मराठी लघुकथा संच - ६
लघुकथा क्रमांक - २६
एक व्यक्ती पोलिस असते. ती पोलिस ठाण्याच्या हेड ऑफिसमध्ये कार्यरत असतात. त्यांची पत्नीही पोलिस असते. लॉकडाऊनच्या काळात पन्नास वर्षावरील पोलिसांना सुट्टी दिल्याने तिला ट्रॅफिक पोलिसाची ड्युटी करावी लागते. एके दिवशी पती ड्युटीवर निघालेले असताना ती सांगते हेल्मेट घाला, पण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ते निघून जातात. ड्युटी संपल्यानंतर परत येताना बघतात तर पत्नी पोलिस त्यांना अडवते. बिगर हेल्मेट प्रवास करणाऱ्याचा कॅमेरा चालू करून फोटो घेते व पाचशे रूपये दंडाची पावती फाडून दंड वसूल करते. पोलिस पतीना फार राग येतो पत्नीचा, पण पत्नी अविचलपणे आपले कर्तव्य पार पाडते. त्या दिवसापासून पती महाशय हेल्मेटशिवाय बाहेर पडत नाहीत. याला म्हणतात शिस्त म्हणजे शिस्त।
लघुकथा क्रमांक - २७
एका ऑफिसमधील सर्व स्टाफ एका कर्मचाऱ्याच्या आईचे निधन झाल्याने त्याच्या सांत्वनासाठी भाड्याने गाडी ठरवून त्यांच्या बॉससह निघतात. अर्थात गाडीभाडे टी. टी. एम्. एम्. करून द्यायचे ठरते. स्टाफचे बॉस बॉसच्या रूबाबात ड्रायव्हर सीटच्या जवळच्या सीटवर बसतात. गाडी पेट्रोल भरायला थांबते. ड्रायव्हर खाली उतरतो. पाठोपाठ बॉसही उतरतात. स्टाफला बरे वाटते. आता बॉस पेट्रोल चे पैसे भागवणार नंतर हिशोब करून सर्वांचे पैसे गोळा करून देऊ त्यांना, असा विचार करतात. पण बघतात तर काय। बॉस महाशय लघुशंकेसाठी निघून जातात. दुसऱ्या एकाने पैसे भागवून गाडी निघाल्याचा हॉर्न वाजल्यावरच परत येतात. स्टाफने काय ओळखायचे ते ओळखले, एकमेकांजवळ कुजबुजले असा हा बॉस आणि याला वाटतं मला सर्वानी मानलं पाहिजे. आधी बॉस सारखं वाग ना।
लघुकथा क्रमांक - २८
एस्. टी .स्टँडवर एस्. टी. बस थांबली. प्रवासी भराभर वर चढू पहात होते. कंडक्टर मॅडमनी त्यांना थांबवलं व म्हणाल्या ज्यांच्याकडे सुट्टे पैसे असतील त्यांंनीच गाडीत चढा. कांही प्रवासी चढायचे थांबले. तिकीट काढणे सुरु झाले. मॅडम एका महिलेजवळ आल्या. तिनं शंभरची नोट काढून दिली व एक तिकीट द्या म्हणाली. कंडक्टर म्हणाल्या, "सुट्टे सतरा रुपये द्या, तुम्हांला त्र्याऐंशी रुपये कुठले देऊ परत? तुम्हाला सांगितले होते ना, सुट्टे पैसे असतील तरच वर चढा म्हणून." आता मात्र ती महिला जाम चिडली व फणकाऱ्याने म्हणाली, "आम्हाला सांगतीस सुट्टे पैसे असतील तरच गाडीत चढा, तुझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत मग तू कशाला गाडीत चढलीस. तुला काय वाटतं एस्. टी. तुझ्या बापाची हाय?" यावर कंडक्टर मॅडम काय बोलणार?
लघुकथा क्रमांक - २९
सुवर्णा एक समंजस, सुजाण महिला होती. घरातील व्यक्तींशी, नातेवाईकांशी तिचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते कारण सुवर्णा सर्वांशी प्रेमाने वागत होती. आपल्यामुळे कुणालाही कसलाही त्रास होणार नाही याची ती नेहमी काळजी घ्यायची. सर्वांचा पाहुणचार करणे, रीतीभाती सांभाळणे यात ती नेहमीच अग्रेसर होती सर्वजण तिच्या वागणुकीवर खूष होते. आत्तापर्यंत तिने कुणाला नावं ठेवायची संधीच दिली नव्हती. तिला ही आपल्या वागण्यावर ठाम आत्मविश्वास होता. एकदा तिच्या जाऊबाईंचे काका गैरसमजामुळे तिला म्हणाले, "सुवर्णा तू एका परीक्षेत नापास झालीस." सुवर्णा ठामपणे म्हणाली, "माझी परीक्षा घेणारा परीक्षकच कच्चा असेल काका, रिचेक करा हवं तर!"
लघुकथा क्रमांक - ३०
कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या पेशंटना एका मंत्री महोदयांनी भेट दिली. "तुमची सर्व व्यवस्था चांगली आहे का? नाष्टा, जेवण, वेळेवर मिळतं का? हे विचारलं." सर्व पेशंटनी व्यवस्था चांगली आहे, नाष्टा, चहा, जेवण वेळेवर व चांगलं मिळतं असं सांगितलं. एक महिला पेशंट मध्येच ऊठून म्हणाली, "साहेब एकच गैरसोय आहे बघा. चार साडेचार वाजता चहा मिळतो बघा, त्या चहाबरोबर बिस्कीट फिस्किट देण्याची व्यवस्था करा. रात्री साडेआठपर्यंत फार भूक लागते हो. आम्ही की न्हाय कामाची आणि भरपूर खाल्ला्या पिल्ला्याली माणसं हाय!" साहेब मनात म्हणाले, "बरोबर आहे तुमचं. सरकारी पाहुणे आहात ना।"
Mast katha
उत्तर द्याहटवा