६ जून हा कवयित्री शांता शेळके यांचा पुण्यदिन त्यानिमित्त त्यांच्या प्रतिभेला वाहिलेली ही शब्दफुले....
कवयित्री शांता शेळके - विशेष लेख
माझ्या आवडत्या कवयित्री .......
प्रतिभासंपन्न कवयित्री शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ मध्ये झाला व ६ जून २००२ मध्ये त्या कालवश झाल्या. त्यांचे पूर्ण नांव शांता जनार्दन शेळके असे होते. १९४४ साली त्या संस्कृत विषयात एम्. ए. झाल्या. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज व मुंबईच्या रुईया आणि महर्षि दयानंद या महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले.
कविता, गीते, चित्रपट गीते, कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांच पहिलं आणि खरं प्रेम राहिलं ते कवितेवरच. कवितेच्या विविध रुपात त्या रमलेल्या होत्या. शांताबाईंच्या कवितेत संतांच्या काव्यातील सात्त्विकता, पंडीतांच्या काव्यातील विद्वता आणि शाहिरांच्या काव्यातील ललितमधु उन्मादकता आढळते. उदाहरणार्थ
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ।
माझ्याकडे देव माझा, पाहतो आहे ।
हे गीत ऐकताना सात्विकतेने मन भरून जाते तर....
तोच चंद्रमा नभात
तीच चैत्र यामिनी
एकांती मज समीप
तीच चैत्र यामिनी ।
हे भावमधुर गीत ऐकतांना त्यांच्या विशाल विद्वतेची प्रचिती येते.
शूर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भिती।
हे गीत ऐकतांना ऐकणाऱ्याला देशप्रेमाने स्फुरण चढते.
भाव कवितेपासून, नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपट गीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून शांताबाईंची कविता आपल्याला भेटते.
कवयित्री शांता शेळके:
जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या वासवदत्ता आणि हे बंध रेशमाचे या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईनी नाट्यगीते लिहिली.
रेशमाच्या रेघांनी ,लाल काळ्या धाग्यानी
कर्नाटकी कशिदा मी काढिला ।
हात नका लावू माझ्या साडीला ।
यासारख्या लावण्या लिहिणाऱ्या शांताबाई या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार आहेत. आजही त्यांच्या लावण्या ऐकून अगदी अरसिक व्यक्तीही ठेका धरते. व्यक्तीला ताल चढतो, सूर धरावासा वाटतो.
वादळ वारं सुटलं ग ।
वाऱ्यानं तुफान उठलं ग ।
वल्हव रे नाखवा हो
वल्हव रे रामा ।
मी डोलकर डोलकर।
डोलकर दर्याचा राजा ।
ही गीते ऐकताना आनंदाने न डुलणारी व्यक्ती सापडणे अशक्य आहे.
सुरूवातीला शांताबाईंच्या कवितेवर माधव ज्युलियन यांच्या काव्याचा प्रभाव होता. त्यामुळे त्या वळणाच्या रक्तबंबाळ कविताच त्यांनी लिहिल्या. परंतु १९७५ साली त्यांचा 'गोंदण' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आणि त्या वेळेपासून त्यांच्या कविता कुणाच्याही अनुकरणापासून दूर असलेल्या कविता म्हणून त्यांच्या कवितेला नवीन चेहरा मिळाला. त्यांच्या कविता अधिकाधिक अंतर्मुख, चिंतनशील व प्रगल्भ होत गेल्या. बालपणाच्या सुखद आठवणी, प्रेम, वैफल्य, मानवाच्या अपुरेपणाचा वेध, एकाकीपणा, मनाची हुरहूर, सृष्टीची गूढता हे सारे काव्यविश्व गोंदणपासून पुढील कवितेत अधिक प्रगल्भपणे प्रतिमारूप धारण करून वाचकांसमोर आल्या. वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली तेवढ्याच सहजतेने त्यांनी चित्रपट गीते, बालगीते सुनीते आणि मुक्तछंद रचनाही केल्या. ग. दि. माडगूळकर यांच्यासारख्या उत्कृष्ट भावानुकूल चित्रपट गीतलेखिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. गरजेनुसार, मागणीनुसार भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, लता मंगेशकर, सुधीर फडके, सलील चौधरी इत्यादि अनेक संगीत दिग्दर्शकासाठी त्यांनी चिलीबरहुकूम गीते लिहिली. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले ...
राजा सारंगा, माझ्या सारंगा
हे गीत आजही सर्वांच्या ओठावर विराजमान झाले आहे.
सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांताबाईंच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. अवतीभवतीचा सामाजिक, सांस्कृतिक अवकाश त्यांनी आपल्या सौंदर्यदृष्टीतून, सहजतेने अभिव्यक्त केला आहे.
शेवटी त्यांच्या एका गीताचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही ते गीत....
असेन मी नसेन मी
तरी असेल गीत हे ।
खरंच शांताताई! तुम्ही तुमच्या सुमधुर गीतांनी अजरामर झालेल्या आहात कारण तुमची कोळ्याची पोर हिरवा शालू नेसून झोकात चालत आहे आणि त्यामुळे चांदणे उन्हात हसत आहे.
अशा या महान कवयित्रीला कोटी कोटी प्रणाम ...