मकर संक्रांत: तिळगूळ घ्या, गोड बोला - विशेष लेख
भारतीय समाजाला फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा वृद्धींगत करण्यासाठी सण व उत्सवांची मोठी मदत झाली आहे. प्रत्येक सणामुळे आपली परंपरा व संस्कृती समृद्धच होते. त्यापैकीच एक सण म्हणजे मकर संक्रांत.
मकर संक्रांत हा हिंदू धर्मात महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्रात या सणाला धार्मिकतेबरोबर सामाजिकतेचे स्वरूप दिले आहे. माणसाच्या परस्पर संबधामध्ये स्नेह व माधुर्य हवे असा संदेश हा सण देत असल्याने सामाजिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. प्रत्येक सण साजरा करताना त्यात आहाराचा, आरोग्याचा, कुटुंबाचा, समाजाचा सखोल विचार केलेला असतो. संक्रांतीच्या सणातही तिळगूळाचा गोडपणा मुखात राहून माधुर्याचा, औषधी गुणांचा परिणाम शरीर व मनावर होऊन स्वभावात, आचरणात मधुरता येऊन सुख, आनंद, आरोग्य प्राप्त करावे हा या सणाचा मूळ उद्देश आहे.
नैसर्गिक परिस्थिती:
सूर्याचा मकर राशीतील प्रवेश म्हणजे मकर संक्रांत होय. शिशिर ऋतुमध्ये येणारा, अधिक प्रमाणात थंडी असताना येणारा हा सण. या कालावधीत शरीर बलवान असते. भूक भरपूर लागते. व्याधींची प्रबळता कमी प्रमाणात असते परंतु शरीरातील रूक्षता, कोरडेपणा थंडीमुळे वाढलेला असतो व त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. तो घालविण्यासाठी तीळ व गुळाच्या औषधी गुणधर्माचा उपयोग होतो शिवाय या दिवसात पोटाची स्निग्ध गुणाचे जड पदार्थ पचविण्याची प्रबळ शक्ती असल्यामुळे तिळगूळ खाणे फायद्याचे ठरते.
इतिहास:
पूर्वी संकरासुर आणि किंकरासुर नावाचे राक्षस होते. ते लोकांना त्रास देत. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड आणि ९ बाहू असलेल्या एका देवीने दोन्ही राक्षसाना ठार मारले. संकराला ठार मारले ती संक्रांत आणि कंकराला ठार मारले ती किंक्रात होय. संक्रातीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रात. दरवर्षी या देवीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, अवस्था, अलंकार वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात.
भौगोलिक परिस्थिती:
मकर संक्रांत हा निसर्गाचा उत्सव आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्यास उत्तरायाणही म्हणतात. ही आहे या सणामागची भौगोलिक पार्श्वभूमी. मानवी जीवनातही नेहमी संक्रमण होत असते. रात्रीच्या गर्भात उध्याचा उषःकाल असतो त्याप्रमाणे संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधारावर विजय. मानवी जीवनही अंधार व प्रकाश यांनी जखडलेले आहे. मनाचे संकल्प परिवर्तनाची इच्छा ठेवून बदलणे गरजेचे आहे. सूर्याचा प्रकाश, तिळाचा स्नेह, गुळाचा गोडवा आपल्या जीवनात योग्य संक्रमण करील ही उदात्त भावना या सणानिमित्त सर्वांनी ठेवली पाहिजे. या सणानिमित्त स्नेह्याकडे जाऊन, तिळगूळ देवून, जुने मतभेद विसरून स्नेहाची प्रतिष्ठापना करायला हवी. तिळगुळाद्वारे आपल्या मनाची स्निग्धता व ह्दयाचा गोडवा देवून स्नेहाची सरिता प्रवाहित करण्याचा हा सण होय.
प्रांतिक संक्रात:
भारतात बहुतेक सर्व भागातून हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात या दिवशी डाळ व भात यांची खिचडी खातात व दान देतात त्यामुळे संक्रांतीला तेथे खिचडी संक्राती म्हणतात. बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून बनविलेला तिळुआ नावाचा पदार्थ तसेच तांदळाच्या पीठात तूपसाखर घालून केलेला पिष्टक नावाचा पदार्थ खातात व एकमेकांना वाटतात. गुजरातमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. जगभरातील पर्यटक हा पतंगोत्सव पाहण्यासाठी गुजरातला भेट देतात. दक्षिण भारतात यावेळी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो.
थोडक्यात सगळ्यानी एकत्र यावे आणि एकमेकांशी मैत्री करावी, गोड बोलावे हाच संदेश देतो संक्रांतीचा सण .
सण संक्रांतीचा मोठा आला ।
भेटा प्रेमभरे एकमेकाला ।
फाटा द्या द्वेष मत्सराला ।
वाटा प्रेमभरे तिळगूळ सर्वाला।