रविवार, २६ जुलै, २०२०

मराठी लघुकथा संच - २


मराठी लघुकथा संच - २


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




लघुकथा क्रमांक - ६

संध्याकाळी साडे-सातची वेळ होती. सासरेबुवाना भूक लागली होती. म्हणून त्यांनी सुनेला विचारले, "भाकरी केल्यास का?" सून म्हणाली, "नाही अजून केल्या. मी बचतगटाच्या मिटिंगला निघाले आहे. आल्यावर भाकरी करणार आहे." ती गेली मिटींगला. सासऱ्यानी शिळी भाकरी तर आहे का पहावी म्हणून बुट्टीत बघितलं तर गरमागरम भाकरी दिसल्या. त्यांनी दोन भाकरी फस्त केल्या व आरामात बसले पुस्तक वाचत. सूनबाईनी आल्यावर बुट्टीत बघितले भाकरी कमी झाल्याचे पण सासऱ्याना विचारले नाही कारण उत्तर आलं असतं न केलेल्या भाकरी कोण कसा बरं खाईल ?


लघुकथा क्रमांक - ७

सासूबाईनी आपल्या उच्चशिक्षित पण बाळ लहान असल्याने नोकरी न करणाऱ्या सूनबाईना स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला. शहरात पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या फॅशन डिझायनिंगच्या कोर्सला जाण्यास सांगितले आणि नातवाला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी घेतली. आपल्या सूनबाईना फॅशन डिझायनिंगची आवड आहे हे सासूबाईनी ओळखले होते. सूनबाईनी अगदी मनापासून तो कोर्स जॉईन केला. कोर्समध्ये तिनं एक छानशी पर्स तयार केली. खरंच पर्स खूप सुंदर व नीटनेटकी बनवली होती. फोटो काढून  स्टेटस ठेवला होता. सासूबाईनी सुनेला क्लासमध्ये मेसेज पाठवला, "यू आर गुड फॅशन डिझायनर." सुनेने रिप्लाय पाठवला "इट्स  क्रेडिट गोज टू यू." सासूबाई जाम खूष।


लघुकथा क्रमांक - ८

संदीप ब्लिचिंग कारखान्यात अगदी प्रामाणिकपणे काम करत होता. सुट्टीच्या दिवशीही कारखान्यात जाऊन ओव्हर टाईम करायचा. दरवर्षी दहावीत शिकणाऱ्या, परिस्थितीने गरीब असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या इंग्रजी विषयाच्या क्लासची फी भरायचा. त्या  मुलांना नियमित क्लासला जायची विनंती करायचा. एका मित्राने त्याला विचारले, "का करतोस संदीप हे सगळं?" संदीप म्हणाला, "क्लास न लावल्यामुळे मला इंग्रजीमध्ये सात मार्क कमी पडले व माझे शिक्षण थांबले. त्याची शिक्षा मी भोगतोय. असं कुणाचं शिक्षण थांबू नये, त्यांना माझ्यासारखी शिक्षा होवू नये म्हणून."


लघुकथा क्रमांक - ९

प्राथमिक शाळेची पहाणी करणाऱ्या भागाधिकाऱ्याना सवय होती की, शिक्षकांचा वर्ग त्यांच्या नकळत खिडकीतून डोकावून पहाण्याची. एका वर्गाच काम व्यवस्थित सुरु होतं. मुले अध्ययनात रमली होती. स्वाध्याय करत होती. वर्गातून फिरताना त्या मॅडमनी स्वतःच्या रूमालाने एका विद्यार्थ्यांचे नाक पुसल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना त्या मॅडमच्या या कृतीचे फार कौतुक वाटले. स्टाफ मिटींगमध्ये अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन त्या मॅडमचा सत्कार केला. बाकीच्या मॅडम मात्र नाराजी ने पुटपुटल्या, साहेबांना काय माहिती तो तिचा स्वतःचा मुलगा आहे म्हणून।


लघुकथा क्रमांक - १०

सूनबाई शाँपिंगला गेल्यावर सासूबाईंच्या लक्षात आले की एक वस्तू आणायला सांगायची विसरली. त्यांनी फोन करून सूनबाईना सांगितले, "अग लता, येतांना एक पर्स घेऊन ये. " सूनबाईनी खरेदीच्या नादात लगेच फोन बंद केला. येताना एक साधी, कमीत कमी किमतीची, मळकट रंगाची पर्स आणली. सासूबाई म्हणाल्या, "अगं तुझी आई उद्या आपल्याकडे पुण्याला जाता जाता येणार आहे ना, त्यांचा उद्या वाढदिवस आहे, विसरलीस की काय. त्यांना गिफ्ट देण्यासाठी पर्स आणायला सांगितली तुला." सूनबाई मनात म्हणाल्या, "तसं सांगायचं ना आधी."



1 टिप्पणी: