बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

नवस विशाळगडचा - आत्मकथन भाग ७

 

नवस विशाळगडचा - आत्मकथन भाग ७

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गुगल


       माझ्या भाबड्या, श्रध्दाळू व सदाचरणी आजीने व आईने माझ्यासाठी व भैय्यासाठी विशाळगडच्या मलिक रेहानबाबा पीरांना नवस केला होता. त्या पीरांना बोलल्या होत्या की या दोघांना नोकरी लागू दे तुझ्या दरबारात या दोघांना पाठवीन. भैय्याला डी. एड्. होऊन दोन वर्षे होऊन गेली होती. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तो मिळेल ती शेताची कामे करत होता. डी. एड्. झाल्यावर सहा महिन्यानंतर मला जयसिंगपूर शिक्षण मंडळात नोकरी लागली. पण असून खोळंबा नसून घोटाळा अशी स्थिती झाली होती. नोकरी पूर्णपणे हंगामी असल्याने वारंवार ब्रेक मिळत होता. दिवाळीची सुट्टी संपून शाळा सुरू झाल्यानंतर ऑर्डर मिळायची. तीस एप्रिलला ब्रेक मिळायचा. मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाली की ३१ जुलैचा पट पाहून १५ ऑगस्टला ऑर्डर मिळायची तेही पट सुरेसा असेल तर! त्यामुळे माझी ससेहोलपट सुरू होती. भैय्या चांगली मजुरी व वैरणही मिळते म्हणून ऊस तोडायला जात होता.


       या बिकट परिस्थितीत आजीबाईला वाटायचे नातवाला नोकरी नाही, नातीलाही कायम नोकरी लागेनाशी झाली आहे नवस फेडला नाही म्हणून हा त्रास होत आहे. मला तात्पुरती नोकरी लागली म्हणून नवस फेडायचा असा विचार सुरू झाला, पण गाडी खर्चासाठी पैशाची जुळणी होणे अवघड होते. त्याचवेळी भैय्याचा ऊस तोडणीचा पगार मिळाला. गाडी खर्चासाठी किती रूपये लागतील याचा अंदाज घेतला व मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विशाळगडला जाण्याचा बेत निश्चित झाला. गाडी खर्च वाचविण्यासाठी खोचीपर्यंत चालत जाऊन एस. टी. बस धरण्याचे ठरले. हे अंतर सुमारे आठ किलोमीटर आहे. ठरल्याप्रमाणे पहाटे लवकर उठून शिदोरीसह खोची या गावापर्यंत चालत गेलो. कोल्हापूरला जाणारी बस मिळाली. वडगाव स्टँडवर बस थांबली. भैय्याने ३० पैशाला मिळणारा सत्यवादी पेपर विकत घेतला. पेपर वाचायला मिळणे ही त्यावेळी मोठी संधी वाटायची. ड्रायव्हर केबिनच्या समोरच्या सीटवर आम्ही बसलो होतो. पांढराशुभ्र सदरा-धोतर त्यावर काळा कोट व टोपी असा पोशाख केलेले वयस्क सुशिक्षित गृहस्थ बसमध्ये चढले व आमच्या समोरच्या सीटवर बसले. त्यांनी खिडकीतून बाहेर डोकावून पेपरवाल्याला बोलवले. तो खिडकीजवळ आला व बस चालू झाली. त्यांना पेपर घेता आला नाही हे लक्षात येताच मी आमच्याजवळचा पेपर त्यांना दिला त्यांनी न मागता. माझ्या या छोट्याशा कृतीने ते खूपच प्रभावित झाले. त्यांनी आस्थापूर्वक आमची चौकशी केली. माझा डावा हात बघून भैय्याला म्हणाले, 'खूप हुशार आहे तुमची बहीण. हिच्या लग्नाची घाई करू नका. तिच्यासाठी अनुरूप वर शोधा. हिचा संसार खूपच सुखाचा व वैभवाचा होईल'. मला हसू आले त्यांच्या बोलण्याचं. अजून कशात काय अन् फाटक्यात पाय नसतानां हे कसं शक्य होईल असे वाटले. कोल्हापुरात त्या देवमाणसाने आम्हाला चहा दिला व आपल्या कामासाठी निघून गेले. आता वाटतं त्यांना ज्योतीषशास्त्र अवगत असावं कारण त्याचं भविष्य खरं ठरलं आहे ना!


       कोल्हापुरातून मलकापूर गाडी मिळाली व साधारणपणे २ वाजता आम्ही मलकापूरात पोहचलो. सोबत आणलेली शिदोरी खाल्ली व विशाळगडला जाणाऱ्या बसची वाट पाहू लागलो. साडेतीन झाले तरी बस आली नाही. चौकशीअंती कळले की रोहिणी नक्षत्रात झालेल्या पावसामुळे विशाळगडला जाणाऱ्या गाड्या बंद झाल्या आहेत. गाड्या फक्त आंबा घाटापर्यंतच जातात. कारण त्यावेळी रस्ते आजच्याइतके चांगले व पक्के डांबरी रस्ते नव्हते. थोडा जरी पाऊस झाला तरी बस बंद व्हायच्या. विशाळगडला जाणारे दुसरे प्रवाशीही होते. ते म्हणाले, आंबा घाटापर्यंत तरी जावू या. तिथून काय सोय होते का ते पाहू या. आम्ही ही त्यांच्याबरोबर बसमध्ये बसलो. आंबा घाटावर उतरलो. इकडे तिकडे चौकशी केल्यावर समजले की कोणतेही वाहन जावू शकत नाही. त्यावेळी पावणेपाच वाजले होते. आमच्या बरोबर निपाणीजवळच्या मांगूर गावचे दोन मामा-भाचे होते. मलकापुरात त्यांच्याशी ओळख झाली होती. ते म्हणाले, "एवढ्या लांबून आलोय देवाच्या वाटेवर इथून परत जायचे नाही, आम्ही तरी पायी जाणार आहोत. तुम्ही काय करता बघा?". हे अंतर साधारण वीस-पंचवीस किलोमीटर आहे. रस्ता घाटातून जाणारा आहे. जंगल झाडीतून जाणारा रात्रीचा प्रवास आहे. भैय्या चालत जायला सर्वार्थानं समर्थ होता. पंचायत आली माझी मी अगदीच अशक्त होते. सकाळी आठ-दहा किलोमीटर चालले होते. भैय्याने मला विचारले, "काय करू या". मी विचार केला माझ्या भैय्याने उन्हातान्हात ऊस तोडून आणलेल्या पैशातून इथपर्यंत आलोय. इथे राहण्याची सोय नाही आणि विशाळगडला न जाता परत गेलो तर आजी-आईने केलेला नवस फिटणार नाही. असा विचार करून मनाचा निर्धार केला व भैय्याला म्हणाले, "जाऊ या चालत यांच्याबरोबर". आम्ही चालू लागलो रस्ता निसरडा व चढीचा होता. अंधार पडू लागला. २-३ किलोमीटर अंतर चालत गेल्यावर माझी दमछाक सुरू झाली. पाय अतिशय दुखायला लागले. पुढे चालवेना, मी मटकन खाली बसले. बाकीचे प्रवाशी पुढे निघून गेले. पण मांगूरवाले ते मामा थांबले व म्हणाले, "थोडं थांबा ताई, आपण सावकाश जाऊ. घाबरू नका आम्ही आहोत तुमच्याबरोबर" त्यांनी थोडीशी खडीसाखर मला दिली. देवाचं नांव घेऊन खा म्हणाले. त्यांच्या बोलण्याने आम्हांला धीर आला. मी डोळे मिटून अल्लाहचा, पीरसाहेबांचा धावा केला, मी ठरवलय तुझ्या दारी यायचं मला बळ दे.  उठून चालायला लागले. भैय्या व ते देवदूत माझ्याकडे पूर्ण लक्ष देवू लागले. इकडून या ताई, तिकडे नका जाऊ असे वारंवार म्हणू लागले. घाटावरची वळणा-वळणाची निसरडी वाट, दोन्ही बाजूला घनदाट झाडी, रातकिड्यांचा किर्र आवाज, पानांची सळसळ व सोबत गडद अंधार, आम्ही बोलत बोलत चालत होतो. त्या मामांजवळ दोन बॅटऱ्या होत्या. ते दरवर्षी इकडे येत असत. त्यामुळे त्यांच्या पूर्वानुभवाचा आम्हांस फायदा होत होता.


       मनात पीरसाहेबांचा धावा करीत रात्री साडेअकरा वाजता गडावर पोहोचलो. दर्ग्यामध्ये गर्दी अजिबात नव्हती. सर्वजण दर्शन, जेवण आटोपून विसावले होते. त्यामुळे आम्हाला निवांतपणे दर्शन घेता आले. मनोमन पीरसाहेबांशी सुसंवाद साधता आला. कष्टाचे चीज झाले असे वाटले. दुसऱ्या दिवशी लवकर उठून स्नान उरकून पुन्हा एकदा दर्ग्यात जाऊन प्रणाम केला व गड उतरून खाली आलो. वाट चालू लागलो. रात्री वीस किलोमीटर पायी प्रवास केला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा वीस किलोमीटर पायी प्रवास करून आंबाघाट गाठला. नवस पूर्ण केल्याच्या आत्मिक समाधानाने मन काठोकाठ भरल्याने पायाचे दुखणे गौण वाटत होते.


       नवस पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांनी भैय्याला रयत शिक्षण संस्थेत नोकरी लागली व एक वर्षानंतर माझी नोकरी कायम झाली. देव नवसाला पावतो पण भाव चांगले हवेत, त्या दृष्टीने प्रयत्नही करायला हवेत. मनी नाही भाव, देवा मला पाव, देव आशेनं देव पावायचा नाही रं. देव परड्यातला भाजीपाला न्हाई रं' या भक्ति गीताची प्रचिती मला आली. अशा प्रकारे आई-आजीचा नवस पूर्ण झाला. आज वाटते कसे चाललो आपण इतके अंतर? कुठून आले हे बळ?