बुधवार, २३ जून, २०२१

वटपौर्णिमा: विज्ञान, अध्यात्म, चिंतन - विशेष लेख

 

वटपौर्णिमा: विज्ञान, अध्यात्म, चिंतन - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       वटपौर्णिमा जवळ आली की आम्हा महिलांचा उत्साह गगनात मावेनासा होतो. भरजरी, रंगीबेरंगी साड्या नेसून, गळ्यात, कानात, हातात दागिने घालून, केसात सुंदर गजरा माळून वडाच्या झाडाची पूजा करायला जाताना स्त्रियांचा आनंद दुथडी भरून वहात असतो. पूजेची थाळी, थाळीत टपोरी फुले, टवटवीत फळे, दोऱ्याची मोठ्ठी गुंडी हातात घेऊन जाताना ती खूपच आनंदून जाते. सर्व स्त्रिया वडाच्या झाडाभोवती गोळा होतात. भक्तिभावाने झाडाभोवती प्रदक्षिणा घालतात. झाडाला दोरा गुंडाळून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, पतीला उदंड आयुष्य मिळू दे, स्वतःला सवाष्ण मरण येवू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतात. कांही स्त्रिया सोयीप्रमाणे वडाच्या झाडाची फांदी आणून किंवा पाटीवर, वहीवर वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करतात.


हा सण का साजरा केला जातो?.....

पौराणिक कथा:

       सावित्री राजर्षि अश्वपति यांची एकुलती एक कन्या होती. सावित्रीने वनवासी राजा द्युमत्सेन यांचे चिरंजीव सत्यवान याची पती म्हणून निवड केली. त्यानंतर नारद ऋषींनी तिला सत्यवान अल्पायुषी असल्याचे सांगितले. हे ऐकूनही सावित्री आपल्या निर्णयापासून जराही विचलित झाली नाही. तिने सर्व राजवैभवाचा त्याग केला. सत्यवान आणि त्याच्या कुटुंबियांची सेवा करत ती जंगलात राहू लागली. ज्या दिवशी सत्यवानाच्या महाप्रयाणाचा दिवस होता, त्या दिवशी लाकडे गोळा करून आणण्यासाठी तो  जंगलात गेला होता. त्या ठिकाणी सत्यवान मूर्च्छित होऊन पडला. त्याचवेळी यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले. तीन दिवसापासून उपवासात असलेली सावित्री हे सर्व जाणून होती. त्यामुळे व्याकुळ न होता सत्यवानाचे प्राण न घेण्याविषयी तिने यमराजांकडे प्रार्थना केली परंतु यमराजांनी ऐकले नाही. तेंव्हा सावित्री त्यांच्या मागे जाऊ लागली. अनेक वेळा विनंती करूनही सावित्री मागे फिरली नाही. सावित्रीचे हे धाडस आणि त्याग पाहून यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी सावित्रीला तीन वर मागायला सांगितले. सावित्रीने सत्यवानाच्या नेत्रहीन मातापित्यांसाठी दृष्टी मागितली. दुसऱ्या वराने त्यांचे गेलेले राज्य मागितले आणि तिसऱ्या वराने तिने स्वतःसाठी शंभर पुत्रांचे वरदान मागितले. यमराज तथास्तु म्हणाले. नंतर त्यांच्या लक्षात आले की आता सत्यवानाला आपल्या बरोबर नेणे शक्य नाही. यमराजांनी सावित्रीला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिला आणि सत्यवानास तिथेच सोडून तेथून ते अंतर्धान पावले. त्यावेळी सावित्री आपल्या पतीला घेऊन वडाच्या झाडाखाली बसली होती म्हणून महिला आपल्या पतीसाठी आणि परिवारातील सदस्यांसाठी दीर्घायुष्य मिळावे म्हणून भक्तिभावाने वडाची पूजा करतात.


माझा वैज्ञानिक अंदाज:

       सावित्री जेंव्हा मूर्च्छित झालेल्या सत्यवानाला घेऊन वडाच्या झाडाखाली बसली होती तेंव्हा सत्यवानाला वडाच्या झाडापासून मुबलक प्रमाणात मिळणारा ऑक्सिजन मिळाला असावा आणि त्यामुळेच त्याची मूर्च्छा जाऊन त्याच्या जिवात जीव आला असावा.


वडाची पूजा करण्यामागील वैज्ञानिक व सामाजिक दृष्टीकोन:

       पूर्वी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची संधी मिळत नव्हती. चूल नि मूल हेच तिचे विश्व होते. या सणाच्या निमित्ताने घराबाहेर पडून कांहीं वेळ मोकळ्या हवेत घालविता यावा, वडापासून मुबलक प्रमाणात मिळणारा ऑक्सिजन तिला घेता यावा, हा सण आयोजकांचा हेतू असावा. वडपूजेच्या निमित्ताने त्या झाडाभोवतीचा परिसर स्वच्छ होतो. आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची संधी त्यामुळे मिळते. सणांच्या निमित्ताने उपवास केला जातो त्यामुळे पचनेंद्रियाना विश्रांती मिळते. विविध प्रकारच्या फळांचा आस्वाद घेता येतो हेच सणांचे प्रयोजन असावे. शिवाय सर्व मैत्रिणीना एकत्र येण्याची संधी ही मिळते. गप्पा गोष्टी करता येतात.


वटपौर्णिमेत आधुनिकता:

       सद्याच्या परिस्थितीत वटपौर्णिमा साजरी करताना त्यात थोडी आधुनिकता आणता येईल. पूजा जरुर करावी पण वडाच्या झाडाचे रोप लावून त्याचे संगोपन करून, त्याला मोठं करुन पर्यावरण संतुलनाची सामाजिक जबाबदारीही पार पाडता येईल. पूजा झाल्यावर फक्त भटजींना फळे न देता अनाथाश्रमातील किंवा वृद्धाश्रमातील गरजूंना द्यावीत. झाडाभोवती दोरा गुंडाळून वाया न घालवता गरजूंना देता येईल ज्यामुळे फाटलेली वस्त्रे, दुभंगलेली मने सांधली जातील.


वडाच्या झाडाविषयीची शास्त्रीय माहिती:

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाविषयीची शास्त्रीय माहिती घेणे उचित ठरेल.

  • पूर्ण वाढलेले एक वडाचे झाड एका तासाला साधारण ७१२ किलो इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडते.
  • वडाच्या झाडाखाली तुम्ही जितक्या जास्त वेळ बसता तितका जास्त वेळ तुमच्या शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन तुम्हाला मिळतो.
  • वडाच्या फांदी, पारंबी व पानामधूही नवीन वटवृक्ष जन्माला येतो म्हणून याला अक्षयवड म्हणतात.
  • वडाच्या झाडाची उंची तीस मीटरपर्यंत असते. हे झाड सदापर्णी आहे. कधीच सुकत नाही.
  • वडाच्या काटक्यांचा उपयोग होम हवनामध्ये आणि यज्ञामध्ये समीधा म्हणून करण्यात येतो.


वडाच्या झाडाचे औषधी उपयोग:

  • वडाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे.
  • विंचवाचे विष उतरविण्यासाठी आणि पायावर भिंगरी अथवा चिखल्या झाल्यास वडाचा चीक उपयुक्त ठरतो.
  • लचक भरल्यास किंवा सांधेदुखी झाल्यास वडाची पाने गरम करून लावल्यास उपयोग होतो.
  • पोटात जंत झाल्यास अथवा अतिसार झाल्यास वडाचे कोवळे अंकुर वाटून लावल्यास गुण येतो.
  • चेहरा उजळण्यासाठी वडाची पाने उपयुक्त आहेत.
  • कानाच्या समस्येवर वडाचा चीक व मोहरीचे तेल मिक्स करून कानामध्ये घातल्यास कानातील किटाणू मरतात.
  • वडाच्या पानांची राख केसांच्या समस्येवर उपयुक्त आहे.
  • वडाची मुळे नाकातून येणारे रक्त थांबविण्यासाठी उपयुक्त आहे. 
  • वडाच्या सालीची पावडर दातांच्या समस्येवर उपयोगी आहे. 
  • वडाच्या बियांची पावडर मूत्रविकारावर उपयुक्त आहे.
  • वडाच्या झाडाचा उपयोग मळमळ दूर करण्यासाठी, डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी, भाजलेल्या जागी लावण्यासाठी, रक्तस्त्राव थांबविण्यासाठीही होतो.

वडाच्या झाडाचे विविध उपयोग लक्षात घेता त्याला मानवाला ईश्वराकडून मिळालेले अमूल्य वरदान  म्हणता येईल.


माझी एक शंका:

       वडाला प्रदक्षिणा घालून सात जन्मी नव्हे तर जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते पण नवरोबांना चेंज हवा असेल तर देवबाप्पा कुणाचे ऐकणार? महिला भगिनींच्याकडून देवबाप्पाकडे अखंड सौभाग्याची मागणी केली जाते. ही मागणी पूर्ण करायची म्हणजे महिला प्रथम निधन पावणार मग दुसऱ्या जन्मी नवऱ्यापेक्षा ती मोठी नाही का होणार? मग तिला तोच पती कसा बरे मिळणार ? 

सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!