२३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा आहे त्यानिमित्त गुरुंच्या चरणी वंदन करण्यासाठी हा विशेष लेख...
गुरूंची थोरवी अर्थात गुरुमहात्म्य - विशेष लेख
✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
आज गुरूपौर्णिमा यालाच आषाढी पौर्णिमा व व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षि व्यास हे गुरूंचे गुरू होते. ते आद्यगुरू होते म्हणूनच त्यांना 'गुरूनाम गुरु' म्हटले जाते. महर्षि व्यासांनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. 'महाभारत' हा मानवजातीला आदर्श जीवनमूल्ये देणारा ग्रंथ आहे. यात संपूर्ण मानवजातीला उपकारक अशी शिकवण दिली आहे. म्हणूनच असे म्हणतात 'व्यासोच्छिष्ट जगत् सर्वम् '.
गुरू या दोन अक्षरी शब्दाचा अर्थ अज्ञान, अंधकार नष्ट करणारे असा होतो. गुरू हे ब्रम्हा, विष्णू, महेश आहेत. इतकेच नव्हे तर गुरू हे साक्षात परब्रह्म असे म्हटले आहे.
'गुरूविण देव दूजा ।पाहता नाही त्रिलोकी'
असे संतश्रेष्ठांनी म्हटले आहे.
संत कबीर गुरूंबाबत म्हणतात.
"गुरु गोविंद दोऊ खडे, किसके लागू पाय ।
बलिहारी गुरूदेवकी, जिन गोविंद मिलाय ।
याचा अर्थ असा गुरू आणि गोविंद एकाच वेळेला माझ्यासमोर उभे राहिले तर मी प्रथम गुरुंच्या पाया पडेन कारण गुरूंनीच गोविंद म्हणजेच ईश्वराचा रस्ता मला दाखविला. गुरू हे कुंभार व शिष्य हा घडा असतो. आतून हाताचा आधार देऊन वरून धपाटा मारून, त्याचे दोष काढून त्याला सुंदर आकार तो कुंभार देत असतो.
गुरू शिष्याची परंपरा प्राचीन काळापासून भारतात आहे. आध्यात्मातील दीक्षागुरू, माता पिता हे संस्कारगुरू, विद्यादान करणारे शिक्षणगुरू, कला शिकविणारे कलागुरू असे अनेक रूपातील गुरु आपले जीवन संपन्न करतात म्हणूनच गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन, गुरूवंदन केले जाते. आज अगदी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही ही परंपरा जपली जात आहे. संकटकाळी शिष्य गुरूचा धावा करतो व गुरूही शिष्याला तारून नेतो असे म्हणतात....
"ज्याच्या पाठीशी सद्गुरूनाथ, तो कैसा राहील अनाथ?"
गुरूंच्या सहवासात अज्ञ असणारे तज्ज्ञ होतात. म्हणून म्हणतात 'गुरु के साथ जीना एक मजा है और गुरू को छोड के जीना एक सजा है।'
शारदेच्या मंदिरात विद्यार्थी हे भक्त व गुरू हे पुजारी असतात. भक्त आणि देवता यांची भेट घालून द्यायचे पवित्र काम गुरुना करायचे असते. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सूर्याला माहित नसते की त्याच्या किरणामुळे फुले फुलतात तसे गुरूंना माहित नसते की त्यांच्या संस्कारामुळे विद्यार्थी घडतात. म्हणून म्हटले जाते गुरूविण कोण दाखविल वाट' 'गुरुनी दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ।'
शिक्षकांच्या बौद्धिक उंचीवरुन राष्ट्राची उंची मोजली जाते. राष्ट्र उभारणीमध्ये गुरु हा महत्त्वाचा कणा असतो. गुरूंना गुरुमाऊली म्हटले जाते कारण गुरूंना मातेचे अंतःकरण असते. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग व उपदेश गुरू आपल्या शिष्याला करतात. हा ज्ञानाचा प्रकाश देताना गुरू आपल्या शिष्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाहीत याउलट त्याला सर्व प्रकारचे ज्ञान देऊन शिष्यांच्या जिवनाचे कल्याण करतात. सत्व-रज-तम या गुणांपासून उत्पन्न झालेली दिव्यशक्ती ज्याच्याजवळ असते तीच व्यक्ती गुरूपद भूषवू शकते.
प्रत्येकाच्या जीवनात अनेक व्यक्ती येतात. त्यापैकी गुरूंचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. आपल्या मनात ज्ञानार्जनाची खरी तळमळ, श्रद्धा, विश्वास, प्रेम या गोष्टी असतील तसेच आपली निष्ठा गुरूचरणी असेल तरच गुरूंच्या रूपात एक चांगली व्यक्ती आपल्याला भेटते व अशा गुरूंचा कृपाशिर्वाद आपणास मिळतो. संतवचनाप्रमाणे परीस लोखंडाचे सोने करतो कारण त्याचा तो गुणधर्म आहे. ते लोखंड नवे आहे, जुने आहे की गंजलेले आहे हे परीस पहात नाही. पण त्यासाठी गुरूबद्दल आदर व निष्ठा हवी.
प्राचीन काळी मलयगिरीच्या चंदनवनापासून ते काश्मिरच्या नंदनवनापर्यंत अनेक गुरुंचे आश्रम होते. एका ऋषीच्या आश्रमात 'अरूणी' नावाचा एक शिष्य रहात होता. एकदा ऋषींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. आश्रमापासून कांही अंतरावर एक बांध फुटला होता व त्याचे पाणी आश्रमाच्या दिशेने येत होते. तेंव्हा तो बांध दुरूस्त करण्याचे व पाणी अडवण्याचे किम गुरूंनी अरूणीला सांगितले. अरूणी त्याठिकाणी गेला. त्याने पाण्याचा प्रवाह अडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्याला ते जमले नाही. शेवटी स्वतःच तो आडवा झोपला व त्याने तो प्रवाह थांबविला. रात्र झाली तरी अरूणी आला नाही. तेंव्हा ऋषी त्याला शोधत त्याठिकाणी गेले. "अरूणी तू कोठे आहेस?" असे म्हणत गुरु त्या बांधाजवळ आले. अरूणीचा आवाज क्षीण झाला होता. पाण्याने व थंडीने तो गारठला होता. गुरूनी त्याला उठविले. त्याला पाहून ते ऋषी धन्य झाले. ते म्हणाले, "शिष्य असावा तर अरूणीसारखा! गुरूंची आज्ञा पाळताना स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करणारा! धन्य तो शिष्य आणि धन्य त्याचे गुरु!
जन्मल्यावर पहिल्यांदा 'आई माझा गुरु' असते कारण ती खायला, प्यायला, बोलायला, चालायला शिकविते. त्यासाठी मातृदेवो भव म्हटले जाते, पितृदेवो भव असेही म्हटले जाते. कारण वडिलांच्या खांद्यावर बसून आपण हे जग पहातो. आपल्याला अक्षर ओळख करुन देणारे, आपल्याला ज्ञानामृत पाजणारे आपले शाळेतील गुरू असतात. तद्वत मला वाटते निसर्ग हा आपला सर्वात मोठा गुरू आहे, जो सातत्यपूर्ण कर्तव्यकर्माची व निरपेक्ष ज्ञानाची शिकवण आपल्या प्रत्यक्ष कृतीतून अखंडपणे देत असतो. अशा भिन्न भिन्न गुरूकडून आपण खूप कांही मिळवतो. खरंच जीवनात गुरूकडून कांहीतरी मिळवायचे असेल तर आपली समर्पणाची तयारी हवी. कारण घेण्यापेक्षा देण्यातून मिळणारा आनंद अनमोल असतो. शेवटी गुरूंची महती सांगताना मी एवढेच म्हणेन.....
रात्रीनंतर उगवते,
ती पहाट असते ।
कलेकलेने वाढतो,
तो चंद्र असतो ।
क्षीतिजापाशी झुकते ,
ते आकाश असते ।
इतरांना श्रेष्ठ बनवतो,
तो गुरू असतो ।
खूप छान आणि माहितीपूर्ण लेख.
उत्तर द्याहटवा