शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

मराठी लघुकथा संच - ३

 

मराठी लघुकथा संच - ३


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



लघुकथा क्रमांक - ११


       एक भाऊजी फार गप्पीष्ट होते. ते आपल्या मेहुणीला म्हणाले, "मी तुला एका झाडाचे रोप आणून देतो. फार सुंदर दिसते ते झाड. त्या झाडाची पाने फुलासारखी दिसतात. ते झाड फार मोठे होत नाही. गेटच्या जवळ दर्शनी भागातच लाव बरं का! फार शोभिवंत दिसेल बघ तुझ्या दारासमोर." मेहुणी म्हणाली, "ठीक आहे' आणून द्या." हे बोलणे होऊन दोन वर्षे झाली तरी रोप काही भाऊजींंनी आणून दिले नाही. एकदा भेटल्यावर मेहुणी भाऊजीना म्हणाली, "भाऊजी, तुम्ही दिलेलं झाड इतकं छान वाढलय! त्याची पानं फुलासारखी सुंदर दिसत आहेत. दर्शनी भागात लावल्यामुळे सर्वजण विचारतात, कुठून आणलं हे रोप? मी तुमचं नाव सांगते." भाऊजींचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला.



लघुकथा क्रमांक - १२


       एक महिला पालक आपल्या साडेचार वर्षाच्या मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी आली. शिक्षकांनी सांगितले, "यावर्षी त्याचं वय बसत नाही, तुम्ही सांगत असलेल्या तारखेवरून. पुढच्या वर्षी त्याचं नाव दाखल करू या." पुढच्या वर्षी लवकर नांव दाखल करताना शिक्षकांनी तिला विचारले, "तुमच्या  मुलाची जन्मतारीख सांगा?" ती म्हणाली, "गेल्या वर्षी जन्मतारीख सात ऑगस्ट २०१३ होती, यावर्षी सात ऑगस्ट २०१४ झाली, व्हय की न्हाय? मी पण मॅट्रिक शिकल्याली हाय, अडाणी न्हाय. मला पाठच हाय सगळं." शिक्षक डोक्याला हात लावून बसले!



लघुकथा क्रमांक - १३


       मीनाचे लग्न एका इंजिनिअर मुलांशी ठरले. ती स्वतः इंजिनिअर होती पण तिला अद्याप नोकरी नव्हती. योगायोगाने लग्न ठरल्यावर कांही दिवसांनी एका कंपनीकडून तिला ऑर्डर मिळाली. ती नोकरीवर हजर झाली. पहिला पगार मिळाला. मीनाच्या आईने नवस केला होता की, मीनाला नोकरी लागू दे, तिचा पहिला पगार गावातील मंदिर बांधकामासाठी देणगी देईन. मीनाने पगार आईच्या हातात दिला. आईने देणगी दिली. ही गोष्ट नियोजित सासूच्या कानावर गेली. तिने मीनाला फोनवर चांगलेच खडसावले. आम्हाला विचारल्याशिवाय हा कारभार केलासच कसा? आणि कांहींबाही बोलली. तिच्या मुलानेही तिला दुजोरा दिला. यानंतर मीनाने मेसज पाठवला, मला तुमच्याशी लग्न करायचंच नाही. आत्ताच असं तर पुढं कसं?



लघुकथा क्रमांक - १४


       रमेश त्याच्या प्रेग्नंट पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी वाहनाची वाट बघत रस्त्यावर उभा होता. तो येणाऱ्या प्रत्येक वाहनाला थांबविण्यासाठी हात करत होता, पण येणारे प्रत्येक वाहन सुसाट पुढे जात होते. त्याची बायको वेदनेने तळमळत बसली होती. हा प्रकार जवळील एक पानपट्टीवाला पहात होता. तो रमेशजवळ आला. त्याने मध्यम आकाराचा एक दगड उचलून घेतला व एका कारच्या दिशेने भिरकावला. कारची मागची काच फुटली. कार उभी राहिली. लोक गोळा झाले. कारवाला तावातावाने म्हणाला, "चल तुला पोलिसांच्या हवाली करतो." पानपट्टीवाला हात जोडून म्हणाला, "मला पोलिसांच्या हवाली जरूर करा पण त्याआधी या तळमळणाऱ्या स्त्रीला दवाखान्यात पोहचवा प्लीज. मी माझ्या मोटरसायकलने पोलिस स्टेशनला येतो, चला लवकर."



लघुकथा क्रमांक - १५


       सुलभाने दहावीची परीक्षा दिली. तिला गणिताचा पेपर अवघड गेला. परीक्षा दिल्यापासून तिला वाटत होते की ती गणितात नापास होणार. आपली परिस्थिती गरिबीची आहे. मी नापास झाले की शाळा सोडायला लागणार. आपल्याला पुढे शिकता येणार नाही. ही गोष्ट तिनं फारच मनाला लावून घेतली. पूर्वीप्रमाणे ती कुणाशी जास्त बोलत नव्हती. सतत आपल्याच विचारात गुंग असायची. आईच्या लक्षात ही गोष्ट आली होती तिने आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला होता. एके दिवशी घरी कोणी नसल्याचे पाहून गळफास लावून घेतला. दोन दिवसांनी रिझल्ट लागला. तिला गणितात शंभरपैकी बावन्न मार्कस् होते. ती पास झाली होती.


२ टिप्पण्या: