सोमवार, ११ जानेवारी, २०२१

युवकांचे दीपस्तंभ: स्वामी विवेकानंद - विशेष लेख

 

युवकांचे दीपस्तंभ: स्वामी विवेकानंद - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       युवकच राष्ट्राची उभारणी करू शकतात. युवक राष्ट्राची खरी संपत्ती होय, असा ठाम विश्वास बाळगणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची आज १२ जानेवारी ही जयंती. आज राष्ट्रीय युवक दिन म्हणूनही साजरा केला जातो.


       "कर्तव्य कोणतेही असो त्याची उपेक्षा करु नये, एखादा मनुष्य हलके काम करीत असेल तर तेवढ्यानेच तो हलका होतो असे नाही. मनुष्य काम कोणते करतो यावरून त्याची परीक्षा न करता तो कसे करतो हे पहावे. त्याची रीत, आकलन शक्ती हीच त्याची खरी कसोटी होय. साऱ्या आयुष्यभर मूर्खपणाची बडबड करणाऱ्या एखाद्या पढिक पंडीतापेक्षा थोड्या वेळात सुंदर व टिकाऊ जोडा तयार करणाऱ्या चर्मकाराची योग्यता अधिक आहे" असे प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या आधुनिक काळातील एक महान विचारवंत स्वामी विवेकानंद जगविख्यात आहेत.


       स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे मूळ नांव नरेंद्र असे होते. त्यांच्या वडिलांचे नांव विश्वनाथ व आईचे नांव भुवनेश्वरीदेवी असे होते. विश्वनाथ दत्त हे व्यवसायाने वकील होते. विवेकानंद हे लहानपणापासून चिंतनशील होते. त्यांचे शिक्षण कलकत्ता येथे झाले. इ. स. १८८४ मध्ये ते बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. कलकत्ता विद्यापीठात त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केला. शालेय जीवनात त्यांच्यावर पाश्चात्य विचारांचा प्रभाव होता. त्यांनी स्पेनर, मील, कान्ट, हेगेल, प्लेटो, अरिस्टॉटल इत्यादी विचारवंतांच्या जीवनाचा आणि तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. ते प्रतिभावंत विद्यार्थी होते.


       महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते ब्राम्हो समाजाकडे आकर्षित झाले. ब्राम्हो समाजाचे एक प्रख्यात नेते केशवचंद्र सेन यांच्या सुधारणावादी विचारांचा विवेकानंद यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे मूर्तीपूजा व बहुदेव वादावर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता. इ. स. १८८१ मध्ये स्वामी विवेकानंद यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. कांही दिवस विचार, तपश्चर्या, चर्चा यात घालविल्यानंतर आणि मनाचे पूर्ण समाधान झाल्यानंतर त्यांनी स्वतःला रामकृष्ण परमहंस यांना समर्पित केले. रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या तपश्चर्येने तेज आणि दिव्य दृष्टी नरेंद्रला देवून त्यांचे नांव विवेकानंद असे ठेवले. त्यांच्या सहवासात राहिल्याने विवेकानंद यांच्या पूर्वीच्या विचारात बदल घडून आला आणि ते सनातन हिंदू धर्म व त्याचे अद्वैत तत्त्वज्ञान यांचे समर्थक बनले.


       १५ ऑगस्ट १८८६ रोजी रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले. त्यानंतर विवेकानंदानी संन्यास धर्माचा स्विकार केला. त्यांनी देशातील विविध भागात प्रवास करण्यास सुरूवात केली. आपल्या शिष्यांना घेऊन त्यांनी कलकत्ता येथे १ मे १८८७ रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. इ. स. १८८८ ते १८९३ या काळात ते अज्ञातवासात होते. म्हणजे कुणालाही काहीही न सांगता त्यांनी भारतीय परिस्थितीचा जवळून अभ्यास केला. आपल्या देशाची व देशबांधवांची एकंदर स्थिती समजावून घेतली. लोकांचे दारिद्रय व अज्ञान पाहून विवेकानंद यांचे मन अतिशय कळवळले.


       ११ सप्टेंबर १८९३ दिवस जगातील धर्माच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवला गेला कारण याच दिवशी पौर्वात्य व पाश्चिमात्त्य विचारांचे अमेरिकेच्या भूमीवर मीलन झाले. याच दिवशी विश्वबंधुत्त्वाचा शुभारंभ झाला. अमेरिकेतील शिकागो या शहरी जागतिक धर्मपरिषद भरली होती. या परिषदेत विवेकानंदानी हिंदू धर्माची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली. आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या 'बंधू भगिनींनो' अशी करून उपस्थित श्रोत्यांच्या हृदयात हात घातला आणि आपल्या विद्वत्तेच्या तेजाने सर्वांना दिपवून टाकले. विवेकानंदांच्या त्या संबोधनात विश्वबंधुत्वाचे बीज होते, विश्वमानवतेचा झंकार होता. विश्वमानवतेचे बीज स्वामी विवेकानंदांनीच शिकागो धर्मपरिषदेत प्रथम पेरले होते. शिकागो येथील धर्मपरिषदेतील त्यांचे भाषण, विचार आणि तत्वज्ञान श्रेष्ठ ठरले होते. दी न्यूयार्क हेराल्ड या वर्तमानपत्राने त्यावेळी लिहिले होते की, धर्म संसदेतील सर्वात महान व्यक्ती म्हणजे विवेकानंद होय. त्यांचे व्याख्यान ऐकल्यावर आम्हाला चांगले कळून आले की, भारतासारख्या ज्ञानसंपन्न देशात सुधारण्यासाठी ख्रिस्ती धर्म प्रचारक पाठविणे हा निव्वळ मूर्खपणा आहे.


       स्वामी विवेकानंद हे धार्मिक असहिष्णुता, सामाजिक मागासलेपणा, स्त्रियांची गुलामगिरी, गरिबी यांच्या विरोधात होते. त्यांनी विविधतेतील एकता या तत्वाचा पुरस्कार केला. भारतीय प्रबोधनाच्या चळवळीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडीत जवाहरलाल नेहरु या नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात जी भूमिका बजावली तिच्या मागे स्वामी विवेकानंद यांचीच प्रेरणा होती. त्यांच्या ओजस्वी वाणीने भारतातील लोकांत सर्वत्र चैतन्य संचारले. त्यांनी युवाशक्तीला प्रेरणा व दिशा दिली. जनता जागृत झाली. युवकांचे ते दीपस्तंभ होते. स्वामी विवेकानंद हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रमुख प्रेरणास्तोत्र होते. त्यांनी भारतीय जनतेला राष्ट्रभक्ती व देशाभिमानाचे धडे दिले. आपले राष्ट्र सामर्थ्यवान बनावे ही त्यांची इच्छा होती. अशा या महान महामानवाने ४ जुलै १९०२ रोजी बेलूर मठात देहत्याग केला. 


       शेवटी स्वामी विवेकानंद यांचे जीवन तत्वज्ञान समजावून घेऊ या कारण हे तत्वज्ञान आपणास फारच उपयुक्त ठरेल. व्यक्तीचे चारित्र्य त्याच्या विचारावर अवलंबून असते. सुखमय प्रसंगापेक्षा दुःखमय प्रसंगाने व श्रीमंतीपेक्षा गरिबीमध्ये व्यक्तीच्या मनामध्ये अधिक चांगले व प्रेरणा देणारे संस्कार निर्माण होतात. परमेश्वराची सतत आठवण रहावी यासाठी कुंतीने श्रीकृष्णाजवळ सुखाची किंवा श्रीमंतीची मागणी न करता दुःखाचीच मागणी केली. पराच्या गादीवर लोळून केवळ ऐष आरामात जीवन कंठणाऱ्यापैकी फार थोडे लोक आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास करतात असे इतिहास म्हणतो. दुःखाची व हालअपेष्टांची वादळ सोसल्यानंतरच आणि निराशेच्या अंधकारातून कर्तव्याची व आत्मविश्वाससाची काठी टेकीत प्रवास करणाऱ्यास आत्मोन्नतीचा मार्ग सापडतो. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी आपण त्यांच्या या तत्वज्ञानाचा अंगिकार करू या हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल आणि त्यामुळे आपणही सुखी होऊ.