१४ फेब्रुवारी: व्हॅलेंटाईन्स डे - विशेष लेख
लेखिका - डॉ. ज्युबेदा तांबोळी
व्हॅलेंटाईन्स डे!
सख्याचा दिवस!
सौख्याचा दिवस!
प्रेमाची नशा ओतण्याचा दिवस!
या हृदयीचे त्या हृदयी घालण्याचा दिवस!
प्रेम म्हणजे काय असतं ?
"मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं ।
काय म्हणालात? यात वेगळं काय घडलं?
हे त्यालाच कळेल ज्याचं असं मन जडलं"
असं मंगेश पाडगावकर म्हणतात ते अगदी खरं आहे.
माणसाला ईश्वराकडून अगणित गुणांचं वरदान मिळालं आहे. त्यापैकी एक म्हणजे त्याचं हळवं मन. या हळव्या मनाच्या सरोवरात उठणारे हळुवार तरंग हीच प्रेमाची व्याख्या, जी व्यक्तीपरत्वे आणि परिस्थिती नुसार बदलत जाते. प्रेम या केवळ अडीच अक्षरी शब्दामध्ये प्रीतिचा फुलोरा फुलला जातो. मनातल्या भावना पानापानावर ओसंडाव्यात, एवढा हा तरल शब्द! प्रेम हा शब्द उच्चारताच ओठांच्या लालचुटूक पाकळ्या उमलतात आणि स्मितहास्य गालावर झळकू लागतं, जणू आवडता मोहक स्पर्श व्हावा आणि मन आनंदानं बेभान व्हावं! प्रेम मैत्रीतलं असो, नात्यातलं असो अथवा आईचं मुलावरचं असो, प्रत्येक क्षणी प्रेमाच्या फक्त भाषा बदलतील मात्र प्रेमातून पाझरणारा हा प्रीतरस भावनेच्या अत्युच्च टोकास जाऊन बसतो. त्यात दिसते ती निःस्वार्थ निरागस आणि निस्सीम माया. त्यासाठी ठराविक दिवसाची, ठराविक वेळेची गरज नाही.
प्रेमात आणि युद्धात सारे अपराध क्षम्य असतात असे कुणी म्हटले आहे पण हे म्हणताना प्रेमाबरोबर युद्धाची निवड का बरे केली असेल? कारण दोन्ही गोष्टीत धाडसाची गरज असते. प्रेमभावना व्यक्त करतांना नकार पचविण्याची आणि युद्धभूमीवर मरणाला सामोरं जाण्याची तयारी असावी लागते.
रामाला न पाहताही, रामावर प्रेम करणारी, हेच ते चरण अनंताचे असे म्हणणारी, रामहृदयावर प्रेम करणारी वैदेही जानकी किती भाग्यवान होती नाही!
One unlucky man says
Love is
L - Lake of tears
O - Ocean of Sarrow
V - Valley of death
E - End of life
पण या बाबतीत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असावा.
व्हॅलेंटाईन्स डे ची पार्श्वभूमी:
इंग्रजी भाषेतील कांही ज्ञानकोशात व्हॅलेंटाईन नावाचा एक संत होता असे म्हटले आहे. संत व्हॅलेंटाईन हा रोमचा प्रिस्ट होता तर दुसरा व्हॅलेंटाईन लेर्नी प्रांताचा बिशप होता. त्याचा १४ फेब्रुवारी हा मृत्यूदिन आहे.
प्रेमाच्या राज्यात एडवर्ड याचे नांव प्रेमिक प्रातःसमयी घेतात. वाँलिस सिमसन हिने प्रेम मिळविण्याची किमया कशी केली ते पहा......
राजा एडवर्ड इंग्लंडच्या मुकूटाचा वारस होता. त्याला लग्नाचा आग्रह होत होता. त्याच्या पायाशी युरोपमधील राजकीय पुढाऱ्यांंनी देशोदेशीच्या बहुश्रुता रूपसुंदरी आणून उभ्या केल्या परंतु राजमुकुटाचा लोभ त्याला आपल्या प्रेमापेक्षा जास्त महत्वाचा वाटला.
सातत्य आणि पाठपुरावा या दोन गुणांच्या जोरावर वाँलिस सिमसन ने एडवर्डचे प्रेम संपादन केले. त्यासाठी जगातील एक राज्य तिने हादरवून टाकले. सर्वसाधारणपणे ज्याला प्रौढ वय म्हणतात त्या वयात तिने राजा एडवर्ड चे प्रेम मिळविले. राजा एडवर्ड ने आपल्याला हव्या असलेल्या स्त्रीसाठी राजत्याग केला. सुमारे चाळीस वर्षे राजमुकूटामुळे त्याला मुक्त जीवन जगता आले नव्हते. त्याने जाहीरपणे प्रीतिचा निर्णय घेतला. वस्तुतः त्याला राजमुकूट आणि वाँलिस सिमसनचे छुपे प्रेम त्याला मिळविता आले असते. पण त्याने तसे न करता प्रेमत्रुप्तीचा मार्ग धरला.
व्हॅलेंटाईन्स डे: अस्सल स्वदेशी अपभ्रंश
कांही वेदशास्त्रसंपन्न महाभारतकालीन इतिहासावर अध्ययन करणारे पंडीत म्हणतात, विलातिना हे रूक्मिणीचे पाळण्यातील नांव. रूक्मिणीने घरात कुणाला कळू नये म्हणून कृष्णाला लिहिलेल्या पत्रावर सदैव तुझीच, विलातिना असे लिहिले होते. तिला घरात रूक्मिणी या नावाने ओळखत असत. त्यामुळे पत्र कुणाला सापडले तरी रूक्मिणीचा कुणालाही संशय नव्हता. श्रीकृष्णाने विलातिना म्हणजेच रूक्मिणी हे तात्काळ ओळखून रथ तिच्या घरापाशी नेला. आपण तिला हाक मारत आहोत हे कुणाला कळू नये म्हणून कृष्णाने कोड लँग्वेज वापरून तिला पाचारण केले. त्यामुळे व्हॅलेंटाईन हा कुणा पाश्चिमात्याने केलेला अपभ्रंश नसून तो अस्सल स्वदेशी अपभ्रंश आहे असे संशोधकांनी सिद्ध केल्याचे समजते.
सध्यःस्थिती:
आजच्या भावनाहीन जगात शून्य मनानं जगणाऱ्या माणसांना भररस्त्यात तरुणीवरचा बलात्कार किंवा हल्ला हा चेष्टेचा विषय असतो. कुणाच्याही अंगात क्रोधाचं रक्त सळसळत नाही. आज सगळीकडे जाणिवेची कमतरता दिसत आहे, तिथे प्रेमातला गोडवा काय कळणार? पावला-पावलावर डोकं सुन्न करणाऱ्या घटना आढळतात त्या सर्व आपण टाळू शकत नाही हे खरे पण त्या कमी करण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो हे निश्चित!
माझ्या सर्व रसिक वाचक बंधू भगिनींना व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा ।