रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

गोड आठवणी पत्रांच्या - विशेष मराठी लेख


दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त पत्रांच्या कांही गोड आठवणी.


गोड आठवणी पत्रांच्या

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गूगल


       आज विज्ञान तंत्रज्ञानानं इतकी झपाट्याने प्रगती केली आहे की अवघं जग जवळ आलं आहे. एका क्लिकवर जगातील ज्ञान भांडार खुलं झालं आहे. एवढ्याशा जादूमयी, छोटेखानी, चपट्या बॉक्समधून म्हणजेच लाडक्या मोबाईलमधून जगातील कोणत्याही व्यक्तीशी सहज संपर्क आपण साधू शकतो, त्याला पाहू शकतो, त्याला मेसेज पाठवू शकतो, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आपल्या घरातच बसून करू शकतो. ही प्रगती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. हे सर्वांना मान्यच करावे लागेल. आज ई-मेल, फेसबुक, व्हाटस् अप्, एस्. एम्. एस्, ट्विटर या सर्व माध्यमातून सगळे एकमेकांच्या जवळ आले आहेत पण इतक्या जवळ येऊनही मनाने जवळ आलोत का? हा प्रश्न आत्मचिंतनाचा आहे हे मात्र खरे.


      पूर्वी पत्रव्यवहार हे एकमेव संपर्कमाध्यम होते. हा पत्रव्यवहार करण्यात जी मजा होती ती मजा आज अभावानेच मिळते आहे. आम्ही लहान असताना सायकलवरून खाकी पोशाख घातलेला एक पोष्टमन सायंकाळी पाच वाजता यायचा कारण त्याच्याकडे टपाल वाटण्यासाठी तीन-तीन गावं असायची. आपल्या नातेवाईकांची खबरबात घेऊन येणारा पोष्टमन देवदूतच वाटायचा. तो दारात येऊन नावासह उच्चार करून पत्र हाती द्यायचा. पत्र आलं की घरातील सगळं वातावरण एकदम बदलून जायचं. त्यात एखादी गोड बातमी असेल तर मन हरखून जायचं. घरात असणारी व्यक्ती प्रथम पुन्हा पुन्हा वाचायची आणि कधी एकदा कामानिमित्त बाहेर गेलेल्या व्यक्ती घरी येतात असं तिला व्हायचं. तिनं तोंडानं सांगितलेली बातमी ऐकूनसुद्धा पत्र वाचायचा मोह आवरता यायचा नाही. पत्र वाचल्यावर घरातील सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होई. पत्रातून पुत्ररत्न कन्यारत्न झाल्याची, एखाद्याला मुलाखतीला बोलवल्याची, कुणाला नोकरीवर हजर होण्याची ऑर्डर यायची आणि दुसऱ्या दिवशी पोस्टमनची पेढे देण्यासाठी वाट पाहिली जायची गोड बातमी आणली म्हणून. पत्र प्रकरण एवढ्यावरच थांबायचे नाही, रात्री जेवताना पत्रातील मजकुरावर सामुदायिक चर्चा सत्र व्हायचे. पत्र पाठविणाऱ्याने आपली नावासह दखल घेतली, तब्येतीची विचारपूस केली आहे हे पाहून अशक्त शरीरावर मूठभर मांस चढायचं. पत्रातील मजकूर ठराविक असायचा. आम्ही इकडे खुशाल आहोत, तुम्ही सगळे कसे आहात, तुमचीच काळजी वाटते, बाकी सर्व ठीक आहे, पत्रोत्तर ताबडतोब पाठविणे, तुमच्या पत्राची आतुरतेने वाट पहात आहे. पत्रातील हे शब्द हृदयाला थेट भिडायचे. आज फोनवर अर्धा अर्धा तास बोलूनही मायेचा, जिव्हाळ्याचा स्पर्श होतो का? पत्राने तो व्हायचा. आवडलेल्या मजकुराची घरातील सगळीच मंडळी अक्षरशः पारायणं करायची. हृदयाच्या खोल कप्प्यात पत्रं जपून ठेवली जायची. भविष्यात ही पत्रं म्हणजे भावविश्वातील अनमोल खजिना ठरायची.


पत्रांच्या कांही सुंदर आठवणी:

       माझी कन्या मलिका जन्मतःच अधू होती. माझी मनःस्थिती फारच बिघडलेली होती. मी पुरती कोलमडून गेले होते. अशावेळी माझी मैत्रिण सुनंदा हिने मला एक अंतर्देशीय पत्र पाठवलं होतं. हल्ली सर्व व्याधीवर उपचार निघाले आहेत, तुमची कन्या औषधोपचारांने निश्चित बरी होईल. पत्रातील या शब्दांनी मला त्यावेळी इतका धीर दिला की मी त्याचे वर्णन करू शकत नाही.


       पेपरमध्ये, मासिकामध्ये माझे लेख नुकतेच प्रकाशित होऊ लागले होते त्यावेळी माझ्या आठ वर्षांच्या भाच्याने मला पत्र लिहिले होते. आत्या, तुला हे सगळं कसं सुचतं गं? त्याच्या या वाक्याने मला लेखनासाठी पुष्कळ बळ मिळालं.


       महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत प्रकाशित होणाऱ्या जीवन शिक्षण मासिकात माझा पहिला लेख प्रकाशित झाला, त्यावेळी संपादकांनी मला पत्रात लिहिले होते. आपण विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर हळूवार फुंकर घालणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका आहात. या शब्दांनी माझ्यातील शिक्षिकेवर जादूच केली. त्या जादूने मी अधिक उपक्रमशील बनत गेले.


      चौतीस वर्षापूर्वी माझ्या मोठ्या भावाचे हार्टचे ऑपरेशन झाले. कांही दिवसांनी तो रायगड जिल्ह्यातील नाते येथील हायस्कूलवर हजर होवून अध्यापन करू लागला. ते ठिकाण आमच्या गावापासून खूप लांब होते. तिथे त्याला फार एकटेपणा वाटू लागला. त्याने मला पत्र पाठवले की तुझ्या कवीभाषेतील एक सविस्तर पत्र पाठव म्हणजे मला थोडं बरं वाटेल. मी त्याला लिहिलं


"कृपाछत्र प्रभूचे, वात्सल्याच्या ठेवा।

भैय्या का होतोस हळवा?


 जगविख्यात डॉक्टरन,

केलं तुझं ऑपरेशन


प्रमाद प्रभूचा, प्रभूनेच सुधारला सगळा

भैय्या का होतोस हळवा?"


या पत्राने भैय्यास खूप धीर मिळाला तो त्या एकटेपणातून सावरला.


       मी माझ्या शाळेत पत्रलेखनाची प्रत्यक्ष कृती हा उपक्रम राबवला. माझ्या विद्यार्थिनी अर्चनाने तिच्या वडिलांना पत्र पाठविले. तिचे वडील इतके खूष झाले की बस्स, त्यांनी शाळेला पत्र पाठवले. हा उपक्रम खूपच छान वाटला. त्या पत्राने मला आणखी कार्यशील बनवलं.


       माझा आत्तेभाऊ उर्दू माध्यमात शिकून अकरावीत गेला होता. त्याने माझ्या काकांना पत्रात लिहिले होते, मामा मी अकरावीत गेलोय मी कोणते विष घेवू ते कळवा. ते खुलं पत्र त्यांच्या एका मित्राने वाचलं व भीतभीतच काकांच्या हातात दिलं. त्याला विषय लिहायचे होते. पत्र वाचून सर्वजण पोट धरून हसलो. अशा गमतीजमतीही पत्रातून घडत होत्या.


       मला किशोर मासिकाकडून एक पत्र आलं. ते पत्र पाहून माझ्या छातीत धस्स झालं. असं का झालं सांगते, पूर्वी एकाद्याच्या मृत्यूची बातमी द्यायची झाली तर अर्ध पत्र यायचं, अमक्या अमक्याला देवाज्ञा झाली. ईश्वर इच्छेपुढे नाईलाज। मला आलेल्या पत्रात फक्त एवढाच मजकूर होता, आपली आज्ञाधारक अरूण ही कथा प्रकाशित करण्यासाठी निवडली आहे. धस्स झालेल्या छातीत आनंदाचे उमाळे आले.


गीतातून व्यक्त झालेले पत्रप्रेम:

माहेरी आलेल्या पत्नीला पती रसभरीत पत्र पाठवायचे. पत्नी लाजून चूर व्हायची व म्हणायची


नांदायला नांदायला

मला बाई जायाचं नांदायला।

पत्र आलया रायाचं

 लिवलय मोठ्या गमतीचं।

लाज मला बाई सांगायला।

मला बाई जायचं नांदायला।


कांही कारणाने पत्नी पतीच्या नोकरीच्या गांवी जाऊ शकत नव्हती. पतीविरहाने ती व्याकुळ व्हायची आणि म्हणायची

मी मनात हसता प्रित हसे

हे गुपित कुणाला सांगू कसे।

 कांही सुचेना काय करावे

पत्र लिहू तर शब्द न ठावे।


 प्रेमपत्राची गोडी काही औरच होती. त्यामुळेच एखादी युवती पत्राला छातीशी घट्ट धरून म्हणायची


ये मेरा प्रेमपत्र पढकर,

तुम नाराज न होना।

की तुम मेरी जिंदगी हो

की तुम मेरी बंदगी हो।


तर आपल्या पत्नीच्या किंवा प्रेयसीच्या आठवणीत  पत्र लिहताना एखादा म्हणायचा


लिखे जो खत तुझे

वो तेरी याद में

हजारो रंग के

नजारे बन गए


आज कोणत्या संपर्कमाध्यमात हजारो रंगाच्या स्वप्नांचे 'नजारे' बनविण्याची शक्ती आहे?


आता पत्रांचा प्रभाव दाखविणारे एक अप्रतिम गीत पाहू या.


फूल तुम्हें भेजा है खत मे,

फूल नहीं मेरा दिल है।


या गीतातील आशय सांगून जातो की, पत्रातून मी फूल पाठवलं आहे. ते फूल नसून माझं काळीज आहे. पत्रातून अशा प्रकारे व्यक्त होणं काळजाचा ठाव घेत होतं. आता ही सोय राहिली नाही असे वाटते.


पत्र फक्त पोष्टातूनच पाठविले जात होते असे नाही तर ते  प्राण्याकडून, पक्षांकडून विशेषतः कबूतरांकडून पाठविले जायचे म्हणून एक युवती कबुतराला म्हणते


कबूतर जा..जा..जा

कबूतर जा...जा...जा...

पहले प्यारकी पहली चिठ्ठी

साजनको दे आ....


       या झाल्या गीतातून व्यक्त झालेल्या पत्र लेखनाच्या आठवणी. लष्करातील जवानांना देशाच्या सीमेवर आपल्या कुटुंबापासून दूर जाऊन लढावे लागते. आपले कर्तव्य बजावत असताना त्याला आपल्या कुटुंबाची आठवण येत असते पण त्यांना भेटणे त्याला शक्य होत नाही. अशा या वेगळ्या भावविश्वात असताना त्याला कुटुंबाकडून पाठवलेलं पत्र मिळतं. पत्र पाहून त्याला अत्यानंद होतो आणि तो म्हणतो


संदेसे आते हैं

चिठ्ठी आती है,

हमे तरसाती है।

की घर कब आओगे?

लिखो कब आओगे।


देशभक्तीने अंगावर रोमांच उभे करणारे पंकज उदास यांनी गायलेले हे गीत ऐकत असताना डोळ्यातून अश्रूधारा केंव्हा वाहू लागतात हे कळतही नाही.


चिठ्ठी आयी है,

चिठ्ठी आयी है।

बडे दिनोंके बाद

हम बेवतनोंको याद

वतनसे मिठ्ठी आयी है।


या गीतातील एका चरणात पत्राचे महत्त्व सांगताना म्हटले आहे.


पहले जब तू खत लिखता था।

कागजमें चेहरा दिखता था।


अशी ही पत्र आज दृष्टीआड झाली आहेत. आपण सर्वांनी वर्षातून एकदा तरी एकमेकांना पत्रं लिहून पत्रांच्या या सुखद आठवणी जपायला हव्यात कारण...

पत्रांची जादू लयी मोठी

सर्वा सर्वांना त्याची हाव।


५ टिप्पण्या: