जकात: एक आर्थिक उपासना - विशेष लेख
इस्लामच्या पाच प्रार्थना पध्दती आहेत. १) ईमान २) सलात (नमाज पढणे), ३) उपवास (रोजा), ४) जकात, ५) हज या पाचपैकी एकाचाही इन्कार मुस्लिम बांधवाना करता येत नाही. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक आर्थिक उपासना करतात आणि ती आहे 'जकात' देण्याची. जकात हे एक प्रकारचे दान आहे. जे आपल्या मालमत्तेवर वर्षातून एकदा हिशेब करून देणे गरजेचे आहे.
जकात 'साहिबे निसाब' म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वरची श्रीमंत माणसे देतात. आजपासून सुमारे साडेचौदाशे वर्षापुर्वी ही दारिद्र्यरेषा ठरविण्यात आली आहे. ज्या व्यक्तीपाशी ८७.४७९ ग्रॅम इतके सोने अथवा ६१२.३५ ग्रॅम इतकी चांदी किंवा या किंमतीचा विकाऊ माल किंवा नाणी, नोटा, एफ. डी., शेअर सर्टिफिकेट, कंपन्यामध्ये इतर गुंतवणूक आहे त्या रकमेवर जकात आहे. ही जकात एकूण मालाचा चाळीसावा भाग म्हणजे अडीच टक्के वजा करून गोरगरीबांमध्ये वाटून टाकावी.
मालावर एक संपूर्ण वर्षाचा कालावधी ओलांडला गेला पाहिजे. जकात जवळच्या नातेवाईकांना प्राधान्याने देण्यात येते. आईवडील आपल्या मुलामुलींना तसेच मुले आपल्या मातापित्यांना जकात देवू शकत नाहीत, तसेच आजी आजोबा व मुलामुलींच्या संतानाला देखील जकात देवू शकत नाहीत. पत्नी पतीला जकात देऊ शकते, कारण त्याच्या खर्चाची जबाबदारी पत्नीवर नाही.
इस्लामी शरीअतमध्ये जकात देण्याचे फार महत्व आहे.