सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे गुरूनानकजी - विशेष लेख
✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
फोटो साभार: गूगल
कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हिंदू धर्मियांसह शीख धर्मियांसाठीही फार महत्त्वाचा मानला जातो. परमोच्च ज्ञानाचे सार सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत देणाऱ्या गुरूनानक यांचा जन्म इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे १५ एप्रिल १४६९ मध्ये सध्या पाकिस्तानमध्ये स्थित असलेल्या पंजाबच्या तलवंडी येथे झाला. त्यांचे जन्मस्थान 'ननकाना साहिब' या नावाने ओळखले जाते. संत गुरुनानक यांच्या वडिलांचे नांव मेहता काळू तर आईचे नांव तृप्तीदेवी होते. त्यांच्या बहिणीचे नांव नानकी होते. नानक लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे होते. प्रखर बुद्धिमता असणाऱ्या नानकांनी बालपणीच सांसारिक विषयांकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली होती. ते शाळेत जात असताना, शाळा सुटल्यावर गायी-गुरांना रानात चरावयास घेऊन जात असत. तेथे जाऊन ते देवाचे भजन करत असत. लवकरच त्यांनी शाळा सोडून दिली आणि त्यानंतर त्यांनी आपला सर्व वेळ आध्यात्मिक चिंतन व सत्संगात व्यतीत केला. ते म्हणत, 'मन हे शेतकरी असून आपले शरीर हे एक सुंदर शेत आहे, तर ईश्वराचे नाम हे या शेतातील बियाणे आहेत. प्रेमानेच ही बियाणे रुजतात, फुलतात. माझ्या शेतातून मी अशा पद्धतीने पीक काढीन की, माझ्या कुटुंबाला भरपूर उत्पन्न मिळेल.' नानक यांचे वडील त्यांना बाजरात भाजी विकायला पाठवायचे. त्यावेळी हिशेब करतांना ते तेरा या संख्येला अडखळायचे. जेंव्हा ते तेरा उच्चारायचे तेंव्हा ते ईश्वराच्या स्मरणात रमून जायचे. कारण हिंदी मध्ये तेरा म्हणजे तुझा. त्यांचे मग तेथे लक्ष नसायचे तर ते ईश्वराकडे असायचे. ते नेहमी ईश्वराला उद्देशून म्हणायचे. 'मै तेरा, मै तेरा'.
प्रेम, भक्तीचे समतादूत: गुरुनानक
भक्ती, ज्ञान आणि कर्म यांच्यामध्ये समन्वय साधून प्रेम भक्तीला महत्त्व देणारे गुरूनानकजी खऱ्या अर्थाने समतेच्या वारीतील निष्ठावंत वारकरी आहेत. पंजाबातील शिखानांच नव्हे तर साऱ्या भारताला भक्ती प्रेमाद्वारे समतेचा संदेश देण्याचे काम गुरूनानकजी यांनी केले. संत कबीर यांच्याप्रमाणे अंधश्रद्धा, पाखंडीपणा, धार्मिक खेळांचा बुरखा फाडण्याचे काम गुरूनानकजीनी केला.
गुरूनानक यांचा उपदेश:
गुरूनानकजी त्यांच्या प्रवचनांमध्ये जातीवाद, भेदभाव नष्ट करणे, सत्त्याच्या मार्गावर चालणे आणि सर्वांचा आदर सन्मान करणे आदि उपदेश द्यायचे. त्यांनी स्वतःला भक्ती योगाला वाहून घेतले होते. भक्तीयोग म्हणजे ईश्वराला प्राप्त करून घेण्याचा योग होय. गुरूगोविंदसिंग कर्मयोगी होते. कर्म करणे म्हणजेच मुक्तीचा मार्ग असे ते मानत तर नानकजी भक्तीयोगी होते. बाह्य घडामोडींमध्ये अडकून ईश्वराला विसरू नका, अंतर्मुख होऊन ईश्वराचे नामस्मरण करण्याचा संदेश देऊन त्यांनी लोकांना याकरिता प्रवृत्त केले. त्यांनी पंधराव्या शतकांमध्ये लंगर परंपरेला सुरुवात केली. ते ज्या ज्या ठिकाणी गेले, तेथे जमिनीवर बसूनच भोजन केले. जातपात, उच्च नीच आणि अंधविश्वास संपविण्याच्या हेतूनेच त्यांनी ही लंगर परंपरा सुरु केली. लंगरमध्ये सर्वजण एकत्र बसून जेवण करू शकतात. त्यांनी सुरु केलेली ही परंपरा शीख धर्मातील तिसरे गुरू अमरदास यांनी पुढे चालू ठेवली व ती आत्तापर्यंत कायम आहे. देशभरातील कोणत्याही गुरूद्वारामध्ये एखादा सण साजरा करण्यासाठी लंगरचे आयोजन केले जाते. लंगरशिवाय कोणताही सण संपन्न होत नाही. लंगरमध्ये विविध जातीचे आणि धर्माचे लोक एकत्र येतात. जगाच्या कानाकोपऱ्यात जेथे शीखधर्मिय राहतात तेथे लंगरची प्रथा चालू आहे. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जगातील सर्वात मोठ्या लंगरचे आयोजन केले जाते. मंदिरात श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जात नाही.
गुरूनानक यांचे साहित्यिक तत्त्वज्ञान:
नानकांच्या मते ईश्वर कृपा झाल्यानंतर कदाचित तत्वज्ञानाचे दार्शनिक भांडार साधकासमोर प्रकट होईल, पण गुरूकृपेनेचते अनुभवाच्या पातळीपर्यंत पोहोचेल म्हणून ते नानकवाणीमध्ये एके ठिकाणी म्हणतात...
'आपे जाने आपे देई, आखहि
सि भी केइ-केइ.
जिसनो बसते सिफती सलाह
नानक पतीसाही'
भारतीय तत्व दर्शनात ईश चैतन्याचे जे एकरुपत्व आढळते ते नानकांच्या साहित्यातही भेटते. ईश्वर एक ओ, तो ओंकार स्वरूप आहे. सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाची तो मूळ उर्जा आहे. त्यांचे कुणाशी शत्रुत्व नाही आणि मित्रत्व नाही, कारण तो कालातीत आहे म्हणून शिष्यांना मूलमंत्र देतांना नानक म्हणत......
ओंकार, सतिनामु, करता पुरस्खु निरभै, निरवैस, अकालि मुरति
अरजुनि सैभं गुरू प्रसादि ।
इस्लामी शक्तीच्या राजकीय वरवंट्याखाली रगडल्या गेलेल्या, विखुरलेल्या भारतीय समाजास एकत्र करून त्याला सत्नाम, सत्धर्म, सत्जीवन यांना नवी दिशा देण्याचे, त्यात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य गुरूनानकजींनी केले. त्यांच्या वाणीत एक अद्भूत प्रेरणाशक्ती होती. आपल्या जीवनातील घटनांची कर्मसुसंगत चिकीत्सा मांडतांना ते एके ठिकाणी म्हणतात....
'करमी वे कपडा, नदरीमोखु दुआरू।
नानक एवै जानिए , सभी आपे सचिआरू ।।
आपण आपल्या जीवनात ज्याप्रमाणे प्रसंगानुरूप आपली वेशभूषा बदलत असतो, त्याचप्रमाणे कर्मास अनुसरून आपल्या जीवनातील वेगवेगळ्या भूमिका बदलत असतात. या बदलातील अनुकूलता आणि प्रतिकूलता प्रेमयुक्त समर्पणाने आपल्याला सुखीच करते.
गुरुनानक यांचे कार्य:
शीख धर्मात दहा गुरू असून, गुरुनानक हे संस्थापक गुरु मानले जातात. सर्वसामान्यांमध्ये देव आणि धर्माविषयी जागृती करणाऱ्या, शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरूनानक यांनी जीवनभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. भारतातच नव्हे तर इराकमधील बगदाद, सौदी अरेबियातील मक्का मदिनासह अनेक अरब देशात भ्रमण केले. त्यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ त्यांच्या चिंतनात होते. एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या क्रांतिकारक विचारांच्या गुरुनानक यांनी 'ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे. आपला कर्ता, धर्ता आणि पिता सारे काही तोच आहे म्हणून प्रत्येकाशीआपण प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे' हा महत्त्वाचा संदेश दिला. ते केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा असून त्यांनी आपल्याला त्यांच्या मूल्यातून जीवनाचे महत्त्व शिकविले. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासावर आधारित आर्थिक व्यवस्था दिली. समाजात समानता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली.
आज गुरूनानक यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पायी अनंत दंडवत ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा