जगू या प्रत्येक क्षण आनंदाने!
हिरेमठ सर तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते नुसतेच नावाला तत्वज्ञानाचे प्राध्यापक नव्हते तर खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाचा जीवनात अंगिकार करत होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीनुसार त्यांची जीवनशैली होती. त्यामुळे हिरेमठ सर आदर्श व विद्यार्थीप्रिय होते. त्यांची पत्नी मधुरा, नावाप्रमाणेच मधुर होती. ती जेमतेम जुनी मॅट्रिक शिकलेली होती पण सरांच्या सहवासात राहून, त्यांचं जीवनाबद्दलचं तत्त्वज्ञान ऐकून ती जणू तत्त्वज्ञानाचं विद्यापीठच बनली होती. संसार काटकसरीने, निगुतीने कसा करावा हे तिच्यापासून शिकण्यासारखं होतं. सरांच्या पगारातील पैसा न् पैसा ती सत्कारणी लावायची. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन संसार सुखासमाधानाचा करण्यात ती यशस्वी झाली होती. दोन्ही मुलांना सुसंस्कारित बनविले होते. सद्या ते दोघेही उच्चशिक्षण घेऊन फॉरेनमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत.
कोरोना लॉकडाऊनच्या या बिकट काळात मधुरा कांहीशी नाराज दिसत होती. दोन्ही मुलांच्या काळजीने त्यांचा जीव तीळ तीळ तुटत होता. आजूबाजूला कोरोना बाधितांची सतत वाढत चाललेली संख्या पाहून मनातल्या मनात त्या हबकून गेल्या होत्या. जवळच्या नातेवाईकांंच्या, परिचीत व्यक्तींच्या मृत्यूची बातमी मधुराला घायाळ करत होती. तिला वाटायचे इथे आपण दोघेच आहोत. आपलं कांही बरंवाईट झालं तर आपली मुलं येतील का? आपल्या मुलांना त्या देशात कोरोनाची बाधा होईल का? अशा असंख्य विचारांनी ती गारठून गेली होती. सरांनी तिची मनःस्थिती ओळखली होती आणि त्यांच्या परीने ते तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते.
लॉकडाऊन संपले, दुकाने उघडली आणि मधुराने सरांकडे बेडशीट आणण्यासाठी तगादा लावला. सर विचार करत होते, एरव्ही कांही आणू या म्हटले की राहू दे आता नंतर आणू या, म्हणणारी मधुरा बेडशीट आणण्याची एवढी घाई का करत असेल? बेडशीट मध्यभागी फाटले होते हे मान्य परंतु यावेळी ती अतिघाई करतेय असे सरांंना वाटत होते.
सरांनी बेडशीट आणून दिले. बेडशीट बेडवर विराजमान झाल्याचे त्यांनी पाहिले. कांही दिवसानंतर एका निवांत क्षणी त्यांनी मधुराला विचारले, "मधुरा, नवे बेडशीट बेडवर अंथरल्याचे मी पाहिले. पण त्या जुन्या बेडशीटचं काय केलंस?"
मधुरा म्हणाली, "अहो त्या बेडशीटचा मध्यभागी जीर्ण झालेला भाग काढून टाकला. बेडशीटचे गादीखाली फोल्ड केलेले दोन्ही भाग एकदम छान होते. ते दोन्ही भाग एकमेकांना जोडून दिवाणवरील छोट्या गादीवर अंथरण्यासाठी त्याचे छानसे बेडशीट तयार केले."
सर म्हणाले, "मग त्या दिवाणवरील जुन्या बेडशीटचं काय केलंस?"
मधुरा म्हणाली, "अहो त्या बेडशीटचा चांगलासा भाग काढून त्याचे दोन पिलोकव्हर शिवले."
सर म्हणाले, "अरे वा! पण त्या जुन्या पिलोकव्हरचं काय केलंस?"
मधुरा म्हणाली, "अहो त्या पिलोकव्हरचा चांगला भाग काढून घेतला. त्या कापडाचा तुकडा मी भांडी, डबे पुसायला घेतला."
सर म्हणाले, "फारच छान केलंस. पण त्या जुन्या कपड्याचं काय केलंस?"
मधुरा म्हणाली, "अहो त्या जुन्या कापडाचे धागे काढून आपल्या काथ्याच्या पायपुसणीतील छिद्रात बसवले. त्यामुळे ती पायपुसणी मऊसूत झाली."
सर म्हणाले, "हे बघ मधुरा, मी तुला एक बेडशीट आणून दिलं आणि तू त्याचा किती हुशारीने, कौशल्याने वापर केलास. कसलाही एक कण वाया न घालवता त्याला नवं नवं सुंदर रूप दिलंस, असंच आहे आपल्या आयुष्याचं! परमेश्वराने आपल्याला एक सुंदर जीवन दिलंय. त्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगायला हवा. या आयुष्यातील सुंदर क्षणांचा उपभोग घ्यायला हवा. आपल्या आयुष्यातील बरेच क्षण आपण काळजी करण्यात घालवत आहोत. कित्येक दिवस आपण कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत आहोत. ही भितीची छाया, काळजी सर्व बाजूला ठेवून प्राप्त परिस्थितीत आलेला प्रत्येक क्षण आनंदाने घालविण्याचा प्रयत्न करू या."
मधुरा म्हणाली, "छान समजवलंत हो मला जीवनाचं तत्त्वज्ञान. म्हणून तर मी नवं बेडशीट आणण्याची घाई केली. त्याच्या येण्यामुळे असं काय काय बनवायचं होतं. कोरोनाच्या काळजीला पळवायचं होतं." दोघेही मोठमोठ्याने हसले व कामाला लागले.
सरांनी सांगितलेले तत्वज्ञान ह्रदयाच्या कुपीत अत्तराप्रमाणे जपून ठेवू या.
जगू या आनंदाने
कोरोनाचा सामना करू नेटाने।
Very nice
उत्तर द्याहटवाVery nice👌💯
उत्तर द्याहटवा