शनिवार, २४ एप्रिल, २०२१

भगवान महावीर - विशेष लेख

 

भगवान महावीर - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       भगवान महावीरांचा जन्म इ. स. पूर्व सहाव्या शतकात चैत्र शुद्ध त्रयोदशीला कुंडलपूर येथे झाला. त्यांच्या  पित्याचे नांव सिद्धार्थ व मातेचे नांव त्रिशला राणी होते. राजा सिद्धार्थ हे वैशालीचे राजे होते. त्रिशला राणी ही राजा चेढकची कन्या होती.


भगवान महावीरांची शिकवण:

अहिंसा हाच खरा धर्म आहे. कोणत्याही जीवाची हिंसा करु नका जगा आणि जगू द्या. सर्व प्राणिमात्रांवर दया करा, प्रेम करा. सर्वांशी संवाद साधा. शत्रू व मित्र सर्व आपलेच माना. संपूर्ण मानव समूह एक आहे. सर्वांच्या उदर्निवाहाची व्यवस्था करा. कुणीही उपाशी रहायला नको ही शिकवण दिली. जगात पहिल्यांदा अहिंसा धर्म कुणी सांगितला असेल तो भगवान महावीरांनीच. अहिंसेबरोबरच सत्य धर्माचे पालन करणे आवश्यक आहे असे ते सांगत. खोटे बोलणे म्हणजे सुद्धा एक प्रकारची अहिंसाच आहे, खोटे बोलण्यामुळे दुसऱ्याचे मन दुखावते त्यामुळे ती हिंसाच आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, चोरी ही सुद्धा हिंसाच आहे. दुसऱ्याचे धन हरण करणे म्हणजे दुसऱ्याचे मन दुखवणे, ती सुद्धा हिंसाच आहे. अपरिग्रह म्हणजे गरजेपुरतं धनधान्य ठेवून घेणं आणि जादाचं गरजूंना देणं.


भगवान महावीर यांच्या जन्मापूर्वीची सामाजिक परिस्थिती:

भगवान महावीरांचा कालखंड सव्वीसशेहून अधिक वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळी जिकडे तिकडे मिथ्या तत्वांचेच साम्राज्य प्रस्थापित झालेले होते. सामाजिक विषमतेला कुठलीच मर्यादा राहिली नव्हती. सामाजिक रूढी, परंपरा वैषम्याने बरबटलेल्या होत्या. स्त्रियांना शूद्राहून अधिक मोल नव्हते. शूद्रांना अतिशूद्र बनवून पशूहूनही त्यांना हीन लेखले जात  होते. पशूंना, मुक्या प्राणीमात्रांना याज्ञिकांच्या होमकुंडात बळी जावे लागे. मानव प्राण्यांचा तर स्वतःच्या अनंत शक्तीवरील विश्वास केंव्हाच उडून गेला होता. अन्यायी राजदंड आणि अनिष्ट रूढी परंपरा यामुळे सारा मानवसमूह भयाकुल व भयभीत बनला होता. थोडक्यात मिथ्यात्वाला महापूर आला होता.


       भगवान महावीर यांच्या कालखंडात देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठेमोठे यज्ञ करीत असत. यज्ञामध्ये पशूंचा बळी दिला जात असे. हे सर्व धर्माच्या नावाने करीत असत. यज्ञ करणारा यजमान क्षत्रिय आणि पूजा करणारा पुजारी हे दोघेही यथेच्छ मांसाहार करीत, सुरापान करीत. अशाने देव प्रसन्न होतो अशी त्यांची समजूत होती.


भगवान महावीरांचा जन्म, बालपण व कार्य:

मिथ्यात्वाचा महापूर दूर करण्यासाठी एका भव्य जीवाचे या पृथ्वीतलावर आगमन होत होते. कुंडलपूरच्या सिद्धार्थ राजाच्या राजवाड्यात लगबग सुरु होती. महाराणी त्रिशलेला सोळा स्वप्ने पडलेली होती आणि तिच्या पोटी एक महामानव जन्माला येणार होता. त्याच्या येण्याची तयारी सुरू होती. अत्यंत आनंदाचा सोहळा पहाण्यासाठी इंद्रादी देवसुद्धा उत्सुक होते. महाराणी त्रिशला अत्यंत आनंदात होती. सगळीकडे आनंदी आनंद होता. भव्य जीवांच्या जन्माच्या वेळी सगळी अनुकूलता असते. त्यांची पुण्याईच जबरदस्त असते. रात्रीची निरव शांतता होती. मंद वारा वहात होता. सगळी प्रजा आनंदात होती. राजकुमाराची वाट पहात सगळ्यांनी झोपेचा त्याग केला होता. महाराणी त्रिशलादेवीला प्रसव वेदनांचा  थोडासाही त्रास तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. पहाटेचा शांत चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर विराजमान झाला होता. जनतेचा उद्धारक जन्माला येणार होता. चतुर्थ काल संपून पंचमकालसुरू होण्याला अजून ७५ वर्षे तीन महिन्यांचा अवकाश होता. विश्व आनंदाने मोहरून गेले. भगवान महावीरांचा जन्मोत्सव फारच थाटामाटात साजरा झाला. अनेक नगर राज्यातील नायकांनी तर त्यात भाग घेतलाच पण स्वर्गातून देवेंद्र ही समारंभास हजर होते.


       बालकाला कुणी वर्धमान म्हणू लागले, कुणी सन्मती तर कुणी महावीर. सर्वांचा लाडका राजकुमार लहानपणापासूनच गुणी होता, निर्भय होता, विवेकी होता, धर्मशील होता. वयात आल्यावर विवाह करण्यास नम्रपणे नकार दिला.


       पहिली तीस वर्षे हा राजकुमार घरी राहून संयमाचे पालन करीत होता. आसक्ती अशी नव्हतीच. राजलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि इंद्रिय यावर त्यांनी सहजतेने लाथ मारली होती. आपल्यातच म्हणजे स्वमध्ये मग्न असणाऱ्या महावीरांनी आईवडिलांची अनुज्ञा घेऊन दिगंबरी दिक्षा घेतली. तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध दशमीचा होता. त्यांनी आपली सारी संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकली आणि ज्ञात्रु खंड वनाकडे तो निघाला. राजकुमार परिषह सहन करीत होता. घोर तपश्चर्या सुरु होती. ऊन, वारा, पाऊस, थंडी, भूकतहान यांची तमा न बाळगता त्यांची तपश्चर्या सुरु होती. तो इतका आत्ममग्न होता की जगाचं त्याला भान नव्हतं. आतील आणि बाहेरील शत्रूशी त्याचा संघर्ष सुरू होता. बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर आत्म्यात लख्ख प्रकाश पडला. सर्वकांही उजळून निघाले सर्वकांही ज्ञात झाले. केवलज्ञानाची प्राप्ती झाली. देवेंद्राना कळलं की महावीरांना केवलज्ञान झालं आहे. ते स्वर्गातून खाली आले. भगवंताना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि जय हो, जय हो अशी गर्जना केली. समवशरणाची म्हणजे सभेची रचना केली. सर्वजण आपापल्या आसनावर स्थानापन्न झाले. पशूपक्षी, मानव, राजेरजवाडे सर्व आले. पण भगवंतांचीवाणी कांही सुरु होईना. त्यावेळेस इंद्रभूती गौतम भगवान महावीरांशी वादविवाद करण्यासाठी आपल्या हजारो शिष्यांसह येत होते. आपल्या ज्ञानाचा त्यांना फार गर्व होता. समवशरणामध्ये आल्या आल्या त्यांचा अहंकार गळून पडला. भगवान महावीरांशी बातचीत झाली आणि ते त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. ते त्यांचे पहिले गणधर झाले. त्यांचे दोन भाऊही महावीरांचे शिष्य झाले. भगवंतांची वाणी सुरू झाली. गौतमांच्या मनातील अंधकार दूर झाला. भगवंतांची वाणी त्यांनी सोपी करून सांगितली.


       भगवान महावीरांची शिकवण आचरणात आणण्याचा निश्चय त्यांच्या जयंती दिनी करू या.


       अशा या थोर महामानवास कोटी कोटी प्रणाम। जय जिनेंद्र...