इस्तिगफार म्हणजे क्षमायाचना
इस्तिगफार या शब्दाचा अर्थ आहे क्षमायाचना. रमजानचा महिना क्षमायाचनेचाच महिना आहे. क्षमायाचना म्हणजे नेमके काय करायचे ? शरीअतमध्ये त्याकरिता काही विधी काही शब्दावली, काही प्रार्थना किंवा काही जप वगैरे सुचविण्यात आले आहेत. ईश्वरी कमालीची गोष्ट हीच की, त्याने मानवाला निर्माण केले. त्यास उत्तम जीवन जगण्याचे मार्ग दाखविले. त्याकरिता प्रेषित, पीर, वली, पैगंबर आणि असंख्य समाजसुधारक व अनेक मार्गदर्शक पाठविले. एवढेच नव्हे तर लोकांच्या मार्गदर्शनाकरिता त्यांच्या भाषेत पुस्तके पाठविली. त्या पुस्तकांचे अनुवादक, विश्लेषक आणि भाष्यकार पाठविले हे सर्व काही करूनसुध्दा मनुष्य मार्गभ्रष्ट झाला आणि त्याच्या हातून पाप घडलेच तर त्या पापांचे निराकारण आणि प्रायश्चित कसे करायचे, त्याचे सन्माननीय मार्गसुध्दा दाखविले. ईश्वरी आदेशान्वये सर्व प्रेषित मासूम म्हणजे निरपराध असतात. त्यांच्या हातून एकही पाप घडलेले नसते. उलट पापी व्यक्ती प्रेषितांच्या सानिध्यात येताच त्याचा कायापालट होतो. प्रत्येक मनुष्य जन्मल्याबरोबर त्याच्यावर एक फरिस्ता म्हणजे एक नेक व सात्विक शक्ती आणि एक सैतान म्हणजे दुष्ट आणि तामसी शक्ती नेमण्यात येते. माणूस ज्या शक्तीचे आदेश अधिक स्वीकारतो. त्याप्रमाणे त्याचे जीवन सात्विक अथवा तामसी बनते व त्यांचा अंतसुध्दा या धर्तीवरील जीवनावरच आधारित असतो.
इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहिवसल्लम यांच्या कथनानुसार, "मी, माझ्यावर नियुक्त केलेल्या सैतानावर संपूर्णपणे ताबा मिळविला असून तो मला कदापि मार्गभ्रष्ट करू शकणार नाही. "एवढे असूनसुध्दा प्रेषित साहेब दिवसातून किमान सत्तरवेळा इस्तिगफार म्हणजेच क्षमा मागायचे. ही क्षमायाचना करताना ते नेमके काय म्हणायचे ? ते शब्द मूळ अरेबिक भाषेत असायचे. कारण प्रेषित साहेबांची मातृभाषाही अरेबिक होती आणि या इस्तिगफारच्या शब्दावलीत मूळ शब्द असायचे "अस्तगफिरूल्लाह रब्बी !" याचा अर्थ 'हे माझ्या ईश्वरा ! हे माझ्या पालनकर्त्या ! मला क्षमा प्रदान कर...!' या मूळ मंत्रावरून प्रेषित साहेबांनी संपूर्ण मानवजातीला त्या अल्लाहल्ला निर्माणकर्त्याला, त्या सृजनकर्त्याला ध्यानी मनी राखून आणि अत्यंत विनम्रपणे, आपल्या अंतःकरणाला जागे राखून म्हणा, 'अस्तगफिरूल्लाह रब्बी मिनकुल्लीजमबिन व अतुबू इलैहि" या वाक्याचा मराठी अर्थ असा "हे ईश्वरा ! सृजनकर्त्या मी तुझ्या चरणी माझ्या पापांची क्षमा मागतो आणि तुझ्याकडे परततो. म्हणजे माझ्या हातून पुनश्च असे काही घडणार नाही. याची मी हमी देतो. हा अनेक क्षमायाचनांपैकी एक संच आहे. या प्रार्थनांना अत्यंत इतमामपूर्वक आणि मन लावून व अत्यंत शांतचित्ताने पठण करणे जरूरीचे आहे. हजार वेळा पुटपुटत राहण्यापेक्षा अल्लाहकडे ध्यानधारणा करून आणि तोच जगाचा स्वामी आहे, तोच मला क्षमा प्रदान करणार आहे असा विश्वास धरून शंभर वेळा याचा जप केलेला बरा.
रमजान महिन्यातील प्रत्येक क्षण अत्यंत मौल्यवान असून आपण उठता बसता क्षमायाचनेचे मंत्र म्हणत राहणे उचित ठरेल. इस्लाम धर्माने मोक्ष आणि मुक्ती प्राप्त होण्याचा दरवाजा आपल्या अनुयायांकरिता सदैव उघडा ठेवला आहे. इस्लाम प्रत्येक माणसाला मुक्ती मिळवून देण्याकरिता वचनबध्द आहे. या वचनबध्दतेचा पवित्र कुरआनात अनेक ठिकाणी उल्लेख आहे. 'जर एखाद्या व्यक्तीकडून वाईट कृत्य घडेल अथवा आपल्या स्वतःवर अत्याचार केले आणि नंतर अल्लाहजवळ माफीची विनंती केली, तर अल्लाह क्षमा करणारा व कृपा करणारा आढळून येईल. असे अन्निसा या अध्यायात एकशे दहाव्या श्लोकात म्हटले आहे.
पवित्र कुरआनातून अनेक ठिकाणी पापाचे प्रायश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. जे लोक पाप करून त्याच्यावरच अडून राहतात. घमेंड करतात तेच खरे द्रोही आहेत आणि जगात सर्वात मोठा द्रोह म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाचाच इन्कार करणे किंवा संसाराचा निर्माता, पालनकर्ता एकापेक्षा अधिक ईश्वरांना मानणे हे होय. याच वर्तनाला क्रमशः 'कफ' आणि 'शिर्क' असे म्हणण्यात आले आहे. इस्लामी शरीअतमध्ये कुफ्र आणि शिर्क मानवी जीवनात सर्वात मोठे अत्याचार मानले गेले आहे. पवित्र कुरआनमध्ये हजरत लुक्मान यांचे एक विधान नमूद करण्यात आले आहे.
"या बुनैथाला तुश्रिक बिल्लाह, इन्नश शिर्क लजुल्मुन अजीम" याचा अर्थ असा "पुत्रा ! अल्लाहसमवेत कोणालाही सहभागी ठरवू नकोस. सत्य असे आहे की शिर्क फार मोठे पाप आहे. असे लुकमान या अध्यायातील तेराव्या श्लोकात म्हटले आहे.
रमजानच्या महिन्यात विशेष करून एरव्हीही तौबा, दुआ ए मग्फिरत, इस्तिगफार, क्षमायाचना अल्लाहसमोर अत्यंत लाचारावस्थेत प्रार्थना करण्यात उपासकाने गर्क राहिल्यास त्याला अशा गोष्टी प्राप्त होतात, ज्यांचा तो विचारसुध्दा करू शकत नाही.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा