३ जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन त्यानिमित्त त्यांना ही भावफुलांची आदरांजली
स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या: सावित्रीबाई फुले - विशेष लेख
महाराष्ट्राच्या भूमीत अनेक नरवीर रत्ने जन्मली. त्यांनी आपल्या कार्याने केवळ देशालाच नव्हे तर जगाला दिशा देण्याचे काम या महामानवांनी केले. त्यांनी आपापल्या क्षेत्रात धृवताऱ्यासारखे अढळ स्थान पटकावले आहे. त्यांच्या विचारांच्या पायधुळीवर आज आपण मार्गक्रमण करीत आहोत. या द्रष्ट्या विभूतीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे नांव घ्यावे लागेल.
सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगांव, तालुका खंडाळा येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांचे वडील खंडोजी सिदूजी नेवसे नायगावचे पाटील होते. तत्कालीन प्रथेनुसार वयाच्या नवव्या वर्षी १८४० मध्ये सावित्रीबाईंचा विवाह पुण्याचे जोतिराव गोविंद फुले यांच्याशी झाला. या विवाहाने लोकोत्तर गुण लाभलेल्या दोन व्यक्तींचं मीलन घडून आले आणि त्यांच्या गुणांचे तेज शतपटीने वाढले. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तद्वत जोतिरावांच्या सहवासाने सावित्रीबाईंच्या ठायी असणारे अनेक सद्गुण विकसित झाले. विवाहापूर्वी सावित्रीबाई अक्षरशत्रू होत्या. जोतिराव स्त्री पुरुष समानता मानणारे होते. पुरूषासारखाच स्त्रियांनादेखील शिक्षण घेण्याचा हक्क आहे असे मानून त्यांनी सावित्रीबाई व मावसबहीण सगुणाबाई क्षीरसागर या दोघींना धूळपाटीवर अक्षरे गिरविण्यास शिकविले. त्यावेळेपासूनच खऱ्या अर्थाने फुले दांपत्याच्या युगप्रवर्तक क्रांतिकार्यास आरंभ झाला.
ज्या काळात शिक्षण घेणे ही वरिष्ठवर्णिय पुरूषांची मक्तेदारी होती, स्त्रियांचे शिकणे धर्मविरोधी व अनीतीचे समजले जात होते, त्या काळात जोतिरांवानी सावित्रीबाईंना शिक्षणाची संधी दिली. सावित्रीबाई मुळातच जिज्ञासू होत्या. त्यांची ज्ञानलालसा उच्च प्रतीची होती. सावित्रीबाईंनी १८४८ मध्ये शिक्षकी पेशाचे प्रशिक्षण घेऊन अध्यापन कला अवगत केली. सावित्रीबाई या पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका होत्या. याच वर्षी जोतिबांनी आणि सावित्रीबाई यांनी शतकानुशतके अज्ञानात खितपत पडलेल्या स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांचा उद्धार करणाऱ्या शिक्षणकार्यास आपले जीवन समर्पित करण्याचा निर्धार केला. १ जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी आणि १५ मे १८४८ रोजी शूद्रांसाठी पहिली शाळा काढून जोतिबांनी ज्ञानाचा दीप लावला. भिडे वाड्यात मुलींच्या शाळेत शिक्षिकेचे काम सावित्रीबाई करु लागल्या. हे काम सुरु केल्यावर त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. अंगावर शेण, चिखल झेलावा लागला पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी आपले कार्य नेटाने सुरु ठेवले. सावित्रीबाईंनी प्रारंभी शिक्षिका नंतर मुख्याध्यापिका व शेवटी निरीक्षक म्हणून विनावेतन सेवा केली. एत्देशीय व्यक्तीने या देशातील मुलींच्या शिक्षणासाठी चालविलेली ही पहिली शाळा होती. सावित्रीबाई या केवळ पोपटपंची करणाऱ्या शिक्षिका नव्हत्या तर शिक्षणावर भाष्य करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्या आपल्या कवितेत म्हणतात,
"शूद्रांना सांगण्यासारखा शिक्षण मार्ग हा ।
शिक्षणाने मनुष्यत्व येते. पशुत्व हाटते पहा" ।।
मुलांना उपदेश करतांना त्या सांगतात, "ज्ञान शिक्षण हे सर्व धनांहून श्रेष्ठ धन आहे"
प्रतिगाम्यांचे केंद्रस्थान असलेल्या पुण्यात त्याकाळी सावित्रीबाईंसारख्या कनिष्ठ वर्णातील स्त्रीने शिक्षण घेऊन मुलींना शिकविण्याचे काम करणे ही गोष्ट निःसंशय धाडसाची व क्रांतिकारक अशीच आहे. परंपरेने हेतुपुरस्सर ज्ञानापासून वंचित ठेवलेल्या स्त्रियांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करून एक प्रकारे फुले दांपत्याने सामाजिक जीवनात नव्या मनूचा प्रारंभ केला. आजच्या बालिका भावी राष्ट्रमाता असल्याने त्यांच्या पोटी जन्म घेणारे स्त्री पुरुष गुणसंपन्न, बुद्धिमान, कर्तबगार निपजावयाचे असतील, तर त्या राष्ट्रमाता सुशिक्षित, सुसंस्कारित असल्या पाहिजेत, असा फुले दांपत्याचा उद्देश होता. म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणापासून समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवात केली. या महत्त्वाच्या कार्यात सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा होता.
त्या काळी उच्चवर्णीय विधवांना पुनर्विवाह करण्याची मुभा नव्हती. बालविधवांची स्थिती तर केविलवाणी होती. तरुण विधवा भावनेच्या भरात किंवा असह्य परिस्थितीमुळे फसल्या जात. त्यांना समाजात तोंड दाखविणे देखील मुश्कील होई. जन्मास येणाऱ्या निष्पाप अर्भकाची गुप्तपणे हत्त्या केली जाई. दयाळू सावित्रीबाईनी मानवतेच्या भावनेतून अशा दुर्दैवी विधवांच्या सहाय्यार्थ उपाय योजण्यास जोतिबांना प्रेरित केले. त्या दोघांनी या समस्येवर विचार विनिमय केला आणि आपल्या घरीच बालहत्या प्रतिबंधक सदनाची स्थापना केली. अनेक फसलेल्या विधवांनी या बालहत्या प्रतिबंधक सदनाचा आश्रय घेतला.
विधवा स्त्रीयांचे केशवपन करण्याची दुष्ट प्रथा बंद करण्यासाठी सावित्रीबाईनी पुण्या-मुंबईच्या नाभिक बांधवांची परिषद भरविली. त्यांचे प्रबोधन करून केशवपनासारखी अघोरी प्रथा बंद केली.
दारिद्र्य, अज्ञान व भोळ्या धर्म समजुतीचा अंधार नाहीसा करण्यासाठी जोतिबांनी ज्ञानाचा दिवा लावला, दिव्यातील ज्योत बनले आणि तेल झाली सावित्रीबाई, त्यामुळे सारा महाराष्ट्र उजळून निघाला.
गाडी, बंगला, पैशाच्या राशी आणि असंख्य ऐष आरामाच्या बाबी पळवाटा शोधून मिळत असतील तर प्रकाशाची, सत्त्याची वाट कोण धरील? सत्य, न्याय आणि समानतेकडे नेणारी वाट ही सर्वांना प्रकाशाकडे नेणारी आहे. जीवन सफल करणारी आहे पण ही वाट संघर्षाची आहे, रक्तबंबाळ करणारी आहे. या वाटेवरून वाटचाल करण्याची हिंमत भल्याभल्यांना होत नसते. जेंव्हा कोणी अशी हिंमत दाखवितो तेंव्हा पळवाटा शोधणाऱ्यांच्या भाऊगर्दीत तो उठून दिसतो. सावित्रीबाई हे असेच पळवाटा शोधणाऱ्यांच्या भाऊगर्दीत वेगळपण जपणारे व्यक्तीमत्व. त्या आपल्या कवितेत म्हणतात,
निर्मिके निर्मिला मानव पवित्र।
कमीजास्त सूत्र बुद्धीमध्ये ।
पिढीजात बुद्धी नाही सर्वामधी ।
शोध करा आणि पुरतेपणी ।
धर्मराज्य भेद मानवा नसावे ।
सत्त्याने वागावे ईशापाशी ।
ही क्रांतिकारी ज्योत १० मार्च १८९७ साली काळाच्या फुंकरीने मालवली ।
अशा थोर समाजसेविकेस नम्र अभिवादन ।