय आपण मान्य करू या. दोघांनी हजरत जैद बिन साबित रजिअल्लाह यांना हकम म्हणजे पंच. नेमले. हजरत जैद बिन साबित यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते 'कात्तिबे वह्यी' अर्थात पैगंबर साहेबांचे कुरआनचे लेखनिक होते. कुरआनच्या आयतींचे अवतरण होताच पैगंबर साहेब त्यांना त्या आयती लिहून घेण्याचे आदेश देत असत. ते स्वतः कुरआनचे हाफिजी होते. हे ऐकताच हजरत जैद रजिअल्लाह म्हणाले, "जे कार्य पैगंबर साहेबांनी केले नाही ते आपण कसे करू?" परंतू हजरत उमर म्हणाले, "ओ जैद ! जर आपण संपूर्ण कुरआन अक्षरबध्द केले तर त्यात काय हरकत आहे?" जैद म्हणाले, "काहीच हरकत नाही." त्याचक्षणी पवित्र कुरआनच्या संकलनाचे काम सुरू झाले.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा