गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

नेताजी सुभाषचंद्र बोस: धडाडीचे नेतृत्व - विशेष लेख

 

नेताजी सुभाषचंद्र बोस: धडाडीचे नेतृत्व - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       आधुनिक भारताच्या इतिहासात एक मनस्वी, प्रतिभावान व असामान्य धडाडीचे देशभक्त म्हणून नेताजींच्याकडे पाहिले जाते. प्रारंभापासून सुभाषबाबूनी देशहित ही एकच गोष्ट स्विकारली आणि तिच्या आड येणारे परकीय राज्यकर्ते असोत अथवा स्वकीय नेते असोत त्यांना कटाक्षाने बाजूला सारले. त्यांची विचारसरणी तरूणांना देशप्रेमाकडे आकर्षित करणारी होती. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती या नात्याने  त्यांनी राष्ट्रवाद नवतरुणांच्यापुढे निर्माण केला.


       नेताजी सुभाषचंद्र बोस हे क्रांतिकारकांचे मेरूमणी होते. ज्या सशस्त्र क्रांतीचे स्वप्न बॅरिस्टर सावरकरांनी बाळगले ते स्वप्न नेताजींनी पूर्ण केले. आझाद हिंद सेनेची स्थापना, नौदलातील उठाव या घटना घडल्या नसत्या तर काय वाटेल ते करून हिंदी लोकांना ताबडतोब स्वातंत्र्य देऊन टाका असा आदेश अँटली यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना दिला असता असे वाटत नाही. यावरून नेताजींच्या कार्याचे महत्त्व समजून येते.


       अशा या महान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ मध्ये कटक येथे झाला. विद्यार्थीदशेत असतानाच ते कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचे नेते झाले. ते १९१९ साली तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी. ए. ची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. विलायतेला जाऊन ते आय. सी. एस्. झाले होते. पण ब्रिटिशांची चाकरी नको म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.


       महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९२१ मध्ये असहकार चळवळीत सुभाषबाबूंनी भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. त्यांना एकदा देशातून तीन वर्षे हद्दपारही व्हावे लागले. त्या काळात ते व्हिएन्ना ऑस्ट्रिया येथे होते. तेंव्हाच त्यांनी फॅसिझम आणि साम्यवादाचा सखोल अभ्यास करून युरोपमधील राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला.


       सुभाषबाबू काँग्रेसमधले एक लोकप्रिय नेते मानले जाऊ लागले होते. हरिपूर आणि त्रिपुरा येथे भरलेल्या काँग्रेसचे ते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांच्या जहाल स्वभावामुळे त्यांना गांधीजींचे विचार पटले नाहीत. त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. तेंव्हा त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले.


       नेताजी त्यांच्या घरात नजरकैदेत असताना एके दिवशी वेषांतर करून निसटले आणि पेशावर मार्गे जर्मनीत गेले. परदेशात जाऊन तिथल्या भारतीयांची संघटना करण्यासाठी त्यांनी फार श्रम केले. जर्मनी, इटली येथे असलेल्या भारतीय सैन्याला त्यांनी इंग्रजाविरूद्ध लढण्यासाठी अवाहन केले.


       २१ ऑक्टोबर १९४३ ला सुभाषबाबू सिंगापूरला आले. त्यांनी तेथे आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ते स्वतः राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, सरसेनापतीही झाले. त्यांनी समांतर सरकार स्थापन केले. आझाद हिंद सेना विजयी होत, लढत इंफाळपर्यंत आली. पुढे जपानचा युद्धात पराभव झाला. सुभाषबाबूंनाही माघार घ्यावी लागली. तेंव्हा विमानाने ते रशियाकडे निघाले, पण त्या विमानाला अपघात झाला. त्यात त्यांचे निधन झाले असे मानले जाते.


       "तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूँगा।" हा त्यांचा नारा होता. सुभाषबाबू भारताचे एक महान सुपूत्र होते, झुंजार नेते होते. परदेशात जाऊन परदेशाच्या सहकार्याने इंग्रजांना पळवून लावावे ही त्यांची जिद्द होती.


       सुभाषबाबू आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून काम पहात असताना त्यांनी खरोखरच एक अदभूत जग निर्माण केले होते. त्यांनी देशोदेशी पसरलेल्या जाती धर्माच्या हिंदी नागरिकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये देशभक्ती निर्माण केली. एक राष्ट्रवादी परंपरा निर्माण करून त्यांना उत्कृष्ट उत्साहाने स्वार्थत्याग करावयास शिकविले. हे करीत असताना गांधीजी व त्यांच्या सहकाऱ्यांना कधीच अवमानिले नाही. या देशभक्तांचा तितकाच आदर केला. त्याचबरोबर भारतीय प्राचीन परंपरा ही आधुनिक विज्ञानाशी व आधुनिक समाजाशी, शिस्तीशी विसंगत नाही हे सर्वांना दाखवून दिले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा