जागवू संवेदना
'लसूण घ्या लसूण' कांदे, बटाटे, आलं घ्या आलं' असा रस्त्यावरून आवाज आला. टीव्हीवर कार्टून पहाण्यात गुंग असलेल्या तुषारला तो आवाज ओळखीचा वाटला म्हणून त्याने खिडकीतून रस्त्यावर नजर टाकली. पहातो तर काय त्याचा पाचवीत शिकत असलेला वर्गमित्र आकाश डोक्यावर बुट्टी घेऊन विक्री करत होता. तुषारला गेले तीन महिने घरातून बाहेर पडायला बंदी होती घरात बसून बसून तो कंटाळला होता. आकाश ला पहाताच तो पळत सुटला. आई तुषार तुषार करत त्याच्यामागे धावली. आई तिथे पोहचण्याआधीच तुषारने आकाशला मिठी मारली. तो बिचारा बुट्टी सावरत म्हणाला, "अरे तुषार!, कोरोना आलाय, आम्ही रस्त्यावर फिरणारी माणसं, कशाला भेटतोस मला? जा घरी". तुषार बाजूला होत म्हणाला, "का रे बाबा उन्हातान्हात असा फिरतोस? तुला भीती नाही वाटत कोरोनाची? आकाश म्हणाला,"वाटतेना भीती पण घरात बसून खाणार काय? वडिलांची हमाली बंद झाली,आईचं धुण्याभांड्याचं काम बंद झालं. माझ्यापेक्षा लहान दोन बहिणी आहेत घरात. तेव्हा काम केल्याशिवाय आमचं पोट कसं भरणार? आई-वडिलांनी भाजी विक्रीचा धंदा सुरू केलाय, मीही त्यांना थोडा हातभार लावत आहे." एवढे बोलून 'लसुण घ्या लसुण' म्हणत आकाश निघून गेला.
इकडे तुषारच्या मनाला चैन पडेना तो विचार करू लागला. पोटासाठी आकाश आई-वडिलांना मदत करतोय आणि मी नाष्ट्याला किचन मध्ये बोलावलं तरी जात नाही, टीव्हीसमोर बसूनच नाष्टा करतो. आईने केलेला उपमा आवडत नाही म्हणून मॅगी करण्याचा हट्ट करतो. आईला किती दमवतो आपण त्याला स्वतःची लाज वाटली. तो मनात म्हणाला आकाश ची आई भाजी विकते मग स्वयंपाक कधी करते? धुणं-भांडी केव्हा करते? कामवाली बंद झाल्यामुळे माझी आई वैतागली आहे कामाने मग आकाश ची आई भाजी विक्री करूनही हे सगळं काम कशी करते? परवापासून ऑनलाईन अध्यापन सुरू झाले आहे आकाश कडे टीव्ही नाही, मोबाईल फोन नाही मग तो कसा शिकणार? त्याचं शिक्षण बंद पडणार की काय? आपण काहीतरी करायला हवं आकाशसाठी असा विचार सुरू असतानाच त्याला एक उपाय सुचला. संध्याकाळी पप्पा घरी आल्यावर त्याने पप्पांना विचारले 'पप्पा तुम्ही हा तीस हजाराचा मोबाईल घेतला पण त्याच्या आधीचा जुना मोबाईल कुठे आहे? पप्पा म्हणाले "तुला कशाला हवाय तो?" तुषार म्हणाला "मला नको माझ्या मित्राला आकाशला हवाय. बिचारा गरीब आहे तो, नवीन अभ्यास कसा शिकणार? वडील म्हणाले "अरे पण त्याला महिन्याला रिचार्ज कोण मारणार?" तुषार म्हणाला "मी खाऊच्या पैशातून रिचार्ज मारून देणार त्याला, आता यापुढे तुमच्याकडे खाऊसाठी हट्ट करणार नाही" त्या पैशातून त्याला रिचार्ज मारून देणार. वडिलांना फार आनंद झाला म्हणाले "शाब्बास बेटा, तुझ्यातील परोपकाराची भावना मला फार आवडली. हीच भावना कायम ठेव."
तुषार ने आकाशला मोबाईल फोन तर दिलाच शिवाय त्याला ऑपरेट करायला मदत ही केली. एवढ्यावरच तुषार थांबला नाही. त्यांच्या पप्पांचा छोटा कारखाना नुकताच सुरु झाला, दररोज थोडे-थोडे कामगार रुजू होऊ लागले. बाजूच्या कारखान्यात ही थोडेफार लोक रुजू झाले. कामगारांच्या सुट्टीच्या वेळी तुषारने आकाशला कांदे, लसूण, बटाटे, भाजी घेऊन येण्यास सांगितले, तो स्वतः घरी जाताना कामगारांना भाजी घेण्यास प्रवृत्त करू लागला. आकाश ची भरपूर विक्री होऊ लागली तुषार आनंदाने मदत करत राहिला.
जागोजागी असे परोपकारी तुषार निर्माण झाले तर 'अच्छे दिन' दूर नाहीत.