२३फेब्रुवारी हा संत गाडगेबाबा यांचा जन्मदिवस त्यानिमित्त हा खास लेख..
कीर्तनातून उपदेश देणारे संत गाडगेबाबा - विशेष लेख
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
फुलपाखराला पहावे बागेत, सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे पाण्यात तसे गाडगेबाबांना पहावे कीर्तनात, हजारो माणसांच्या समुदायामध्ये बाबा एकदा उभे राहिले म्हणजे पावसाळ्यातील मेघाप्रमाणे ते आभाळभर गडगडू लागत. श्रोत्यांच्या डोक्यावर सदभावनेचा, सद्विचारांचा नि साहित्याचा असा कांही वळवाच्या पावसासारखा मारा सुरु होई की, त्या कीर्तन गंगेत हजारो श्रोते आपले देहभान विसरून अक्षरशः डुंबत रहात. कीर्तनासाठी बाबांना साहित्य लागत नसे. टाळ नाही, वीणा नाही, बाजाची पेटी नाही. मिळाली तर वाहवा, न मिळाली तरी वाहवा. रस्त्यावरचे दोन दगड वेचून ते वाजवायला लागत. श्रोत्यांच्या टाळ्या आणि घोष, हेच त्यांच्या कीर्तनाचे सारे भांडवल असे. गरिबांचा आणि दलितांचा उद्धार हाच त्यांच्या कीर्तनाचा विषय असे. ते सांगत, "मूर्तीची पूजा करू नका, देवापुढे पैसे, फुले ठेवू नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, सत्यनारायण पुजू नका, पोथीपुराणातल्या चमत्कारावर विश्वास ठेवू नका, कुणाचा गुरूमंत्र वा उपदेश घेऊ नका, प्राण्यांची हत्या करू नका, दारू पिऊ नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण द्या. ही शिकवण, सतत पन्नास वर्षे हजारो कीर्तने घेवून बाबांनी दिली.
गाडगेबाबा कीर्तनात सॉक्रेटिस तंत्राचा अवलंब करीत म्हणजे एकेक प्रश्न विचारीत व श्रोत्यांना आपल्या चुका कबूल करायला लावीत. उदाहरणार्थ "बासुंदी चांगली का बोंबील चांगलं?" लोक म्हणत, 'बासुंदी'. ते पुन्हा विचारीत, "श्रीखंड चांगलं का सागुती?" लोक सांगत, 'श्रीखंड'. मग बाबा त्यांच्यावर एकदम कडाडत, "तुम्ही कबूल करता श्रीखंड चांगल व घरी जाऊन बोंबील व सागुती खाता". श्रोते विचारात पडत व वर्तनात सुधारणा करत. बाबांचे कीर्तन श्रोत्यांच्या मनावर बिंबले जाई. त्यात अध्यात्म नव्हते, कर्मकांड नव्हता, पोथी नव्हती, पुराणे नव्हती, मूर्ती पूजाही नव्हती. आयुष्यात बाबा देवळात कधीच गेले नाहीत. हजारो वर्षे समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक दबावाखाली भरडून निघाल्यामुळे दूधखुळ्या, देवभोळ्या, आंधळ्या, पांगळ्या, हीन-दीन समाजाच्या उद्धाराचा झगझगीत प्रकाशझोत म्हणजे 'गाडगेबाबा'. मार्क्स हा माणूस कोण होता हे गाडगेबाबांना ठाऊक नव्हते पण सतत पन्नास वर्षे आपल्या जीवनामधून मार्क्सवादी शिकवण त्यांनी जनतेला दिली. गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ होते.
गाडगेबाबांच्या जीवनातील एक ह्रदयद्रावक प्रसंग:
जीवनातील दुःखाचे हलाहल प्राशन करण्याचे आणि पचविण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्या अंगी होते. त्यांचा एकुलता एक पुत्र मुदगल उर्फ गोविंद ऐन तारुण्यात अकस्मात मरण पावला. त्यावेळी बाबा कोकणात एका गांवी कीर्तन करीत होते. पुत्राच्या अपघाती मृत्यूची तार घेऊन स्वतः पोस्टमास्तर त्यांच्याकडे गेले. त्यांचे कीर्तन रंगात आले होते, म्हणून त्यांना ती तार दाखविण्याची हिंमत होईना. अखेर त्यांनी तारेमधला मजकूर कसाबसा सांगितला. बाबा क्षणभरच थांबले आणि म्हणाले..
"ऐसे गेले कोट्यानुकोटी।
रडू काय तेथे एकासाठी?
बोला गोपळा गोपाळा
देवकीनंदन गोपाळा ..।
धन्य ते गाडगेबाबाआणि धन्य ते त्यांचे मनोधैर्य !