मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

शिक्षक गौरव - विशेष मराठी लेख


   शिक्षक गौरव

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गूगल

'करी मनोरंजन जो मुलांचे 

जडेल नाते प्रभुशी तयाचे'


      असे साने गुरुजींनी म्हटले आहे. गुरू नेहमीच मुलांचे मनोरंजन करीत असतो. त्यामुळे त्याचे नाते परमेश्वराशी जडलेले असते. आईच्या प्रेमळ छत्राखालून तो जेंव्हा बाहेर पडतो, तेंव्हा त्या निरागस, कोवळ्या मनाचा गुरू हाच परमेश्वर असतो.


       आपण शिक्षकास आचार्य म्हणतो. ज्याचे आचरण आदर्श असते, तोच आचार्य होय. शिक्षकाला अध्यापक म्हटले जाते. त्यातील 

म्हणजे अध्ययन करणारा,

ध्या म्हणजे अध्यापनाचा ध्यास घेतलेला,

म्हणजे अध्यापनाची पद्धत जाणणारा,

म्हणजे कर्तव्याची जाण ठेवणारा. 


        भारतीय संस्कृतीत शिक्षकांचं स्थान नेहमीच मानाचं मानलं गेलं आहे. भारतीय संस्कृतीचा दीप शिक्षकांमुळेच तेवत राहिला आहे. देशाचे भवितव्य ठरविणारे आजचे विद्यार्थी उद्याचे समर्थ, सक्षम नागरिक बनणार आहेत त्यांचे भविष्य शिक्षकांच्या हातूनच घडते. कोणत्याही व्यवसायापेक्षा शिक्षकांचा व्यवसाय सर्वार्थानं वेगळा आहे. त्या व्यवसायाचं यशापयश अनेक वर्षानंतर ठरते. त्यांच्यासमोर असतात ते बालकांचे निरागस कुतूहलाने रसरसलेले, अवखळ, अल्लड, चैतन्यदायी चेहरे. शिक्षक त्या बालकरूपी इवल्या रोपट्यांचे महावृक्षात रूपांतर करतात.

     

     मनुष्यबळ संपत्ती ही सर्वकाळात सर्वश्रेष्ठ साधनसंपत्ती मानली गेली आहे. म्हणून ही संपत्ती मोठ्या विश्वासानं पालक शिक्षकांच्या हाती देतात. अनेकविध भाव-भावना, बुद्धी-ज्ञान यांचा अखंड वाहणारा हा झरा  स्वतंत्र, निर्मळ, चैतन्यदायी ठेवण्यात शिक्षकांचं कौशल्य पणाला लागतं. हे कौशल्य प्राप्त करून स्वतः विद्यार्थी बनून शिकत-शिकत राहणारे शिक्षक हा राष्ट्राचा  अमोल ठेवाच असतो. शाश्वत मूल्यांवरचा विश्वास, प्रगत ज्ञानावरची निष्ठा वास्तवाला सामोरं जाण्याचं धैर्य, नवनवीन ज्ञान ग्रहण करणारं ताजंतवानं मन ठामपणे विकसित होणारा आत्मविश्वास, विधायक कार्य करण्याची प्रेरणा ही शिक्षकांकडून मिळणारी अमूल्य देणगी आहे. डॉ. राधाकृष्णन म्हणत, 'ज्यावेळी सारे जग ते उद्विग्न होईल, त्यावेळी फक्त दोन व्यक्तींच्या अंत:करणात सदिच्छा शिल्लक राहतील त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे आई व दुसरी म्हणजे शिक्षक.'


              भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते उत्तम शिक्षक होते. म्हणून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. भारत  सरकार आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने १९६२ मध्ये हा दिवस प्रथम साजरा केला गेला.


        शिक्षकांच्या स्वास्थ्यावरच राष्ट्राचे स्वास्थ्य अवलंबून असते. आपल्या देशातील शिक्षक हेच आपल्या भविष्यकाळाचे रक्षणकर्ते आहेत. म्हणून  त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देऊन गुरुजनांसंबंधीच्या आपल्या विविध कर्तव्याची आठवण शिक्षकदिनी यावी  ही अपेक्षा.


1 टिप्पणी: