महात्मा गांधीजींचे स्मरण
"आपला धर्म म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. सगळी जणं माणसंच आहेत. आपण अस्पृश्यांवर अन्याय करणे योग्य नाही, ते पाप आहे, आपण त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे." अशी शिकवण देणाऱ्या, ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून संबोधतो त्या बापूजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ हा जन्मदिवस. महात्मा गांधीजी यांनी आपल्या आचार विचारांनी सर्व जगात मानाचे स्थान मिळविले. त्यांनी आपले विचार व आचरण यांच्यात एकवाक्यता ठेऊन जीवन व्यतित केले.
'विनाशस्त्र, रक्ताचा एकही थेंब न सांडता, ज्यांनी केवळ अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला असा 'हाडामांसाचा माणूस' या पृथ्वीवर होवून गेला यावर पुढील पिढी क्वचितच विश्वास ठेवेल.' असे अल्बर्ट आईनस्टाईन यांनी म्हटले आहे. किती सार्थ आहेत ना त्यांचे विचार?
संपूर्ण राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणे हीच त्यांच्या दृष्टीने ईश्वरसेवा होती. या सेवेसाठी आयुष्यभर त्यांनी कांही व्रते अंगीकारली. गांधीजींच्या चिंतनाची प्रगल्भता जसजशी वाढत गेली तसतशी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना ही एकादश व्रते त्यांना जाणवली, दिसत गेली. महात्मा गांधीजींच्या विचारांचे मंथन करून पूज्य विनोबाजींनी ही व्रते कविताबद्ध केली. ही व्रते आपल्याला माहीत झाली पाहिजेत.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह।
शरीराश्र, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन।
सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना।
ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रत निश्चये।
महात्मा गांधीजींच्या एकादश व्रतापैकी शरीरश्रम हे एक व्रत आहे. या ठिकाणी शरीरश्रम म्हणजे व्यायाम नव्हे किंवा मजुरीने शरीर झिजवणे नव्हे. जीवनाला आवश्यक असणारे पदार्थ उत्पन्न करण्यासाठी स्वतः शारीरिक परिश्रम करणे हा येथे शरीरश्रमाचा अर्थ आहे. जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी मेहनत न करता उपभोगणे किंवा स्वतंत्र मेहनतीचा मोबदला न देता एखाद्या गोष्टीचा उपभोग घेणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने चोरी करणे होय. ते म्हणत आपला उदरनिर्वाह आपला आपण करावा या हेतूने परमेश्वराने मनुष्यजन्म दिला आहे. जो स्वतः कष्ट न करता जगतो, तो एक प्रकारे चोरीच करतो असे बापूजींना वाटायचे.
आपल्या देशाला इतकी महान संस्कृती, विचार लाभलेले असताना कांही लोकांना स्वच्छता किंवा त्यासंबधी असणाऱ्या कामांची सामाजिक जबाबदारी ही माझी नसून शासनाची आहे असे वाटते. विशेषतः उच्चपदस्थ किंवा शिकलेले लोक बरेचदा शारीरिक श्रमापासून दूर राहू इच्छितात. त्यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनशैलीकडे पाहून श्रमप्रतिष्ठा वाढवायला हवी.
महात्मा गांधीजींच्या विचारसरणीत मनुष्याने आपल्या गरजा कमी करणे, खाजगी परिग्रह शक्य तितका कमी करणे, स्वतःचे काम स्वतः करणे या बाबी एखाद्या व्रताप्रमाणे मानल्या गेल्या आहेत. म्हणूनच गांधीजींनी सूत कातणे, सफाई करणे यांना यज्ञाइतके महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते शारीरिक श्रम करून जे प्रामाणिकपणे काम करतील अशा सर्वांना आपल्या देशात पुरेशा प्रमाणात काम आहे. ज्याला पै न् पै प्रामाणिकपणे मिळवायची आहे, त्याला कोणत्याही प्रकारचे काम हलके किंवा कमी दर्जाचे वाटत नाही. प्रत्येकाची आपले हात-पाय हलविण्याची तयारी हवी. म्हणजेच शरीरश्रम व कष्ट करायची तयारी हवी. भुकेल्या आणि आळशी लोकांना परमेश्वराचे खरे रूप पहावयाचे असेल तर ते त्यांना कामातच दिसेल. आपण प्रत्येकाने जीवनात हे व्रत तंतोतंत आचरल्यास देशात क्रांति झाल्याशिवाय रहाणार नाही.
महात्मा गांधीजींचे स्मरण करताना सत्य, अहिंसा ही मूल्ये चटकन् आठवतात. ती आजन्म पाळणे ही सोपी गोष्ट नाही, पण स्वावलंबन आणि कोणतेही काम करण्याची तयारी ही मूल्ये सामान्य माणसाच्या अवाक्यातील आहेत.गांधीजी स्वत्ःची सगळी कामे स्वतः करीत. ते कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचे, झाडलोट, आजाऱ्यांची सेवा ही तर त्यांची नित्याचीच कामे होती. याशिवाय भंगी, न्हावी, चांभार, धोबी, शिंपी यांची कामेही त्यांनी शिकून घेतली होती. मोठ्या आनंदाने व उत्साहाने ते ती कामे करीत असत. त्यांच्या कामात नियमितता होती, शिस्त होती, आनंद होता. कोणतेही काम त्यांना कमी दर्जाचे किंवा किळसवाणे वाटत नसे. म्हणूनच त्यांनी परचुरे शास्त्रीसारख्या महारोगी रूग्णाची सेवा प्रेमाने केली. संडास सफाई करणे त्यांना ओंगळवाणे वाटत नव्हते.
थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा।
आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा।।
थोर पुरूषांच्या चरित्रांचे वाचन, श्रवण त्यांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने केले जाते, पण आपण त्यांच्या समान व्हावे असा प्रयत्न केला जातो का? ते कसे शक्य आहे? ते महात्मे कुठे आणि आम्ही सामान्य माणसे कुठे? त्यांची बरोबरी कशी करता येईल? असा प्रश्न विचारण्यात येतो. तो प्रश्न चुकीचा नाही. पण महान व्यक्ती या जन्मतःच महत्पदाला पोहोचलेल्या नसतात, त्यासाठी त्यांनी सोसलेले कष्ट, केलेला त्याग, संघर्ष, त्यांची नीतिमत्ता, त्यांनी प्राणापलीकडे जपलेली तत्वे यांचा कांही प्रमाणात स्वीकार सामान्य माणसालाही करता येईल. आज लहानसहान कामासाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो. अशी कामे करण्यात आपल्या सुशिक्षित मनाला लाज वाटते. अशा वेळी गांधीजींचे स्मरण करावे. त्या महात्म्याने घालून दिलेली श्रमप्रतिष्ठेची व स्वावलंबनाची वाट आपण यथाशक्ती चालण्याचा, अंगिकारण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने राष्ट्रपित्याची जयंती साजरी होईल असे मला वाटते.
शेवटी ही काव्यपुष्पांजली
प्रियतम आमचे गांधीजी।
नमन तयांना आज करू।
जन्मदिनी या फुले वाहुनी।
गान तयांचे कर जोडोनी।
फारच सुंदर लेख.
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाखूपच उत्तम लेख👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवा