‘दाते' होऊन पुण्य प्राप्त करा
पवित्र कुरआनमध्ये अनेक ठिकाणी गरिबांना जेवण देण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्यात आले आहे. मुस्लिम समाजातील गरीब लोकांच्या गरजा भागविण्यासाठी आणि त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा पुरविण्यासाठी श्रीमंत लोकांना उत्तेजित करण्यात आले आहे.
विविध उपासनांच्या दरम्यान माणसाच्या हातून कांही चुका घडतात. उदाहरणार्थ, रमजानच्या महिन्यात कुणी जाणूनबुजून वेळेच्या आधी उपवास सोडला किंवा उपवास राखलाच नाही अशा व्यक्तीला शिक्षा म्हणून सतत ६० दिवसांचे उपवास राखण्याचे आदेश आहेत. असे करतांना एकही खाडा झाला तर पुन्हा एकपासून साठपर्यंत उपवास करावेत. एखाद्या व्यक्तिला आरोग्याच्या दृष्टीने असे करणे जमत नसेल तर अशा व्यक्ति साठ गरिबांना दोन वेळचे पोटभर जेवण द्यावे. यालाच 'कफ्फारा' म्हणजेच परतफेड असे म्हणतात.
तात्पर्य असे की, कुठल्या ना कुठल्या पध्दतीने लोक देणारे बनावेत. फक्त घेणारी माणसे समाजाला घातक ठरतात आणि त्यांच्यामुळेच केवळ समाजाच नव्हे तर संपूर्ण देश आणि संपूर्ण संस्कृतीचा अस्त होतो. या दृष्टीकोनातून आपल्या समाजाचे विश्लेषण केले तर दिसून येईल की घेणारे हात अधिक आहेत, देणारे कमी आहेत. म्हणूनच या पवित्र रमजान महिन्यात गोरगरिबांना सढळ हाताने मदत करा व सवाब (फळ) मिळवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा