शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञानलालसा


६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्त हा विशेष लेख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञानलालसा

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       हजारो वर्षांपासून ज्यांचे न्याय हक्क दडपले जात होते, इतकेच काय पण त्यांना कुत्र्यामांजराएवढीही किंमत नव्हती, विद्याअध्ययनाचा हक्क नाकारल्याने जो समाज हजारो वर्षांपासून दारिद्र्याच्या विळख्यात सापडला होता, अशा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजात डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य उगवला.

       अस्पृश्य समाजाला वेदाभ्यास, विद्यार्जनापासून वंचित केल्याने काय खरे, काय खोटे, काय हितकारक, काय अहितकारक यातील भेद ओळखण्याची क्षमताच संपुष्टात आली होती. काही लोकांनी हजारो वर्षांपासून हिंदू धर्मग्रंथातील शास्त्रांचा आधार घेऊन अस्पृश्यांंना अज्ञानाच्या खाईत लोटले होते. पण दुसऱ्या बाजूला ते ग्रंथ अस्पृश्यांना वाचताच येऊ नये, याचीही खबरदारी त्यांनी नेहमी घेतली होती. अस्पृश्यांच्या अवनतीला दुसरे कांही नसून फक्त अज्ञानच जबाबदार आहे, त्यामुळेच त्यांच्या वाट्याला नरकतुल्य जीवन आले, हे बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते. त्यासाठीच त्यांंनी आयुष्यभर शिक्षणाचा ध्यास घेतला. शिक्षण घेताना त्यांनी डोंगराएवढे कष्ट  उपसले.

       जेथे बसून मार्क्स, लेनिन, मँझिनी या लोकोत्तर पुरुषांनी संशोधनाचे कार्य केले, त्या लंडन म्युझियममध्ये बसून बाबासाहेब आंबेडकर अर्धपोटी राहून विद्याभ्यास करत असत. पैसे नसल्याने ते ग्रंथ मिळविण्यासाठी मैलोनमैल पायपीट करत. सर्वात आधी वाचनालयात प्रवेश केलेले आंबेडकर सर्वात शेवटी जेंव्हा बाहेर पडत तेंव्हा श्रमाने त्यांचे शरीर थकलेले असे, पण लिखाणाने टिपणवह्या भरलेल्या असत. रात्री दहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत अभ्यास करण्याची त्यांना सवय होती. त्यांच्या खोलीत अस्नाडेकर नावाचे एक गृहस्थ राहात असत. ते कधी कधी रात्री जागे होत, तेंव्हा आंबेडकर अभ्यासात गढलेले असत. अशाच एका रात्री ते जागे झाले असता ते आंबेडकरांना म्हणाले, "अहो बाबासाहेब रात्र फार झाली. किती जागता दररोज? आता विश्रांती घ्या, झोपा." बाबासाहेब आंबेडकरांनी वळून म्हटले, "अन्नाला पैसा व झोपायला वेळ मजपाशी नाही. मला माझा अभ्यासक्रम शक्यतेवढा लवकर पूर्ण करायचा आहे, मग काय करणार." आंबेडकरांचा ज्ञान लालसेचा आग्रह किती जबरदस्त होता, याची आपल्याला कल्पना येते.

डॉ. आंबेडकर यांच्या जीवनात वेळेचे महत्त्व:
       माणसाच्या जीवनात वेळेला किती महत्त्व असते, याचा उत्तम पायंडा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिला आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जेंव्हा संधीची लाट येते, तेंव्हा त्या संधीचा योग्य प्रकारे उपयोग त्याने केला, तर त्या मनुष्याला वैभव प्राप्त होते. या शेक्सपिअरच्या वचनाचा त्यांनी आपल्या जीवनात काटेकोरपणे उपयोग केला. त्यांच्याकडे सावधानता आणि संधीचा सदुपयोग करून घेण्याची वृत्ती होती.

       डॉ. आंबेडकर यांनी विचार कृतीत आणण्यासाठी, आपल्या अंगभूत गुणांचा आणि वृत्तीचा आपण उत्कर्ष केला पाहिजे, त्यासाठी अविश्रांत उद्योग करणे क्रमप्राप्त आहे, हे त्यांनी जाणले होते. म्हणून आपली सर्व शक्ती एकवटून अध्ययन करण्याचा निश्चय केला. मुख्य म्हणजे सुखविलासात रमणे हा त्यांचा स्थायीभाव नव्हता आणि तसे करूनही चालणार नव्हते. सामान्यतः प्रत्येक विश्वविद्यालयीन तरुण विद्यार्थ्याचा अशा सुखचैनीत, ऐदी जीवनात रमण्याचा कल अधिक असतो परंतु ध्येयनिष्ठ आंबेडकरांचे मन तशा जीवनास अनुकूल नव्हते. शिवाय पैसा तर जवळ नव्हताच. चित्रपट पाहावयास जाणे, नयनमनोहर सौंदर्यस्थळे पाहणे, उद्यानात बागडणे, यासारखे विचार त्यांच्या मनालासुदध्दा शिवले नाहीत. त्यांना सपाटून भूक लागे परंतु ती एक कप कॉफी, दोन केक यावरच शमवावी लागे. त्या जेवणाचा खर्च एक डॉलर दहा सेंटस् येई. शिष्यवृत्तीच्या पैशातून पत्नीला घरखर्चासाठी काही रक्कम पाठवावी लागे. यास्तव खर्च हात आखडून करावा लागे. ही परिस्थिती ज्या सहाध्यायीनी पाहिली, त्यांनी पुढे मोठ्या अभिमानाने सांगितले की आय मिळालेल्या संधीचा भरपूर लाभ घेण्यासाठी आंबेडकरांनी प्रत्येक क्षण सोन्याचा कण मानून अभ्यासासाठी व्यतीत केला. धनाचा प्रत्येक कण योग्य ठिकाणी लावला.

       आंबेडकरांचे ध्येय अमेरिकेतील मोठ्यात मोठी विश्वविद्यालयीन पदवी मिळविणे हेच केवळ नव्हते तर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र आणि मानववंशशास्त्र इत्यादि विषयात पारंगत होण्याची प्रबळ महत्वाकांक्षा त्यांनी बाळगली होती.

       आंबेडकरांच्या मनावर तेथील एका प्राध्यापकाच्या व्यक्तत्वाची चांगलीच पकड बसली होती. त्यांचे नांव एडविन आर्. सेलिग्मन. त्या काळी अमेरिकेत असलेल्या लाला लजपतरायांचे ते स्नेही होते. लाला लजपतरायांची सेलिग्मनशी ओळख ब्रिटनमधील समाजवादी विचारवंत सिडने वेब यांच्या मुळे झाली होती. बदक जसे पाण्यापासून दूर राहात नाही, तसे आंबेडकर सेलिग्मनपासून दूर राहात नसत. ते त्यांच्या अनुमतीने प्रत्येक वर्गात ज्ञानकण वेचण्यासाठी धावत असत. संशोधनाची कोणती पद्धत आपण अनुसरावी, असे आंबेडकरांनी त्यांना एकदा विचारले. त्यावर सेलिग्मन यांनी त्यांना हितोपदेश केला की, तुम्ही आपले काम कळकळीने करत जा म्हणजे त्यातून तुमची स्वतःची पद्धत आपोआप निर्माण होईल. याचा जबरदस्त परिणाम आंबेडकरांच्या अंतर्मनावर झाला. तेंव्हापासून ते दररोज अठरा अठरा तास याप्रमाणे अनेक महिने अभ्यास करत होते. यावरून त्यांच्या ध्येयाचा ज्ञानकुंड कसा धगधगत होता याची प्रचिती येते. त्यांची प्रचंड मेहनत साऱ्या गरिबीवर नांगर फिरवणारी गोष्ट ठरली.

       भारतातील अस्पृश्यांसाठी आंबेडकरांनी काय केले, ते सांगण्याची गरज नसावी. बाबासाहेब आपल्या कोट्यावधी देशबांधवांच्या आयुष्यात नव्या युगाची सुरुवात करू शकले, कारण  अज्ञानाचा अंधकार नाहीसा करण्यासाठी त्यांच्या सारख्या तेजस्वी सूर्याची गरज होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी प्रणाम।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा