बहुजन हिताय, बहुजन सुखाय
मानवाच्या एकूण शारीरिक हालचाली त्याच्या मानसिक व बौध्दीक आदेशावर अवलंबून असतात. कुणी असे निर्धारच केले की, आयुष्यभर मी हरामकमाईचा एक थेंबसुध्दा माझ्या वा माझ्या मुलांबाळांच्या पोटात जाऊ देणार नाही, तर कसलीही भूक अथवा लालसा त्याला हराम कमाईवर अवलंबून राहण्याकरिता परावृत्त करणार नाही. आता पाहू हराम म्हणजे का ? हराम म्हणजे सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्ता, कायदे व्यवस्था, द्रव्य, शासन, पैसा इत्यादी बाबींना परवानगी नसताना स्वतःच्या अथवा कुटूंबियांच्या वा मित्र परिवाराच्या फायद्याकरिता अथवा कल्याणाकरिता वापरणे होय. साध्यासोप्या भाषेत यालाच चोरी किंवा लाचखोरी म्हटले जाते. इस्लामी शरीअतमध्ये गुन्हाचे स्वरूप व तीव्रता आणि विस्तार बघून हात कापण्यापर्यंतचे प्रावधान आहे. कर्मचाऱ्याच्या या कृत्यामुळे जर देशाची एकता व अखंडतेवर प्रहार होत असेल तर अशा आरोपीला मृत्यूदंड सुनावण्याचे देखील आदेश आहेत. इस्लामी विधीशास्त्राच्या इतिहासामध्ये याची अनेक उदाहरणे आहेत.
चोरीचा गुन्हा एक सामाजिक अपराध असला तरी वैयक्तिकदृष्ट्या चोरी करणाऱ्या व्यक्तिच्या मानसिकतेवर त्याचा खूप वाईट परिणाम घडत असतो. चोर मानवी समाजात आयुष्यभर आपली मान उंचावून राहू शकत नाही. आयुष्यभर पैसा पैसा करून जमा केलेल्या मालावर चोराने अचानकपणे हात साफ करावा आणि त्या पैशाची अनावश्यक वस्तूवर उधळपट्टी करावी आणि समाजात एक अनैसर्गिक आर्थिक पोकळी निर्माण करावी अशा कृत्याला कुठलाही समाज क्षमा करणार नाही म्हणून ईस्लामी शरीअतने चोराचे हात कापून टाकण्याचे आदेश दिले ० आहेत ही शिक्षा इस्लामच्या उदयकाळापासून म्हणजे यहुदी आणि ख्रिस्ती काळापासून लागू होती. पैगंबर साहेबांनी काही नवे आदेश न देता प्रचलित कायद्यालाच मान्यता दिली होती. मनूस्मृतीमध्ये देखील चोराची याच शिक्षेच्या जवळपासचेच आदेश सुचविण्यात आले आहेत. चोराला किंवा लाचखोराला द्रव्य हरामात मिळाल्यामुळे त्याला पैशाची कदर नसते. आपली हौस किंवा चैनीच्या वस्तू बळकाविण्याकरिता तो बाजारात पैशांचा भडिमार करतो म्हणून महागाई वाढते, चलनाची किंमत कमी होते आणि व्यवहारात पैशांचा फुगवटा जाणवतो. नाणी आणि कागदी चलन अप्रभावित ठरतात म्हणून आपल्या गरजा भागविण्याकरिता चोर आणि लाचखोर आपल्या व्यवसायाचीही किंमत वाढवितात. सर्वात शेवटी देशाच्या आर्थिक आणि नैतिकतेवर याचा परिणाम होतो ती खालावते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मालाच्या विक्रीच्या किंमतीवर लाच देण्याची टक्केवारीही जोडली जाते म्हणून वस्तूंचे भाव वाढतात. मालाला उठाव राहत नाही. लाचखोर कर्मचाऱ्यांचा देश या नावाने देशाची नामुष्की होते. देशाच्या उन्नती आणि प्रगतीवर याचा पणिणाम होतो. देश एका भयानक संकटात पडलेला बरा की पहिल्याच चोरीच्या वेळी चोराचे हात कापलेले बरे? याचा अर्थ असा नाही की सरकारी यंत्रणेने प्रत्येकाचे हातच छाटत बसावे? आपल्याकडे हा कायदा लागू झाला तर निम्म्या देशाला एका हाताने टाळी वाजवावी लागेल. भुकेलेल्या माणसाने मुठभर चणे चोरले तर त्याचे हात कापावे अशातला भाग मुळीच नाही. खाण्यापिण्याच्या वस्तूमध्येदेखील इस्लामने खूप दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. अल्लाहशिवाय इतर कुणाच्या नावाने आहुती दिलेल्या अन्नाचे अथवा इतर पदार्थांचे सेवन करणे अथवा वापरणे निषिध्द व वर्ज्य आहे. तसेच मद्य व नशा आणणाऱ्या वस्तूंचे सेवन करणे हराम आहे. इस्लामचे दुसरे आदर्श खलिफा हजरत उमर यांनी एकदा एका वृध्द गृहस्थाला भीक मागताना पाहिले. ते ताबडतोब आपल्या स्वारीवरून उतरले आणि म्हणाले, "माझ्या खिलाफतीत कुणी भीक कसा मागत आहे?" चौकशी केल्यावर समजले की, हा एक यहुदी व्यापारी होता. वयाच्या मानाने आता त्याच्या हातून काम होत नाही. त्याच्या मागे-पुढेही कुणी नाही. हजरत उमरनी बैतुलमाल म्हणजेच इस्लामी कोषागारच्या रोखपालाला आदेश दिले की, "या वयोवृध्दाला कोषागारातून वजीफा म्हणजे पेन्शन बहाल करण्यात यावी." एका कल्याणकारी राजाच्या राज्यकर्त्याकडून एका विरोधी समाजाच्या सदस्याला दिली जाणारी जगातील ही पहिली-वहिली पेन्शन होती. विरोधी विरोधी समाज अशाकरिता की या लोकांनी पैगंबर साहेबांना खूप छळले होते. इस्लामने कल्याणकारी राज्याची संकल्पना दिली आहे. यालाच 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' म्हटले जाते. इंग्रजी भाषेत याला 'वेलफेअर स्टेट' म्हटले जाते. आधी सर्वांना सर्व गोष्टी उपलब्ध करून द्या, नंतर कठोर कायदे लागू करा. हे कायदेसुध्दा बहुजनांच्या हिताकरिता आहेत. चंगळवादी प्रवृत्तीवर आळा घालणे बहुजन सुखाकडे पडणारे पहिले पाऊल आहे. आपण या रमजानमध्ये बहुजन सुखाकडे वाटचाल करण्याचा प्रारंभ करू या.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा