विशेष लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विशेष लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

माझे ग्रेट बाबा

 आदरणीय बाबांना,.



                         ज.गुलाब नबी तांबोळी


        बाबा, आता मी ५८ वर्षाची झाले. गेल्या ५८ वर्षातील ३८ वर्षे ४ महिने शिक्षिका पदावर कार्य करून सेवानिवृत्तही झाले. गेल्या ५८ वर्षात मला थोडफार समजायला लागल्यापासून विविध विषयावर तुमच्याशी खूप बोलले. तुमच्याशी बोलता बोलता खूप शिकले. पण मला अगदी अंत:करणापासून जे बोलायचं होत ते राहूनच गेलं. म्हणून या लेखातून तुमच्याशी बोलते आहे.


        बाबा, मला आठवतोय तो माझ्या नोकरीचा पहिला दिवस. तुम्ही मला माझ्या शाळेत घेऊन आलात. मुख्याध्यापकांशी माझी ओळख करून दिलीत, त्यावेळी तुम्ही ही मुख्याध्यापक पदावर कवठेपिरान येथे कार्यरत होता. मी अगदी निश्चितपणे नोकरीत रूजू झाले, कारण मला आधार होता तो तुम्ही दिलेल्या शिकवणुकीचा व उत्तम संस्काराचा. तुम्ही नजरेनेच मला सांगितलत, 'तुला डी.एड्.पर्यंतच शिक्षण देवून इथपर्यंत आणून सोडलय. तुझी नोकरी तू व्यवस्थित सांभाळ, काहीतरी वेगळं करून दाखव जेणेकरून तुझं पर्यायाने आपल्या कुटूंबाचं नाव उज्ज्वल होईल'. आणि बाबा खरं सांगू तुम्ही सांगितल्याप्रमाणेच अगदी मनापासून, कर्तव्यात कसूर न करता अध्यापनकार्य करत राहिले. आदर्श शिक्षिका म्हणून दहा पुरस्कार प्राप्त केले. पी.एच.डी. सारखी पदवीही मिळवू शकले. कुटूंबाला अभिमान वाटावा असे कार्य करू शकले.


         माझ्या नोकरीच्या सुरूवातीच्या काळात वारंवार ब्रेक मिळत होता. ३ ते ४ महिने विनावेतन रहावे लागायचे. त्यामुळे खूपच ओढाताण व्हायची. आजीचा व माझा घरखर्च चालविणेही अवघड होते. त्यात आजी खूप आजारी पडली, तिच्या उपचारादरम्यान मला बसलेला मानसिक धक्का सहन न झाल्यामुळे मीही खूप आजारी पडले. मला खूप ताप भरला, दोन-तीन दिवस तो अंगावरच काढला. कारण बाबा, त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि तुम्हाला त्यावेळी त्रास द्यायची माझी इच्छा नव्हती. तापामुळे माझं मानसिक संतुलनही बिघडल. मी गांवी आले त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी सांगलीला न्यायचा सल्ला दिला. त्याचवेळी तुमचा आष्टा येथे सेवांतर्गत कोर्स चालू होता, अधिकारी तुम्हाला रजा द्यायला तयार नव्हते. तुम्ही त्यांना म्हणाला, 'साहेब, माझी मुलगी आजारी आहे. तिला औषधोपचारासाठी सांगलीला नेणे जरूरीचे आहे. आज माझा राजीनामा घ्या, वाट्टेल ती कारवाई करा पण आज मी जाणारच'.  तुम्ही माझ्यावर औषधोपचार तर केलात पण माझ्यासाठी एवढा मोठ्ठा त्याग करणारे बाबा आहेत हे पाहून त्या भयंकर दुखण्यातून मी ताबडतोब बरी झाले.


        बाबा, आठवतय तुम्हाला दहावी इयत्तेत मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचं मार्कलिस्ट तुम्हाला दाखवताच डोळ्यात पाणी भरून म्हणालात, 'ज्युबेदा, तू आमच्यासारख्या गरिबाच्या घरात कशाला जन्माला आलीस, तुझ्या बुध्दीच्या मानाने उच्च शिक्षण आम्ही देवू शकत नाही'. माझ्यावरील प्रेमापोटी तुम्ही थोडं अतिशयोक्तीनं बोललात हे खरं पण त्या बोलण्याने माझ्या अंगावर मूठभर मांस चढले.


       नोकरीतील बारीक-सारीक कटकटी, अडचणी मी तुम्हाला सांगायची, त्यावेळी तुम्ही मला सांगितलत. 'बेटा, प्रेमानं जग जिंकता येतं. प्रेमळ वागण्यानं सर्वांची मने जिंकून घे; आणि लक्षात ठेव आपलं उत्कृष्ठ काम हाच आपला वशिला आहे. तुला भरपूर मित्र-मैत्रिणी जोडता आल्या नाहीत तरी चालेल पण तुझ्या वागण्याने शत्रू निर्माण करू नकोस" बाबा हे तुमचे तत्वज्ञान मला कुठल्याही पुस्तकी तत्वज्ञानापेक्षा मोलाचे वाटतात.


       बाबा मला चांगलं आठवतय एक नातेवाईक माझ्या बाबतीत तुम्हाला म्हणाला, 'गुरूजी तुमच्या मुलीच्या लग्नाचं बघा, स्त्री हे काचेचं भांड असतं' तुम्ही ठामपणे उत्तर दिलंत, 'माझं भांडं काचेचं नाही शिशाचं आहे तुम्ही नका काळजी करू'. एकदा कारखान्यात काम करणाऱ्या, कमी शिकलेल्या श्रीमंत मुलाचं माझ्या साठी स्थळ आल्यावर म्हणालात, 'नको हे स्थळ, माझ्या मुलीची भाषासुध्दा त्याला कळणार नाही'. तुम्ही सहजपणे बोललेल्या शब्दांनी माझा आत्मविश्वास शतपटीने, वाढत गेला. एकदा पत्रातून तुम्ही याबाबतीत माझा निर्णय विचारलात. त्यावेळी मी तुम्हाला लिहीलं होतं, 'बाबा ! प्रत्यक्ष ईश्वरानेही माझं कांही वाईट करण्याचा विचार केला तर माझे बाबा ईश्वराला प्रार्थना करून वाईट करण्यापासून परावृत्त करतील. तुम्ही घेतलेला निर्णय मी स्विकारेन'. तसंच केलत बाबा तुम्ही, माझ्यासाठी अगदी योग्य जोडीदार निवडलात, माझ्या आयुष्याचं सोनं झालं.


        आम्हां भावंडासाठी आयुष्यभर कष्ट केलेत. शिक्षकाच्या नोकरीबरोबरच शिकवण्या घेतलात. शिलाईकाम केलतं. आपल्या गरजा कमी करून, काटकसरीने राहून आमच्यासाठी वह्या-पुस्तके पुरवलीत. शाळेचा गणवेशही माप न घेता अगदी बरोबर शिवून पाठवत होतात. बाबा, हे तुमचे उपकार या जन्मी तरी फिटणार नाहीत. तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली रहाणे मला जास्त आवडेल.  माझा संसार सुरू झाला. तुमची आई म्हणजे माझी लाडकी दादी माझ्याजवळच रहात होती. त्यामुळे तुमचं येणं जाणं असायचं, प्रत्येक वेळी आम्ही घेतलेली एखादी वस्तू किंवा भांडं मी तुम्हाला दाखवायची. त्यावेळी एक अनमोल शिकवण तुम्ही मला दिली. 'वस्तू-भांडं असं घ्यायचं की आपल्या आयुष्यात ते पुन्हा पुन्हा बदलायला लागू नये.' तुम्ही सांगितल्याप्रमाणेच खरेदी होत गेली. तुमचे बोलणे म्हणजे एक जीवनसिद्धांत होता. आम्ही रामनगरमध्ये छोटेसे घर बांधल्यावर मला म्हणालात, 'ज्युबेदा कोल्हापूर रोडवरून तुझ्या घराकडे येताना खूप मोठे बंगले दिसतात. त्यानंतर वडर समाजातील बांधवानी दगडाने रचलेल्या भक्कम झोपड्याही आहेत. बंगल्याकडे जरूर बघ पण त्यानंतर झोपड्यांकडे बारकाईने बघूनच आपल्या घराकडे बघ तुझं घर फार सुंदर वाटेल तुला'. जगातील कोणत्याही तत्वज्ञाने इतका महान संदेश आपल्या लेकीसाठी दिला नसेल.'


       खरंच बाबा मी माझ्या मानाने खूप शिकले, शिकवलेही पण जीवनाची पाठशाळा मात्र मी तुमच्याकडूनच शिकले, कळत-नकळत तुम्हीच ठरला माझ्या जीवनाचे शिल्पकार! तुमच्यामुळेच मी शिकत गेले. हे सुंदर जीवन घडवू शकले. मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. 'माझ्या बाबांना आरोग्यपूर्ण उदंड आयुष्य दे'.


तुमची लेक - ज्युबेदा


       माझे ग्रेट बाबा अर्थात माझे काका हा लेख युवकांचा नवा महाराष्ट्र या दैनिकामध्ये प्रकाशित झाला. त्यावेळी बाबा हयात होते , वाचून बेहद खूष झाले होते. बारा १२नोव्हेंबर २०१८ ला ते पैगंबरवासी झाले. त्यांना आमच्यातून जाऊन सात वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या आठवणी आम्हा सर्वांच्या ह्रदयात कोरलेल्या आहेत. त्यांच्या सातव्या पुण्यस्मरणा निमित्ताने हे मनोगत मनापासून........


शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

दिनूची दणक्यात दिवाळी, इतरांची का निराळी।

    दिनूची दणक्यात दिवाळी, इतरांची का निराळी।
      



                            फोटो साभार:गुगल
  


      दसरा सण नुकताच संपला होता 'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या उक्तीप्रमाणे सर्वांवर आनंदाचा वर्षाव करून गेला होता. थंडीची चाहूल लागली होती. सणांचा राजा दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपला होता. त्याचवेळी माझ्या काकांना श्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले, तेही अतिदक्षता विभागात. प्रसंग गंभीर होता. इथेच मला स्वच्छंदी दिनू भेटला. दिनू पस्तीशीच्या आसपास वय असलेला दवाखान्यातील सफाई कर्मचारी. सावळ्या रंगाचा, मध्यम उंचीचा, सदा आनंदी दिसणारा, बोलका, परोपकारी, कार्यतत्पर दिनू दवाखान्यात आला की अतीव यातना भोगणाऱ्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरही स्मितरेषा उमटायची. दिनू कचरा गोळा करत करत सर्वांशी बोलत बोलत गाडी पुढे ढकलतो. काय काका बरं हाय का? मावशी तुमची तब्बेत काय म्हणते ? पलीकडच्या माई, तुम्ही आज गप्प का दिसता ? आज हे दादा एकदम फ्रेश दिसतात अशी सर्वांची विचारपूस करतो. प्रसंगी कपडे बदलायला, कूस बदलायला, उठवून बसवायला मदत करतो. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या ताई-माईंना प्रेमळ सूचनाही देतो. असा हा दिनू सर्वांचा लाडका दिनू बनला आहे.


        डॉक्टरना, कर्मचाऱ्यांना, पेशंटना, पेशंटच्या नातेवाईकांना दिवाळीचे वेध लागले होते. दिवाळीला काय खरेदी करायचे याचे मनसुबे सुरू होते. महिला कर्मचाऱ्यांच्या ड्रेस, साडी खरेदीच्या गप्पा दवाखान्याच्या बाजूला हळू आवाजात रंगात येऊ लागल्या होत्या. दिवाळी पाच दिवसावर आलेली असतानाच केर गोळा करणारे दिनूचे हात चमचम चमकू लागले होते. निरखून पहाते तर काय दिनूच्या हातात चांदीचे सुंदर ब्रेसलेट व चांदीच्या दोन अंगठ्या विराजमान झाल्या होत्या. आज केर गोळा करणारे त्याचे हात अधिकच सुंदर दिसत होते. हातातल्या रूपेरी दागिन्यामुळे नेहमी प्रसन्न दिसणारा त्याचा चेहरा आज वेगळ्याच तेजाने उजळून निघालेला दिसत होता. त्याचा हात आज दररोजच्या गतीपेक्षा अधिक गतीने कचऱ्याची विभागणी करून कचरा गोळा करण्यात गुंतला होता. नेहमीप्रमाणे सर्वांची विचारपूस करून मदत करत होता. एका पेशंटने हाताकडे पाहून हसत विचारलेच 'दिनूची दिवाळी नटली जणू' तसा दिनू हसत म्हणाला, परवाच सरांनी दोन हजार बोनस दिला. फार फार दिवसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सरळ गेलो सराफ कट्ट्याकडे. एक हजाराचे ब्रेसलेट घेतले. व एक हजाराच्या या दोन अंगठ्या घेतल्या चांदीच्या. हात पुढे करून सर्वांना ब्रेसलेट व अंगठ्या दाखवताना त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद खरंच अवर्णनीय होता. एका सहकाऱ्याने शंका विचारलीच स्वतःसाठीच सगळा बोनस खर्च केलास ? बायको, मुलांना, आईला काय घेतलास की नाही ? दिनू हसत हसत म्हणाला, सिव्हीलचा पगार झाल्याबरोबर बायकोला दोन हजार साडीसाठी दिलं. पाहीजे तशी घे म्हटलं. असलीच आणली, तसलीच आणली नको पुन्हा. दोन्ही मुलांच्या कपड्यांसाठी दोन हजार आणि फराळाच्या बाजारासाठी दोन हजार दिलं. खूष झाली बायको व म्हणाली, तुमच्या आईसाठी लुगडं तुम्हीच आणा मला नाही त्या लुगड्यातलं कळत. "मी स्वतः जाऊन आईसाठी हजाराचं लुगडं चोळी आणली. आई जाम खूष झाली. पाचशे रूपये आधीच बाजूला ठेवलेत. फटाके, मेणबत्या, पणत्या, साबण, वाशेल तेल इ. या वस्तू आणण्यासाठी असा खुलासा करून दिनू गडबडीने बाहेर पडला कारण त्याला ही ड्युटी करून सिव्हीलची परमंनंट ड्युटी करायची होती. डबल ड्युटी आनंदाने पार पाडणाऱ्या दिनूने नऊ-दहा हजारात दणक्यात दिवाळी करण्याचा हिशोब कसा चुटकीसरशी मांडला बघा! दिनू निघून गेला पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले.  

 

       उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या तुमच्या-आमच्या आसपास वावरणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या घरातील दिवाळी कशी साजरी झाली? किती आनंद देऊन गेली? किती निराशा पदरी पडल्या? किती समाधानाचे दीप मनामनात उजळून गेले? याबाबतीतील उदाहरणे पाहण्यात, ऐकण्यात आली ती सर्व उदाहरणे वाचल्यावर तुम्हीच सांगा 'दिनूची दिवाळी दणक्यात की या सर्वांची दिवाळी दणक्यात ?


* आयटी क्षेत्रात इंजिनिअर म्हणून लठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या रोहितला ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रमोशन मिळाले. पगारात चाळीस टक्क्यांनी वाढ झाली. रोहित - रीना आनंदून गेले. गावाकडचे कुटुंबीय, नातेवाईक खूश झाले. दिवाळीच्या आधी (चार दिवस) त्याला ऑफिसमध्ये एकाएकी चक्कर आली. उपचारादरम्यान समजले की रोहितची शुगर कमी झालीय व बी. पी. वाढलाय. आठ दिवस दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले. शिवाय बी. पी. ची गोळी कायमची सुरू झाली. शुगर कमी होऊ नये याची दक्षता घेण्याचा सल्ला मिळाला. त्यामुळे रोहित रीना यांची यावर्षीची दिवाळी फुल्ल काळजीत गेली.


* निखिलरावांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ऐंशी लाखाचा फ्लॅट बुक केला. फ्लॅट सोळाव्या मजल्यावर होता. रम्य परिसर होता. सुशिक्षित अपार्टमेंट होते. तरीही त्यांची पत्नी नीरजा नाराज होती. याचे कारण असे होते मोठा फ्लॅट घेतल्यावर निखिलराव आईवडिलांना.  गावाकडून इकडे कायमचे राहण्यासाठी आणणार होते. त्यामुळे नीरजा तूर्त मोठा फ्लॅट नकोच म्हणत होती. कारण तिला आपल्या संसारात सासू-सासऱ्यांची लुडबूड नको होती. तिला येथे फक्त राजाराणीचा संसार हवा होता. सासू-सासरे कायमचे इकडे आले तर आपल्या मुक्त राहणीमानावर गदा येईल या भितीने ती ऐंशीलाखाच्या फ्लॅट बुकिंगमुळेही दिवाळीचा आनंद उपभोगू शकली नाही.


* सुषमा-सागरची दिवाळी यंदा दणक्यात होणार नव्हतीच कारण त्यांचा एकुलता एक श्रीराज यंदा बारावीला होता. श्रीराज हुशार होता. अभ्यास ही मन लावून करत होता. पण त्याच्या आई-वडिलांना फारच टेन्शन आलं होतं. कारण आयुष्याला कलाटणी देणारं हे वर्ष होते. सुषमा सागरला अॅट ऍनी कॉस्ट श्रीराजला एम्. बी. बी. एस्. डॉक्टर बनवायचं होतं. चार-दोन मार्कासाठी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळण्याची संधी त्यांना घालवायची नव्हती. त्यांनी वर्षभर श्रीराजच्या मागे टुमणे लावले होते. एन्जॉय काय नंतर करता येईल यावर्षी अभ्यास महत्वाचा.. त्यात कालच अॅकॅडमीतून सरांचा फोन आला होता की श्रीराजला या युनिट टेस्टमध्ये ९६% च मार्कस् पडलेत. तो इतरांपेक्षा दोन टक्क्यांनी मागे पडलाय. मग काय विचारता दोन मार्कस् गेले कुठे? या विचारात श्रीबाळा अभ्यास कर म्हणण्यात दिवाळी निघून गेली. फराळाचं काहीच नाही केलं विकतच आणलं थोडं सुषमा-सागर यांची दिवाळी फुल्ल टेन्शन मध्येच गेली.


* सुशिलाताईना ही दिवाळी फारच दुःखदायक वाटली. त्यांच्यात कसलाही उत्साह, हुरूप राहिला नाही कारण त्यांच्या एकुलत्या एका लेकाला सुरेशला दुसरी मुलगी झाली लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी ऐन दिवाळीत लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या पोटी दीपाली आली म्हणून सुनिल-सुवर्णा खूश झाली. पण वंशाला दिवा नाही झाला म्हणून सुशिलाताईंनी अंथरूण घातलं. तिसरा चान्स घ्यायलाच पाहिजे असा त्यांच्याकडे हट्ट धरला पण ते दोघे आपल्या मतावर ठाम होते. दोन्ही मुलीना चांगल वाढवायचं शिक्षण देऊन स्वावलंबी बनवायचं असा ठाम निर्धार त्यांनी केला होता. हे पाहून सुशीलाताई खचून गेल्या आपल्या जावेला परिस्थिती गरीबीची असूनही देवाने दोन नातू दिले आणि मला दोन नाती. कष्टान मिळविलेल्या इस्टेटीचे मालक जावई होणार या कल्पनेने त्यांनी हाय खाल्ली होती. त्यामुळे त्यांना दिवाळीचा फराळ गोड वाटला नाही.


* स्मिताची दिवाळी काही वेगळीच म्हणा ना! स्मिताने पतीकडून सुभाषकडून हट्टाने चार तोळ्यांचा राणीहार करून घेतला होता. परवाच्या कार्यक्रमात रोहिणीने घातलेला हार तिला भारीच आवडला होता. तीन पदरी राणीहार शालूवर खुलून दिसत होता. अगदी अगदी तस्साच हार तिनं बनवून घेतला होता. भावाला ओवाळणी म्हणून शालू ची मागणी तिनं आधीच केली होती. शालूवर राणीहार घालून कॉलनीभर मिरवण्याचा घाट तिनं घातला होता. रोहिणीच्या राणीहारापेक्षा आपला हार वजनाने जास्त व सुंदर नाजूक डिझाइनचा आहे असे समजून ती खूप आनंदात होती. पण तिच्या आनंदावर विरजण पडलं मैत्रिणीसमवेत दुचाकीवरून तिन्हीसांजेला घरी परत येत असताना चोरट्यांनी तिच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे गंठन हिसकावून नेले. ऐन दिवाळीत आलेला हा प्रसंग स्मिताला असह्य झाला. दिवाळी अशी तशीच गेली.


* मेघाला तिच्या पतीने मयूरने पाच हजाराची साडी आणली. आता तरी मेघा माझ्या पसंतीवर खूश होईल या कल्पनेने मयूर आनंदात घरी आला. त्याने साडी मेघाच्या हातात दिली. मेघाने साडी पाहिली नाक मुरडत म्हणाली, " मला हा कलर नको होता. या कलरच्या चार-पाच साड्या आहेत माझ्याकडे, शिवाय या डिझाइनच्या साड्या जांभळ्या रंगात जास्त खुलून दिसतात." काय बोलणार बिचारा मयूर? संयम राखत म्हणाला, 'उद्या तू माझ्याबरोबर दुकानात चल तुला पाहिजे तो कलर घे. बदलून देण्याच्या अटीवरच मी साडी आणली आहे.' दुसऱ्या दिवशी मेघा दुकानात गेली. पाहिजे तो कलर मिळविण्यासाठी दुकान पालथे घातले तरी तिला पाहिजे तसा कलर मिळाला नाही थोडा फेंटच वाटतो म्हणाली. ती साडी नेसल्यावर कॉलनीतल्या एकीनेही साडी छान आहे असे म्हटले नाही म्हणून मेघा लक्ष्मीपूजेच्या दिवसापासून नाराज झाली. मयुरने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण बाईसाहेबांचा मूड काही ठिकाणावर आला नाही. पाच हजार पाण्यात गेल्याच्या दुःखात मयूरही दिवाळीत डिस्मूड झाला. 


       पाहिलीत श्रीमंत लोकांची असंतुष्ट दिवाळी? कुणाचा टॉमी दिवाळीत आजारी होता. कुणाच्या मुलाने पसंत केलेल्या मुलीने लग्नासाठी नकार दिला होता. लाखो कारणे आहेत दिवाळीत दुःखी होण्याची पण या छोट्या दुःखावर मात करून दिनूप्रमाणे थोडक्यात सुख मानणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होते. दहा हजारात दणक्यात दिवाळी साजरी करणारा दिनू आणि त्याचं कुटुंब पाहिलं की, वाटतं सुख शेवटी मानण्यावर असतं. ते व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असतं. फार दिवसांनी चांदीचं ब्रेसलेट व चांदीच्या अंगठ्या घालण्याचं स्वप्न साकार झाल्यावर आनंदसागरात पोहणारा दिनू, सकारात्मक वृत्ती ठेवून समाधानाने - आनंदाने जीवन व्यतीत करणारा दिनू मला आदर्शवत वाटला. तुम्हालाही वाटला ना ?


       नाहीतर एवढ्या तेवढ्या कारणावरून दुःखी होणारे बाकीचे लोक भौतिक सुविधा हात जोडून उभ्या असतानाही सुखी होऊ शकत नाही. आणखी हवं, वेगळं हवं, सर्वांत भारी हवं, आत्ताच हवं, या सगळ्या 'हवं' मुळे माणूस नेहमी असमाधानाच्या भोवऱ्यात अडकतो. त्या भोवऱ्यातून सुटका करून घेण्याची क्षमता तो 'हवं' मुळे आधीच गमावून बसलेला असतो. त्यामुळे आज परिस्थितीने समृद्ध असलेले लोकही असमाधानी राहतात. त्यांना सुखी माणसाचा सदरा शोधूनही सापडत नाही. सगळं माझ्या मनासारखं व्हावं. अशी अपेक्षा करणारे आपण कधीच सुखी होणार नाही का? त्यापेक्षा जे झालं ते चांगलं झालं. जे होत आहे ते चांगलं होत आहे व जे होणार आहे तेही चांगलच होईल अशी वृत्ती ठेवून जीवन व्यतीत करायचे ठरविले तर आपल्यासारखे सुखी आपणच होऊ. व दिनूप्रमाणे आलेली येणारी प्रत्येक दिवाळी दणक्यात साजरी करू. करणार ना अल्पसंतुष्ट, सुखी-समाधानी दिनूचे अनुकरण ?



शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

आनंदाने जगावे असे !

                आनंदाने जगावे असे!


     
                          
                           फोटो साभार: गूगल
                       

        कुणाचा साखरपुडा असो वा लग्न, डोहाळेजेवण असो वा बारसे, वाढदिवस असो वा कार्यक्रम जयाचा उत्साह अगदी दुथडी भरून वहात असतो. तो कार्यक्रम थोडा हटके, अविस्मरणीय, मनोरंजक व थाटामाटात कसा होईल इकडं जयाचं जातीनं लक्ष असतं. साखरपुडा, डोहाळेजेवण, वाढदिवसाला तिच्याकडे खास फनीगेम्सचं नेटकं नियोजन असतं. फुगे फुगविण्यापासून साड्यांच्या घड्या घालण्यापर्यंतच्या ॲक्टीव्हिटीज त्यामध्ये असतात. शिवाय बुगडी घातलेल्या स्त्रीला व पत्नीचा फोटो जवळ बाळगणाऱ्या पुरुषाला अनायसे छोटेसे गिफ्ट जया खुबीनं देते. त्यामुळे जमलेल्या सर्वांचेच छान मनोरंजन होते. नातेवाईकातील कुणाचेही लग्न असो रूखवतावर शायऱ्या झळकतात, जयानं स्वतः तयार केलेल्या. त्यामुळे वधुवरांना रूखवतासोबत छान संदेशही मिळतो. लग्नसमारंभातील संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या प्रसंगात गीत गायनात जया अग्रेसर असतेच. बारशाच्या वेळी जया स्वतः पाळण्याची रचना करते व सर्वांच्या मदतीने पाळणे म्हणते. त्यामुळे बाळाच्या आई-वडिलांचे, आजी-आजोबांचे, मामा-मामींचे, काका-काकूंचे चेहरे असे खुलतात की विचारूच नका. जया खरोखरच जगावेगळी आहे. घरच्या कार्यक्रमात ब्लाऊज पीस ऐवजी कापडी पिशव्या देते तर साडी ऐवजी छान संसारपयोगी वस्तू देते. कार्यक्रम आनंदमय करत असतानाच सामाजिक भानही ठेवते. समाजासाठी एक पाऊलवाट तयार करते.

  

         तर अशी ही जया! तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की ही जया असेल २५-३० वर्षाची तरूणी! पण नाही. जयानं नुकतीच साठी ओलांडली आहे. हा उत्साह, ही उर्जा, ही आपुलकी त्यांच्या प्रत्येक वागण्या बोलण्यात कुठून येते देव जाणे! या सगळ्या सकारात्मक वृत्तीचं जया म्हणजे एक भांडारच आहेत. आजुबाजुच्या जवळच्या कोणीही यावे आणि या उत्साहाचा, उर्जेचा, औदार्याचा, मनमोकळेपणाचा, गोड बोलण्याचा शिडकावा अनुभवावा; कारण त्यांचे घर सर्वांसाठी मुक्तद्वार वाटते. घरी येणाऱ्या - एका वर्षापासून ८५ वर्षाच्या व्यक्तीशीही जयाताईंचे छान - जमते. जयाताई इतक्या छान गप्पा मारतात की येणाऱ्याचा सहजपणे, बेमालूमपणे ब्रेन वाब्रेनवॉश होतो व तासाभरासाठी आलेली व्यक्ती २/३ तास छान रमते व मोकळी-ढाकळी होऊन समाधानाने परत जाते. त्यांच्या या मनमोकळ्या सहज स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या संबंधामुळेच त्यांना कधीच एकटेपणा जाणवत नाही. दुःखी निराश व्हायला वेळच मिळत नाही. आपल्या पतीकडे, मुलांकडे, नातवांकडे येणाऱ्या प्रत्येकाशी  जयाताईंचा एक वेगळा मर्म बंध, ऋणानुबंध निर्माण होतो.  जयाताईंच्या स्वभावात फक्त सेलीब्रेशनच आहे. घरातील त्यांचा वावर, कामातील व्यग्रता, साधेपणातही नीटनेटके  राहण्याचा त्यांचा प्रयत्न येणाऱ्या प्रत्येकाला अचंबित करून सोडतो. येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत असताना कुणाला काय हवं, नको हे बघण्यासाठी त्यांची अविरत धडपड सुरू असते. कुणी कसलीही समस्या सांगो ती सोडविण्यासाठी लागणारे धीराचे शब्द जयाताईंच्या तोंडून इतक्या आत्मियतेने, अंत:करणापासून बाहेर पडतात की समस्याग्रस्ताला समस्या दूर करण्यासाठी हजार हत्तींचे बळ येते. जयाताईंचा हा सारा व्यवहार ठरवून चाललेला नाही तर तो एक नैसर्गिक, सहजसुंदर आणि स्वभावतः स्त्रवणारा साठ वर्षे वयाचा स्वच्छ निखळ वाहता झरा आहे हे कोणाच्याही  लक्षात सहज येवून जाते. जयाताईंचे हे असे दर्शन ज्या ही क्षणी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीस होते, त्या क्षणापासून ती व्यक्ती त्यांची चाहती बनून जाते.


         जयाताईंचा जन्म छोट्याशा खेडेगावात, एका कष्टाळू, गरीब व सुसंस्कारीत शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच गरीबीवर मात करत जीवन आनंदाने कसं जगावं याच बाळकडू त्यांना मिळालं. लग्न होऊन सासरी आल्यावरही सर्वांना त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने आपलेसे केले. सासर-माहेर यात भेदभाव न करता त्यांनी या दोन घरातील नात्यांची वीण इतकी घट्ट केलीय की त्यांच्या घरगुती कार्यक्रमात दीर कोणता? भाऊ कोणता? सासू-आई कोणती हे येणाऱ्याला विचारल्यावरच कळते. काटकसरीने संसार कसा करावा हे त्यांच्याकडूनच शिकावे. पतीच्या नोकरीतील ताणतणाव, अपत्यांचे यश-अपयश, नातेवाईंकांची आजारपणे, स्वतःची नाजूक तब्येत त्यांनी इतक्या खंबीरपणे पचवली आहे की एकदा आलेल्या संकटाने त्यांच्या जीवनात पुन्हा येण्याचे धाडस नाही केले.


       येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्ती त्या धीराने, आनंदाने स्विकारत असतात. केवळ रडत, कुठत बसणे, थांबणे, आराम करणे, त्यांच्या स्वभावात नाही. सतत काहीतरी करत राहणे हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र आहे. सर्वसामान्य स्त्रीच्या जीवनात येणारे नानाविध प्रसंग, चढ-उतार त्यांच्याही जीवनात आले पण चढताना त्या घाबरल्या नाहीत व उतरताना दमल्याही नाहीत. टक्केटोणपे खूप खाल्ले. खूप सोसलं पण त्या आज कशाबद्दलही तक्रार करत नाहीत की, कुणाबद्दल अढीही धरत नाहीत. ज्यांनी त्यांना त्रास दिला, त्यांच्याशी त्या प्रेमाने वागतात. उलट मनापासून त्यांचे आभार मानतात, कारण जयाताईंच म्हणणं आहे की, अशा लोकांमुळेच आपल्याला जगण्याची, लढण्याची व जिंकण्याची नवी उर्जा मिळत गेली. बहुधा ही सकारात्मक वृत्तीच त्यांच्यासाठी शक्तीस्त्रोत ठरत असावी कारण साठी ओलांडल्यानंतरही त्या प्रचंड क्रियाशील व मनाने कणखर आहेत. त्यांच्यासोबत गप्पा मारताना अनेकदा जयाताई आपल्या पूर्वायुष्यातील घटना सांगत असतात तेव्हा त्यांनी परिस्थितीशी केलेला संघर्ष मनाला स्पर्शून तर जातोच शिवाय एक प्रेरणाही देतो.  त्यांच्या क्षमाशील वृत्तीचे दर्शनही घडते. दुसऱ्याकडून घडलेल्या चुका, घडलेले प्रमाद, त्यामुळे स्वत:ला झालेल्या यातना हे सारे मागे टाकून आनंदाने जगण्याची त्यांची वृत्ती आपल्याला बरंच काही शिकवून  जाते. आयुष्यभर त्या अशाच वागल्या आहेत. कोणासाठी काही करताना त्या स्वतःचा आनंद शोधत असतात. कुणाला काही मदत करताना त्यांचा निरपेक्ष भाव दिसतो. व्यक्तीगत आयुष्यात त्यांचे वागणे शिस्तप्रिय व वक्तशीर असते. स्वच्छतेबाबत त्या कमालीच्या आग्रही आहेत पण स्वच्छतेचा बाऊ करणे त्यांना आवडत नाही. आपले घर, अंगण, छोटासा बगीचा कुटुंबियांच्या मदतीने स्वच्छ व नीटनेटका ठेवतात. आपल्या बगिच्यात उमललेली फुले, फुलांच्या स्वतः तयार केलेल्या वेण्या, पुष्पगुच्छ व बुके तयार करून देण्यात त्यांना अनमोल आनंद मिळतो. त्यांच्या बागेत आलेली फळे पै-पाहुणे, स्नेह्यांच्या दृष्टीने गोड मेवा-मिठाई ठरते. अशा रितीने जयाताई हरितहस्तही आहेत.


        जयाताईना लेखन, वाचन, संगीत, कला नाट्य यात खूप रस आहे. आपल्याला आवडलेले कार्यक्रम, मालिका त्या रसिकतेने पाहतात पण नुसतंच पहात बसत नाहीत त्याचवेळी भाजी निवडत असतात किंवा शेंगा सोलत असतात. आकाशवाणीवरचे कार्यक्रम स्वयंपाक करताना, शिवणकाम करताना लक्षपूर्वक ऐकतात. कामात व्यस्त राहून ऐकण्या-पाहण्याचे त्यांचे कसब खरंच अनुकरणीय आहे. स्मरणशक्ती ही त्यांना मिळालेली दैवी देणगी असावी. आपल्या जीवनात येऊन गेलेल्या प्रत्येकाचं नाव, गाव, आपल्यावर उपकार केलेल्या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये, तो प्रसंग बारीकसारीक तपशीलासह त्यांना लख्ख आठवतो व तो प्रसंग त्या इतक्या खुबीनं आपल्यासमोर ठेवातात की एक सुरेख चित्रपट पाहिल्याचा भास होतो, पण त्यांच्या स्मरणाच्या मर्यादा इथपर्यंतच नव्हे तर बहीण-भावांच्या, मुलांच्या, परिचितांच्या कानावर पडलेल्या गोष्टी जशाच्या तशा मनाच्या कागदावर टिपून ठेवतात व दुसऱ्याला समजावताना, धीर देताना प्रकट करतात. त्यांनी सांगितलेला एखादा विनोदी प्रसंग उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडवून जातो. अशाप्रकारे जयाताई म्हणजे साठ वर्षापूर्वीचा चालता बोलता सुपर रोबोच वाटतो.


        एरवी आपल्या संसारात काटकसरी असलेल्या जयाताई एखादी चिंधीही जपून ठेवून त्याचा सदुपयोग करणाऱ्या, अन्न वाया जावू नये म्हणून शिळं खाणाऱ्या त्या, कुणी शिक्षणासाठी मदत किंवा देणगी मागितली तर हजाराची नोट अगदी सहजपणे काढून देतात. गरजू स्त्रीला वापरत असलेली चांगली साडीही देऊन टाकतात हे त्यांचे वर्तन म्हणजे कुणालाही न सुटलेले कोडे आहे, असे वाटते.


        एरवी शांतपणे ऐकून घेणाऱ्या, मोलाचा सल्ला देणाऱ्या, मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या जयाताई समोरच्या व्यक्तिने जाणून बुजुन कांही चूक केली किंवा त्यांच्या अस्मितेला धक्का देण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यांचा अवतार कडाडणाऱ्या विजा प्रमाणे असतो. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात असलेल्या व्यक्ती जरा सांभाळूनच असतात. कारण एरवी प्रेमळपणाचा वर्षाव करणाऱ्या त्या रागावल्याचं दुःख समोरच्याला पचवणं फार जड जातं. उधळपट्टी करणाऱ्याला काटकसरीचे महत्व सांगायलाही त्या योग्य संधीची वाटच पाहत असतात.


        चांगल्याचुंगल्या वस्तू जमविणे आणि इतरांना भेटीदाखल देणं हा त्यांचा छंद आहे. आणि हो, बारशाला जाताना स्वतः शिवलेली दुपटी, टोपडी, बाळलेणी न्यायला त्यांना फार आवडते. रुखवत सजविण्यासाठी स्वतः तयार केलेली वस्तू हमखास नेतात. एकंदरीत आपल्या जीवनात सर्वांच्यात मिसळूनही स्वतःचा वेगळेपणा त्यांनी जपला आहे. हा वेगळेपणा जपत असतानाच इतर कुणालाही त्रास होणार नाही याविषयी त्या नेहमीच दक्ष असतात. जयाताईंचे व्यक्तिमत्व असे संपन्न व बहुपेडी आहे. 

    

        त्यांचे आणखी एक खास वैशिष्ट म्हणजे गतिमान  धकाधकीच्या या जमान्यात, बदलत्या हवामानात, सर्वांच्या वाट्याला येणाऱ्या तबेत्तीच्या तक्रारी त्यांच्याही वाट्याला आल्या पण त्यांनी कधीच त्याचा बाऊ केला नाही. इतरांसमोर आपल्या तब्येतीच्या तक्रारी सतत मांडत बसणे त्यांना आवडत नाही. आपल्या अशा वृत्तीने समोरच्या व्यक्तीला नकळतपणे दुःखी करतो असे त्याना वाटते. त्यामुळे त्यांच्यासमोर कुणी माझं डोकं दुखतय म्हटलं की जयाताई सहज म्हणतात, आपलं आहे म्हणून दुखतं ते दुसऱ्याचं असतं तर दुखलं असतं का ?' समोरचा एकदम मोठ्याने हसतो.


        जयाताईच्या जीवनशैलीकडे पाहिले की वाटते काही माणसं आपल्या जीवनात काही मापदंड शिरोधार्य मानून आपली वाटचाल करीत असतात. कोणाला तरी आदर्श मानून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जीवनात मार्गक्रमण करीत असतात. व आपले आयुष्य सफल संपूर्ण यशस्वी बनवतात. जयाताईंसारख्या व्यक्ती आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, व्यवहारातून इतरांसमोर जगण्याचे मापदंड प्रत्यक्ष उभे करतात हेच खरे!


 जयाताईंच्या जगण्याकडे पाहून शेवटी म्हणावेसे वाटते,


अशाही व्यक्ति आहेत भवती, जीवन त्यांचे पहा जरा। 'आनंदी जगावे असे' हाचि सापडे बोध खरा।





शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

आमची विहीर

आमची विहीर 


                    

    

       १४ एप्रिल २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत हाजी मन्सूर रमजान तांबोळी व परिवार यांच्या कोथळी येथील शेतात विहीर खुदाई संपन्न झाली. या कालावधीत अनेक भल्याबुऱ्या अनुभवांचे झरे लागले. या अनुभवांना शब्दबध्द  केलं आहे आमची कन्या सौ.यास्मीन नौशाद शिकलगार हिने. यास्मीन  बी.ई.   (इलेक्ट्रॉनिक्स ) आहे. कराडमध्ये राहते. विशेष म्हणजे १४ एप्रिल हा यास्मीन चा वाढदिवस आहे.


        त्या दिवशी विहीर खुदाईचा आरंभ झाला. व २५ एप्रिल रोजी विहीरीला पाणी लागले. त्या दिवशी आमची कराडची नात सोहा हिचा वाढदिवस आहे. या लेखाचे एडिटिंग माझी सून सौ. हिना हिने केले आहे. चिरंजीव मोहसीन व सौ. अरमान यांनी तिला सहकार्य केले आहे.

  

        


       माझे आई-वडील शेतकरी कुटुंबातून लहानाचे मोठे झाले त्यामुळे माझ्या वडिलांना शेतीची फार आवड. 31 मे 2010 रोजी माझे वडील दुय्यम निबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची शेतीची आवड जोपासण्यासाठी त्यांनी जयसिंगपूर या आमच्या गावापासून जवळ कोथळी येथे सव्वा एकर शेत खरेदी केले. आणि या शेतात ते आवडीने काम व देखरेख करतात शेतीला पाणी शेजारच्या शेतकऱ्याकडून चालू होते पण ऐन उन्हाळ्यात शेताला पाणी मिळत नव्हते व त्यामुळे पिकांचे नुकसान होत होते म्हणून आमच्या कुटुंबाने शेतात विहीर काढण्याचा निर्णय घेतला.  

      

        पाणाड्याला बोलवून शेतातील विहीर काढण्याची जागा निश्चित करण्यात आली. 14 एप्रिल 2025 रोजी सर्वांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले. त्यानंतर विहीर खुदाई साठी एक मोठे पोकलेन शेतात आणण्यात आले. आणि 19 एप्रिल पासून विहीर खुदाई चे काम चालू झाले. माझ्या वडिलांची व भावाची धावपळ सुरू झाली. वडील सकाळी नऊ वाजता डबा घेऊन शेतात जाऊ लागले. आणि दिवसभर विहीर खुदाईचे काम पाहून संध्याकाळी सात वाजेपर्यंत घरी येऊ लागले. आठ ते दहा फूट खोदल्यानंतर मोठा खडक लागला, मग त्यानंतर सुरुंग लावून खडक फोडण्याचे काम सुरू झाले. आणि 25 एप्रिल ला दुपारीच घरी आनंदाची बातमी कळली. पाणी लागलं घरातील सर्वांना फार आनंद झाला. काम करू देत नव्हतं एवढं पाणी लागलं होतं. मग पाण्याची मोटर खरेदी केली आणि मोटर लावून पाणी शेजारील शेतात सोडले इकडे वीर खोदायचे काम चालू होते. हे काम  उमेश पाटील यांना दिले होते. वीहीर खुदाई, सुरूंग लावायचं काम जोमात चालू होतं. माझ्या वडिलांची व भावाची धावपळ होत होती. भाऊ नोकरीत असल्याने तो पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता. पण वडिलांची एकट्याची धडपड सुरू होती आमची शेती पाहणारे सुकुमार चिंचणे व त्यांचा मुलगा चेतन यांची मोलाची साथ मिळाली. 

       

        25 ते 30 फूट विहीर खोदून झाल्यानंतर आणखी सात ते आठ फूट विहीर खोदायचा निर्णय घेतला. त्यानंतर भरपूर अडथळे येऊ लागले एक दोन वेळा खुदाई करताना पोकलेनचे दात तुटले, पोकलेन कामगार व सुरूंग लावणारे कामगार हेही काम हळूहळू करत होते.

         

        घर पहावे बांधून, लग्न पहावे करून, आणि विहीर पहावी खोदून अशी आशयाची म्हण आहे पण अशी म्हण का बरं आली असावी याचा प्रत्यक्ष अनुभव आला. कदाचित या तिन्ही गोष्टी करताना होणारी धावपळ, होणारा त्रास, लागणारा वेळ, घ्यावे लागणारे कष्ट, इत्यादी आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टीचं अनिश्चित स्वरूपाचे बजेट आणि काम पूर्ण होईपर्यंत होणारा प्रचंड मानसिक त्रास होतो तो वेगळाच. 

       

        साधारण 18 मे पर्यंत विहीर खुदाईचा अंतिम टप्पा पार पडला त्यानंतर दोन-तीन दिवस पाईपलाईन व इतर कामे पार पडली. विहिरीच्या चारी बाजूंनी जाई करण्यात आली.

     

       25 मे ला सर्व नातेवाईकांना विहीर पाहण्यासाठी व स्नेहभोजनासाठी शेतात बोलवायचे ठरले सर्व तयारी करण्यात आली. परंतु 20 मे पासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाऊस विश्रांती घेत नव्हता. हिरवी पाने हिरवी राने, हिरवी शेती, हिरवी मने,... पण हे वरूण राजा थोडी उसंत घे आणि आमच्या शेतातील स्नेहभोजनाचा  कार्यक्रम पार पडू दे. अशी सर्वांची मनोकामना झाली. त्यानंतर कार्यक्रम पुढील आठवड्यात घेण्याचे ठरले.

       

       माती सुपीक आणि बियाणं सकस असेल तर उगवलेले रोप सशक्त होतंच. सुपीक माती म्हणजे आमचे शेत आणि सकस बियाणे म्हणजे माझ्या आई-वडीलांचे  विचार आणि सशक्त रोप म्हणजे  शेतातील पिक. ते रुजवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्यातून आलेले शेती विषयाचे भान माझे आई-वडील त्यांच्या माझ्या आणि पुढच्या पिढीला देऊ पाहतायत.

     

         25 मे ला पावसाने थोडी उघडीप दिल्यानंतर माझा भाऊ व बहिण शेताकडे गेले. तेव्हा आमची विहीर तुडुंब भरली होती ते पाहून खूप समाधान झाले. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम 31 मे 2025 रोजी पार पडला.        


प्राऊड ऑफ यू माय फॅमिली फॉर कम्प्लिटिंग फार्म ऑफ हॅपिनेस 

     माझ्या माहेरी हत्ती ऐश्वर्याचा झुले ,

     आई-वडिलांची शेती प्रेमाणे फुले 


      विहीर आमच्यासाठी केवळ पाण्याचा स्त्रोत नाही, तर हृदयातील एक भावना आहे. शेतीच्या प्रवासातील आमची साथीदार आमची विहीर भविष्याची नांदि व्हावी ही सदिच्छा!

शुक्रवार, ३० मे, २०२५

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर


 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

                  ✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी




    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदर्श व्यक्तिमत्वाच्या , दानशूर व कुशल प्रशासक होत्या. त्या वीरांगना  अतिशय न्यायप्रिय व दूरदृष्टी असलेल्या ,पुरोगामी विचारांच्या होत्या. अहिल्याबाई शिवभक्त आणि प्रजाहितदक्ष होत्या.अशा थोर अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ में इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्याबाई यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव  होते. त्यांच्या मामाचे आडनाव मैंदाड होते. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकविले होते.


       बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे मावळा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार आठ वर्षाच्या अहिल्याबाईना मल्हाररावानी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.


       मल्हारराव होळकरांच्या त्या सून झाल्या. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स.१७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावानी अहिल्याबाईना सती जाऊ दिले नाही. बारा वर्षानंतर मल्हारराव होळकर हेही मरण पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.


       इंग्रज लेखक लाँरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन , इंग्लंड ची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. भारतातील माळव्याचे जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी , इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केले होते. त्या आधाराने अहिल्याबाईनी इ. स.१७६६ ते इ.स.१७९५ ,म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.


       राणी अहिल्याबाई यांनी अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले , त्यांचा जीर्णोद्धार ही केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनविले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी , उज्जैन , नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्याबाईनी शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात इ.स.१७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाई दरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर गाढ विश्वास असल्याचे दिसून येते.


       पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई नी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत असे म्हणतात.


       पेशव्यांनी परवानगी दिल्यावर ज्या माणसाने त्यांना विरोध केला होता,  त्यास चाकरीत घेऊन तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तकपुत्र )यास सैन्याचा मुख्य करून अहिल्याबाईनी दिमाखात माळव्यास प्रयाण केले.


       अहिल्याबाईनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गार्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. राज्याची राजधानी नर्मदातीरी असलेल्या महेश्वर येथे होती तरीही इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे हे अहिल्याबाईनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले. अनेक उत्सव भरवले. हिंदू मंदिरामध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून दाने दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या. अहिल्याबाईनी रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईंच्या स्मृतीस अभिवादन म्हणून सन १९९६मध्ये इंदुरातील नागरिकांनी त्यांच्या नावांने पुरस्कार सुरु केला. तो दरवर्षी जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास  दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ इंदूर येथील विश्वविद्यालयास त्यांचे नांव दिले आहे.


       अहिल्याबाईंच्या नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे एक विद्यापीठ सोलापूरला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईनी आश्रय दिला होता. कारागिरांना , मूर्तीकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी सुरु केली होती. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गायी देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.


        अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्याबाई होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळाला पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संतांचा दर्जा दिला.

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

वर्गमित्र स्नेहमिलन

                वर्गमित्र स्नेहमिलन

        



      सन -1993-94 ची नवजीवन हायस्कूलची दहावी बँच् व 1990- 91 ची न.प.शाळा क्र.1 ची सातवीची बँच यांचं गेट टुगेदर 5 एप्रिल 2005 रोजी गेमोजी फूड माँल , जयसिंगपूर  येथे संपन्न झाले. त्या अपूर्व सोहळ्याविषयीचे माझे मनोगत.....

एक संसस्मणीय रम्य सोहळा ।

विद्यार्थी बाळानो,

       खरं तर 34 वर्षापूर्वी आम्ही शिक्षकांनी तुम्हाला ज्ञानदान केलं.एवढ्या वर्षानंतर तुम्ही सर्वांनी आमची आठवण ठेवली.आठवणीने प्रत्येकाच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं .सर्वांना एकत्र बोलावून सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान केलात ,ही आमच्या साठी खूप सुखावह गोष्ट आहे. आयुष्याच्या संध्याकाळी तुमच्यासारख्या सद्गुणी , सुसंस्कारित विद्यार्थ्याकडून झालेला गौरव आम्हा शिक्षकांना हत्तीचं बळ देऊन गेला. आनंदाने ऊर भरून आला. योगश आणि मित्र परिवार ने आयोजित केलेला हा नयनरम्य सोहळा नितांतसुंदर, अप्रतिम ,अपूर्व असा झाला. तुम्ही सर्वांनी इतकं छान नियोजन केलं होतं की स्वागत झाल्यापासून सोहळा संपेपर्यंत एकामागून एक असे अनेक सुखद धक्के बसले .ज्यानी आम्हाला नवी एनर्जी मिळाली.आम्ही लावलेल्या छोट्याशा आम्रवृक्षाच्या रोपांचे फळांनी बहरलेल्या डेरेदार वृक्षात झालेले रुपांतर पाहून आपण आमराईत वावरत असल्याचा आनंद आम्ही उपभोगला.

         बाळानो तुम्ही सर्वजण स्वागताला थांबला होता. तुतारीचा कर्णमधुर स्वर आणि तुम्हा सर्वांचे उत्साही ,हसरे चेहरे, चेहऱ्यावर विनम्र भाव,आदराने केलेले नमस्कार हे सर्व पाहून आमच्या नकळत आमच्या अंतःकरणातून लाखो आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळालेत बाबानो!...

        स्टेजवर जाताना चे पार्टी पाँप्अप्स् ,चालताना तुम्ही धरलेला हात खरोखरीच अविस्मरणीय होता.सोहळ्याच्या सुरुवातीला जो परिपाठ सादर केलात ना त्यातील कल्पकता कोतुकास्पद आहे. इतक्या वर्षानंतर तुमच्या तोंडून नेहमी खरे बोलावे हा सुविचार ऐकताना मजा वाटली. बातम्या ऐकून बरे वाटले. स्वर्गीय शिक्षकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचाही सन्मान करण्याचा तुमचा मनोदय खूप आवडला.त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तुम्ही केलेला सन्मान राज्यस्तरीय पुरस्कापेक्षाही भारी वाटला .तुम्ही गळ्यात घातलेल्या माळा तुमच्या आमच्यातील जिव्हाळ्याच्या प्रतीक ठरल्या .

        प्रत्येक शिक्षकाबद्दल त्यांच्या खास वाक्यासह तयार केलेल्या चारोळ्या या सोहळ्यातील खास आकर्षण ठरल्या.तलहा,यास्मिन, योगिता व चारोळ्या तयार करणाऱ्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. चारोळ्या ऐकताना रणरणत्या उन्हात आल्हाददायक पावसाच्या सरी पडत असल्याचा सुखानुभव आला.

                         मार्मिक चारोळ्या

                         सरी पावसाच्या

                         आकर्षण ठरल्या

                         अपूर्व सोहळ्याच्या ।

        तुम्ही सर्वांच्यासाठी केलेली फेट्यांची व्यवस्था लाजवाब. स्वादिष्ट नाश्ता व रूचकर भोजन व्यवस्था करून सर्वांना तृप्त केलंत तम्ही .भोजन करतांना तुम्ही केलेल्या आग्रहाने मनही भरले.अभिजीत यातलं थोडं तरी घ्या म्हणत होता तर दुसरा जिलेबीचा घास मुखात भरवत होता.कित्ती कित्ती प्रेम दिलंत रे बाळानो मी बाळानोच म्हणेन तुम्हाला कारण तुम्ही फारच गुणी बाळे आहात.

        उर्वरित आयुष्य आनंदाने घालविण्यासाठी तुमचा हा आपुलकीचा , आदराचा, जिव्हाळ्याचा सोहळा आम्हाला सदैव टाँनिक देत राहील.

       शेवटी योगेशचे आभारप्रदर्शन म्हणजे आभारप्रदर्शनाचा उत्कृष्ट नमुना होता. स्वतः च्या चुकांची कबुली, आपण केलेल्या कामाचे प्रदर्शन न करता सर्व श्रेय मित्रांना देण्याची त्याची खिलाडूवृत्ती पाहून आम्ही तुम्हा सर्वांचे शिक्षक असल्याचा अभिमान वाटला.

                 धन्य झालो आम्ही सोहळा पाहून

                 अशीच मर्जी ठेवा मनापासून।

मनोगत प्रेषक,

डॉ. सौ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी

शाहूनगर जयसिंपूर ।

मंगळवार, ३१ मे, २०२२

आमचा 42 वा लग्नवाढदिवस


आमचा ४२ वा लग्नवाढदिवस

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी 




       मे महिन्यात मोसमी पावसासारखा वळवाचा पाऊस बरसला. तापलेली धरती शांत झाली. वरच्या दुधाने सुकलेली झाडे व वेली नी आईच्या दुधाने बाळसे धरले. आमच्या दारी कर्दळीवर लाल, पिवळ्या झुबकेदार फुलांनी हजेरी लावली. कुंडीत वाढलेल्या गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या फुलांनी मन भरून आले. जिन्यावरच्या मोगऱ्याने घरात सुगंधाची उधळण केली अशा रम्य वातावरणात माझ्या दोन्ही लेकी अरमान व यास्मीन आपल्या लेकरांसह उन्हाळी सुट्टीतील माहेरपणासाठी आल्या आणि आमच्या घराचे गोकुळ झाले. रौनक व राहीबला खंदे सवंगडी मिळाले.


       अशा या रम्य वातावरणात आमच्या लग्नाचा पंचवीस में हा बेचाळीसावा वाढदिवस आला. आदल्या दिवसापासूनच हीना सूनबाईंची लगबग सुरू झाली. तिने लोणी डोशांचा बेत केला. त्यामुळे आदल्या दिवशी हळदी मेहंदीची जशी गडबड असते ना तश्शी लगबग सुरु होती. सकाळी उठल्यानंतर सहा नातवंडाकडून शुभेच्छा मिळाल्या. सून, चिरंजीव, लेकींनी शुभेच्छा दिल्या. आठवण आजीची ग्रुपवर शुभेच्छांचा पाऊस पडला. उरलेल्या पीठाचे लोणी डोशांचा नाष्टा झाल्यावर सर्व नातवंडे शुभेच्छा पत्रे बनविण्यासाठी सज्ज झाली. कागद मिळविले, रंगाची जुळणी झाली आणि प्रत्येकाने आपले कौशल्य पणाला लावून सुंदर सुंदर कार्डस् तयार केले. अल्फीया नातीचे कार्ड अतिसुंदर कारण ती सर्वात मोठी शिवाय चित्रकार. सोहानेही फार सुंदर कार्ड तयार केले व दाखवून दिले हम भी कुछ कम नही. झियान व रौनक या दोघांनी एकच कार्ड तयार केले पण भले मोठे. या सर्वांचे हे प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो. मुलींनी अबोलीची फुले आणून गजरे केले. आम्ही दोघे वास्तुशांतीसाठी बाहेर गेल्याची संधी साधून मुली आम्हाला गिफ्ट आणण्यासाठी बाहेर पडल्या. बऱ्याच वेळाने एक छानशी साडी व यांच्यासाठी कपडे घेऊन परतल्या. संध्याकाळचा बेत तिघींनी ठरवून टाकला. वडापाव, केक, कलाकंद, दाल खिचडीचा फक्कड बेत ठरला. चिरंजीव ऑफिसहून आल्यानंतर दोघे केक आणण्यासाठी बाहेर गेले. घरी राहणाऱ्यांनी कार्यक्रमाची तयारी केली. नव्या साडीसाठी मॅचिंगची तयारी झाली. साडी पिन्अप करण्यासाठी तिन्ही लेकी तयार होत्या. त्यामुळे बेचाळीस वर्षापूर्वीची आठवण झाली. मन भरून आले. आम्ही ही गोड नातवंडाना रिटर्न गिफ्ट आणून ठेवले. माझ्या मुलाच्या निरिक्षणशक्तीचे कौतुक वाटले कारण त्याने केक आणतांना पप्पांसाठी एक छानशी उन्हाळी टोपी आणली. केक कापल्यावर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या. गोड केकचा आस्वाद घेतल्यानंतर मस्त वडा पाववर आडवा हात मारला. बेचाळीसावा लग्न वाढदिवस अविस्मरणीय केला माझ्या पिलांनी व लाडक्या नातवंडानी.

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

नातवंडांना गोष्टी सांगताना - विशेष लेख


नातवंडांना गोष्टी सांगताना - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी

       मार्च २०२० ला कोरोना नावाच्या महाभयंकर राक्षसाने आपल्या जीवनात प्रवेश केला आणि आपल्या सर्वांचीच जीवनशैली बदलून गेली. जरा घर सोडा, थोडावेळ मोकळ्या हवेत फिरून या, निसर्गाच्या सहवासात राहा तुमचे आरोग्य उत्तम राहील असा सल्ला देणारे लोक, घरातून अजिबात बाहेर पडू नका, हात वरचेवर धुवा, मास्क लावा असा सल्ला देऊ लागले. शाळा, बाजार, चित्रपटगृह, एस. टी. बस प्रवास सारेकाही बंद झाले. आणि मागे पडलेले, जोपासता न आलेले छंद पुढे नेटाने निभाऊ लागले. वयाने मोठ्या असलेल्या लोकांचे ठीक झाले. पण लहान मुलांचे फार अवघड झाले. घरात कोंडून बसणे त्यांना जमेनासे झाले. अपवाद वगळता सर्वच लहान मुलांनी दूरदर्शनला आणि मोबाईलला जवळ केले. टीव्ही आणि मोबाईलचे त्यांना वेड लागले. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आणि विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले. आयतीच संधी मिळाली. मोबाईल हातात धरूच नकोस म्हणणारे पालक आटापिटा करून मोबाईल खरेदी करून मुलांच्या हातात देऊ लागले त्याशिवाय काय करणार बिचारे पालक? आलिया भोगासी असावे सादर या उक्तीनुसार पालक आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊ लागले.


            अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मुलांना मोबाईल नको घेऊ, टीव्ही पाहू नकोस हे सांगणे सोपे आहे पण त्यांनी काय करावे हे पालकांनी विचारपूर्वक ठरवले पाहिजे. त्यांना इतर बाबतीत रमण्याचे पर्याय शोधले पाहिजेत. त्यांच्याबरोबर खेळले पाहिजे. त्यांना कृतीत रमवले पाहिजे. त्यांची अभिरुची ओळखून त्यांच्या अभिरुची प्रमाणे त्यांना खेळात, गोष्ट ऐकविण्यात रमविले पाहिजे. असाच काहीसा विचार करून मी माझ्या नातवंडाना बालकथा, बोधकथा, संस्कारकथा सांगण्याचा नित्यकर्म लॉकडाऊनच्या काळात सुरू केला. गोष्टी ऐकण्यात ते छान रमू लागले. गोष्टी बरोबरच काही बडबड गीते म्हणू लागले. गोष्टी गाणी ऐकून त्यांच्यातही कमालीची सजगता निर्माण झाली. मध्ये मध्ये प्रश्नही विचारू लागले. त्यातून हल्ली मुलांची विचार शक्ती किती प्रबळ झालेली आहे हे समजले गाणी गोष्टी सांगताना आजी-आजोबांना सतर्क करण्याकरता हा लेखन प्रपंच.


           माझ्या साडेतीन वर्षाच्या राहीब नावाच्या छोट्या नातवाला एक गोष्ट सांगत होते. जी गोष्ट पाचवीच्या हिंदी पाठ्यपुस्तकात समाविष्ट होती. दोघे बहिण-भाऊ रस्त्याने चालले भाऊ होता आठ वर्षाचा व बहीण चार वर्षाची. एक कुत्रा त्यांच्या अंगावर आला. मी पळून गेलो तर कुत्रा बहिणीला चावेल म्हणून भावाने एक युक्ती केली. त्याने आपल्या अंगातला कोट काढला व कुत्र्याच्या तोंडावर फेकला. तो कुत्रा कोट बाजूला करेपर्यंत तो बहिणीला घेऊन पळाला व लपून बसला.

किती हुशार धाडसी होता ना तो भैय्या ?

          

        हे ऐकून राहीब म्हणाला, "वो भैय्या चालाक था. हमारा भैय्या ऐसा नहीं करेगा". मी म्हणाले, "क्यो नही करेगा ?" राहीब म्हणाला, "मेरा भैया मुझे घुमाने नही लेके जाता. वो हमेशा टीव्ही देखता है मोबाइल पर गेम खेलता है".

            

        काय म्हणावे याला? मी म्हणाले, "नही रे बाबा, तेरा भैया भी कुत्ता सामने आने पर ऐसाही करेगा". त्यावर राहीबचे उत्तर, "मॉ भैय्या कोट नही पहेनता. वो तो जाकेट पहनता है". मी म्हणाले, "जाकेट भी कोट जैसा काम करेगा". पण या बोलण्याने मी थक्क झाले नाही तरच नवल. 

          

        या चुणचुणीत राहिबला झोपवताना मी, 'इथं माझ्या हातावर नाच रे मोरा' हे गाणे म्हणत होते. डोळे उघडून मला मध्येच थांबवून तो म्हणाला, "मैने गाव को जाते वक्त मोर को देख लिया है. वो कितना बड़ा बड़ा होता है. मा मुझे बोल इतना बड़ा मोर हमारे हाथ पर कैसे नाचे गा?" मी त्याला समजावले, "मोर हातपे नही नाचेगा. लेकिन हम उसे बिनती कर रहे है, बुलाते है. हम बरसात को बुलाते है, येरे पावसा तुला देतो पैसा. हमारे बुलाने पर बरसात उस वक्त आयेगा ही ऐसा नही हो सकता. वैसे ही हम मोर को नाचने बुला रहे है व आयेगा या नहीं आयेगा हम गाते रहेंगे".


          तर अशी मजा होते आजी-आजोबांची नातवंडांना गाणी गोष्टी सांगताना. नातवंडे अपडेट झाली आहेत. आजी-आजोबानाही गोष्टी गाणी सांगताना अधिक हुशार व अपडेट व्हायला हवे. अनपेक्षित प्रश्नाने गोंधळून न जाता त्यांना समजवायला हवे तरच आपण लाडके आजी आजोबा बनू , होय ना?


     माझा सात वर्षाचा रौनक नावाचा नातू गेल्यावर्षी दुसरीत होता. मी त्याला कोल्हा आणि द्राक्षे हि गोष्ट सांगितली व काय बोध घ्यायचा हे ही त्याला प्रश्न विचारून सांगितले. त्यानंतर तो मला म्हणाला कोल्हा व्हेजिटेरियन आहे मी म्हणाले नाही. तो म्हणाला मग मला सांग तो कोल्हा द्राक्ष खाण्यासाठी का गेला होता? त्याच्या या प्रश्नाने मी क्षणभर अवाक झाले. मला आठवले इंग्लिश च्या पुस्तकात ही कथा होती आणि कित्येक वर्ष पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ही कथा शिकवली होती, पण असा प्रश्न यापूर्वी कोणीही विचारला नव्हता, स्वतःला त्याला समजावले बाळ ही कथा काल्पनिक आहे. कोल्हा प्रत्यक्षात बोलत नसतो. पण आपण म्हणतो, कोल्हा बकरी ला म्हणाला. त्याचप्रमाणे कोल्ह्याने द्राक्षे काढायचा प्रयत्न केला. पण त्याला द्राक्ष काढता आली नाही हे मान्य करायला तो तयार नव्हता. म्हणून त्याने द्राक्षाला आंबट म्हटले. थोडक्यात काय तर त्याला समजावताना माझी दमछाक झाली.


       एक दिवस रौनकला  "हात लावीन ते सोनं" ही गोष्ट सांगितली. ती गोष्ट सांगून झाल्यावर तो म्हणाला; मा मला एक सांग! त्याने ताटाला हात लावल्यावर ते सोन्याचे झाले. त्यातील अन्नही सोन्याचे झाले. त्याला काही खाता येईना. तेव्हा त्यांनी असे करायला पाहिजे होते. त्याला दुसऱ्याने घास भरवावा म्हणजे त्या राजाचा हात ताटाला, अन्नाला लागणार नाही. अनायसे त्याचे पोट भरेल. त्या राज्याचे दोन्ही हात बांधून ठेवायचे. कुठली वस्तू सोन्याची करायची असली तरच त्याचे हात सोडायचे. देवाने तर त्याला हात लावला तर सोने असा वर दिला होता ना? या राजाने विनाकारण, दिलेला वर परत घ्यायला सांगितला.


            या त्याच्या युक्तिवादावर माझी क्षणभर बोलतीच बंद झाली. त्याला समजावले बाबारे हात लावीन तिथे याचा अर्थ त्याच्या शरीराचा कोणत्याही वस्तूला स्पर्श झाला तरी ती सोन्याची होईल असा आहे. त्याने नाखुशीने ते समजून घेतले. तुम्ही तरी सांगा ना काय उत्तर द्यायचे अशा वेळेला ?


शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

एक अविस्मरणीय फॅमिली ट्रीप - विशेष आढावा गणपतीपुळे सहलीचा


एक अविस्मरणीय फॅमिली ट्रीप - विशेष आढावा गणपतीपुळे सहलीचा

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


ठिकाण: गणपतीपुळे

       ७५ वर्षाच्या आजोबांपासून एक वर्षाच्या नातवंडापर्यंत समावेश असलेली रत्नागिरी गणपतीपुळे ट्रीप सर्वांच्या जीवनातील एक अविस्मरणीय ट्रीप ठरली.


या ट्रीपमधील ठळक बाबी:

        सुरूवातीला नाही नाही म्हणत असलेल्या व्यक्ती फुल्ल तयारीनिशी ट्रीपमध्ये सामील झाल्या व त्यांनी अगदी मनापासून ट्रीपचा आनंद घेतला.


       सर्वांना मायेच्या धाग्यानी घट्ट बांधून ठेवणाऱ्या आपल्या लाडक्या 'बू' ला विशाल समुद्र डोळे भरुन बघता आला. न्यू जनरेशन कपल्सनी फॅमिली ट्रीपमध्ये सुद्धा मनमुराद आनंद लुटला. साठ वर्षावरील व्यक्तीनी तो आनंद डोळे भरून पाहिला. एकल सभासदांनी मनातल्या मनात पुढील प्लॅन तयार केला. साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणातील सहभोजन म्हणजे जरा कमी सर्वांच्या डोहाळे जेवणाचाच कार्यक्रम ठरला.


       खरा अभिमान वाटला आमच्या खऱ्या वारसदारांचा. सर्वांना घोड्यावर बसवून इतकी सुंदर ट्रीप घडवून आणल्याचा. आमची न्यू जनरेशन इतकी समंजस, सर्वांच्या बद्दल नितांत आदर असलेली, सर्वांची काळजी घेणारी, मित्रपरिवार जपणारी आहे हे पाहून समाधान वाटले.


       लक्झरी मध्ये धमाल गाण्यांनी कमाल केली. लहान मुलांपासून आजीआजोबा पर्यंत सर्वांनी डान्सचा आनंद लुटला. विशेष म्हणजे बैठकीच्या डान्सचा एक नवा प्रकार शोधून काढला. झिंगाट, खंडेराया, शांताबाई, गाडीवर, इ. गाण्यावर बसून डान्स ........।


       ट्रिपमध्ये डिग्रजच्या बडेभाईंची स्मरणशक्ती, बोलण्यातील ठामपणा, आरोग्याचे सर्व नियम पाळण्याची सवय सर्वांनी अनुकरण करण्यासारखी आहे. कुणाचे गायनप्रेम, कुणाचे डान्सप्रेम, कुणाचे सेल्फी व फोटोप्रेम, कुणाचे पाण्यात पहुडणेप्रेम, कुणाचे कलाकुसरप्रेम, कुणाचे ड्रायव्हिंगप्रेम, कुणाचे हास्यप्रेम सगळंच अप्रतिम....।


अशी झाली सहल मजेशीर।

पुन्हा जाण्याची लागली हुरहुर।

 

To

डॉ. थोरात फॅमिली, गणपतीपुळे 

        डॉक्टर, तुम्ही आमच्या परिवाराला दिलेल्या स्नेहपूर्ण ट्रिटमेंटने आम्ही खरंच खूप भारावून गेलो. बागणीसारख्या ग्रामीण भागात जन्म घेऊन इतक्या लांब गणपतीपुळे सारख्या पर्यटनस्थळी इतकं सुंदर विश्व तुम्ही निर्माण केले आहे आणि इतकं करून सुद्धा तुमच्यामध्ये गर्वाचा लवलेशही आम्हाला दिसला नाही. जीवनात अनेक व्यक्ती सतत भेटत असतात पण कांही थोड्याच व्यक्ती भेटल्याक्षणीच आपल्या होऊन जातात त्यापैकी तुम्ही आहात. आजकाल चहा द्यावा लागेल म्हणून तोंड फिरवून सोईस्करपणे दुर्लक्ष करणारे कांही नातेवाईक आम्ही अनुभवले आहेत, या पार्श्वभूमीवर वीस बावीस व्यक्तिंची राहण्याची सोय करून त्यांचा पाहुणचार करणाऱ्या तुमच्यासारख्या व्यक्ती म्हणजे मनुष्यरूपात  वावरणाऱ्या देवताच म्हणणे योग्य ठरेल.


      पेशंटना सुयोग्य ट्रिटमेंट देऊन हजारोंनी बील वसूल करणाऱ्या डॉक्टरसाहेबांना पेशंटशी चार दिलासादायक शब्द बोलण्यासाठी अजिबात वेळ नसतो. नातेवाईकांना धीर देणे असभ्य वाटते. या कुठल्याच प्रकारात न बसणारे तुम्ही पेशंटच्या शरीराची व मनाची नस ओळखणारे डॉक्टर आहात असे आम्हाला अगदी मनापासून वाटले.


तुमची अशीच भरभराट होवो, सुयश लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.....। तुमचे आभार न मानता तुमच्या ऋणात राहणे आमच्या परिवाराला आवडेल.

आपले स्नेहांकित,

तांबोळी, शिकलगार व पटवेगार परिवार।


शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

नाताळ ख्रिसमस - विशेष लेख


नाताळ ख्रिसमस: विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       

       नाताळ  किंवा ख्रिसमस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा सण. प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म ही दंतकथा किंवा काल्पनिक गोष्ट नसून एक ऐतिहासिक घटना आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. पवित्र शास्त्राप्रमाणे येशू ख्रिस्त हे देवाचे, जिवंत देवाचे पुत्र आहेत.


       या देवाच्या पुत्राला या भूतलावर मनुष्याचा जन्म का घ्यावा लागला ? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्रातील पहिलं पुस्तक अर्थात उत्पत्तीच्या पुस्तकात पहावे लागेल.


       उत्पत्तीच्या पुस्तकात असे नमूद केलेले आहे की, देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. आकाश, पृथ्वी, समुद्र, नद्या, डोंगर, झाडी, पशू, पक्षी, पाण्यातील जीव इत्यादी आणि सर्वात शेवटी त्याने आदाम आणि इव्ह अर्थातच पुरुष व स्त्री यांची निर्मिती केली. देवाने या पुरुष आणि स्त्रीला ऐदेन नावाच्या बागेत ठेवले होते. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणिमात्र यांच्यावर देवाने मनुष्याला अधिकार दिला होता. बागेतील वाट्टेल त्या झाडाचे फळ खाण्याची मुभा होती पण 'बऱ्या वाईटचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको' अशी देवाने आदामाला आज्ञा दिली होती. 'ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील' अशी ताकीद देवाने आदामाला दिली होती. पुढे उत्पत्तीच्या पुस्तकात म्हटले आहे की, सर्प जो सैतानाचा प्रतीक आहे, ज्याच्या आमिषाला बळी पडून स्त्रीने, परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करून, त्या झाडाचे फळ खाल्ले व आदामाला ही ते खाण्यास भाग पाडले. त्यांच्या या कृतीमुळे, पाप या जगात आले व मनुष्य देवापासून दूर झाला. देवामध्ये व मनुष्यामध्ये या पापामुळे एक दरी निर्माण झाली. ( उत्पती३ः१७-१९)


       देव जो पवित्र आहे, प्रेमळ आहे, कनवाळू आहे त्याची इच्छा होती की, मनुष्याबरोबर समेट करावा. यासाठी सर्वप्रथम पापाची खंडणी गरजेची होती. पापाचे वेतन मरण आहे. रक्त हे जीवनाचं प्रतीक आहे. रक्ताशिवाय जिवंत राहता येत नाही. अर्थातच पापक्षमेसाठी रक्तार्पण होऊ लागलं. प्राण्यांना व पक्षांना बळी देण्याची प्रथा सुरू झाली. परंतु या प्रथेने पापाचा नायनाट होत नव्हता तर पापावर तात्पुरते पांघरूण घातले जात असे आणि मनुष्य पुन्हा पुन्हा पाप करत असे व निष्पाप जनावरांचा व पक्षांचा बळी जात असे. देवाला या गोष्टीचा वीट आला. पापांच्या क्षालनासाठी पुरेपूर परिपूर्ण व कायमस्वरूपी खंडणी गरजेची होती अनिवार्य होती आणि म्हणून गलतीकारास पत्र ४ः४ मध्ये म्हटले आहे, 'काळाची पूर्णता झाली तेंव्हा देवाने पुत्राला पाठवले.' तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा होता. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म एका विशिष्ट उद्देशासाठी झाला होता. ख्रिस्ताचा जन्म ख्रिस्ती धर्म स्थापित करण्यासाठी नव्हे तर पापात गुरफटलेल्या समस्त मानव जातीला पापापासून सुटका करण्यासाठी, पापाच्या शापापासून त्यांना बंधमुक्त करण्यासाठी, लोकांना क्षमेचा अनुभव देऊन सार्वकालिक जीवनाची आशा देण्याकरिता ख्रिस्ताचा जन्म झाला होता.


     ख्रिस्ताचा जन्म झाला तेंव्हाच त्याने मोठेपणी मानव जातीच्या पापासाठी वधस्तंभावर बलिदान देणे निश्चित होते. मनुष्याच्या पापासाठी एका निष्पाप मनुष्याचाच बळी आवश्यक होता आणि यासाठी देवाला त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवावं लागलं. त्या देवाच्या पुत्राचा जन्म आपण नाताळ किंवा ख्रिसमस म्हणून जगभर साजरा करतो.


ख्रिसमसचा केंद्रबिंदू:

       आज ख्रिसमस साजरा करताना लोक ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, ख्रिसमस केक इत्यादि गोष्टींचा समावेश करतात परंतु आपण सर्वांनी ख्रिसमसचा केंद्रबिंदू कधीच विसरता कामा नये आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला जगाचा प्रकाश म्हणतो (योहान८:१२) प्रकाश हा प्रत्येक सणाचा अविभाज्य हिस्सा आहे आणि ख्रिसमसचा प्रकाश म्हणजे स्वतः प्रभू येशू आणि प्रभू येशू त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनादेखील जगाचा प्रकाश म्हणतो. मत्तय ५:१४,१६ मध्ये ते म्हणतात, "तुम्ही प्रकाश आहात त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा."


ख्रिस्ती जीवनशैली:

       ख्रिस्ती ही एक जीवनशैली आहे. या ख्रिसमसच्या दिवशी आपण सर्वांनी हे लक्षात ठेऊया की, ख्रिस्त आपल्याला धर्मांतर करायला शिकवत नाही तर कुठल्याही गोष्टींची अपेक्षा न ठेवता सत्कर्म करा असे अवाहन करतो. आपल्याला जर ख्रिसमस खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल तर आपण इतरांना क्षमा करू या, दुःखितांचे अश्रू पुसूया आणि सर्वांशी प्रेमाने आणि शांतीने वागून हा ख्रिसमस साजरा करू या. गरजू लोकांना मदतीचा हात देवू या. हे नेहमी लक्षात ठेवू या की, ख्रिसमसच्या दिवशी देवाचा पुत्र मनुष्य झाला जेणेकरुन मनुष्याच्या पुत्रांना देवाचे पुत्र होण्याचे सौभाग्य मिळावे.


सर्वांना ख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा.....।


शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे गुरूनानकजी - विशेष लेख

 

सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे गुरूनानकजी - विशेष लेख 

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हिंदू धर्मियांसह शीख धर्मियांसाठीही फार महत्त्वाचा मानला जातो. परमोच्च ज्ञानाचे सार सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत देणाऱ्या गुरूनानक यांचा जन्म इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे १५ एप्रिल १४६९ मध्ये सध्या पाकिस्तानमध्ये स्थित असलेल्या पंजाबच्या तलवंडी येथे झाला. त्यांचे जन्मस्थान 'ननकाना साहिब' या नावाने ओळखले जाते. संत गुरुनानक यांच्या वडिलांचे नांव मेहता काळू तर आईचे नांव तृप्तीदेवी होते. त्यांच्या बहिणीचे नांव नानकी होते. नानक लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे होते. प्रखर बुद्धिमता असणाऱ्या नानकांनी बालपणीच सांसारिक विषयांकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली होती. ते शाळेत जात असताना, शाळा सुटल्यावर गायी-गुरांना रानात चरावयास घेऊन जात असत. तेथे जाऊन ते देवाचे भजन करत असत. लवकरच त्यांनी शाळा सोडून दिली आणि त्यानंतर त्यांनी आपला सर्व वेळ आध्यात्मिक चिंतन व सत्संगात व्यतीत  केला. ते म्हणत, 'मन हे शेतकरी असून आपले शरीर हे एक सुंदर शेत आहे, तर ईश्वराचे नाम हे या शेतातील बियाणे आहेत. प्रेमानेच ही बियाणे रुजतात, फुलतात. माझ्या शेतातून मी अशा पद्धतीने पीक काढीन की, माझ्या कुटुंबाला भरपूर उत्पन्न मिळेल.' नानक यांचे वडील त्यांना बाजरात भाजी विकायला पाठवायचे. त्यावेळी हिशेब करतांना ते तेरा या संख्येला अडखळायचे. जेंव्हा ते तेरा उच्चारायचे तेंव्हा ते ईश्वराच्या स्मरणात रमून जायचे. कारण हिंदी मध्ये तेरा म्हणजे तुझा. त्यांचे मग तेथे लक्ष नसायचे तर ते ईश्वराकडे असायचे. ते नेहमी ईश्वराला उद्देशून म्हणायचे. 'मै तेरा, मै तेरा'.


प्रेम, भक्तीचे समतादूत: गुरुनानक

भक्ती, ज्ञान आणि कर्म यांच्यामध्ये समन्वय साधून प्रेम भक्तीला महत्त्व देणारे गुरूनानकजी खऱ्या अर्थाने समतेच्या वारीतील निष्ठावंत वारकरी आहेत. पंजाबातील शिखानांच नव्हे तर साऱ्या भारताला भक्ती प्रेमाद्वारे समतेचा संदेश देण्याचे काम गुरूनानकजी यांनी केले. संत कबीर यांच्याप्रमाणे अंधश्रद्धा, पाखंडीपणा, धार्मिक खेळांचा बुरखा फाडण्याचे काम गुरूनानकजीनी केला.


गुरूनानक यांचा उपदेश:

गुरूनानकजी त्यांच्या प्रवचनांमध्ये जातीवाद, भेदभाव नष्ट करणे, सत्त्याच्या मार्गावर चालणे आणि सर्वांचा आदर सन्मान करणे आदि उपदेश द्यायचे. त्यांनी स्वतःला भक्ती योगाला वाहून घेतले होते. भक्तीयोग म्हणजे ईश्वराला प्राप्त करून घेण्याचा योग होय.  गुरूगोविंदसिंग कर्मयोगी होते. कर्म करणे म्हणजेच मुक्तीचा मार्ग असे ते मानत तर नानकजी भक्तीयोगी होते. बाह्य घडामोडींमध्ये अडकून ईश्वराला विसरू नका, अंतर्मुख होऊन ईश्वराचे नामस्मरण करण्याचा संदेश देऊन त्यांनी लोकांना याकरिता प्रवृत्त केले. त्यांनी पंधराव्या शतकांमध्ये लंगर परंपरेला सुरुवात केली. ते ज्या ज्या ठिकाणी गेले, तेथे जमिनीवर बसूनच भोजन केले. जातपात, उच्च नीच आणि अंधविश्वास संपविण्याच्या हेतूनेच त्यांनी ही लंगर परंपरा सुरु केली. लंगरमध्ये सर्वजण एकत्र बसून जेवण करू शकतात. त्यांनी सुरु केलेली ही परंपरा शीख धर्मातील तिसरे गुरू अमरदास यांनी पुढे चालू ठेवली व ती आत्तापर्यंत कायम आहे. देशभरातील कोणत्याही गुरूद्वारामध्ये एखादा सण साजरा करण्यासाठी लंगरचे आयोजन केले जाते. लंगरशिवाय कोणताही सण संपन्न होत नाही. लंगरमध्ये विविध जातीचे आणि धर्माचे लोक एकत्र येतात. जगाच्या कानाकोपऱ्यात जेथे शीखधर्मिय राहतात तेथे लंगरची प्रथा चालू आहे. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जगातील सर्वात मोठ्या लंगरचे आयोजन केले जाते. मंदिरात श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जात नाही.


गुरूनानक यांचे साहित्यिक तत्त्वज्ञान:

नानकांच्या मते ईश्वर कृपा झाल्यानंतर कदाचित तत्वज्ञानाचे दार्शनिक भांडार साधकासमोर प्रकट होईल, पण गुरूकृपेनेचते अनुभवाच्या पातळीपर्यंत पोहोचेल म्हणून ते नानकवाणीमध्ये एके ठिकाणी म्हणतात...

'आपे जाने आपे देई, आखहि 

सि भी केइ-केइ.

जिसनो बसते सिफती सलाह

नानक पतीसाही'


       भारतीय तत्व दर्शनात ईश चैतन्याचे जे एकरुपत्व आढळते ते नानकांच्या साहित्यातही भेटते. ईश्वर एक ओ, तो ओंकार स्वरूप आहे. सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाची तो मूळ उर्जा आहे. त्यांचे कुणाशी शत्रुत्व नाही आणि मित्रत्व नाही, कारण तो कालातीत आहे म्हणून शिष्यांना मूलमंत्र देतांना नानक म्हणत......

ओंकार, सतिनामु, करता पुरस्खु निरभै, निरवैस, अकालि मुरति

अरजुनि सैभं गुरू प्रसादि ।


इस्लामी शक्तीच्या राजकीय वरवंट्याखाली रगडल्या गेलेल्या, विखुरलेल्या भारतीय समाजास एकत्र करून त्याला सत्नाम, सत्धर्म, सत्जीवन यांना नवी दिशा देण्याचे, त्यात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य गुरूनानकजींनी केले. त्यांच्या वाणीत एक अद्भूत प्रेरणाशक्ती होती. आपल्या जीवनातील घटनांची कर्मसुसंगत चिकीत्सा मांडतांना ते एके ठिकाणी म्हणतात....

'करमी वे कपडा, नदरीमोखु दुआरू।

नानक एवै जानिए , सभी आपे सचिआरू ।।


       आपण आपल्या जीवनात ज्याप्रमाणे प्रसंगानुरूप आपली वेशभूषा बदलत असतो, त्याचप्रमाणे कर्मास अनुसरून आपल्या जीवनातील वेगवेगळ्या भूमिका बदलत असतात. या बदलातील अनुकूलता आणि प्रतिकूलता प्रेमयुक्त समर्पणाने आपल्याला सुखीच करते.


गुरुनानक यांचे कार्य: 

शीख धर्मात दहा गुरू असून, गुरुनानक हे संस्थापक गुरु मानले जातात. सर्वसामान्यांमध्ये देव आणि धर्माविषयी जागृती करणाऱ्या, शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरूनानक यांनी जीवनभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. भारतातच नव्हे तर इराकमधील बगदाद, सौदी अरेबियातील मक्का मदिनासह अनेक अरब देशात भ्रमण केले. त्यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ त्यांच्या चिंतनात होते. एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या क्रांतिकारक विचारांच्या गुरुनानक यांनी 'ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे. आपला कर्ता, धर्ता आणि पिता सारे काही तोच आहे म्हणून प्रत्येकाशीआपण प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे' हा महत्त्वाचा संदेश दिला. ते केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा असून त्यांनी आपल्याला त्यांच्या मूल्यातून जीवनाचे महत्त्व शिकविले. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासावर आधारित आर्थिक व्यवस्था दिली. समाजात समानता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली.


आज गुरूनानक यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पायी अनंत दंडवत ।।

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

वार्धक्याचा सप्तसूर - विशेष लेख


वार्धक्याचा सप्तसूर - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


                वार्धक्य आल्यानंतर म्हटले जाते संध्याछाया, भिवविती हृदया. पण मी म्हणते 'संध्याछाया खुणविती हृदया' असे का ? प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तिने खाली दिलेले सप्तसूर आळवले की तुम्ही सर्वजण माझ्याशी सहमत व्हाल. हे सप्तसूर असे....


१) सावधानता:

निवृत्तीनंतर आहार, विहार आणि विश्रांती या तीन बाबीत सावधानता बाळगायला हवी. वेळेवर जेवणे, व्यायाम करणे, पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. एवढे करुनही आजारी पडलोच तर वेळेवर औषधे घेणे व पथ्ये पाळणे आवश्यक.


२) रेखीवपणा:

जेष्ठ झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे मोठमोठी कामे तुमच्या हातून होणार नाहीत. पण छोटी छोटी कामे रेखीवपणे करा. भाजी आणायला सांगितली तर एकदम ताजी टवटवीत आणा. भाजी पाहून पत्नी किंवा पती, सूनबाई एकदम खूश झाली पाहिजे. घराचे अंगण इतके स्वच्छ ठेवा. सर्वांनी म्हणावे वा ! सुंदर आहे तुमचे अंगण ! कपडे निटनेटके, साहित्य व्यवस्थित ठेवा.


३) गर्व नको:

विसरुन जा आपण फार मोठ्या पदावर होतो व फार उत्कृष्ट काम आपण केले आहे. आता आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत. सर्वांशी प्रेमाने वागा. मला इतरांनी मान द्यावा असे वाटत असेल तर दुसऱ्याला मान द्या. आणि हे लक्षात ठेवा 'मुंगी होऊन साखर खाता येते गर्व सोडून द्या. कारण 'महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती,' 


४) मनोरंजन करा:

समस्येत गुंतलेले आपले मन मनोरंजनात गुंतवा. आनंदी रहा. घरातील इतर सदस्यांचा विचार करुनच टी. व्ही. पहा. कारण तरुणांना पिक्चर व लहानांना कार्टून पहायचा असतो. आपलाच हट्ट नको. बातम्या व क्रिकेट पहाण्याचा. त्यासाठी मोबाईल किंवा रेडिओ वापरा पण आवाज मोठा न करता स्वत:ला ऐकू येईल इतकाच ठेवा. 


५) परमार्थ करा:

आयुष्यभर आपण खूप काम केलं. या वळणावर स्वार्थ थोडासा बाजूला ठेवून परमार्थ करा. ईश्वरभक्ती जमेल, रुचेल तशी करा. गरजूंना शक्य तेवढी मदत करा दानधर्म करा पण आपलं दान सत्पात्री होतंय का याकडे लक्ष द्या. आपल्या देण्यामुळे आपण कुणाला आळशी बनवत नाही ना? हेही पहायला हवे.


६) धन जोडा:

आपण आयुष्यभर कमावलेलं धन योग्य ठिकाणी गुंतवून ठेवा. फसवणूक होणार नाही ना? हे जरुर पहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या मुलाबाळांना जेवणाचं ताट अवश्य द्या. पण बसायचा पाट मात्र देवू नका. 


७) निर्मोही रहा:

जन्माला आलेल्या प्रत्येकाला एकन् एक दिवस हे जग सोडून जावं लागणार आहे. जन्माला येताना कुणी कांहीही घेवून आला नाही. जातानाही काय घेऊन जायचे नाही. तेंव्हा जे ईश्वराने दिले आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगा. मोह सोडल्यास सुख भरपूर मिळेल.


८) सामंजस्य ठेवा:

नव्या पिढीशी जुळवून घ्या. चालवू नका आपलाच हेका. कारण तुमचा हेका तुमच्यासाठी धोका ठरु शकतो. आमच्यावेळी असं नव्हतं असं वारंवार म्हणू नका. एखादे वेळी जरुर सांगा पण त्यांच्या नव्या गोष्टी आनंदाने स्वीकारा. त्यांच्या प्रगतीला साथ द्या. नवी पिढी तुम्हाला हात देईल. व तुमचा उरलेला प्रवास सुखकारक, आनंददायी ठरेल.


             ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींनो समजले ना तुम्हाला वार्धक्याचे सप्तसूर ? हे सूर आळवा. आयुष्याची संध्याकाळ सोनेरी किरणांनी शोभिवंत बनेल. होय 

कायमपणे लक्षात ठेवण्यासाठी खाली चार्ट देत आहे.

  • सा- सावधानता ठेवा.
  • रे- रेखीवपणा असू द्या
  • ग-गर्व नको
  • म- मनोरंजन करा
  • प- परमार्थ करा
  • ध- धन जोडा
  • नि- निर्मोही रहा
  • सा- सामंजस्य ठेवा












शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

गुरूंचे गुरू भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - विशेष लेख


उत्कृष्ट प्राध्यापक, मुत्सद्दी प्रशासक, आदर्श तत्त्वज्ञ, विद्वान, बुद्धिवंतांचा मुकूटमणी आणि सामान्य प्राध्यापकापासून भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारे गुरुंचे गुरू डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर, भारत सरकारतर्फे 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त हा विशेष लेख....


गुरूंचे गुरू भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

अल्प परिचय:

       आंध्रप्रदेश जिल्हा चित्तूरमधील तिरूपती बालाजी या तीर्थक्षेत्राजवळच तिरुत्ताणी गांवात ५ सप्टेंबर १८८८ साली त्यांचा जन्म एका पंडितांच्या घरी झाला. त्यांची परिस्थिती बेताची होती पण ते विद्वान होते. घरात सुसंस्काराचे, ईश्वरभक्तीचे वातावरण होते. त्यांना चार भाऊ व एक बहीण होती. लहानपणीच ते पूजापाठ, मंत्रघोष याचे अनुकरण करायचे. सदाचार व सुविचार यांचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिरूपतीतील शाळेत झाले. लहानपणीच ते वाचन, मनन, लेखन यात मग्न असायचे. तीव्र बुद्धिमत्ता, चांगली स्मरणशक्ती व संवेदनशील मन यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तरोत्तर संपन्न होत गेले. माध्यमिक शिक्षणासाठी ते लूथरन या मिशनरी शाळेत गेले. त्या शाळेतून ख्रिस्ती धर्माचा प्रसार अधिक केला जायचा. या वातावरणामुळे त्यांच्या मनात आध्यात्मिक जीवनाविषयी ओढ वाटू लागली. हिंदू धर्माविषयी, परंपरेविषयी, तत्वज्ञानाविषयी त्यांनी जे ऐकले त्यामुळे त्यांच्या श्रद्धेला हादरे बसले आणि हिंदू धर्म, परंपरा आणि तत्वज्ञान यांचा चिकित्सक अभ्यास करणे त्यांना आवश्यक वाटले. हिंदू धर्मातील कांही रुढी, परंपरा, जातीयता, भेदभाव, अंधश्रद्धा मानवतेसाठी दूर झाल्या पाहिजेत हे त्यांना पटले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पदवी परीक्षेसाठी इतिहास व गणित विषयाची गोडी असूनही त्यांनी तत्वज्ञान विषय निवडला. त्यांचा पिंडच तत्वज्ञानाचा होता. बी. ए. च्या परीक्षेत ते प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एम्. ए. ला त्यांनी प्रबंधासाठी "वेदांतातील नीतिशास्त्र" हा विषय निवडला व सखोल अभ्यास करून त्यांनी तो प्रबंध सादर केला. त्या प्रबंधास प्रथम श्रेणी मिळाली.


ज्ञानार्जनाकडून ज्ञानदानाकडे:

       १९०९ मध्ये ते मद्रास प्रेसिडेन्सी काॅलेजमध्ये प्राध्यापक झाले. तेंव्हापासून चाळीस वर्षे त्यांनी प्राध्यापक, कुलगुरु आदि पदावर कामगिरी बजावली. ज्ञानार्जनाकडून ज्ञानदानाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. ते विद्यार्थ्यांना अंधारातून उजेडाकडे नेणारे दीपस्तंभ बनले. त्यांची राहणी साधी पण नीटनेटकी असे. त्यांची वाणी मधुर होती. इंग्रजी व संस्कृत बोलण्याची त्यांची शैली आकर्षक होती. त्यांची अध्यापनाची हातोटी वेगळी होती. त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक झाले नसते तरच नवल! त्यांची ख्याती ऐकून म्हैसूर येथील नवीन विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.


अग्रणी भारतीय विचारवंत:

       आर्यांच्या सनातन धर्मापासून ते शंकराचार्यांच्या हिंदू धर्मापर्यंत त्यांनी चिंतन, मनन केले. वेद, वेदांग, उपनिषदे गीता यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. हिंदू धर्माचे सर्वसमावेशक स्वरूप बहुजन सुखाय बहुजन हिताय ही शिकवण रूजविण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यांचे सुंदर शैलीतील ग्रंथ, रसाळ व्याख्याने आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमधील प्रभावी सहभाग यामुळे एक अग्रणी भारतीय विचारवंत म्हणून जगात त्यांची कीर्ती पसरली. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर आणि लोकमान्य टिळक यांनी त्यांचा गौरव केला. त्यांच्या अथांग विद्वत्तेपुढे पाश्चिमात्य विद्वान धर्मपंडीतही नतमस्तक झाले होते. त्यांनी राधाकृष्णन यांना अर्वाचीन महर्षि ही पदवी दिली. डॉ. राधाकृष्णन यांचा 'रेन ऑफ रिलीजन इन् काॅन्टेम्पररी फिलाॅसाफी' या ग्रंथातून भारतीय वेदांताची आध्यात्मवादी तत्कालीन परिभाषेतील मांडणी जगासमोर आली. म्हैसूर मध्ये कार्यरत असताना कोलकत्ता विद्यापीठाकडून की जे ज्ञानोपासनेचे एक सर्वश्रेष्ठ केंद्र होते त्यांच्याकडून आमंत्रण आले, त्यांनी ते स्विकारले. ते घोड्याच्या बग्गीतून रेल्वे स्टेशनकडे निघाले. त्यांना निरोप देण्यासाठी व्यथित अंतःकरणाने जमलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बग्गीचे घोडे सोडले आणि बग्गी स्टेशनपर्यंत ओढत नेली. ते प्रेम, तो आदर पाहून राधाकृष्णन भारावून गेले.


ज्ञानगंगेत पोहणारा तत्वज्ञानी:

       जून १९२६ मध्ये इंग्लंडमध्ये विद्यापीठ परिषदेसाठी कोलकता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. १९२६ मध्येच अमेरिकेतील हाॅवर्ड विद्यापीठात सहावी आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषद झाली. त्या परिषदेत त्यांनी 'माया सिद्धांतः काही समस्या आणि तत्वज्ञानाचे संस्कृतीमधील कार्य' या विषयावर व्याख्यान देऊन श्रोत्यांवर विलक्षण पकड घेतली. भौतिक प्रगतीला जर आध्यात्मिकतेची जोड दिली नाही तर मानवाला खरी सुखशांती लाभणार नाही हे शाश्वत तत्व त्यांनी बिंबवले. श्रोत्यांच्या मनात भारतीय तत्त्वज्ञानाविषयी आस्था व आदर निर्माण झाला. १९२३ मध्ये त्यांचा इंडियन फिलाॅसाफी खंड पहिला व १९२७ मध्ये खंड दुसरा प्रसिद्ध झाला.


       राधाकृष्णन यांना अनेक मानसन्मान मिळाले. आंध्र विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ यांनी त्यांना 'डॉक्टरेट' ही पदवी दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्को संघटनेने त्यांना कार्यकारी सदस्य केले. कांही काळ ते युनेस्कोचे अध्यक्ष झाले. पंडीत मालवीय यांच्या निधनानंतर १९४८ साली ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती झाले. त्याच वर्षी भारत सरकारच्या युनव्हर्सिटी कमिशनचे ते अध्यक्ष झाले. १९४९ ते ५२ या कालावधीत ते भारताचे रशियात राजदूत होते. त्यावेळी रशियाचा सर्वाधिकारी असलेल्या स्टॅलिनसारख्या कडक पोलादी पुरुषावरदेखील डॉ. राधाकृष्णन यांचा प्रभाव पडला. तो म्हणाला, "चोवीस तास ज्ञानगंगेत पोहणारा तत्वज्ञानी महापुरूष या जगात जर कोणी असेल तर तो फक्त डाॅक्टर राधाकृष्णन!"


प्राध्यापक ते राष्ट्रपती:

       डॉ. राधाकृष्णन यांची सन १९५२ मध्ये भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. या पदावर असताना त्यांनी रशिया, अमेरिका, जर्मनी, पोलंड, बल्जेरिया, झेकोस्लोवाकिया, हंगेरी, आफ्रिका आदि देशाचे दौरे केले. देशादेशातील संघर्ष मिटावेत, वर्णभेद दूर व्हावेत, आर्थिक शोषण थांबवावे आणि आखिल मानव जातीचे कल्याण व्हावे या भारताच्या भूमिकेचा हिरिरीने प्रचार व प्रसार केला. १९५८ साली त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब प्रदान करण्यात आला. १२ में १९६२ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉ. राधाकृष्णन यांची निवड झाली. १९६७ साली ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले.


राधाकृष्णन यांचे महान कार्य:

       डॉ. राधाकृष्णन शांततेचे पुरस्कर्ते होते. आपल्या भाषणातून व लेखनातून त्यांनी सतत शांततेचा पुरस्कार केला. जगाला शांततेची गरज आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी जवळजवळ पस्तीस पुस्तके लिहिली. त्यात वेद, उपनिषदे, भारतीय तत्त्वज्ञान, रामायण, टागोरांचे तत्वज्ञान, महाभारत, भारत आणि चीन, गौतम बुद्ध, पूर्व आणि पश्चिम, महात्मा गांधी, हिंदू धर्म आदि पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे जीवन ऋषीतुल्य होते. निगर्वीपणा, साधेपणा हा त्यांच्या स्वभावाचा मोठा गुण होता. ते आदर्श शिक्षक होते. सर्व शिक्षकांबद्दल त्यांना आदर वाटायचा. शिक्षकाला समाजात मानाचे स्थान असले पाहिजे असे ते म्हणायचे. शिक्षकांनी सदैव आपले ज्ञान वाढविले पाहिजे, आपल्या पवित्र आचरणाने समाजापुढे, विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे, निर्भय बनून समाजाला सुयोग्य मार्गदर्शन केले पाहिजे, विद्यार्थ्यांवर संस्कार घडविले पाहिजेत, सुसंस्कारित, सुखी, समृद्ध जीवन हेच शिक्षणाचं खरं ध्येय आहे, असे शिक्षण देणाऱ्या आदर्श शिक्षकांचा समाजाने सत्कार केला पाहिजे, शिक्षकाला गुरू ही संज्ञा आहे, गुरू ला देव मानण्याची भारताची थोर परंपरा आहे असे ते म्हणत. पाश्चिमात्य राष्ट्रानी जगाला विज्ञान दिले तर डॉ. राधाकृष्णन यांनी जगाला तत्त्वज्ञान दिले. बालवयातील तेजस्वी बुद्धी पाहून त्यांचे वडील म्हणाले, "उच्च शिक्षणाकरिता तुला मी परदेशात पाठवेन" तेंव्हा त्यांनी हजरजबाबी प्रत्युत्तर दिले, "बाबा, शिकण्याकरिता नाही तर मी शिकविण्याकरिता परदेशी जाईन" हे बोल त्यांनी खरे करून दाखविले. परदेशात तत्त्वज्ञानासारख्या कठीण विषयाचे आंतरराष्ट्रीय कीर्तिचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवून भारताचे मोठेपण जगात सिद्ध केले.


       अशा या थोर ऋषीतुल्य थोर शिक्षकाची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतभर आपण पाच सप्टेंबर हा डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपण देखील डॉ. राधाकृष्णन यांचा आदर्श समोर ठेवून नेहमी विद्यार्जनासाठी निष्ठेने कष्ट करून, आपल्या गुरूजनांविषयी आदराची भावना ठेवून ज्ञान दीप हातात घेऊन अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करु या.


डॉ. राधाकृष्णन यांचे १९७५ रोजी दुःखद निधन झाले.

अशा या महान तत्वज्ञानी थोर विभूतीस कोटी कोटी प्रणाम !