सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

आठवणीतील विद्यार्थी - विशेष मराठी लेख


आठवणीतील विद्यार्थी

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: pixabay.com



       माझ्या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या अस्मिता व पूनम या दोघींचे भांडण झाले होते. अस्मितानं पूनमला मारले होते. मधल्या सुट्टीमध्ये पूनम रडत घरी गेली होती आईला सांगायला. अस्मिता दुसऱ्या मैत्रिणीबरोबर खेळण्यात गुंग झाली होती. तिला माहित होते की पूनम घरी गेली आहे आईला बोलवायला, त्यामुळे अस्मिता पूनमवर जास्तच चिडली होती. जेंव्हा तिनं पाहिलं पूनम शाळेत येत आहे, तिने पूनमला आणखी एक तडाखा मारला. पूनमची आई कांही अंतरावर मागे होती. तिने अस्मिताने पूनमला पुन्हा मारलेलं पाहिलं. पूनमची आई त्या दोघींना घेऊन माझ्याकडे तक्रार घेऊन आली व म्हणाली, "मघाशी हिनं मारलं म्हणून पूनम मला सांगायला आली आणि आत्ता माझ्यासमोर तिनं पुन्हा मारलं बघा." मी अस्मिताला विचारलं, "का ग मारलस पूनमला?" ती म्हणाली, "मॅडम, मी तिच्या आईला पाहिलं नव्हतं म्हणून मारलं. मघाशी ती मला चिडवत होती म्हणून मारलं." किती निरागस, निष्पाप असतात ना ही मुलं. तिचं उत्तर ऐकून पूनमची आईसुद्धा हसू लागली. पुन्हा असं मारू नको असं सांगून ती घरी गेली.


       माझ्या पहिलीच्या वर्गात सुहास नावाचा एक छोटासा गोरागोमटा मुलगा होता. त्यावेळी म्हणजे तीस वर्षापूर्वी प्रत्येकाकडे आत्ता असतात तशा  वॉटर बॉटल्स नसायच्या. सुहास सुशिक्षित कुटुंबातील एकुलता एक लाडका मुलगा असल्याने त्याच्या एकट्या जवळच वॉटर बॅग होती. त्यांच्या शेजारी अशोक नावाचा वयाने त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा असलेला विद्यार्थी रहात होता. सुहासच्या पालकांनी अशोकला सुहासकडे लक्ष द्यायला, त्याची काळजी घ्यायला सांगितले होते. त्याप्रमाणे अशोक सुहासकडे लक्ष द्यायचा. इतर मुले सुहासकडे पाणी प्यायला मागायची. अशोक त्यांना म्हणायचा, "देत नाही जा. दिवसभर सुहासला पाणी पुरायला नको का." अशोकचे हे बोलणे ऐकून सुहासला फार वाईट वाटायचे व तो रडवेल्या स्वरात म्हणायचा, "दे की रे पाणी, त्याला दे की रे." मला फार कौतुक वाटायचं सुहासचं. एवढ्या लहान वयातील त्याच्या परोपकारी वृत्तीचं, त्याच्यावर झालेल्या संस्काराचं. अशोक चिडून पाणी द्यायचा मगच सुहास गप्प बसायचा.


       शेखर नावाचा पांचवीत शिकणार एक विद्यार्थी छोट्या सुट्टीत माझ्या जवळ कोणी नसताना आला व म्हणाला, "मॅडम, दारुपिणं चांगलं का वाईट?" मी म्हटलं, "वाईट आहे." तो म्हणाला, "मॅडम, पण मला वाटतं दारू पिणं चांगलं आहे." मी म्हणाले, "असं का वाटतं तुला?" तो म्हणाला, "कारण माझे वडील दारू पिऊन आल्यावर मला फार माया करतात, खाऊसाठी पैसे देतात, मला जवळ घेतात, आई ओरडली तरी गप्प बसतात, एरव्ही एवढी माया करत नाहीत. सदा रागवत असतात." मी त्याला समजावलं, "शेखर दारू पिणं वाईट आहे. त्यामुळे आपल खूप पैसे खर्च होतात. शरीराचंही नुकसान होतं, तब्येत बिघडते. ज्यावेळी ते घेऊन येतात व तुला माया करतात त्यावेळी तू त्यांना सांग पीत जाऊ नका तुमची तब्येत बिघडेल. तुम्ही पिला नाही तर आपले पैसे वाचतील." शेखरने असे बोलल्यामुळे त्याचे वडील सुधारल्याचे कळले.


     अशा या निरागस, निष्पाप मुलांच्या सहवासातील ते क्षण अजूनही विसरता येत नाहीत म्हणून हा लेखनप्रपंच।