गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

घटस्थापना मनमंदीरातही - विशेष मराठी लेख

 

घटस्थापना मनमंदीरातही

डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


     आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवरात्रीची सुरुवात होते. नवरात्र म्हणजे नऊ दिवस व नऊ रात्री होय. नवरात्रीच्या पूर्वी घराची, भांड्यांची, अंथरूण पांघरूणाची, कपड्यांची साफसफाई करण्याची प्रथा आहे. याला घरातील स्वच्छता अभियानचं म्हणा ना. याला वैज्ञानिक कारण असावं. पावसाळा संपत आलेला असतो. पावसामुळे घरातील भिंतीना, जमिनीला ओल आलेली असते, बुरशी साचलेली असते, ती दूर करून शेतात पिकलेल्या नव्या धान्याची साठवण स्वच्छ जागेत व्हावी हा या स्वच्छतेमागील उद्देश असावा.


       नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी वारुळाची माती आणून देव्हाऱ्याजवळ एका पत्रावळीवर पसरवली जाते. त्यात वेगवेगळी धान्ये पेरून घटस्थापना केली जाते. धान्य पेरणी करून त्याची उगवणक्षमता आजमवण्याची पूर्वजांची ही प्रयोगशीलता म्हणावी लागेल. घटस्थापना म्हणजे शेतीचे आपल्या जीवनातील महत्वपूर्ण स्थान लक्षात आणून देण्याची कल्पकता होय. मातीचा छोटासा चौथरा, त्यात नऊ धान्याची पेरणी आणि त्यावर पाणी, सुपारी, नाणं घालून मातीचा कलश, आंब्याची व खाऊची पानं कलशावर नारळासह ठेवून त्या कलशाची गंध, हळदकुंकू, चुना, काव यांची सजावट केली जाते. या नऊ दिवसात घराघरात देव्हाऱ्यात अखंड नंदादीप तेवत असतो. सजावटीसाठी झेंडूच्या फुलांचा वापर खुबीने केला जातो. त्यामुळे फारच नयनमनोहर दिसतो हा घटस्थापनेचा सोहळा.


       या नऊ दिवसात उपवास करण्याची प्रथा आहे. आरोग्यशास्त्राची जाणीव करून देणारी ही उपवासाची पद्धत आहे. पावसाळ्यानंतर आपल्या शरीरातील पचनेंद्रियांना विश्रांतीची गरज असते. ती विश्रांती मिळावी म्हणून उपवास करण्याची प्रथा असावी. उपवासाच्या कालावधीत दूध, फळे, खजूर, खोबरे खाण्याची योजना म्हणजे शरीराला अधिक पौष्टिक पदार्थ मिळावेत. पचनेंद्रियांना विश्रांती देत असताना अशक्तपणा येऊ नये हा हेतू असावा. उपवासाची ही रीत आहारशास्त्र व आरोग्य शास्त्राची साक्ष देणारी आहे.


    नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवीची पूजा बांधण्याचा उत्सव होय. आजच्या ग्लोबल जगात व चंगळवादाच्या युगातही भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्र उत्सव, विजयादशमीसारखे सण साजरे करण्याची टिकून राहिलेली मानसिकता भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी आहे. एकविसाव्या शतकात माणसाच्या जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. या पार्श्वभूमीवर या सण समारंभाचे संदर्भही थोडेसे बदलण्याचा आपण प्रयत्न करायला हवा असे मला वाटते. याचा अर्थ असा नव्हे की, जुन्या संस्कृती, परंपरा, चालीरीती पूर्णपणे बदलून टाकाव्यात. आपली संस्कृती, परंपरा, चालीरीती यांचे पूर्णपणे पालन करत नवीन संदर्भ स्विकारायला हवेत.


घरातील देव्हाऱ्यात आपण घटस्थापना करतो. त्याप्रमाणे देहमंदिरात, मनमंदिरात चांगल्या आचार विचारांची घटस्थापना करायला हवी. एका भक्तीगीतात म्हटले आहे.


देह देवाचे मंदिर, आत आत्मा पांडुरंग।


      या नवरात्रीत आपलं आरोग्य चांगले ठेवण्याचा संकल्प करु या, इतरांनाही त्यांच्या आरोग्याला जपण्याच्या सवयींबाबतीत मार्गदर्शन करु या, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यथाशक्य प्रयत्न करण्याच्या विचारांची स्थापना करु या. देवघरात धान्य तर रुजवूयाच पण त्याचबरोबर आपल्या घराच्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी एक तरी झाड लावून त्याची जोपासना पुढच्या नवरात्रीपर्यंत करून त्या इवल्याशा रोपाचे मोठे झाड करण्याचा विचार मनामनात रूजवू या. ही खरी घटस्थापना होईल. होय ना?


मनामनात स्थापन करूया घट......

आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचे।

पर्यावरणाचा समतोल राखण्याचे।

गरजूंना यथाशक्य मदत करण्याचे।


1 टिप्पणी: