सोमवार, ३ मार्च, २०२५

जे मागायचे ते अल्लाह कडे मागा

          जे मागायचे ते अल्लाह कडे मागा 
        
              ✍️डॉ. ज्युबेदा तांबोळी

                     फोटो साभार ःगूगल

       रमजानमध्ये अल्लाहकडे दुवा मागण्याची नामी संधी आहे. या पाश्वभूमीवर अल्लाहकडे भरभरून मागा हे सांगणारी ही कथा.

         एका दर्गाहच्या दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला दोन कट्टे बांधलेले होते. या दोन्ही कट्ट्यावर दोन फकीर खैरात घेण्यासाठी बसायची. डाव्या बाजूला सलीम बसायचा व उजव्या बाजूला करीम बसायचा. त्या दर्गाहमध्ये शहानवाज नावाचा एक मनुष्य दररोज यायचा. तो खूप श्रीमंत होता. शहानवाज दर्गाहमधून बाहेर येताना त्या दोघांना खैरात (दान) द्यायचा. सलीम श्रीमंत जे देईल ते घ्यायचा व अल्लाहच्या नामस्मरणात रमायचा. करीम श्रीमंताजवळ मागायचा. त्यांना म्हणायचा अल्लाहने तुम्हाला खूप काही दिलयं. आणखीन द्या माझ्यासाठी. तो सलीमला डीवचायचा तू श्रीमंताकडे का मागत नाहीस. सलीम म्हणायचा माझा अल्लाह मला जरूर देईल.

       शहानवाजांना एक दिवस त्यांचे मित्र म्हणाले, करीम तुमच्याकडे मागतो, त्याला द्या ना काहीतरी. शहानवाजनी एक डबा भरून खीर करून करीमकडे पाठवली. ती खीर फारच स्वादिष्ट होती. करीम सलीमला म्हणाला, बघ सलीम मी श्रीमंताकडे मागितले नी मला खीर मिळाली. तू मागत बस अल्लाहकडे. खीरवर ताव मारून झाल्यावर थोडीशी खीर डब्यात उरली. करीमच्या मनात आले ही थोडीशी उरलेली खीर सलीमला द्यावी, त्याने खीर सलीमला दिली.

        दुसऱ्या दिवशी श्रीमंत दर्गाहला आले. जाताना करीमला म्हणाला, "खीर खाल्ली की नाही काल". करीम म्हणाला," खूप खूप आभारी आहे मी तुमचा. खीर फार स्वादिष्ट होती. खीर खाऊन मी तृप्त झालो आहे. अल्लाह तुमचे भले करो. खीर थोडीशी उरली होती, ती मी सलीमला दिली. तो आज दर्गाला आला नाही". श्रीमंत म्हणाले, "अरे काय केलं हे, तुझ्यासाठी सोन्याचे पाच क्वाईन्स मी खिरीच्या तळाशी ठेवले होते". करीमने कपाळावर हात मारला व पश्चाताप करू लागला.

       ही गोष्ट केवळ सलीम, करीमची नसून आमची तुमची सर्वांची आहे. आपण अल्लाहकडे थेट मागू शकतो. अल्लाह दयाळू कृपाळू आहे. तुम्हाला भरभरून देण्यासाठी तो सज्ज आहे. फक्त जे. मागायचे आहे ते पूर्ण श्रद्धेने, भक्ती भावाने मागितले पाहिजे आणि मागताना अल्लाहवर पूर्ण विश्वास हवा. आपण दुसऱ्या कुणाकडे मागतो, दुसऱ्याकडून मिळण्याची अपेक्षा करतो असे न करता फक्त अल्लाहकडे मागा, निश्चित मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा