मकर संक्रांतीचा आरोग्यमंत्र - विशेष मराठी लेख
भारतीय संस्कृतीतील सणांचे आयोजन अतिशय दूरदृष्टीने आपल्या पूर्वजांनी केले आहे. प्रत्येक सण साजरे करत असताना त्या त्या ऋतुनुसार शरीरास आवश्यक असणाऱ्या पदार्थांची योजना केली आहे. आता हेच पहा ना, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी बाजरीच्या भाकऱ्या तीळ लावून केल्या जातात. पावटा, वाटाणा, वांगी, गाजर, घेवडा इत्यादींची मिक्स भाजी केली जाते. कांदापात व हरभऱ्याची भाजी केली जाते. हे सर्व पदार्थ करण्यामागील हेतू हाच की थंडीच्या दिवसांत शरीरात उष्णता निर्माण व्हावी. सर्वांनाच पोषक व चौरस आहार मिळावा. एरव्ही आपण गव्हाची चपाती व ज्वारीची भाकरी खातो पण या सणाला बाजरीची भाकरी खाण्याचा प्रघात आहे कारण बाजरी उष्ण आहे. या दिवशी तांदळाच्या भाताऐवजी राळ्याचा भात खातात. त्यामुळे शरीरास आवश्यक असणारी उर्जा मिळते, शरीर बलवान बनते.
बाजरीच्या भाकरीवर मिक्स भाजी, पालेभाजी, राळ्याचा भात, भातावर दही घालून पाच सवाष्णीना वाटण्याची पद्धत आहे आणि हो, भाकरीबरोबर गाजर आणि कांद्याची पातही दिली जाते. या देण्यामागे हेतू हाच असावा की, आपल्या घासातील चार घास इतरांना ही मिळावेत, देण्याची सवय लागावी. या पदार्थांमुळे सर्वांना शारीरिक बळ तर मिळतेच शिवाय बंधुभाव, आपुलकी निर्माण होते.
मकर संक्रांतीचा सण म्हणजे तिळगुळ वाटण्याचा सण. थंडीच्या दिवसात पोटाची स्निग्ध गुणाचे जड पदार्थ पचविण्याची शक्ती असल्यामुळे तीळ व गुळाच्या औषधी गुणधर्मांची ओळख करून घेणे उचित होईल.
तीळाचे औषधी गुणधर्म:
उष्ण, पचायला जड असणारा परंतु थंडीत अतिशय उपयुक्त. याच्या उष्णपणामुळे याचा उपयोग वातनाशक व शरीरातील उष्णता वाढविण्यासाठी होतो. तीळाचे तेल कफनाशक आहे. दृष्टी दोषांसाठी हे तेल पोटातूनही घेता येते. तिळाचे तेल कृमिनाशक, केसांना काळेपणा देणारे असते. केसातील कोंड्यावर इतर तेलाबरोबर या तेलाचा प्रयोग फलदायी ठरतो. सतत कफाचा त्रास असणाऱ्यानी तीळाचे पदार्थ खावेत व छातीला तीळाचे तेल गरम करून लावावे. तीळ हा पित्त, अग्नी वाढवणारा असून बल वाढवणारा आहे. त्यामुळे त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना बुद्धी व बल वाढवण्यात होऊ शकतो. सर्व सांध्यांना तीळाचे तेल गरम करून लावल्यास त्वचेचा वर्णही सुधारतो व सांध्यांचे रक्षण होते. पुराणकाळात तीळाच्या तेलाच्या अभ्यंगानेच सर्व देव अजरामर होऊन दैत्यांचा नाश करू शकले असे म्हणतात.
तिळाच्या दाण्यात तांबे, मँगेनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी १ आणि बी ६, थायामीन फॉलेट, नायासिन, झिंक, मॉलिब्डेनम, सेलेनियम तसेच सिसॅमिन व सिसॅमोलीन हे दोन अत्यंत महत्वाचे दुर्मीळ पोषक घटक असतात. सिसॅमिन व सिसॅमोलीन हे लिग्नन्स म्हणून ओळखले जातात आणि ते रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करणारे तसेच इ व्हिटॅमिन देणारे आहेत. अत्यंत महत्वाच्या घटकयुक्त अशा तिळांमुळे मधुमेहाला प्रतिबंध करायला आणि त्याचे नियंत्रण करायला मदत होते. या शिवाय पचनक्रिया सुधारणे, कॅन्सरचा धोका कमी करणे, हाडांची शक्ती वाढवणे, सूज प्रतिबंध, पचनक्रियेत सर्व अवयवांची शक्ती वाढविणे इत्यादी गोष्टीतदेखील तीळामुळे मदत होते. हृदयाची कार्यक्षमता वाढविणे, उच्च रक्तदाब कमी करणे, स्नायू आणि केसांची ताकत वाढविणे, अकाली वृद्धत्व टाळणे आदींसाठी देखील तीळ फार उपयुक्त आहे.
गुळाचे औषधी गुणधर्म:
गूळ हा तिळाचे गुणधर्म वाढवणारा, तिळाला चिकटणारा व माधुर्य वाढवणारा असल्याने त्याचा उपयोग शरीराला होतो. गूळ खायला आरोग्यदायक व पथ्यकारी गुणधर्माचा आहे. गूळ दुर्बलाना बलवान करणारा आहे. शरीरातील थकवा तसेच क्षय रोगासारख्या दीर्घकालीन व्याधीनी आजारी असणाऱ्या रूग्णांचे बल वाढवणारा, छातीत जळजळ असणाऱ्याना उपयुक्त आहे. गूळ शरीरातील वात नाश करणारा आहे.
गुळामध्ये व्हिटॅमिन बी ६, बी १२, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन्स, फॉलेट, सेलेनियम असा खजिना भरलेला असतो. गुळाचे अतिसेवनही कफ वाढवणारे, अग्नीमंद करणारे आहे. शेंगदाण्यासोबत खाल्ल्यास पित्त वाढवणारे व छातीत जळजळ वाढवणारे ठरते. परंतु तीळासोबत खाल्ल्यास त्याचा दुरूपयोग होत नाही. म्हणूनच तीळगूळ खा, तीळगूळ वाटा. तीळाची स्निग्धता व गुळाची गोडी अंंगी बाणविण्याचा प्रयत्न करा.
नवीन वर्षाची सुरुवात नुकतीच झाली आहे. नवीन वर्ष माझ्या वाचक बंधू भगिनींना सुखासमाधानाचे, भरभराटीचे, आनंददायी व आरोग्यदायी जावो हीच मनापासून प्रार्थना ।