शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

कर्मवीर भाऊराव पाटील : एक युगपुरुष


 कर्मवीर भाऊराव पाटील : एक युगपुरुष

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूूूगल


               कर्मवीर आण्णा, तुमचे पाऊल तिथे प्रकाश! तुम्ही नसता तर फत्तराच्या छातीतून प्राणांना कोंब फुटले नसते, दलितांच्या दंडात कर्तृत्वाच्या बेडक्या फुगल्या नसत्या, घाणेरीच्या फुलांना स्वाभिमानाचा रंग चढला नसता. सहकार्य, सेवा, श्रम व शिक्षण यातून जीवन सुखमय बनते. हा महान संदेश देणाऱ्या कर्मवीर आण्णांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ साली कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांचे शिक्षण फक्त सहावीपर्यंत झालं होत, पण ध्येयाने झपाटलेल्या या महान कर्मवीरांनी वाट्टेल ते कष्ट झेलून आपले कार्य सिध्दीस नेले. ज्यावेळी आण्णांनी आपल्या शैक्षणिक कार्यास सुरूवात केली. तो काळ पारतंत्र्याचा होता. त्यावेळी जनता रूढी परंपरा भोंदूगिरी व धर्मभोळेपणा यामध्ये भरडली जात होती. हे लोक अंधारात चाचपडत होते. ज्या ज्या ठिकाणी अंधार होता त्या त्या ठिकाणी ते ज्ञानाची ज्योत घेवून गेले. लोकांच्या रोमा रोमात भरलेल्या अंधश्रद्धा त्यांनी ज्ञानज्योतीने दूर केल्या.


       आण्णा खेडोपाडी, घरोघरी हिंडले आणि त्यांनी ज्ञानाचे महत्व लोकांना पटवून दिले. निरनिराळ्या जाती धर्माच्या हुशार मुलांना साताऱ्याला एकत्र आणले आणि ज्ञानदानास सुरूवात केली. कर्मवीर आण्णा म्हणत, धर्म आहेत तरी काय? हे पाडले कोणी? बरं शेवटी प्रत्येक धर्मातील माणूस हाडामासांचाच बनलेला आहे ना? सगळ्यांचे रक्त लालचं आहे ना?

         

       आण्णांनी ठिकठिकाणी बोर्डिंगची स्थापना केली व तेथे निरनिराळ्या जातीधर्मांच्या मुलांना प्रवेश दिला. ही मुले एकत्र राहिली, एकत्र बसली-उठली, एकत्र जेवली, एकत्र शिकली, एकत्र झोपली आणि या एकत्रीकरणामुळेच या मुलांनी जाती धर्माची बंधने तोडून टाकून रूढी परंपरांना तिलांजली दिली. कर्मवीर आण्णांनी साताऱ्याला शाहू बोर्डिंगची स्थापना केली व रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला सुरूवात केली. कर्मवीर आण्णा व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या मुलांचे माता-पिता बनले. मुलांसाठी या शैक्षणिक कार्यासाठी या दांम्पत्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. तरूणांना स्वावलंबनाचे महत्व पटवून दिले. त्यांनी एक नवीन तत्व, नवीन सूत्र जनतेसमोर ठेवले ते म्हणजे म्हणजेच Earn and leam कमवा आणि शिका. त्या काळात गरीबीमुळे शिक्षण ही फार दुर्मिळ गोष्ट बनली होती. श्रीमंत लोक आपल्या मुलांना शिकवायचे मग गरिबांनी जायचे कुठे? याच्यावर आण्णांनी तोडगा काढला. गरिबांनी प्रथम आपल्या पायावर उभं रहायचं, कमवायला शिकायचं व कमवत असतानाच शिकायचं. त्यांनी श्रीमंताकडे पडीक जमिनी मागितल्या ते लोकांना म्हणत,

"Give us waste land, we shall turn it into best land"

आणि या अशा पडीक जमिनीतूनच कष्टाच्या घामाचे मोती बनले. पडीक जमिनीतून सोनं पिकवलं व ते सोनं शिक्षण प्रसारासाठी खर्च केलं.

         

     आण्णा नसते तर बॅरिस्टर पी. जी. पाटील, आमदार एन. डी. पाटील यासारखे लोक विद्वान म्हणून चमकले नसते. आण्णा नसते तर शेतकऱ्यांच्या पायात त्राण व डोक्यात ज्ञान आले नसते, बहुजन समाज मागेच राहिला असता. आण्णा नसते तर लोकशाहीत लोकांना आपल्या हक्कांची जाणीव झाली नसती स्वराज्य मिळूनही त्याचे सुराज्य झाले नसते. आण्णांनी शिक्षणाचे बीज पेरले नसते तर आज काहीच उगवले नसते. संपादकांचे पेपर्स वाचले गेले नसते, लेखकांची पुस्तके ग्रंथालयात पडून राहिली असती, दलित पँथर सारख्या संघटना जागृत झाल्या नसत्या. नामदेव ढसाळ, अमर शेख, आण्णाभाऊ साठे, दया पवार, ना. दो. महानोर यासारखे कवि लेखक झाले नसते. कर्मवीर नसते तर हजारो शाळा, शेकडो कॉलेजेस आणि कोट्यावधी विद्यार्थी दृष्टीपुढे आले नसते. उच्च लोकांच्या हाती असलेली ज्ञानगंगा सामान्य लोकांच्या अंगणात आली नसती. त्यांनी स्थापन केलेल्या हायस्कूलमध्ये शिकून आलेली माझ्यासारखी सामान्य मुलगी त्यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक चार शब्द लिहू शकली नसती!

                

       साऱ्या जगाने वाहवा केलेले कर्मवीर, या भारतमातेचे सुपुत्र, महाराष्ट्राच्या शिरपेचातील मुकुटमणी आहेत. त्यांच्याबद्दल म्हणावेसे वाटते


'असा मोहरा झाला नाही 

पुढे कधी ना होणार 

कर्मवीर अण्णा, तुमचे नाव

सतत गर्जत राहणार.'


२ टिप्पण्या: