भिन्न जाती, जिव्हाळ्याची नाती - मराठी कथा
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
फोटो साभार: गूगल
एप्रिल महिना सुरू होता. उन्हाचा तडाखा प्रकर्षाने जाणवत होता. अंगाची लाही लाही होत होती. अशावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कांही कामासाठी जावे लागले. ते काम अपेक्षेपेक्षा लवकर झाले आणि आम्ही दोघांनी कुलकर्णी काकांना भेटण्यासाठी दिंडेनगरला जायचे ठरविले. दिंडेनगर तिथून तसे खूप लांब होते. त्यात ऊन मी म्हणत होते. शिवाय त्यांचे नवीन घर नेमके कुठे आहे हे पण आठवत नव्हते. कारण दोन वर्षांपूर्वी वास्तुशांतीच्या निमित्ताने त्यांच्याच गाडीतून जाऊन बघितले होते. बस स्टॉपपासून घर सापडणे कठीण होते, त्यामुळे रिक्षाने जाण्याचा निर्णय झाला. अर्धा तास थांबून लगेच परत येता येईल असा विचार करून एका रिक्षावाल्याला पत्ता सांगून भाडे विचारले. तो म्हणाला, "तीनशे रूपये लागतील. रिक्षाभाडे २५० रुपये व वेटिंग चार्ज ५० रू आणि हो अर्ध्या तासाच्या वर एक मिनिटही जास्त थांबणार नाही". दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारले तर तो ३५० रूपये म्हणाला, म्हणून पहिल्या रिक्षावाल्याला २५० रू. घे आणि चल म्हणालो. पण तो तयार झाला नाही. शेवटी असू दे बाबा म्हणून रिक्षात बसलो.
रिक्षा कांही अंतर पार करत असतानाच आकाशात ढगांनी गर्दी केली. ढगांच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. पाऊस येणार की काय म्हणत असतानाच पाऊस जोरात पडू लागला. गारा रिक्षावर जोराने आदळू लागल्या. वळवाचा पाऊस असाच असतो. रिक्षा कशीबशी दिंडेनगर बोर्डजवळ उभी राहिली. तो म्हणाला, "सांगा आता कुणीकडे जायचं?" आम्हाला कांहीच समजेना. म्हणून काकांना फोन केला. त्यांनी रिक्षावाल्याला नेमका पत्ता सांगितला पण धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे रिक्षा चालवणेही कठीण झाले. थोडा वेळ थांबलो इतक्यात काकांचा फोन आला, अजून कसे नाही आलात? कांही वेळाने रिक्षा कशीबशी काकांच्या गेटजवळ थांबली. पहातो तर काय काकी छत्री धरून हातात दोन तीन छत्र्या घेऊन उभ्या होत्या. ड्रायव्हरसह आम्हा दोघांसाठी छत्र्या दिल्या हेतू हा की गेटपासून घरात येईपर्यंत आम्ही भिजायला नको. बाथरूममधून बाहेर काकी टॉवेल घेऊन उभ्या होत्या. पाच मिनिटाच्या आतच फक्कड असा गरमागरम चहा दिला. घरातील सर्वासर्वांची आस्थेने चौकशी केली. त्यांच्या मते चौकशीत कमालीची माया, आपुलकी होती. थोड्याच वेळात मस्त पैकी ओलं खोबरं व कोथिंबीरीने सजलेली पोह्यंची प्लेट आमच्यासमोर हजर झाली.
अर्धा तास झाल्याबरोबर रिक्षावाल्याला आम्ही म्हणालो, "चला, अर्धा तास संपला". तो म्हणाला, "थांबा अजून थोडा वेळ. पाऊस कमी झाल्यावर निघू या". पुन्हा गप्पा रंगल्या. काकीनी मुलांना खाऊचे पॅकिंग दिले. माझी खणानारळाने ओटी भरली. ड्रायव्हरला व यांना नॅपकिन, पानसुपारी दिली. पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहून आम्हीच उठलो. काका काकीना निरोप देऊन रिक्षात बसलो. रिक्षावाल्याला यांनी शंभराच्या तीन नोटा दिल्या. त्याने त्यातली शंभराची नोट परत दिली. प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर तो म्हणाला, "तुमच्या दोन कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी बघून मी थक्कच झालो. तुमचा धर्म वेगळा त्यांचा वेगळा पण मनाने तुम्ही एकमेकांच्या किती जवळ आहात हे मी जवळून बघितल. खूष झालोय मी, नाहीतर हल्ली कुठं बघायला मिळतं असं चित्र?"
ड्रायव्हरप्रमाणेच सर्वांना थक्क करून सोडणारं आमच्या दोन कुटुंबातील हे नातं जातीधर्माच्या पलीकडचे आहे. कुलकर्णी काका मिल्ट्रीमन पंधरा वर्षाच्या सेवेनंतर कलेक्टर ऑफिसमध्ये क्लार्क आणि आमचे हे रजिस्टार ऑफिसमध्ये क्लार्क. दोघांची अगदी घट्ट मैत्री होती. काकांची गावाकडे शेती, घर होते. नोकरी संपल्यानंतर गावाकडे किंवा कोल्हापूरात त्यांना स्थायिक व्हायचं होतं. तिथून गावाकडच्या शेतीकडे लक्ष देता येईल, म्हणून ते जयसिंगपूरात भाड्याच्या घरी रहात होते. त्याचवेळी आम्ही बँकेचे कर्ज घेऊन सहा खोल्यांचे घर बांधले व तीन खोल्या भाड्याने द्यायचे ठरविले. अशाप्रकारे काकांची फॅमिली आमच्या घरात रहायला आली. मैत्री होतीच त्यात इतक्या जवळ रहायला आले त्यामुळे दुधात साखर पडली. दोघेजण ऑफिसला एका गाडीवरून जाऊ लागले. एकत्र खरेदी होऊ लागली. माझ्या सासूबाई व काकी एकत्र गप्पा मारत भाजी निवडू लागल्या. काकांच्या मुलीने स्मिताने आमच्या लेकीना अरमान व यास्मिन ला इतका लळा लावला की स्मिता परगांवी गेली की या दोघींना तिचा जोसरा काढून ताप येऊ लागला. काकांचा मुलगा स्वप्निल, पुतणे सचिन व सुयोग आमच्या मुलापेक्षा मोहसीनपेक्षा थोडे मोठे असल्याने आमच्या मुलांना सायकलवरून शाळेत नेऊ आणू लागले. काकांना पाच बहिणी आहेत. त्या इकडे आल्या की आम्हाला भेटू लागल्या. त्यांच्याशीही आमची घट्ट मैत्री झाली. आमची दोन कुटुंबे एकरूप होऊन गेली.
स्वातीकाकी पत्रद्वारा दासबोध अभ्यास करत होत्या. मी त्यांच्याकडे चौकशी केली व मलाही अभ्यास करता येईल का असे विचारले. काकी म्हणाल्या, "का नाही?, उलट तुमचं विशेष कौतुक होईल." त्यांच्यामुळे मी तीन वर्षाचा पत्रद्वारा दासबोध अभ्यास पूर्ण केला. भारतीय संस्कृती दर्शनाच्या काकींसमवेत परीक्षा दिल्या. काका आम्हा दोघींना चेष्टेने म्हणायचे, "तुम्ही दासबोध अभ्यास करून आम्हा दोघांना सज्जनगडावर पाठवू नका म्हणजे झाले."
२००६ साली अयोध्येत बाबरी मशीद प्रकरण सुरु होते. नेमक्या त्याच वेळी बेंगलोरच्या आत्या व त्यांच्या मुली काकांकडे आल्या होत्या आणि दोन्ही कुटूंबाचे आमच्या अंगणात चांदणी भोजन सुरु होते. रस्त्याने जाणारे लोक म्हणत होते, "थोडा आदर्श घ्यावा या दोन्ही कुटुंबाचा आणि संपवून टाकावा तो वाद."
रमजानमध्ये काका सत्ताविसावा रोजा करायचे. दिल्लीच्या जामा मशिदीत नमाज पडून आल्याचे अभिमानाने सांगायचे. काकी मोहरममध्ये पीराला नैवद्य व वस्त्र अर्पण करायच्या. काकांच्या तुळशीच्या लग्नाला आम्ही सहकुटुंब सहपरिवार आहेर घेऊन हजर असायचो. मंगळागौर, ऋषीपंचमी, चैत्रागौर या सर्व कार्यक्रमांना आमची हजेरी ठरलेली असायची. दोन्ही कुटुंबातील पै पाहुण्यांच्या घरातील मुंजीपासून लग्नापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना आम्ही आवर्जून हजर रहायचो. अशा प्रकारे आमचं अनुभवविश्व समृद्ध व संपन्न झालं.
असे हे आमचे कुलकर्णी काका एकदा खूप आजारी पडले. ते आजारी असल्याचा फोन येताच आम्ही दोघे ताबडतोब दवाखान्यात हजर झालो. काकांंची तब्येत खूपच गंभीर होती. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते पण प्रतिसाद नव्हता. त्यांच्या किडनीचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. नातेवाईकांना बोलवून घ्या असं सांगितल्यानं त्यांच्या बहिणी, भाऊ, मेहुणे, भाचे, पुतणे सगळे सगळे हजर होते. जेवणाचे डबे असूनही दोन वाजून गेले तरी कुणी अन्नाचा कणही घेतला नव्हता. त्यांची अवस्था बघून दोघीतिघी नातेवाईक स्त्रिया पुढच्या म्हणजेच अंतिम तयारीसाठी घरी गेल्या. काकी पूर्ण खचून गेल्या होत्या. आम्हाला पाहिल्यावर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्या गळ्यात पडून खूप रडल्या. त्यांना रडतांना बघून सर्वांनाच गलबलून येत होते. पेशंट बघायला आत कुणालाही जायला परवानगी नव्हती. त्यांचा डॉक्टर भाचा निरंजन फक्त त्यांच्याजवळ होता. आम्ही डॉक्टरांना खूप विनवलं व दोनच मिनिटासाठी आत जावून काकांना बघून आलो. विमनस्क मनःस्थितीत सगळेजण देवाचा धावा करत होते. असाच अर्धा तास निघून गेला. आणि काय आश्चर्य निरंजन हसतच बाहेर आला आणि म्हणाला, "मामा प्रतिसाद देताहेत. त्यांनी डोळे उघडले आहेत. ते पूर्ण शुद्धी वर आलेत. डॉक्टरांच्या संपलेल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत."
सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची बरसात झाली. आम्ही तिथे थांबलो व सर्वांना जेवण करण्यासाठी बाहेर पाठवलं. कदाचित आम्ही तिथे जाणं आणि काका बरं होणं हा निव्वळ योग असावा. डॉक्टरांच्या प्रयत्नाचं फळ असावं किंवा बोला फुलाला गाठ पडली असावी, ईश्वर अल्लाहची कृपा असावी. पण काकी म्हणाल्या, "मोहरम सुरू आहे. पीरबाबांसाठी आमच्यातर्फे वस्त्र घेऊन जा".
असा हा जिव्हाळा अंतःकरणात रूजलेला मनात साठवून ठेवलेला.
कथा फार आवडली..
उत्तर द्याहटवाआमचं बालपण गेलं त्यांच्या सोबत..
आपुलकी, जिव्हाळा, प्रेम.... 😊😊😊👍👍👌
उत्तर द्याहटवा