स्वातंत्र्यदिनाचा निर्धार
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
'कशाला आई, भिजविशी डोळे, उजळ तुझे भाळ
रात्रीच्या गर्भात उद्याचा, असे उषःकाल'
या दुर्दम्य इच्छाशक्तीने या मायभूमीच्या सुपुत्रांनी आपल्या मायभूमीच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडून टाकल्या. ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून आपला भारत मुक्त झाला त्याला आज अनेक वर्षे झाली, असंख्य ज्ञात-अज्ञातांच्या असीम त्यागातून, महान बलिदानातून स्वातंत्र्याचे भव्य-दिव्य स्वप्न साकार झाले. ज्यांच्यामुळे स्वातंत्र्याचा हा मंगल कलश आला, त्या त्यागी देशभक्तांची, स्वातंत्र्यसैनिकांची प्रकर्षाने आठवण येते. पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंंडात ज्यांनी स्वतःच्या आहुती हसत-हसत दिल्या, तळहातावर निखारे घेऊन जुलमी सत्तेशी झुंज दिली, ज्यांनी स्वतःच्या हातांनी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली, त्या असंख्य त्यागी देशभक्ताच्या त्यागाचे स्मरण करण्याचा हा सोनेरी दिवस! स्वातंत्र्याचा तेजस्वी सूर्य तेजाने दिमाखात तळपत असतानाच गेल्या अनेक वर्षात राष्ट्रीय एकात्मतेला लागलेल्या सुरुगांनी देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असे म्हणता येईल का? फुटिरतावाद, भ्रष्टाचार व दहशतवादाने स्वराज्याला ग्रहण लावण्याचा अधमपणा सुरू आहे. सुराज्याच्या मार्गात काटे पेरण्याचा प्रयत्न दुष्ट शक्ती करत आहेत.
सर्वसामान्य महागाईच्या खाईत पुरता भाजून निघत आहे, शिक्षण क्षेत्रातील खासगीकरणाने गरिबांना शिक्षण मिळणे कठीण होत आहे. उच्च शिक्षण ही श्रीमंतांची मक्तेदारी बनत आहे. आपण तरीही गप्प आहोत. समाजात दिसून येणारा अन्याय अत्याचार आपण निमूटपणे सोसत आहोत. हे चित्र आपण बदलू शकत नाही हे खरे आहे पण, आपण स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने असा निर्धार करूया की आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत, जे काम आपण करत आहोत, ते काम प्रामाणिकपणे करूया सर्व 'वाईट' नष्ट करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करून घडवूया नवा स्वतंत्र सुजलाम् सुफलाम् मानवतावादी भारत!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा