बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले


२८ नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा विशेष लेख.


थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       समाजाने छळले आणि राजाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची? अशा काळात छळ, अपमान, कष्ट सहन करीत दिवसरात्र देह झिजवित जोतिबांंनी मानव समाजाला प्रकाश दाखविला. जोतिबा ज्या काळात जन्मले, वाढले त्या काळात त्यांनी आपल्या कार्याने सर्व मानवांच्या ह्रदयात आदराचे स्थान मिळविले. अज्ञान, दुष्ट रूढी, अनिष्ट परंपरा आणि भयंकर दारिद्र्याने समाजाला ग्रासून टाकले होते. मूठभर लोकांच्या हाती विद्याधन होते. तर बहुजनांना  शिक्षण म्हणजे काय हेही समजत नव्हते. स्त्रियांची अवस्था तर गुलामासारखीच होती. हक्क आणि स्वातंत्र्य त्यांच्यापासून कैक योजने दूर होते. विद्याधन त्यांना प्राप्त करता येत नव्हते. समाजातील दलित वर्गाला कोणी जवळ घेत नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांचा स्पर्शदेखील वर्ज्य मानीत होते. अशा या काळात जोतिबा समाजसुधारक म्हणून अवतरले.


       जोतिबांना स्वतःसाठी कांही मिळवायचे नव्हते. त्यांना समाजाची अधोगती थांबवायची होती. समाजातील मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून, समाजाला समता, स्वातंत्र्य आणि माणुसकीचे हक्क मिळवून द्यायचे होते. रूढी परंपरांच्या नावाखाली समाजावर जो अनिष्ट, अमानुष पगडा बसला होता तो दूर करायचा होता. माणसाला माणूसपण बहाल करायचे होते. गुलामगिरीतून माणसाला मुक्त करून त्यांच्या जीवनात चैतन्य आणायचे होते. जोतिबांचा समाजात जो अपमान झाला, त्याने त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी पैदा केली. त्यांच्या मनात सामाजिक चळवळ उभी करण्याच्या कल्पनेने जन्म घेतला. त्या दृष्टीने त्यांची पावले पडू लागली. त्यांच्या मनात विचार आला, मी तर चांगला सुशिक्षित आहे. चांगले वाईट मला कळते. आम्ही तर सर्व मानव, आम्ही एकाच धर्माचे. मग मी कमी दर्जाचा असे त्या लोकांना का बरे वाटते? नीती ने वागणे हाच खरा मानवधर्म. एकमेकांमध्ये भेदभाव करणे हा समाजावरचा कलंक आहे. बहुजन समाजातील लोकांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करायला हवा. त्यामुळे ते गुलामगिरीविरुद्ध लढायला तयार होतील.


       स्त्रिया आणि दीन दलितांना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचे जोतिबांनी ठरविले. सन १८४८ च्या सुमारास त्यांनी पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी शाळा काढली. समाजाचा रोष पत्करुन आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून कार्यरत होण्यासाठी संधी दिली. जोतिबा आणि सावित्रीबाई शाळेत विनावेतन राबत होते. घरखर्च भागविण्यासाठी जोतिबा कपडे शिवण्याचेकाम करायचे, तर सावित्रीबाई चटया विणायच्या.


      त्या काळी अनेक क्रूर आणि वेडगळ समजुतींनी समाजाला अवकळा आणली होती. पती निधनानंतर पत्नी ला सती जावे लागत असे. केस कापून तिला घरातच डांबून ठेवले जात असे. विधवा स्त्रियांना कोणी वाली नव्हता. म्हणून त्यांनी विधवा विवाहाला पाठिंबा दिला. कांही विधवा स्त्रियांचे विवाहही त्यांनी लावून दिले. टाकून दिलेल्या मुलांसाठी जोतिबानी माणुसकीच्या दृष्टीकोनातून एक अनाथालय सुरु केले. एकदा एक विधवा स्त्री त्यांच्या अनाथालयात आली, तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला व निघून गेली. जोतिबांना मूलबाळ नव्हते. त्यांनी त्या मुलालाच आपला पुत्र मानले. त्याचे नांव यशवंत ठेवले. त्याला डॉक्टर बनविले. पुढे त्यानेही समाजसेवेचा वारसा चालू ठेवला.


      दीनदलित मुलांसाठी शाळा काढणारे पहिले भारतीय, स्त्रियांसाठी देशात पहिली शाळा काढणारे स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्रियांचे हक्क व स्वातंत्र्याचे जनक, शेतकरी आणि कामगार यांचे दुःख आणि दारिद्रय निवारण्यासाठी लढा उभारणारे पहिले पुढारी, भेदभाव मानणाऱ्यांंवर हल्ला चढविणारे आणि समानतेची घोषणा करणारे पहिले लोकनेते, सामान्य जनतेच्या दुःखाला वाचा फोडणारे पहिले महात्मा आणि सत्यमेव जयते या दिव्य मंत्राने भारावून गेलेले जोतिबा फुले हे खरे सत्यशोधक होते.


       स्त्रिया, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नाप्रमाणेच जोतिबांनी दलित वर्गाच्या दैन्यावस्थेकडेही समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधले. इंग्लडचे राजपुत्र आपल्या देशात आले असता, त्या समारंभात शेतकऱ्याच्या वेशात उपस्थित राहून जोतिबांनी खरा भारत कसा आहे हे प्रत्यक्ष दाखवून दिले.


       शैक्षणिक कार्यासाठी जोतिबांनी केलेला त्याग आणि घेतलेले अपार कष्ट आणि सोसलेला छळ यांविषयी महाराष्ट्रभर त्यांचे नांव झाले. त्यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती इंग्लंडमधल्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचली होती. सरकारने जाहीररीत्या त्यांना मानाची शालजोडी अर्पण करून त्यांचा बहुमान केला. त्यावेळी जोतिबा अवघे पंचवीस वर्षांचे होते. त्यांचे कार्य आणि त्याग पाहून लोक त्यांना महात्मा म्हणू लागले. जोतिबा खऱ्या अर्थाने महात्मा ठरले.


त्यांच्या पवित्र स्मृतींना शतशः प्रणाम ।


1 टिप्पणी:

  1. खूप छान लेख... म्हणूनच शिक्षक दिन महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त किंवा पुण्यतिथीनिमित्त साजरा करायला हवा.....अशी मागणी वाढत आहे....

    उत्तर द्याहटवा