बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

श्रावणधारा - विशेष लेख


 
सद्या श्रावण महिना सुरु आहे त्यानिमित्त श्रावणातील साजऱ्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करणारा हा सुंदर लेख.....


श्रावणधारा - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गुगल


हसरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजीरा श्रावण आला
सृष्टीत सुखाची करून पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला।

       दूरच्या आभाळातून थेंब थेंब पडणारा हा पाऊस आणि सोनेरी ऊन यांचा लपंडाव, जमिनीवर बागडणाऱ्या जीवांच्या निरागस मुग्धतेला श्रावणा शिवाय दुसरं नावच सुचत नाही. श्रावण सृष्टीच्या जीवांची प्रीति, मांगल्य, दिव्यत्वाची ओढ, सौंदर्याचा ध्यास, पूर्णत्वाचे स्वप्न, हळूवारपणा, कोमलता अशी सारी मानवी मूल्यं जपतो. या सर्वामध्ये तो आपलेच देखणे रूपडे न्याहळत राहतो. मंद झुळकीसरशी एक तरल गारवा देऊन हळूच सोनेरी हसून जातो. त्या हास्याने लुब्ध होऊन सृष्टीही या रंगसंगतीत आकंठ नहात जाते व एका अखंड, अदम्य, स्वच्छंद, मूर्तीमंत आनंदात श्रावण बरसत राहतो.

       अक्षय तारूण्य तेचं खुललेलं रूप घेऊन आलेला श्रावण जणू अनुरागाचं, उत्कटतेचं, हर्षोन्मादाचं प्रतीक. अतीव बहराची सारी आलम सृष्टी तेजानं टवटवीत होऊन निजल्या मनांच्या तारा हळुवारपणे छेडत जाते. ही सारी राजस सृष्टी एक निसर्ग गाणचं होऊन जाते. यावळी वाटतं की सारी पृथ्वी दाही दिशातल्या आनंदाला डोक्यावर घेऊन नाचते आहे. या निसर्ग गाण्यातच अचानक हिरव्या लुसलुशीत मऊशार गवताचा शुद्ध कोवळेपणा घेऊन साकार झालेली बालकविता न आठवली तर नवलच.

"श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे।"

       अशा या नितांत रमणीय वातावरणात कविमनाचे पक्षी तर दूरदूरच्या निळाईत आपले शब्द शोधत राहतात आणि अनेक रंगाची उधळण करीत इंद्रधनू त्यांना प्रतिसाद देतो. रानोमाळी तर हा निसर्ग आपला कोवळा अविष्कार दाखवत खुणावतो क्षणाक्षणाला या बहरलेल्या रानवाऱ्याला, या अफाट डोंगर पहाडांना, अंकुरलेल्या भावनांना आणि मुक्त मनमंजिराना.

       असा हा सरसरता श्रावणी पाऊस एक हिरवंगार स्वप्न देऊन जातो. कुठेतरी दूर खळाळता, निळासावळा निर्झर हसत खेळत, वाट काढीत चंदेरी ओळ रेखाटत जातो. तर दूर गर्द पानांपानातून इवल्या पक्ष्यांच्या किलबिलाटानी सारं वातावरण भारलं जातं. कधी सरींच्या शिरण्यामुळं पानापानातला हिरवेपणा उठून दिसतो अन् उन्हात तो आणखी खुलून दिसतो. या साऱ्या सौंदर्याने दिपून जाऊन एखाद्या निर्जीव मनाला संजीवनी मिळते व या साक्षात्काराच्या सौंदर्यग्रहणाचा अनुभव पुनःपुन्हा घ्यावा असं कुतूहल वाटतं व मनाचा एखादा कोपरा सुखावतो.

       असा क्षणोक्षणी पालवणारा हिरवाकंच श्रावणी पाऊस कधी इकडे तिकडे उधळतो तर कधी रोमरोमी सुखसंवेदनांचे तरंग उठवतो. मग एका विलक्षण झंकाराचे नाद कानात गुंंजत राहतात आणि स्वरगंध ल्यालेले सौरभघडे दाही दिशांना सांडले जाऊन तो परिमल आकाशालाच भिडू पहातो. जणू अशा या विस्तीर्ण पोकळीतला गंध जेंव्हा सापडतो तेंव्हा या घननिळ्या आसमंताची ओढ कांही औरच असते. घरट्याच्या ओढीने निघालेला दूरचा अनाम पक्षी जणू गगनाला कवेत घेतल्यासारखा भराऱ्या मारता मारता क्षितीजापल्याड जाऊ पहातो.

श्रावणाच्या सोनेरी सांजवेळी बालकवींचे संध्याचित्र आठवावे.

" सांज खुले सोन्याहुनी
पिवळे हे पडले ऊन।
चोहीकडे लसलसीत
बहरल्या हिरवळी छान।"

       पर्वतमाथे सूर्यकिरणांच्या सप्तरंगी कडांचे रंगमहाल बनतात तर सृष्टीजीवांच्या अमर्त्य सूरांनी, गंधानी वेडी होऊन सारी सृष्टी तालमय होते. हा सृष्टीसमारंभ पाहण्यासाठी तसंच श्रावणी मन हवं, मनी भाव हवा म्हणून तर समईच्या शुभ्र ज्योती लीली फक्त श्रावणाची असते.

       असं ओतू पहाणारं आभाळ, खट्याळ धुंद वारा, हिरवेपण जपलेली रंगीबेरंगी सृष्टी खरंच कल्पनेचा कुंचला एकेक चित्र काढीत जातो. हा श्रावण म्हणजे स्वप्नांचे सुंदर पक्षी घेऊन आलेला अजब जादूगार आहे, जो ऊनपावसाचे खेळ करतो व साऱ्या सृष्टीला चकित करतो. मनामनातले गुपित हळूच जाणतो आणि त्या लयीत, सुरात आकंठ बुडवतो. कधी सोनेरी सकाळ साऱ्या सृष्टीला शूचिर्भूत करते तर कधी धुंदल्या संध्याकाळी पश्चिमेचा रंगसूर पाहून इतर दिशा ही मग्न होवून जातात. चैतन्य दुथडी भरून वाहणाऱ्या सरींचा श्रावण बहरत जाईल. मनामनात संवाद साधत जाईल, अनादी सूर शोधत रम्य स्वप्नांची उधळण करीत राहील मग अशा श्रावणसरीत चिंब होत आपलाही श्रावणमय होण्याचा ब्रम्हानंद चिरकाळ टिकेल अन् श्रावण बरसत राहील. या देखण्या श्रावणाच्या अंगात डोळ्यांचे पारणे फेडणारे लावण्य आहे. रसिल्या मनाला मोहवून टाकणारी उन्मादकता या श्रावणात आहे. आंतरमनाला भुरळ पाडून पिसे लावणारी किमया आहे. तासन् तास हे लावण्य पहावं आणि हळूवार हातांनी मऊशार रेशीम कुरवाळावं तितकच मादक मदोन्मत्त होऊन ते लुटावं इतकी नशा या श्रावणात आहे. या पुरुषी श्रावणाची अवनी केंव्हापासून चातकासारखी वाट बघते. वचन दिल्याप्रमाणे श्रावण धरतीला भेटायला येतो आणि नटूनथटून, गळयात साज घालून नवयुवतीसारखी सजते, आनंदाने बहरते. श्रावण आणि धरतीचं मिलन होतं नि धरतीवरच्या नव्या अंकुराना कोंब येतात. संस्कृती जोपासणारा आणि संस्कृतीचं संवर्धन करणारा हा श्रावण पूर्वजांचं स्मरण करतो. मातीचं देणं लागतो. तो आपलं आगळं वेगळं महिरप घेऊनच उदयाला येतो. आपलं बावन्नखणी बिलोरी रूपडे तो उलगडून दाखवतो. धरतीवरच्या लेकरांना तो सुखावतो. आपल्यात गुंतवून ठेवतो. आत्म्याला आलेली बधिरता, मनाला आलेली मलिनता आणि शरीराची स्वच्छता श्रावण करतो, करवून घेतो.

       असा मनाला अल्हाद देणारा श्रावण प्रेमाने टपटपणाऱ्या प्राजक्तासारखा खाली सांडून धरतीशी संभाषण करतो. युगायुगाच्या ऋणानुबंधाची आठवण करून देतो पण तेवढ्यानेही धरती किती बरे सुखावते!अंगरोमांगी फुलून येते. तिच्या त्या फुललेल्या सौंदर्यात शालीनता असते, नादमयता असते. निसर्गाने कलाकुसर केलेले, विश्वकर्म्याने घडविलेले अपूर्व किमतीचे दागदागिने ती घालते. रातकिड्यांना रातराणीचे सुरेल गाणे गायला लावते. बेडकांना चौघडा वाजवायला सांगते, उंच झाडाच्या माथ्यावर डहाळीत लपून मधुर कंठाने कोकिळेला भजन गायला सांगते. लाजवाब रंगांची उधळण केलेला पिसारा उधळून ती आराधनेसाठी मोरांना थयथया नाचायला लावते. झाडाझुडपांवर वाढलेल्या लतावेलींना साज करून मंडप सजवायला सांगते. सागाच्या झाडांना तुरे हातात घेऊन उभारायला सांगते. जाईजुई  बटमोगऱ्याना फुलायला सांगते. श्रावण नटलेल्या धरतीसाठी आभाळात अधांतरी ढग चौऱ्या ढाळतात. कोवळी पहाट शुभ्र दव बनून अत्तरपाणी शिंपत असते. गडगडाट तिच्या आगमनाची आणि स्वागताची तुतारी वाजवतो. गवतफुले पाने उघडून मिटून टाळ्या वाजवितात. नानारंगी नानाछंदी फुले उमलून रंगांची उधळण करतात.

       नदीतलावातील कमळपुष्पे विनम्रतेने, भक्तीभावाने भाव व्यक्त करतात. अशा राजेशाही थाटात धरणी युवराज्ञी बनून श्रावण राज्यात राज्य करते सुखसमृद्धीची लयलूट करते. नदीनाल्याना, ओहोळांना ती आनंदाने खळाळा वाहायला लावते. कवींच्या ओठात आपल्या रसिल्या सौंदर्याचे गाणे देते. चित्रकारांना चित्रात रंग भरायला कल्पना देते. शेतकऱ्यांना मोत्याच्या किमतीचे दाणे देते. एवढे करुनही ती समर्पण भावनेनं म्हणते हे राज्य श्रावणाचं आहे. म्हणून तर भक्तीची सुरूवात श्रावणात होते.

       पशूमध्ये सिंह, पक्ष्यामध्ये मोर तसा महिन्यामध्ये श्रावण राजा असतो. चैतन्यानं फुलून आलेली धरती अंगाअंगावर हिरव्या पानांचे तोरण बेंदूर सणालाच बांधून घेते. नारळी पौर्णिमेला सागराला सामावून घेते. बृहस्पतीची पादपूजा करते. मानाच्या गणपतीला वंदन करत गौरीला साकार करते.

       असा हा श्रावण मनात उदबत्तीसारखा दरवळणारा, पहाटे पारव्यासारखा घुमणारा, मंदिरातील घंटीसारखा निनादणारा, मनाच्या अंतरनादातील भावनांना नित्य नवे संदर्भ देणारा, ऋणानुबंधाच्या धाग्याना जवळ करणारा, जीवनभरच्या आठवणींना साठवणारा हा. सुंदर श्रावण मनाच्या अंगणात पिंगा घालू लागतो. गंधभरल्या कंठातून प्रेमाने साद घालतो. गळालेल्या कंगोऱ्याना नवनवे, नव्या जीवनाचे कोंब आणतो. अखंड ऋतूचक्राचे हे गाणे भावभक्तीसाठी घुमत असावे. यासाठीच तर हे वर्तुळ आसाभोवती फिरत असावे.
अशा या नितांतसुंदर श्रावणाचे वर्णन किती करावे तेवढे थोडेच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा