६ मे हा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस, त्यानिमित्त त्यांच्या आभाळाएवढ्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारा हा खास लेख.....
राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य - विशेष मराठी लेख
✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
राजर्षि तू राजा प्रेमळ , निधडा दिलदार ।
मराठगडी तू नेता आमुचा प्रणाम शतवार ।
मान आमुचा शान आमुची, तू दैवत आमचे ।
तुझ्या प्रतापे मोला चढले, हे जीवन आमचे ।
पायी गती, हाती शक्ती व ह्रदयी मानवाची उन्नती हा ध्येयवाद स्विकारून भारताच्या इतिहासात अजरामर झालेल्या राजर्षि शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्रांतीचे बीजारोपण केले. समाजात पडलेली दरी, पराकोटीची हीन अवस्था दूर करण्यासाठी शिक्षणाशिवाय तरूणोपाय नाही हे त्यांनी ओळखले. महात्मा फुले यांचा वारसा त्यांनी मोठ्या ताकतीने पुढे चालविला. देशाची सर्वांगिण उन्नती करावयाची असेल तर सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे ही महाराजांची भूमिका होती. १९१७ साली महाराजांनी प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. यासाठी एक लाख रुपये खर्च करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्यापैकी ऐंशी हजार रूपये दरबार खजिन्यातून व वीस हजार रुपये देवस्थान फंडातून खर्च करण्यात आले. देवस्थानचा पैसा प्राथमिक शिक्षणाकडे वळविणारे शाहू महाराज हे देशातील क्रांतिकारक राजपुरूष होते. पंढरपूर येथील अन्नछत्रासाठी कोल्हापूरच्या दरबारातून दरमहा एकशे बारा रूपये आठ आणे जात असत. महाराजांनी ते अन्नछत्राऐवजी 'मराठा विद्याप्रसारक समाज' या संस्थेला देण्याचा निर्णय ऑक्टोबर १९२० च्या आदेशान्वये घेतला. अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे, अशी शाहू राजांची धारणा होती. ज्ञानसंपन्न माणूस अन्नासाठी वणवण भटकणार नाही, हे महाराजांचे मत होते.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्यानंतर जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाहीत त्यांना दर महिना प्रत्येकी एक रुपया दंड करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. यातून महाराजांना शिक्षणाच्या प्रसाराची किती तळमळ होती हे लक्षात येते. ज्यावेळी ते आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षणावर एक लाख रुपये खर्च करीत, त्यावेळी इंग्रज सरकारचा सिंध, गुजरात, मुंबई, कर्नाटक या सर्व प्रांताच्या शिक्षणावरील खर्च एक लाख रूपये होता. महाराजांनी अभ्यासक्रम तयार करण्यापासून ते शिक्षकांना प्रशिक्षण देणे, शाळा तपासणे याचीसुद्धा व्यवस्था केली. गावपाटलांना नियमितपणे शाळा तपासून तसा अहवाल पाठविण्याची योजना त्यांनी केली. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. त्यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत.
राजर्षिंनी सर्व जातीधर्माच्या वसतिगृहांची एकत्र उभारणी करून राष्ट्रीय एकतेचा, समतेचा मंत्र खऱ्या अर्थाने जनतेला दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचण येवू नये म्हणून त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले. १८९६ मध्ये कोल्हापुरात एका वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. पण ब्राह्मण नि अब्राम्हण विद्यार्थी तिथे एकत्र रहाणे मोठे कठीण जाऊ लागले. त्यामुळे आणखी एक प्रबळ कल्पना त्यांना सुचली. तो त्यांनी माता भवानीचा आदेशच मानला.
वसतिगृह स्थापना हा एक नवीनच उपक्रम होता. मुंबई इलाख्यातच नाही तर संपूर्ण भारतातही विद्यार्थ्यांसाठी विविध जातीधर्माची वसतिगृहे नव्हती. आपले सल्लागार न्यायमूर्ती रानडे, गो. कृष्ण गोखले, गंगाराम म्हस्के यांच्याशी त्यांनी विचारविनिमय केला आणि १८ एप्रिल १९०१ रोजी मराठा वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. महाराजांनी त्या काळचे चार हजार रुपये देणगी म्हणून दिले.
जातीपातींचे निर्मूलन हे त्या काळी अवघड होते. शिक्षणाचा प्रसार तर झालाच पाहिजे म्हणून अन्य जमातीसाठी वसतिगृहे उभारण्याचे ठरले. नाव जरी मराठा वसतिगृह असले तरीही अन्य जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. १९०१ मध्ये दिगंबर जैन वसतिगृह स्थापन करण्यात आले. महाराजांनी त्याला देणग्या दिल्या पण कांही मराठ्यांनी विरोध केला. तेंव्हा महाराजांनी त्यांना खडसावले, "मी केवळ मराठ्यांचा राजा नाही. मी साऱ्यांचा राजा आहे". १९०८-१९०९ मध्ये जैन वसतिगृहाने खास मुलींसाठी एक वसतिगृह उघडले व त्याला नांव दिले श्राविकाश्रम. त्यावेळी त्यात सोळा विद्यार्थिनी होत्या.
आणखी एक विशेष म्हणजे त्यांनी चित्रकलेच्या खास अभ्यासासाठी दोन जैन विद्यार्थ्यांना इटलीला पाठविले. मुस्लिम समाज अक्षरशत्रू, आर्थिकदृष्टया मागासलेला व प्रतिगामी होता. तेंव्हा महाराजांनी १५ नोव्हेंबर १९०६ रोजी 'किंग एडवर्ड महामेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना करून तिच्या वतीने वसतिगृह सुरु केले. १९०७ मध्ये लिंगायत वसतिगृह सुरू केले. महाराजांनी सगळ्याच वसतिगृहांना उदार देणग्या दिल्या.
महाराजांनी हाती घेतलेला एक क्रांतिकारक प्रकल्प:
खऱ्याखुऱ्या पददलित, विद्येच्या वाऱ्यालाही वंचित व उपेक्षित अशा अस्पृश्य मानलेल्या जातीत विद्याप्रसार करणारी एक संस्था स्थापन करून १४ एप्रिल १९०८ रोजी अस्पृश्यासाठीचे वसतिगृह स्थापन केले. वंचितामध्ये शिक्षण घेण्याची लाट उसळली. त्यानंतर सोनार समाज, शिंपी समाज, पांचाळ, सारस्वत, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, वैश्य समाज यांचीही वसतिगृहे चालू झाली. ख्रिस्ती समाजासाठी वसतिगृह स्थापन झाले. म्हणूनच राजर्षिंच्या करवीर नगरीला वसतिगृहांची जननी, वसतिगृहांची सुवर्णभूमी म्हणतात.
राजर्षि शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतांना एका कवीने म्हटले आहे.
दिव्यत्वाची जेथे प्रचिती,
तेथे कर माझे जुळती।
अश्रूंचा हा बांध फुटूनी,
ह्रदय येते आज भरूनी।
जाणार इतक्या लवकर, नव्हते जाणिले कुणी ।
साश्रू नयनांनी असे वाटते, तुम्ही यावे परतुनी।
निजदेहाचे झिजवून चंदन ।
तुम्ही वेचिलाइथे कण कण ।
आणि फुलविले हसरे नंदन ।
स्मृतीस तुमच्या शतशः वंदन ।
खूपच सुंदर लेख👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लेख
उत्तर द्याहटवा