असे करा संस्कार! (संस्कार कथा)
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
अनिल नुकतेच ऑफिसमधून घरी आले. चहा घेऊन मोबाईल पहात बसले होते एवढ्यात त्यांचा दुसरीत शिकणारा लाडका चिरंजीव अथर्व शाळेतून आला. त्याच्या आई सुखदाने त्याचे दप्तर घेतले, डबा काढून पाहिला व म्हणाली, "वा अथर्व, सगळा शिरा खावून आलास, कसा झाला होता शिरा?" अथर्व म्हणाला, अगं मम्मी जाताना इतकं भरपूर जेवलो होतो ना, मला भूकच नव्हती, माझ्या मित्राने रमेशने आज डबाच आणला नव्हता. त्याला दिला माझा डबा". अथर्वचे हे बोलणे ऐकून सुखदा जाम चिडून म्हणाली, "एवढा चांगला, साजूक तुपातला, काजू-बदाम घालून तुझ्यासाठी केलेला शिरा तू दुसऱ्याला दिलास? आता बघ मी तुला पुन्हा कधीच शिरा करुन देणार नाही". सुखदाचे बोलणे अनिलला खूप खटकले. त्याने मूकपणे इशारा करुन सुखदाला गप्प बसायला सांगितले. दूध-बिस्किटे खाऊन अथर्व खेळण्यासाठी कॉलनीतील ग्राऊंडवर गेला.
सुखदा गवारी निवडत बसली. अनिलही तिच्यासोबत गवारी निवडत बोलले, "मघाशी तू अथर्ववर शिरा मित्राला खायला दिला म्हणून चिडलीस ना, हे बरोबर नाही. तुला आठवतंय ना अथर्व प्ले-ग्रुप ला ऍडमिशन देताना स्कूलने आपला इंटरव्यूह घेतला होता. त्यावेळी आपल्याला विचारलं होतं, "मुलानं कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला? " आपण उत्तर दिलं होतं "चांगला माणूस". यावर मॅडमनी स्पष्टीकरण मागितलं होतं, कारण हे उत्तर सर्वांहून निराळं होते. स्पष्टीकरण देताना आपण म्हणालो, चांगला माणूस म्हणजे जीवनात येणाऱ्या संकटांना हसत-सुखाने सामोरे जाणारा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परोपकार करत आनंदाने जगणारा". आणि सुखदा एवढ्यातच विसरलीस आपला निश्चय आपल्या मुलावर आपल्याला सुसंस्कार करायचे आहेत. ते कुठे बाजारात विकत मिळत नाहीत. मुलं अनुकरण प्रिय असतात. ती आपल्या कृतीचं बोलण्याचं अनुकरण करतात. सुखदा म्हणाली, " सॉरी हं ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही".
अनिल पुढे म्हणाले, "माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली, मी असेन दहा-अकरा वर्षांचा, आई दारात तांदूळ निवडत बसली होती, तांदळाची कणी चिमण्यांकडे टाकत होती, चिमण्या तांदळाचे दाणे टिपत होत्या, मी नेलकटर घेऊन तेथे नखे काढण्यासाठी गेलो. आई म्हणाली, "अरे इथे नको नखे काढुस". मी म्हणालो, "का?". ती म्हणाली, "अरे इथे चिमण्या दाणे टिपत आहेत, तुझी नखे इथे पडली तर, तांदूळ समजून चिमण्या तुझी नखे खातील, नख तिच्या पोटात टोचतील की नाही?". माझ्या आईने नकळत मला पक्षांवर प्रेम करायला शिकवले. याला म्हणतात संस्कार! आणि तू शिरा मित्राला खायला दिला म्हणून अथर्ववर रागावलीस. तुझ्या लक्षात आलं का सुखदा? आपल्या अथर्वने आज परोपकाराचा पहिला धडा गिरवलाय. तू म्हणायला हवं होतंस, " वा, छान केलंस हं, तुझ्या मित्राला आवडला का शिरा?" मी अथर्वपुढे तुला काही बोललो नाही कारण त्याला वाटले असते आमच्या मम्मीला काही कळत नाही, पप्पाना फार कळतं".
प्रसंग छोटासाच, तुमच्या-आमच्या घरात घडणारा, पण सुजाण पालकत्व कसे असावे हे दाखवणारा. आई-वडील मुलांपुढे सतत भांडत असतील तर कुणाशी भांडू नको सांगितल्यावर ऐकेल का? मुलाला दुकानातून तंबाखू-गुटख्याची पुडी आणायला लावणाऱ्या पालकांनी तंबाखू गुटखा वाईट आहे खाऊ नकोस सांगितल्यास मूल ऐकेल काय? घरात असताना बाबा घरात नाही म्हणून सांग, कोथिंबीर घरात असूनही शेजारणीला संपलीय म्हणून सांग, असे कळत-नकळत वागणे बोलणे मुलांच्यावर खोटे बोलण्याचे संस्कार करुन जातात हे लक्षात घ्यायला हवे.
सुज्ञ, सुजाण पालकहो आजची मुले कमालीची हुशार आहेत. ते सतत पालकांच्या वागण्या बोलण्याचं निरीक्षण करत असतात. मुलं अनुकरणप्रिय असतात म्हणून आपली प्रत्येक कृती विचारपूर्वक करा व आपल्या मुलाला "चांगला माणूस" बनवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा