'पवित्र कुरआन' चे अवतरण
रमजान महिन्याला कुरआनचा महिनाही म्हणतात, कारण या महिन्यातच कुरआनचे आकाशातून पृथ्वीतलावर अवतरण झाले. या महिन्यातच पैगंबरसाहेब जास्तीत जास्त या ग्रंथाचे पठण करायचे आणि तसे करण्याचे आदेशही आपल्या सिहबींना (सोबत्यांना) द्यायचे. रमजानच्या महिन्यातच ईश्वराचे सर्वात प्रतिष्ठित दूत हजरत जिब्राईल अलैहिस्सलाम प्रेषित साहेबांच्या सेवेत येऊन त्यांनी मुखोद्गत केलेला कुरआन ऐकून घ्यायचे. प्रेषित साहेबांच्या जीवनातील अंतिम रमजानच्या महिन्यात याच ईशदूताने त्यांच्याकडून दोनदा कुरआन ऐकून घेतले. तसेच पैगंबर साहेबांनी आपल्या सर्व सोबतियांकडून त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथाची सुनावणी करवून घेतली. त्यामुळे सर्व मसुदे आणि लोकांकडे उपलब्ध प्रती दोषमुक्त झाल्या. त्याच मसुद्यावरून इस्लामचे तिसरे सन्मार्गी खलिफा हजरत उस्मान (र.) यांनी सात प्रती एक तज्ज्ञ मंडळ नेमून त्यांच्या देखरेखीखाली तयार करून घेतल्या. आजही त्यापैकी पाच प्रती जगातील पाच मुस्लिमेतर राष्ट्रामधून उपलब्ध आहेत.
रमजानच्या महिन्यात प्रत्येक मशिदीतून रात्रीच्या ईशाच्या नमाजनंतर एक ते दीड तास 'तरावीह' ची जादा नमाज पढली जाते. त्या नमाजमध्ये पवित्र कुरआनचे तीस खंड सत्तावीस दिवसात संपूर्णपणे नमाजी ऐकतात.